अलंकारांचा थाट

ज्योती बागल
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
दसरा म्हणजे खरेदीला निमित्त देणारा सण! त्यात सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. सोने, चांदी, मोती, डायमंडच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, झुमके, टॉप्स, चेन, पेंडंट, ब्रेसलेट, छल्ला, कंबरपट्टा, बाजूबंद, अंगठी, भिकबाळी असे स्त्री-पुरुषांचे सर्वच दागिने उपलब्ध आहेत. पण सध्या या दागिन्यांमध्ये कोणती नवीन डिझाइन्स आहेत. त्यांच्या साधारण किमती काय आहेत. सध्या कोणता ट्रेंड आहे. याची सविस्तर माहिती...

महिलांचा सर्वांत आवडता दागिना म्हणजे नेकलेस. सध्या हे नेकलेस कलकत्ती, अँटिक, गोकाक, थेवा कलेक्शन, टेंपल इत्यादी प्रकारात उपलब्ध आहेत. टेंपल नेकलेसमध्ये शॉर्ट आणि लॉंग दोन्ही प्रकारचे नेकलेस आहेत. हे साधारण साडेतीन तोळ्यांपासून पुढे आणि लॉंग साधारण सहा तोळ्यांपासून पुढे घेईल तसे आहेत. यामध्ये सेमी प्रेशस स्टोन वापरले जातात. कारण स्टोन न वापरता त्याला तसा लूक येत नाही. तसेच यामध्ये पांढरे, लाल, हिरवे असे मोतीदेखील वापरले जातात. टेंपल अँटिक ज्वेलरी २३ ग्रॅमपासून पुढे घेऊ तशा वजनात मिळतात. यात काही ओरिजिनल टेंपल डिझाइन्स आहेत, ज्यात देवाचे डिझाइन वापरून नेकलेस तयार केले आहेत.

टेंपलमध्ये मोहनमाळदेखील येते. ही ४५ ग्रॅमपासून पुढे ८५ ग्रॅमपर्यंत येते. यात रेग्युलर लाल, हिरवे मणी वापरले आहेत. याशिवाय या माळेत सोन्याचे नाजूक मणीदेखील वापरतात. ग्राहकांच्या मागणीनुसार ते वापरले जातात. सोन्याचे मणी वापरले की त्याची किंमतही नक्कीच वाढते. पण मण्यांच्या माळेला जास्त मागणी दिसते.

सध्या बाजारात नवीन आलेल्या नेकलेसच्या प्रकारात थेवा कलेक्शनचे लॉंग आणि शॉर्ट नेकलेस आलेले पाहायला मिळतात. हा राजस्थानी प्रकारचा दागिना असून याला तयार करायला जवळजवळ एक महिना लागतो. यामध्ये पेंडंटला जास्त महत्त्व आणि भाव असतो. कारण हे पेंडंट करताना काच वापरून त्यावर २४ कॅरेटचे गोल्ड वापरून डिझाइन काढली जाते. तर बाजूच्या इतर डिझाइनसाठी २२ कॅरेट सोने वापरतात. हे साधारण दीड तोळ्याच्या दरम्यान आहे. याचे फक्त पेंडंट घेतल्यास ते कोणत्याही प्रकारच्या साखळीत वापरता येते.    

गोकाक कलेक्शनची खासियत म्हणजे याचे नक्षीकाम उत्तम असून लांबून पाहिले तरी याचे डिझाइन कळून येते. यामध्ये लॉंग आणि शॉर्ट या दोन्ही प्रकारात नेकलेस दिसतात. यातले लॉंग हार हे ४५ ग्रॅमच्या आसपास असून किंमत दोन लाखाच्या दरम्यान आहे. टेंपलचा ८ तोळ्याचा लांब हार साधारण साडेतीन लाखांपर्यंत मिळतो. यामध्ये हिरव्या आणि गुलाबी रंगांचे सेमी प्रेशस स्टोन वापरले आहेत. नेकलेसमध्ये नवीन प्रकारात ‘होडी घाट’ ही डिझाइन आली आहे. हा नेकलेस ११ ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहे. कल्चर्ड मोती वापरलेले नेकलेस साडेपाच तोळ्याचे असून त्यांची किंमत दोन लाख ४० हजारच्या दरम्यान जाईल. यामध्ये कमी वजनाचे नेकलेसदेखील उपलब्ध आहेत आणि त्यानुसार त्यांच्या किमती कमी अधिक होताना दिसतात. 

