मजा ऑनलाइन शॉपिंगची

इरावती बारसोडे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
 

पितृपक्ष संपता संपता सणावाराची चाहूल लागते. नवरात्र, मग लगेचच दसरा. त्याची मजा ओसरेपर्यंत पाठोपाठ दिवाळी येऊन ठेपते. या काळात एक वेगळीच वातावरण निर्मिती झालेली असते. जसजसे सण जवळ येऊ लागतात, तसतशी बाजारपेठ फुलू लागते आणि ती बाजारपेठ बघून खरेदीचेही वेध लागतात. दसऱ्याला घेऊ, दिवाळीला घेऊ म्हणून अनेक गोष्टींची यादी तयार असते. प्रत्यक्षात काही घ्यायचे नसले, तरी विंडो शॉपिंग करतानासुद्धा तेवढीच मजा येते... आणि आता तर घरबसल्याही शॉपिंगची मजा घेता येते. 

घरबसल्या शॉपिंग अर्थातच ऑनलाइन शॉपिंग! या शॉपिंगमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची, हाताळण्याची मजा नसेल कदाचित, पण तरीही ऑनलाइनच शॉपिंग करणाराही मोठा वर्ग आहे. हल्ली कोणतीही वस्तू ऑनलाइन मिळते; अगदी दाढी करायच्या ब्लेडपासून वॉशिंग मशीनपर्यंत, पुस्तकांपासून डायपरपर्यंत, काय वाट्टेल ते ऑनलाइन मिळते. फळे, भाज्या, एक्झॉटिक भाज्या, डाळी, रोजचा किराणासुद्धा घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करता येतो आणि घरपोच मिळतोही. औषधेसुद्धा मिळतात. बोर्नव्हिटा हवाय का किंवा पायपुसणी? या गोष्टीही मिळतील. प्रत्येक वस्तू असंख्य ब्रँड्स, असंख्य प्रकारांमध्ये, वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध होते. ज्यांना खरेच बाजारात जाऊन खरेदी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन शॉपिंगमुळे बरीच सोय झाली आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा, मोबाइल, लॅपटॉप्स यांसारख्या मोठ्या वस्तूंसाठी, ज्यांच्या किमती जास्त असतात, त्यांच्यासाठी नो कॉस्ट ईएमआयसारखे पर्याय उपलब्ध असतात. ठरावीक बँकांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल, तर आणखी चांगल्या डील्स मिळतात. एक्स्चेंज ऑफर्समुळे किमती आणखी कमी होतात. मूळ किंमत १२-१३ हजार असलेला एखादा ऑफरमधला मोबाइल सगळे डिस्काउंट्स लावून एक्स्चेंज ऑफर्स मधून घेतला, तर सात हजारापर्यंत मिळूनही जातो. घेतलेली वस्तू नंतर आवडली नाही किंवा आपल्याला हवी तशी नसेल किंवा कपडे, बूट यांचा साईज वेगळा असेल, तर ‘३० डेज रिटर्न’ म्हणजे ३० दिवसांमध्ये परत करण्याचा पर्यायही असतो. वस्तू परत करून दुसरीही घेता येते. कपड्यांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर कितीतरी असंख्य प्रकारचे कपडे असंख्य पर्यायांमध्ये मिळतात. ट्रॅडिशनल वेअर पासून कॅज्युअल, फॉर्मल सर्वकाही. 

मोबाइल, लॅपटॉप्स आणि तत्सम गॅजेट्ससाठी सॅमसंग, असुस, लिनोव्हो, एचपी यांसारखे ब्रँड्स; तर होम अल्पायन्सेससाठी गोदरेज, व्हर्लपूल, सॅमसंग, पॅनासोनिक, हायर आदी ब्रँड्सची उत्पादने आहेत. त्यामुळे चांगल्या ब्रँडचा आहे की नाही, ही चिंताही मिटते. हीच गोष्ट कपड्यांच्या बाबतीतही. परदेशी आणि भारतीय नामांकित ब्रँड्सचे कपडे खूप छान मिळतात. ऑनलाइन शॉपिंगला अर्थातच ऑनलाइन पेमेंट करता येते. त्यामध्येही डेबिट, क्रेडिट कार्ड, ई-बँकिंग, यूपीआय पेमेंट असे सर्व पर्याय आहेत. वस्तू घरी येण्याआधीच पैसे कसे द्यायचे आणि पैसे देऊनही वस्तू आली नाही तर? अशी भीती वाटत असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीचा उत्तम पर्याय आहेच! या अशा अनेक कारणांमुळे ऑनलाइन शॉपिंग लोकप्रिय होत आहे.

