नोंद ठेवावी असे

सायली काळे 
सोमवार, 25 जानेवारी 2021

स्पर्धा परिक्षा    
स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

संरक्षण
तेजस विमानांची खरेदी

 • भारत संरक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठा स्वदेशी करार करणार आहे. यासाठी १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या संरक्षण समितीने हिरवा कंदील दाखवला.
 • या करारान्वये भारत सरकार व भारतीय वायुसेना हिंदुस्थान एरॉनॉटिक्सकडून LCA MK1A
 • या प्रकारातील ७३ लढाऊ तर १० प्रशिक्षण विमाने तब्बल साडेसहा अब्ज डॉलर्सना विकत घेणार आहे.
 • करार लागू झाल्यापासून पुढील १८ महिन्यांमध्ये या विमानांची निर्मिती होणार आहे. निर्मिती वेळेत पूर्ण होण्यासाठी नाशिक व बंगळूर युनिटवरही काम होणार आहे.
 • तेजसच्या MK 1 मध्ये ५० टक्के तंत्रज्ञान स्वदेशी होते, तर नवी आवृत्ती असणाऱ्या MK 1A मध्ये हे प्रमाण ६० टक्के इतके असणार आहे.
 • ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाच्या अंतर्गत केलेल्या या कराराच्या यशानंतर भारत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाचा महत्त्वाचा टप्पा पार करू शकणार आहे.

आंतरराष्ट्रीय

मुक्त गगनविहार करारातून रशिया बाहेर 

 • मुक्त गगनविहार करारातून (Open Skies Treaty) बाहेर पडण्याची घोषणा रशिया लवकरच करणार असल्याचे वृत्त अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तांकनांतून १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाले.
 • या करारान्वये सभासद राष्ट्रांना एकमेकांच्या सीमेत निःशस्त्र टेहळणी विमानातून विहार करण्याची परवानगी आहे.  
 • रशियन विमानांच्या टेहळणीवर संशय घेत मागील वर्षी मे महिन्यात ट्रम्प सरकारने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला व नोव्हेंबर २०२० पर्यंत त्याची अंमलबजावणीदेखील केली. 
 • यानंतर करारातून बाहेर पडूनही मित्र राष्ट्रांमार्फत अमेरिकेची टेहळणी आपल्या सीमेत चालूच राहील, या कारणास्तव रशियासुद्धा या करारातून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. 
 • रशियाने या निर्णयाची घोषणा केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन रशियास करारमुक्त होण्यास सहा महिने लागतील.
 • २००२ साली लागू झालेल्या या करारात सुमारे ३४ देशांचा सहभाग होता.

भारत-नेपाळ संबंध : कालापाणी सीमावाद 

 • सोळा जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या भारत-नेपाळ बैठकीत नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांनी अतिशय जुना कालापाणी सीमावाद पुन्हा ऐरणीवर आणला. 
 • त्यांच्या मते १९८१ पासून नेपाळने त्यांच्या देशाची सीमा आखणी व नकाशाचा आराखडा यावर काम सुरू केले आहे, मात्र कालापाणी (काली नदीचा परिसर) आणि सुस्त या दोन्ही भागातील काम आजतागायत अपूर्ण राहिले आहे.
 • या बैठकीत भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला होता.
 • नेपाळने २०१९ साली नोव्हेंबर महिन्यात आपला नवा राजकीय नकाशा तयार करताना कालापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिठोरागढ जिल्ह्याच्या भागास नेपाळच्या सीमेत समाविष्ट केले होते; त्यानंतर प्रथमच नेपाळने हा सीमावाद उकरून काढला आहे.
 • सीमाप्रश्न हा परराष्ट्र सचिवालयाचे अंतर्गत येत असल्याने या आयोग पातळीवरील बैठकीत त्यावर तोडगा काढण्यास भारताने नकार दिला.