कलकत्ती नेकलेस हे पूर्ण सोन्याचे असतात. यामध्ये शॉर्ट आणि लॉंग प्रकार येतात. लॉंग नेकलेस साधारण पाच तोळ्याच्या पुढे येतात. तर शॉर्ट दोन तोळ्यापासून पुढे घेऊ तसे आहेत. हे पूर्ण सेटमध्ये म्हणजे गळ्यातला हार, कानातले, बिंदी, बांगड्या असे उपलब्ध आहेत. तसेच स्वतंत्र ही घेता येतात. यात नव्याने दाखल झालेले डिझाइन म्हणजे मोराचे डिझाइन. हा नेकलेस २५ ते ३० ग्रॅमच्या दरम्यान असावा.

तरुणी, महिला या सर्वांच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये आवर्जून सापडणारा दागिना म्हणजे ठुशी. ठुशी या अँटिक आणि रेग्युलरमध्ये उपलब्ध आहेत. हा दागिना पारंपरिक असला, तरी त्यात अलीकडे अनेक डिझाइन्स पाहायला मिळतात. ठुशी ही साधारण पाच ग्रॅमपासून उपलब्ध आहे. यामध्ये भरीव ठुशी थोड्या महाग मिळतात. त्या साधारण आठ ग्रॅमपासून १३ ते १४ ग्रॅमच्या दरम्यान मिळतात. यात डिझाइनबरोबर प्लेन ठुशीही येते. यात ठुशीच्या मध्यभागी डिझाइन किंवा खडे वापरलेले नसतात. ठुशीप्रमाणे पारंपरिक दागिन्यांमध्ये लाखी हारदेखील उपलब्ध आहे. या प्रकारच्या बांगड्यादेखील मिळतात. तसेच काही चेन पेंडंट सेट आहेत, जे १५ ग्रॅमपासून उपलब्ध आहेत.

झुमक्यांमध्ये कलकत्ती झुमके, कारवारी झुमके, कुंदनचे झुमके इत्यादी प्रकार बघायला मिळतात. कलकत्ती झुमके ५ ते ६ ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे आहेत. अॅंटीकचे झुमके साधारण १० ग्रॅमपासून पुढे आहेत. गोकाक पॅटर्नमध्ये ८ ते ९ ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. यामध्ये प्रॉपर झुमक्यांच्या स्टाइलचे झुमके, तसेच फॅन्सी डिझाइन्समध्ये म्हणजेच लेअरचे झुमके, लहान मोठ्या आकारातले झुमके इत्यादी प्रकार दिसतात. कारवारी झुमके हे ट्रॅडिशनल पॅटर्नमध्ये उपलब्ध असून ते ५ ग्रॅमपासून घेता येतात. तर गोकाक पॅटर्नच्या झुमक्यांमध्ये मोती वापरले जातात. अँटिकच्या झुमक्यांमध्ये कुंदन घातला, की ते कुंदनचे झुमके होतात. गोकाक आणि अँटिकचे हेवी रेंजमधले झुमके ३० ते ४० ग्रॅमपर्यंत येतात. तसेच गोकाक, कलकत्ती, टेंपल या सर्व प्रकारात 'कान' उपलब्ध आहेत. हे कान म्हणजे कानावर पूर्ण घालायचे असते. पूर्वी कानातले वेल असायचे, आता हे कान जास्त वापरले जातात. वेल आजही वापरले जातात, पण त्यात हा नवीन एक प्रकार अॅड झाला आहे. गोकाकचे कान २५ ते ४५ ग्रॅमपासून पुढे घेईल तसे उपलब्ध आहेत.

