मोबाइल फोन्समध्ये अनेक पर्याय

ऋतुजा हगवणे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
 

मोबाइल फोन हा आता ४६ वर्षांचा झाला आहे. ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टिन कूपर यांनी मोबाइलची निर्मिती केली आणि लँडलाइन फोनला नवा आणि सोईस्कर पर्याय उपलब्ध करून दिला. 

आज अन्न, वस्त्र, निवारा आणि सगळ्यात जास्त गरजेचे जर काय झाले असेल, तर तो मोबाइल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. खिशात म्हणा किंवा पर्समध्ये शानमध्ये हा मोबाइल वावरत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक जनरेशन मोबाइल फोनचा वापर करताना दिसते. एवढ्याशा या मशीनच्या स्मार्टनेसमुळे म्हणा किंवा त्याच्या होणाऱ्या उपयोगामुळे मोबाइल हा अत्यंत गरजेचा झाला आहे. कधीकधी वाटते शिवाजी महाराजांच्या काळात जर हा पठ्ठ्या म्हणजेच मोबाइल असला असता, तर त्या लोकांना किती सोपे झाले असते ना. असो, हा झाला गमतीचा भाग. पण आजमितीला मोबाइल फोनचे अगणित असे उपयोग आहेत. 

दैनंदिन जीवनाचा मोबाइल हा अविभाज्य भाग झाला आहे. म्हणतात ना, ''ये दुनिया बहोत छोटी हैं.'' या मोबाइलने ते सिद्ध करून दाखवले आहे. जग मोबाइलमुळे एकमेकांच्या जरा जास्तच जवळ आले आहे. नाही का? आणि या मोबाइलचा राजेशाही थाटच बघा ना, रोज नवनवीन स्मार्टफोन्सची भरती बाजारात होताना दिसते. त्यातच आजचा तरुणवर्ग स्मार्टफोन्सच्या खरेदीत स्मार्ट आणि चूझी होताना दिसतो आहे. स्मार्टफोन्स कंपन्यादेखील प्रत्येकवेळी नवनवीन स्मार्ट फीचर्स बाजारात आणून ग्राहकांना भुरळ पाडताना दिसतात. 

भारताच्या बाजारपेठेचा जर विचार केला, तर २०१९ या वर्षात टॉप १० मोबाइल कंपन्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये सॅमसंग, MI (रेडमी ), लेनोव्हो, विवो, ओप्पो, एलजी, अॅपल, नोकिया, वन प्लस, एचटीसी इत्यादी मोबाइल कंपन्यांचा अनुक्रमे क्रमांक लागतो. या १० मोबाइल कंपन्यांच्या मोबाईल फोन्सला ग्राहकांची पहिली पसंती दिली आहे.

ओप्पो
विवो मोबाइलप्रमाणेच ओप्पो हा मोबाइल फोनमध्ये असणाऱ्या उत्तम कॅमेऱ्यामुळे  लोकांच्या पसंतीस उतरला आहे. फोटो आणि सेल्फीवेड्या लोकांसाठी तर ओप्पो म्हणजे वरदानच आहे, असे म्हणणेदेखील वावगे ठरणार नाही. ओप्पोच्या किमतीही जनसामान्यांना परवडणाऱ्याच आहेत. त्याच्या फिचर्समध्ये स्क्रीन साईज ६.६, त्याचा कॅमेरा १६ mp, रॅम - ८GB, बॅटरी - ४०६५mAh, अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्रोसेसर- OCTA इत्यादींचा समावेश दिसतो. ओप्पो मोबाइलच्या किमती १३ हजारांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत आहेत. 

अॅपल
हा मोबाइल सर्वांनाच परवडेल अशा किमतीत शक्यतो नाही. त्यामुळे भारतात अॅपलचा कमी वापर होताना दिसतो. भारताच्या तुलनेत इतर देशांत अॅपल फोनला चांगलीच मागणी आहे. अॅपलमध्ये असणाऱ्या उत्तम फिचर्समुळे हे मोबाइल लोकप्रिय आहेत. या मोबाइलच्या साधारण किमती २५ हजार, ३७ हजार, ८५ हजार, ९४ हजार रुपये अशा आहेत.

