नोंद ठेवावी असे 

सायली काळे
रविवार, 31 जानेवारी 2021

नोंद ठेवावी असे 

पायाभूत सुविधा
रतले जलविद्युत प्रकल्प 

 • जम्मू- काश्मीर येथील चिनाब नदीवरील रतले जलविद्युत प्रकल्पास केंद्र सरकारकडून २१ जानेवारी रोजी हिरवा कंदील मिळाला. याकरिता ५,२८१ कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. 
 •  हा ८५० मेगावॉटचा प्रकल्प किश्तवाड या जिल्ह्यामध्ये होणार आहे. यात राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) आणि जम्मू काश्मीर राज्य विद्युत महामंडळ (JKSPDC) यांची अनुक्रमे ५१ टक्के आणि ४९ टक्के अशी भागीदारी असणार आहे.
 • येत्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या काळात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे चार हजार नागरिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. 
 • जम्मू काश्मीर प्रदेशाची विजेची गरज भागविण्याबरोबर तेथील आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लागण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 
 • पाकिस्तानने १९६० सालच्या सिंधू जल कराराचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत या प्रकल्पात अनेकदा अडथळे आणले होते. मात्र ऑगस्ट २०१७ मध्ये या प्रकल्पातील धरणाच्या बांधकामास जागतिक बँकेकडून मंजुरी मिळाली.

पर्यावरण
रेड पांडा: भारतात दोन्ही प्रजातींचे अस्तित्व 

 • रेड पांडा या प्राण्याच्या हिमालयीन पांडा (Ailurus fulgens) आणि चिनी पांडा (Ailurus styani) अशा दोन्ही पोटजाती भारतात आढळून येत असल्याचे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. 
 • अरुणाचल प्रदेश राज्यातील सियांग या नदीने या दोन पोटजातींचे प्रदेश एकमेकांपासून विभागले आहेत. 
 • अनेक वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पोटजाती २०२० साली करण्यात आलेल्या जनुकीय अभ्यासानंतर जगास ज्ञात झाल्या. त्यानंतर चिनी पांडा ही पोटजात केवळ चीनमध्ये आढळून असल्याचा दावा चीनने केला होता.
 • यापैकी हिमालयीन पांडा हा सियांग नदीच्या पश्चिम भागात म्हणजेच पश्‍चिम बंगाल, सिक्किम आणि दक्षिण तिबेट येथे आढळून येतो. तर चिनी पांडा हा सियांग नदीच्या पूर्वेस दिबांग नदीचे खोरे आणि आग्नेय चीनमध्ये आढळून येतो.

ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्प 

 • आफ्रिका खंडातील महाकाय हरित भित्तिका उभारणीच्या रखडलेल्या प्रकल्पासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन यांनी १४ अब्ज डॉलर्सचे साहाय्य जाहीर केले आहे.
 • निधीअभावी थांबलेला हा प्रकल्प आफ्रिकन महासंघ लवकरच आफ्रिकेच्या ‘सोहेल’ नामक प्रदेशापासून सुरू करणार आहे. सन २०३० पर्यंत १० कोटी हेक्टर भूमी वृक्ष लागवडीखाली आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
 • सुमारे ३,८६० किलोमीटरच्या भूभागावर असणाऱ्या या साहेल क्षेत्राचा विस्तार अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील सेनेगल पासून मॉरीटोनिया, माली, बुर्किना फासो, छाड, नायजर, नायजेरिया, सूदान यांना ओलांडत लाल महासागराच्या तटावरील इरिट्रियापर्यंत आहे.
 • आफ्रिकी महासंघाने २००७ साली सुरू केलेल्या या प्रकल्पामध्ये सहारा वाळवंटाच्या दक्षिण सीमेकडे ११ देश आणि इतर काही आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी आहेत. 
 • आफ्रिका खंडाचे वाळवंटीकरण रोखण्याच्या दृष्टीने या प्रकल्पा अंतर्गत आफ्रिका खंडाच्या पश्चिमेपासून पूर्वेकडे आठ हजार किलोमीटर लांब आणि १५ किलोमीटर रुंद अशा पट्ट्यात विविध वृक्ष, झुडुपे, औषधी वनस्पती तसेच गवत यांची नियोजनबद्ध लागवड करण्यात येणार आहे.
 • पश्चिमेकडे सेनेगलपासून पूर्वेकडे जिबुतीपर्यंतच्या या प्रकल्पामुळे सुमारे १० कोटी लोकांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. 
 • या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जागतिक बँकेनेसुद्धा बुर्किना फासो, छाड, नायजर, माली आणि मॉरीटोनिया या पाच देशांत मिळून १४५ लक्ष डॉलर्सच्या निधीची घोषणा केली आहे.