रोजच्या वापरासाठी किंवा प्रोफेशनल लूक येण्यासाठी नोकरदार महिला मोठ्या कानतल्यांपेक्षा छोटे टॉप्स वापरण्याला प्राधान्य देतात. हे टॉप्सदेखील कलकत्ती, कारवारी, कुंदन इत्यादी प्रकारात उपलब्ध आहेत. कलकत्ती टॉप्स साडेतीन ग्रॅमपासून १५ ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत. तर कारवारी, कुंदन आणि गोकाकचे टॉप्स २ ग्रॅम, ४ ग्रॅमपासून १० ते १२ ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत. मोत्याचे २ ग्रॅमपासून ७ ते ८ ग्रॅमपर्यंत मिळतात. हे थोडेसे हॅंगिंग लोंबते असतात. 

कानाचे सौंदर्य खुलवणारे कानातले वेल हे हाफ आणि फुल डिझाइनमध्ये येतात. हे साधारण ३ ते १५ ग्रॅम दरम्यान उपलब्ध आहेत. हेदेखील सर्व प्रकारांमध्ये आहेत. तसेच एकदम प्लेनमध्येही हे वेल मिळतात. यांची किंमत डिझाइनवर अवलंबून असते. कानातल्या रिंगा या साध्या आणि टेंपल, कलकत्ती या प्रकारात पाहायला मिळतात. साध्या रिंगा या २ ग्रॅमपासून पुढे घेऊ तशा आहेत. पण सोन्याच्या रिंगांमध्ये मोठ्या रिंगांना जास्त मागणी आहे.

मंगळसूत्रामध्ये टेंपल, अँटिक, पूर्ण पट्टी मंगळसूत्र, गोकाक मंगळसूत्र हे पीस बघायला मिळतात. तसेच काही हॅंडमेड मंगळसूत्र आहेत. झरोका हे गोकाकमध्ये नवीन लॉंच आहे. ते ७०-८० ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहे. या प्रकारात राजेराजवाड्यांच्या काळातील डिझाइन असते. यामध्ये पिंजऱ्याची एक डिझाइन बघायला मिळते. हे मंगळसूत्र १६७ ग्रॅम आहे. साध्या प्रकारात 'नॅनोचेन' मंगळसूत्रे आहेत. हे सव्वा ग्रॅमपासून १२ ते १३ ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत. फॅन्सी प्रकारात ‘लेटर’ चेन मंगळसूत्र एक येते. यामध्ये दोन किंवा तीन पदर असतात. हे सहा ते सात ग्रॅमपासून पुढे मिळते. काही वन साइड डिझाइन असणारी मंगळसूत्रे आहेत. म्हणजे एका बाजूला सोन्याचा पत्ता किंवा डिझाइन आणि एका बाजूला फक्त काळे मणी. तसेच किरण मणी मंगळसूत्र, व्हर्टिकल मणी मंगळसूत्र हे १२ ते १३ ग्रॅममध्ये येतात. यात काळ्या मण्यांचा साइज झिरो असतो. टेंपल, कलकत्ती आणि व्हर्टिकल यामध्ये मंगळसूत्राच्या वाट्यादेखील उपलब्ध आहेत. 

