नोंद ठेवावी असे

सायली काळे 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

नोंद ठेवावी असे

आंतरराष्ट्रीय
डब्लूटीओला लाभल्या महिला व्यवस्थापकीय संचालक

 • नायजेरियाच्या अर्थतज्ज्ञ नगोझी ओकोन्जो इवायला या जागतिक व्यापारसंघटनेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकी व्यक्ती ठरल्या आहेत.
 • नायजेरियाच्या भूतपूर्व परराष्ट्र मंत्री व सलग दोन वेळा वित्तमंत्री असणाऱ्या नगोझी या सध्या स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक, ट्विटर, लस व लसीकरण आंतरराष्ट्रीय मैत्री करार (GAVI) अशा महत्त्वाच्या संस्थांच्या मंडळांवर कार्यरत असून त्यांनी जागतिक बँकेत तब्बल २५ वर्षे विविध पदांवर काम केले आहे.
 • सहा फेब्रुवारी रोजी दक्षिण कोरियाच्या उमेदवार ‘योऊ म्युन्ग ही’ या स्पर्धेतून बाद झाल्यावर नगोझी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि यासाठी त्यांना अमेरिकेचादेखील पाठिंबा मिळाला.
 • मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात माजी व्यवस्थापकीय संचालक रॉबर्टो अझवेदो यांनी पदभार सोडला. नगोझी या लवकरच संचालकपदाच्या जबाबदाऱ्या हाती घेणार आहेत.

राजकीय
जलविद्युत प्रकल्पांवरून वाद 

 • दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत उत्तराखंड राज्यातील केंद्र सरकारने अनुमती नाकारलेल्या १३ जलविद्युत प्रकल्पांची यादी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 
 • सुमारे आठवडाभरापूर्वी आलेल्या पुरात पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या ऋषिगंगा आणि धौलीगंगा या दोन्ही विद्युत प्रकल्पांची नावे सदर यादीमध्ये समाविष्ट होती.
 • या बैठकीच्या तपशिलांनुसार उत्तराखंड राज्यात गंगा व तिच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्यास कायमस्वरूपी बंदी आणि बांधकाम अर्ध्यापेक्षा कमी झालेल्या, अतिरिक्त वाळू उपसा किंवा खडकफोडी अशा वादात अडकलेल्या प्रकल्पांवर कायमस्वरूपी स्थगिती देण्याबाबत बोलणी झाली होती.
 • मात्र मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. तसेच २०१९ साली रावत यांनी सदर बंदी व स्थगितीमुळे बेरोजगारी व विद्युत तुटवडा निर्माण होऊ शकेल असे पंतप्रधान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
 • २०१२मध्ये भागीरथीच्या परिसरास ‘इको सेन्सेटिव्ह’ दर्जा व केदारनाथ पुरानंतर २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंधनांमुळे आधीच ३४ प्रकल्प बंद असताना उपरोक्त बैठकीतील प्रकल्प बंद करणे अन्यायकारक असल्याचे या पात्रात नमूद केले होते. 
 • सद्यःस्थितीत पुराचा फटका बसलेल्या दोन्ही प्रकल्पांवर मिळून सुमारे १५० कामगार अजूनही बेपत्ता आहेत. 

विकास प्रकल्प
शाहतूत धरण प्रकल्प

 • अफगाणिस्तानातील काबूल येथील ‘शाहतूत धरण प्रकल्पा’च्या बांधणीसाठी भारत व अफगाणिस्तान यांच्यात ९ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार झाला.
 • सदर करार हा आभासी शिखर परिषदेत झाला. त्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हानिफ अतमार यांनी सहभाग घेतला.
 • २०१६ सालातील सलमा धरणानंतर भारताकडून बांधण्यात येणारे अफगाणिस्तानातील हे दुसरे मोठे धरण ठरणार आहे.
 • या धरणामुळे काबूल नदीच्या खोऱ्यातील नागरिकांची पेय पाण्याची आणि सिंचनाची गरज भागणार असून शिवाय पूर संरक्षण व व्यवस्थापन यांनाही साहाय्य होणार असल्याने या शिखर परिषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी या ‘जल भेटी’साठी भारताचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
 • आत्तापर्यंत विकास सहकार्याचा भाग म्हणून भारताने अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांमध्ये सुमारे ४०० प्रकल्प उभे केले आहेत.