सार्वजनिक आरोग्य
फ्लिंट शहरातील पाण्याची आणीबाणी

 • अमेरिकेतील मिशीगन राज्यातील फ्लिंट शहरामध्ये ओढवलेल्या पाण्याच्या आणीबाणीसाठी २१ जानेवारी रोजी तेथील भूतपूर्व राज्यपाल रिक स्निडर यांसह एकूण नऊ माजी पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 • सुमारे एक लाख लोकसंख्येच्या या शहरावर हे संकट २०१४ सालापासून आले आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा स्रोत बदलल्यामुळे हे घडले आहे.
 • फ्लिंट शहरास ह्युरॉन नामक जलाशयातून पाणी पुरवठा होत असे व त्यासाठीच्या शुद्धीकरणाचा खर्च खूप मोठा असल्याने, तसेच डेट्रॉईट जलविभागाशी होऊ पाहणारी करारप्रक्रिया अपयशी ठरल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांनी फ्लिंट नदीच्या पाण्याचा पर्याय स्वीकारला.
 • प्रदूषणग्रस्त असलेल्या या नदीच्या पाण्याचे सदोष शुद्धीकरण व पुरवठानलिकांना लागलेला गंज यांमुळे या पाण्यात शिसे मिसळले आणि ‘लेजोनेला’ या जिवाणूंची अुत्पत्ती झाली. परिणामी तेथील हजारो नागरिकांना न्यूमोनिया वर्गातील लेजिनोरीज नावाच्या रोगाची लागण झाली.
 • वेगाने पसरत चाललेल्या आजाराचा स्रोत लक्षात येताच २०१५ साली पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला, मात्र तोपर्यंत झालेल्या संसर्गाचे परिणाम दूरगामी होते. २०१६ साली मिशीगन राज्याने आणीबाणी जाहीर केली. तसेच शहर व्यवस्थापनाकडून आलेले पाणी हे घरगुती पातळीवर शुद्ध केल्याशिवाय वापरू नये असे सर्व नागरिकांना आवाहनही केले.
 • रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्राने (CDC) २०१६ साली प्रकाशित केलेल्या माहितीनुसार शहरातील ६६ टक्के अधिक घरातील किमान एका प्रौढ, तर ५४ टक्के घरातील किमान एका बालकाला मानसिक आजार उद्‍भवला आहे.
 • फ्लिंट शहराच्या उभारणी, उद्योग आणि व्यवस्था यांत असलेला वंशभेददेखील या घटनेस कारणीभूत ठरला आहे, असे मिशीगनच्या मानवी हक्क आयोगाने २०१७ साली प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भारतीय नवसंशोधन आलेख २०२०: नीती आयोग

 • वीस जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे नीती आयोगाने भारतीय नवसंशोधन आलेख प्रकाशित केला. या अहवालाचे हे दुसरे वर्ष आहे.
 • हा अहवाल नीती आयोगाने ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस’बरोबर तयार केला असून यासाठी जागतिक नवसंशोधन आलेखाची परिमाणे वापरण्यात आली आहेत.
 • हा अहवाल तयार करताना वापरण्यात आलेल्या परिमाणांमध्ये ज्ञानावर आधारित रोजगाराचे प्रमाण, पीएचडी तसेच अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, संशोधन क्षेत्रातील गुंतवणूक व पेटंट, ट्रेडमार्क यांकरिता झालेल्या नोंदींचे प्रमाण, व्यवसायाची अनुकूलता आणि इंटरनेटच्या वापराचे प्रमाण यांचा विचार करण्यात आला आहे.
 • अहवाल करताना मोठी राज्ये, ईशान्येकडील व डोंगराळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश व लहान राज्ये असे तीन वर्ग करण्यात आले होते.
 • मोठ्या राज्यांमध्ये या आलेखात ४२.५ गुणांसह कर्नाटक राज्य अव्वल ठरले असून ३८.०३ गुण मिळवून महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
 • डोंगराळ राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशचा प्रथम क्रमांक असून त्याखालोखाल उत्तराखंड, मणिपूर आणि सिक्कीम यांचा क्रमांक आहे. 
 • तिसऱ्या वर्गात दिल्लीस प्रथम क्रमांक मिळाला आहे.
 • झारखंड, छत्तीसगड आणि बिहार या राज्ये पिछाडीवर असून बिहारला केवळ १४.२ गुण मिळाले आहेत.

संबंधित बातम्या