बांगड्यांमध्ये टेंपल, कलकत्ती, अॅंटिक, प्लेन, राजकोट, किल्ला बांगडी, मशीन बांगडी, मिरर, फॅन्सी असे प्रकार पाहायला मिळतात. साधारण २० ग्रॅमपासून १५० ग्रॅमपर्यंत बांगडी सेट उपलब्ध आहे. बांगड्यांचा दोन, चार आणि सहा बांगड्यांचा सेट येतो. लग्नाच्या आणि वापराच्या हिशोबाने सेट घेतला जातो. सहा अशा सेटमध्ये दोन पाटल्या आणि चार बांगड्या असतात. हा पूर्ण सेट ९० ग्रॅमपासून पुढे घेऊ तसा आहे. टेंपलमध्ये हा सेट बघितला तर पूर्ण रेडमध्ये दिसतो. त्यात तसे स्टोन वापरलेले असतात. तसेच अँटिक गोल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड पॉलिश केलेले कुंदन जडवलेले असतात. हा पूर्ण सेट कमीत कमी तीन ते चार लाखाच्या आसपास बसतो. बांगड्यांचा पॅटर्न निवडण्यावर किंमत अवलंबून आहे. सध्या टेंपलची जास्त फॅशन आहे.

सोन्याचे आणखी दागिने बघायला गेले तर सोन्याचा छल्ला, अंगठी, बाजूबंद, पैंजण, वाकी, नथ, बोर माळ, लक्ष्मी हार, चिंचपेटी, कंबरपट्टा असे अनेक दागिने दिसतात. वाकीमध्ये साधी वाकी, चटई वाकी आणि कलकत्ती वाकी हे प्रकार दिसतात. या वाकी साधारण तीन तोळ्यापासून १० तोळ्यापर्यंत उपलब्ध आहेत. छल्ला साडेतीन तोळ्यापासून पुढे घेऊ तसा आहे. तर कंबरपट्टा १५ तोळ्यापासून पुढे आहे. 

पुरुषांसाठी वेगवेगळ्या डिझाइन्सच्या सोन्याच्या साखळ्या तर उपलब्ध आहेत, पण त्याचबरोबर साखळीबरोबरचे स्वतंत्र पेंडंट्सही उपलब्ध आहेत. यामध्ये गणपती, शिवाजी, सूर्य, ओम, सिंह, मासा अशी हटके डिझाइन्स आहेत. हे पेंडंट्स साधारण पाच ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे आहेत. सोन्याच्या साखळ्या या साधारण दीड तोळ्यापासून उपलब्ध आहेत. पुरुषांमध्ये पिळ्याच्या साखळीला आणि पिळ्याच्या अंगठीला जास्त मागणी दिसते. भिकबाळी ही एक ग्रॅमपासून उपलब्ध आहे. यामध्ये सोन्याच्या काडीमध्ये रंगीत मोती घातलेले दिसतात. पण पारंपरिक भिकबाळीची तरुणांमध्ये जास्त क्रेझ दिसते. काही बाळ्यांमध्ये खडेदेखील वापरले आहेत.  

महिलांमध्ये साउथ इंडियन अंगठ्यांना जास्त मागणी असून या अंगठ्या अगदी चार ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. या आकाराने थोड्या मोठ्या आणि पसरट असतात. तर काही अंगठ्यांमध्ये स्टोन वापरलेले दिसतात. महिलांसाठी चांदीचे पायातले हे अगदी ७०० रुपयांपासून ११ हजार व त्याच्या पुढेही उपलब्ध आहेत. चांदीचे ब्रेसलेट हे ९०० रुपयांपासून उपलब्ध आहे.

डायमंडमध्ये नॅचरल आणि अमेरिकन डायंमडचे दागिने बघायला मिळतात. नॅचरल डायमंड अमेरिकन डायमंडच्या तुलनेने महाग असतो. अमेरिकन डायमंड २२ कॅरेट गोल्डमध्ये वापरतात. नॅचरल डायमंड्समध्ये चांगले डिझाइन्स उपलब्ध आहेत. डायमंडमध्ये नेकलेस, ब्रेसलेट, फिंगर रिंग, बांगड्या, पेंडंट, कानातले टॉप्स इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. नॅचरल डायमंडमध्ये वेगवेगळ्या सेटिंग्ज वापरून डिझाइन केल्या जातात. त्यामध्ये रिअल प्रॉंग सेटिंग, बेझेल सेटिंग, मिरॅकल सेटिंग अशा सेटिंग असतात. त्यानुसार दागिन्यांचे लूक बदलतात. रिअल डायमंड्‌समध्ये जास्त व्हरायटीज बघायला मिळतात. डायमंडच्या शॉर्ट आणि लॉंग नेकलेसची रेंज दीड लाखांपासून पुढे १५ लाखांच्या पुढेही घेऊ तशा किमती आहेत. पेंडंटमध्ये गणपती, शिव, बदाम, फूल, पान अशा अनेक डिझाइन्स दिसतात. काहींमध्ये नवरत्ने वापरली आहेत. 