ऑनलाइन शॉपिंग लोकप्रिय होण्यामध्ये नाही म्हटले तरी थोडाफार जाहिरातींचाही हातभार आहेच. सेल सुरू होण्याच्या काही दिवस आधी सगळ्यांकडूनच जाहिरातींचा अक्षरशः भडिमार केला जातो. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, बिग बिलियन डेज, बिग फॅशन डेज अशी मोठी मोठी नावे दिली जातात. साधारण एकाच वेळी सगळ्याच वेबसाइट्स / ॲप्सवर सेल सुरू होतो. जाहिरातींमध्ये बिग बी, आलिया भट, विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी यांसारख्या बड्या स्टार्सचा समावेश केला जातो. टीव्ही, वृत्तपत्रे, सोशल मीडिया, ॲप नोटिफिकेशन्स यांच्या माध्यमातून सारखी आठवण करून दिली जाते, ‘तारीख विसरू नका, सेल सुरू होतोय.’ लो कॉस्ट ईएमआय, अमुक एक टक्के डिस्काउंट, बेस्ट ऑफर्स, नेव्हर बिफोर प्राइझेस, बेस्ट डील्स... याचा जाहिरातींच्या माध्यमातून इतका डंका पिटला जातो, की शेवटी धावती का होईना, पण त्या वेबसाइटला एक भेट दिली जातेच. मग विचार सुरू होतो, अरे चांगल्या ऑफर्स आहेत. आपले काही घ्यायचे राहिलेय का? बघूया तरी... आणि जाहिरातींचा उद्देश सफल होतो.  

सध्या ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक वेबसाइट्स अनेक ऑफर्स देत असतात. सगळ्यांची ॲप्सही आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटाक्लिक, मिंत्रा, जबाँग, स्नॅपडील, बिग बास्केट अशी काही उदाहरणे देता येतील. हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा सर्व वेबसाइट्सवरील दसऱ्यानिमित्त सुरू झालेले सेल्स संपले असतील. पण काळजी नसावी, दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा ऑफर्स सुरू होतील. खरे तर वर्षभर कोणत्यातरी कारणाने ऑफर्स आणि डिस्काउंट्स सुरूच असतात. त्यामुळे प्रवासात, ऑफिसला येता-जातासुद्धा खरेदी करता येते. सगळ्या पर्यायांमधून व्यवस्थित ‘स्क्रुटिनी’ करून वस्तू खरेदी करता येतात. 

ऑनलाइन खरेदी वाटते तितकी कठीण नाही, तशी सोपी आहे. आता आपण बिले भरण्यापासून सारे काही ऑनलाइन करू लागलो आहोत. हे डिजिटल युग आहे. त्यामुळे वेळोवेळी जी काही डिजिटल क्रांती होईल, ती स्वीकारून काळाबरोबर गेलो नाही; तर आपण मागे पडू. प्रत्यक्ष खरेदीला जायचे म्हटले, तर आपल्या वेळेचे गणित जमत नाही. मग ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय स्वीकारायला काय हरकत आहे? पण, हे विसरता कामा नये, की कधीतरी सहकुटुंब प्रत्यक्ष बाजारात जाऊनही खरेदी करावी. कारण, त्याची मजा काही वेगळीच!  

शॉपिंग करा, पण काळजी मात्र घ्या
सर्व काही अगदी सहज ऑनलाइन मिळत असले, तरीही ऑनलाइन वस्तू घेताना काळजी मात्र घ्यायलाच हवी. वर म्हटल्याप्रमाणे नीट पारखून वस्तू खरेदी करावी. 

  • पहिल्यांदाच ऑनलाइन खरेदी करत असाल, तर कोणातरी अनुभवी माणसाची (म्हणजे ज्याला ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव आहे, अशी व्यक्ती. ती २० वर्षांची तरुण मंडळीही असू शकतात.) मदत घ्यावी. खूप पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपल्याला हवी असलेली वस्तू नेमकी कशी शोधायची हे समजावून घ्यावे.
  • प्रत्येक वस्तूचे ‘प्रॉडक्ट डिटेल्स’ व्यवस्थित दिलेले असतात. ते नीट काळजीपूर्वक वाचावेत. प्रॉडक्ट डिटेल्समध्ये प्रॉडक्टचे नाव, ब्रँड, किंमत या बेसिक गोष्टींसह इतरही सर्व माहिती दिलेली असते. उदा. कपड्यांच्या बाबतीत मटेरियल, मशीन वॉश आहे की हँड वॉश या गोष्टी दिलेल्या असतात. मोबाईलसारख्या वस्तूंसाठी कॅमेरा, डिस्प्ले, मेमरी, बॅटरी आदी गोष्टी दिलेल्या असतात. ही सर्व माहिती न कंटाळता वाचणे आवश्‍यक आहे.  
  • कपडे खरेदी करताना योग्य साइज निवडणे ही समस्या असते. त्यासाठी साइज चार्ट दिलेला असतो, त्याचा वापर करावा. 
  • ऑनलाइन पेमेंटचा पर्याय सुरक्षितच आहे. ऑनलाइन पेमेंटची सवय असेल तर निश्‍चिंत मनाने पेमेंट करण्यास हरकत नाही. मात्र, खात्री नसेल तर त्या भानगडीत न पडता सरळ कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय स्वीकारावा. जरी इथे कॅश म्हटले असले, तरीही आता डिलिव्हरी बॉयकडे कार्ड स्वाइप करण्याचे मशीन असते. त्यामुळे शक्यतो कार्डचा वापर करावा. 
  • ‘प्रॉडक्ट रिव्ह्यूज’ही वाचावेत. त्यातूनही वस्तूच्या गुणवत्तेबाबत खात्री करता येते.

संबंधित बातम्या