खनिजसंपत्ती

भारतात लिथियमची खाण

 • अणुऊर्जा विभागाची शाखा असणाऱ्या ‘आण्विक खनिज संशोधन मंडळा’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ११ जानेवारी रोजी कर्नाटकातील मंड्य जिल्ह्यामध्ये लिथियमच्या खाणी सापडल्या आहेत. 
 • लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स तसेच विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये आवश्यक असणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या या आम्लारी धातूच्या अधिक संशोधनार्थ शासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
 • मंड्य जिल्ह्याच्या मार्लागल्ला-अल्लापटना भागातील अग्निज खडकात सुमारे १६०० टन लिथियमचा साठा असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात दिसून आले आहे.
 • या खाणीतील लिथियमचे प्रमाण हे अतिशय अल्प असले तरीही देशात त्याचा साठा मिळणे व अग्निज खडकांतून त्याचा उपसा करणे हे एक यश असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
 • सद्यःस्थितीत भारतास लागणारे सर्व लिथियम व त्यावर आधारित बॅटरी यांची केवळ आयात होत असून यासाठी मुख्यतः चीनवर अवलंबून राहावे लागते.
 • कर्नाटकातील खाणीत मिळालेले लिथियमचे अत्यल्प प्रमाण पाहता, या धातूची आयात थांबवून भारत त्वरित आत्मनिर्भर होईल अशी परिस्थिती नसली, तरी गुजरात, मध्यप्रदेश याशिवाय राजस्थान आणि ओडिशाच्या अभ्रक पट्ट्यात लिथियमच्या खाणी शोधण्याचे काम चालू आहे. 
 • जगातील लिथियमचे मोठे साठे : बोलिव्हिया (२१० लाख टन), अर्जेंटिना (१७० लाख टन), ऑस्ट्रेलिया (६३ लाख टन) आणि चीन (४५ लाख टन)

भारतात व्हॅनेडियमची खाण 

 • पोलाद आणि टायटॅनियम यांना मजबुती देणाऱ्या मौल्यवान अशा व्हॅनेडियम नामक धातू वर्गातील खनिजांचे साठे अरुणाचल प्रदेशात असण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
 • याबाबतचे संशोधन जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत केले जात आहे. पूर्व हिमालयी भागातील या साठ्यांचे नेमके ठिकाण थोड्याच काळात समजू शकेल असे भूवैझानिकांचे म्हणणे आहे.
 • अरुणाचल प्रदेशमध्ये पापुम पारे जिल्ह्यातील डेपो आणि तमांग या भागातील पुरातन खडकांच्या सुमारे सहा किलोमीटरच्या पट्ट्यात हे साठे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 • सर्व प्रकारच्या वातावरणात टिकाव धरणारा व्हॅनेडियम हा गंजमुक्त धातू आहे. हा धातू पोलादामध्ये मिसळल्यास पोलादाची तन्यता वाढत असल्याने मोठमोठे पूल, इमारती, बोगदे यांच्या बांधकामास हा धातू अतिशय उपयोगी ठरणारा आहे.
 • शस्त्रास्त्र निर्मितीत आवश्यक असणाऱ्या या धातूच्या वापरात भारत अग्रस्थानी असूनही उत्पादनात मात्र मागे आहे.
 • भारतात लोह खाणीतील व्हॅनेडिफेरस मॅग्नेटाईट या अशुद्धीपासून जोड उत्पादन म्हणून व्हॅनेडियम मिळते.
 • जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार २०१७ या वर्षात जागतिक पातळीवर ८४ हजार मॅट्रिक टन व्हॅनेडियमचे उत्पादन झाले असून भारताला त्यापैकी केवळ चार टक्के धातूचा लाभ झाला. 
 • जगातील ५७ टक्के व्हॅनेडियमचे उत्पादन चीनमध्ये होत असून त्यापैकी ४४ टक्के व्हॅनेडियम चीनमध्येच वापरले जाते.
 • जगातील व्हॅनेडियमचे मोठे साठे : चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका

पर्यावरण
जुको दरीतील वणवा आटोक्यात 

 • नागालँड व मणिपूर या राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या निसर्गसंपन्न अशा जुको नामक दरीतील जंगलात लागलेला वणवा शमविण्यास १२ जानेवारी रोजी यश आले. 
 • तब्बल दोन आठवडे पेटता असलेला हा वणवा विझविण्याचे काम भारतीय वायुसेना आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल यांनी एकत्र येऊन केले. 
 • या कामी भारतीय वायुसेनेची Mi17 V5 प्रकारातील चार सुसज्ज हेलिकॉप्टर्स देण्यात आली होती, असे संरक्षण प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले.
 • हेलिकॉप्टर्समधून बम्बी बकेट्स या महाकाय बादल्यांमधून पाणी फवारून ही आग आटोक्यात आणण्यात आली. 
 • स्थानिक अंगामी नागा भाषेत जुकोचा अर्थ शीतल पाणी असा असून दरीतून वाहणाऱ्या हिमनद्यांवरून हे नामकरण झाले आहे. 
 • येथील दुर्मीळ जुको लिली फुलांमुळे ही दरी गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या