डायमंडचे ब्रेसलेट हे ६० हजारांपासून पुढे घेऊ तशा रेंजमध्ये उपलब्ध आहे. या ब्रेसलेटमध्ये रोझ गोल्ड आणि कॉपर वापरले जाते. त्यामुळे तांबूस असा शाइनवाला लूक येतो. सध्या रोझ गोल्डचा ट्रेंड असल्याने यात जास्त डिझाइन्स बघायला मिळतात.   

डायमंडची रिंग ही १५ हजारांपासून पुढे घेऊ तशी आहे. यामध्ये सॉलिटेअर या प्रकारची व्हॅल्यू असून इन्व्हेस्टमेंटसाठी हा चांगला पर्याय आहे. डायमंडच्या बांगड्यांमध्ये सिंगल आणि दोन बांगड्यांचा सेट आहे. यांची किंमत साधारण एक लाखापासून पुढे घेऊ तशी आहे. 

डायमंडमध्ये झुमके खूप दुर्मीळ असतात. पण घेणारे घेतात. हे झुमके साधारण दीड लाखापासून पुढे आहेत. पण याला जास्त मागणी नसते. डायमंडमध्ये कानातल्या टॉप्सना जास्त मागणी असते. यांच्या साधारण किमती १५ हजारांपासून पुढे घेऊ तशा आहेत. यांची किंमत कलर स्केल, कट स्केल, क्वालिटी स्केल, कॅरेट स्केल आणि वेट स्केल यावरून ठरवली जाते. डायमंडमध्ये काही ग्राहकांच्या मागणीनुसार, तर काही मार्केट रेटनुसार कलेक्शन उपलब्ध दिसते. प्लॅटिनमची अंगठी ही २० हजारांपासून उपलब्ध आहे. तर छोटे कानातले ४० हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत. 

डायमंडमध्ये 'फॅब्युलस फाईव्ह'चे कलेक्शन उपलब्ध असून त्यामध्ये पाच ऑर्नामेंट्स असल्याने त्याला तसे नाव दिले आहे. यामध्ये गळ्यातील पेंडंट, कानातले टॉप्स, ब्रेसलेट, अंगठी आणि मंगळसूत्र पेंडंट इत्यादींचा समावेश आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला किंवा कॉलेज तरुणींसाठी हा सेट उत्तम असल्याची माहिती पु. ना. गाडगीळमधील विक्रेत्यांनी दिली.

आज ग्राहक हुशार झाला आहे. खूप शिकलेली व्यक्ती नसली, तरीही खरेदी करताना मात्र दागिन्यांवरील हॉलमार्क चेक करूनच खरेदी करतात... आणि एखादे कोणी न बघणारे असेल, तर त्यांना आम्ही स्वतःहून बघायला सांगतो. त्यामुळे फसवणूक वगैरे होत नाही... आणि ग्राहकांचा आपल्यावरचा विश्वास नक्कीच वाढतो. दागिन्यांबद्दल बोलायचे झाले, तर सध्या टेंपल ज्वेलरीचा ट्रेंड असल्यामुळे त्यालाच जास्त मागणी आहे. 
- देवराज सोनी, व्हरायटी ज्वेलर्स
 

संबंधित बातम्या