विज्ञान
आईन्स्टाईनिअम 

 • दहा फेब्रुवारी रोजी रासायनिक आवर्तसारणीत ९९व्या स्थानावर असणाऱ्या आईन्स्टाईनिअम या मूलद्रव्याच्या गुणधर्मांबाबत ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात एक प्रबंध प्रकाशित झाला.
 • कॅलिफोर्नियातील लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबमधील डॉ. रिबेका अबर्गल यांच्या नेतृत्वाखालील चमूने हा प्रबंध लिहिला आहे.
 • सदर अभ्यासामध्ये क्ष-किरणांच्या मदतीने मूलद्रव्याच्या अणुबंधांच्या लांबीचा अंदाज घेण्यात आला. तसेच आईन्स्टाईनिअम-२५४ या समस्थानिकाचा (isotope) अभ्यास करण्यात आला.
 • या मूलद्रव्याची समस्थानिके निसर्गतः आढळून येत नसून अतिशय किरणोत्सर्गी वृत्तीमुळे ती अल्पायुषी असतात. 
 • या अभ्यासासाठी दृश्य स्वरूपातील आईन्स्टाईनिअमची निर्मिती करण्यासाठी तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागला.
 • या मूलद्रव्याच्या गुणधर्मांबाबत अधिक स्पष्टता आल्यानंतर इतर 
 • जड धातूंप्रमाणे याचाही वापर औषधोत्पादन क्षेत्राकरिता करता येणार आहे.
 • हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटानंतरच्या मलिद्यामध्ये १९५२साली हे मूलद्रव्य प्रथमच आढळून आले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांबाबत फारशी माहिती मिळू शकली नव्हती.

चीनची पहिली मंगळमोहीम

 • चीनच्या मानवरहित अवकाशयाने जवळपास साडेसहा महिन्यांच्या अवकाश प्रवासानंतर १० फेब्रुवारी रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे.
 • ‘तियानवेन-१’ नामक यान मंगळाच्या उत्तर गोलार्धावर (युटोपिया प्लॅनिशिया) एक कॅप्सूल सुमारे २४० किलोग्रॅम वजनाचे रोव्हर घेऊन यशस्वीरीत्या उतरल्यास पुढील ९० दिवस मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे मिळू शकणार आहेत.
 • यातून तेथील माती, उपपृष्ठीय पाणी, हिम तसेच तेथील सजीवांच्या संभाव्य खुणा यांचा अंदाज येणार आहे.
 • चीनचे हे यान या महिन्यातील मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे दुसरे यान आहे. यापूर्वी एका यानाने मंगळावर हजेरी लावली आहे, तर एक यान याच महिन्यात मंगळावर हजेरी लावणार आहे. 
 • संयुक्त अरब अमिरातीच्या ‘होप’ नामक यानाने ९ फेब्रुवारी रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला असून अमेरिकेचे ‘परसिव्हिअरन्स’ हे यान साधारणपणे १८ फेब्रुवारीला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. 
 • यूएईचे ‘होप’ मंगळाचे हवामान व वातावरण यांची माहिती गोळा करणार आहे. 
 • ‘परसिव्हिअरन्स’ ही अमेरिकेची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. तब्बल एक टन वजनाचे हे यान मंगळाच्या खोलगट खडकाळ भागात ‘जेझेरो क्रेटर’ या कड्यावर उतरणार आहे.

पर्यावरण
उत्तराखंड महापूर २०२१ 

 • उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयाच्या  बहिर्भागात साधारणतः नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातून ७ फेब्रुवारी रोजी पहाटे या महापुराला सुरुवात झाली. 
 • भूस्खलन, हिमस्खलन अथवा हिमतलावाच्या फुटणे यापैकी कोणती घटना पूर येण्यास कारणीभूत ठरली हे निश्चित झालेले नाही. मात्र, यामुळे राज्यातील चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा, धौलीगंगा आणि आणि अलकनंदा या क्रमशः एकमेकींना जोडलेल्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून त्यांना पूर आला.
 • ऋषिगंगा नदीवरील ‘ऋषिगंगा विद्युत प्रकल्प’ आणि ऋषिगंगा-धौलीगंगा संगमावरील ‘धौलीगंगा धरण’ या महापुरात पूर्णतः उद्‍ध्वस्त झाले असून तेथे जीवितहानीदेखील झाली आहे.
 • राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाच्या (NTPC) ‘तपोवन विष्णुगढ़ जलविद्युत प्रकल्पा’चेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे २०० कामगार अडकले असून त्यांच्या जीवितावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी सांगितले.
 • याशिवाय तपोवन भागातील जवळपास १३ गावांना सुरक्षित ठिकाणाशी जोडणारा पूल पुरात वाहून गेल्यामुळे तेथील नागरिकांना अधिक धोका निर्माण झाला.
 • पूरसदृश परिस्थितीची चिन्हे लक्षात घेता हृषिकेश आणि हरिद्वार या दोन ठिकाणी पाणी पोहोचू नये यासाठी अधिकाऱ्यांनी उतारावरील धरणे रिकामी करून वरून येणाऱ्या पाण्यास जागा करून दिली व यासाठी या धरणांच्या भागातील गावांमधील लोकांना तातडीने हलविण्यात आले.
 • बचावकार्यासाठी दोन C-१३०J सुपर हर्क्युलस प्रकारातील हेलिकॉप्टर्स आणि राष्ट्रीय आपत्ती सेवा बळाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 • या पुराचा सर्वाधिक फटका नंदा देवी, रीनी, तपोवन, जोशीमठ, श्रीधर या भागांना बसला आहे.

संबंधित बातम्या