सॅमसंग
सध्या बाजारातील लेटेस्ट ट्रेंडचा जर विचार केला तर सॅमसंग मोबाइलने बाजी मारलेली दिसते. भारतात ४६ टक्के मार्केट सॅमसंग मोबाइलने काबीज केले आहे. सॅमसंग मोबाइलचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्यदेखील आहे, ते म्हणजे हा मोबाइल वापरण्यास टिकाऊ समजला जातो. मुळातच सॅमसंग मोबाइलची बॉडी ही भक्कम असल्याने हा मोबाइल जास्तकाळ टिकण्यास मदत होते. सॅमसंगचे दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे हा मोबाईल फोन गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच वापरताना दिसतात. सॅमसंग मोबाइलच्या किमती या सामान्य माणसाला परवडण्यासारख्या आहेत. 
सॅमसंगचे फिचर्स बघायचे झाले, तर त्याची स्क्रीन साईज ६.४, कॅमेरा - १२+१२+१६, रॅम - ८GB, बॅटरी- ४१००mAh, ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉइड, प्रोसेसर - OCTA इत्यादींचा समावेश दिसतो. सॅमसंग मोबाइलच्या साधारण किमती ९,४९०, १३,९९९ पासून ते २० हजार रुपयांपर्यंत आहेत.

नोकिया
सुरुवातीला भारतात नोकिया मोबाइलने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्याचा भक्कमपणा अनेकांना भावला. ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही अशांसाठी नोकिया फोन बेस्ट पर्याय आहे. आजही अनेक वयस्कर लोक आपल्याला नोकियाचा मोबाइल वापरताना दिसतात. पण यातही आता स्मार्ट फोन्स आले आहेत. याच्या फिचर्समध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० एसओसी, ४ जीबी आणि ६ जीबी रॅम असे दोन पर्याय आहेत. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप, सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूट्‌थ v5.0, GPS/ A-GPS इत्यादींचा समावेश आहे. याच्या साधारण किमती दोन हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. 
  एकूणच काय तर मोबाइल घेताना सर्व जण मोबाइलची बॅटरी, त्याचा कॅमेरा, इंटर्नल स्टोरेज इत्यादी गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

MI-रेडमी
सध्या बाजारात MI मोबाइल फोनला चांगलीच मागणी आहे. या मोबाइलमध्ये आलेल्या फिंगरप्रिंट लॉक या फिचर्समुळे MI मोबाइल तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच या मोबाइलचे बॅटरी बॅकअप उत्तम आहे. हा मोबाइल वजनालादेखील हलका फुलका असा लाइटवेट आहे. आधी MI मोबाइल केवळ ऑनलाइन उपलब्ध होता. पण आता तो कोणत्याही मोबाइल शॉपमध्ये मिळू लागला आहे. या मोबाइलचे सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे यात कमी किमतीत जास्त फिचर्स मिळतात. तरुणांमध्ये या मोबाइलफोनची जबरदस्त क्रेझ असल्याने बाजारातील मागणीदेखील तशीच जास्त आहे. या मोबाइलच्या फिचर्सचा विचार केला तर स्क्रीन साईज ६.६, कॅमेरा - १६ mp, रॅम - ८GB, बॅटरी - ४०६५mAh, ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉइड, प्रोसेसर- OCTA इत्यादींचा समावेश दिसतो. या मोबाइलच्या साधारण किमती सहा हजारांपासून पुढे नऊ हजार, १२ हजार, २१ हजार, २७ हजार रुपये अशा आहेत.

विवो
हा मोबाइल त्यात असणाऱ्या उत्तम कॅमेरा फिचर्समुळे अत्यंत लोकप्रिय झाला आहे. खास सेल्फीसाठी असणाऱ्या उत्तम कॅमेऱ्यामुळे या मोबाइलला प्रचंड मागणी असल्याचे बोलले जाते.  विवो मोबाइलची बॉडीदेखील स्लिम असल्यामुळे हा मोबाइल फोन दिसण्यास आकर्षक वाटतो. तसेच विवो मोबाइलचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दर दोन ते तीन महिन्यांनंतर या मोबाइलमध्ये नवीन फिचर्स अपडेट होतात. इतर मोबाइलच्या तुलनेत बघितले, तर या मोबाइलची किंमतदेखील खूप कमी आहे. याची स्क्रीन साईज ६.६, कॅमेरा - १६ mp, रॅम - ८GB, बॅटरी- ४०० mAh, अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसेसर - OCTA, फिंगरप्रिंट सेन्सर इत्यादी फिचर्स उपलब्ध आहेत. या मोबाइलच्या किमती साधारण १४ हजारांपासून २१ हजार रुपयांपर्यंत आहेत.

(लेखात दिलेल्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो.)
 

संबंधित बातम्या