स्मार्ट गॅजेट्स

 समृद्धी धायगुडे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घेताना चांगला दिवस पाहून खरेदी केली जाते. या खरेदीमध्ये वस्तू कालानुरूप बदलत गेल्या. खरेदीमध्ये स्मार्ट वस्तूंची भर पडत गेली. दसऱ्यानिमित्त घरासाठी किंवा पर्सनल गॅजेट्स म्हणून कोणत्या वस्तू खरेदी करता येतील, याविषयी थोडक्यात माहिती...

क्लिनिंग रोबो  
घरातील महिलामंडळासाठी स्वयंपाकघरात मिक्सर, कुकर, ओव्हन, मायक्रोवेव्ह यांचे आगमन झाल्यावर सुसह्य वातावरण झाले, तसेच आता या स्वच्छता करणाऱ्या रोबोमुळे वाटणार आहे. ऑनलाइन आणि ठरावीक नामांकित ब्रँड्सच्या दुकानात हे रोबो उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरडी धूळ आणि ओली फरशी पुसण्यासाठी असे दोन प्रकार मिळतात. शिवाय हे रोबो ॲपवरूनदेखील सहज ऑपरेट होतात. ज्या खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, त्या सर्व खोल्यांची नोंद त्यावर करून ठेवल्यास त्या त्या वेळेला तो एक खोली तीन वेळा साफ करतो. हे रोबो साधारण ४० ते ५० हजार रुपयांपासून मिळतात.

स्मार्ट डिफ्युजर बंडल  
सुगंधित घरासाठी आपण रूम फ्रेशनर किंवा अत्तराची कुपी असे उपाय करतो. यामुळे घर प्रसन्न राहते. स्मार्ट गॅजेट्समध्ये आता आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे डिफ्युजर बंडलची. हे दिसायला अतिशय छोटे डिव्हाइस असून यात चार प्रकारचे सुवासिक द्रव्य ठेवता येते. ठरावीक वेळांनी ते एक एक सुगंध घरात पसरवते. दिसायला आणि आकाराला लहान असल्याने ते चार्जदेखील एका यूएसबी पोर्टवर होते. सिंगल कॅप्सूल डिफ्युजर कारमध्ये योग्य असते, पण घर किंवा ऑफिसमध्ये हे चार वेगवेगळ्या सुगंधांचे बंडल ठेवणे योग्य ठरते.

ट्रान्सलेटर  
तुम्ही सतत देश-विदेशात सहलीला जात असाल किंवा दैनंदिन कामासाठी ट्रान्सलेटरची गरज असेल, तर हे उपकरण तुम्हाला जरूर उपयोगी पडेल. यात स्पॅनिश, चायनीज, इंग्रजी अशा परदेशी भाषा उपलब्ध आहेत. याची किंमत त्यातील शब्दसंचयावरून, त्यात किती भाषा आहेत यावरून निश्‍चित होते. सध्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर आणि बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स दुकानात सेल सुरू असल्याने ऑफरमध्ये हे उपलब्ध होतील.

स्मार्ट वायफाय पॉवर स्ट्रिप 
या स्ट्रिपच्या माध्यमातून तुम्ही एखादे डिव्हाइस, जसे की मॅक, लॅपटॉप, स्मार्टफोन कनेक्ट केल्यानंतर कुठूनही ते ॲक्सेस करू शकता. ही स्ट्रिप व्हॉइस कमांडवर नियंत्रित होते. याशिवाय संबंधित डिव्हाइसेसचा एनर्जी युसेजचादेखील ट्रॅक ठेवते. त्यामुळे तुमच्या स्मार्टहोममध्ये ही स्ट्रिप समाविष्ट करणे अगदी योग्य ठरेल. 

वायरलेस सॉइल मॉयश्‍चरायजर सेन्सर 
घरात छोटी किंवा मोठी झाडे असली, की त्यांच्या देखभालीसाठीसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. प्रत्येक झाडातील माती परीक्षणासाठी एक सेन्सर बसवता येतो. हा वायरलेस असल्याने सहज कुठेही कॅरी करता येतो. झाडांना कधी पाणी घालावे हे बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे या सेन्सरच्या मदतीने आपला वेळ, पैसे आणि पाणी आपण नक्की वाचवू शकतो. तुमच्या घरातील किंवा बाहेरच्या बागेसाठी तसेच कुंड्यांमधून लावलेल्या झाडांसाठी हे अगदी योग्य आहे. यात तीन सेन्सर्स आहेत, जे झाडांना कधी पाणी घालावे हे अगदी अचूक सांगतात. यात जमिनीचे तापमान किती आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळते. हे वायफायवर काम करते, तसेच अँड्रॉइड आणि ॲपल दोन्हीसाठी याचे ॲप उपलब्ध आहे. हे दोन AA सेलवर साधारण तीन वर्षे चालते. हे उपकरण पूर्णपणे अमेरिकेत विकसित केलेले आहे आणि यातला एक हिस्सा ते सेफ वॉटर नेटवर्कला देतात. हे वापरायला अतिशय सोप्पे आहे आणि यामुळे तुम्ही पाणी बचत नक्कीच करू शकता.

ऑडिओ सनग्लासेस 
एका नामांकित कंपनीने इअरफोन आणि सनग्लासेस फॅन्ससाठी नामी डिव्हाइस काढले आहे. यामध्ये दोन्हीचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. एक म्हणजे गॉगल आणि दुसरे म्हणजे त्यालाच जोडून असलेले वायरलेस इअरबड्स. हे ब्ल्यूटूथने तुम्ही कोणत्याही डिव्हाइसला जोडून आवडीची गाणी ऐकू शकता. त्यामुळे सनग्लासेस आणि कानात श्रवणीय संगीत दोन्हीचा आनंद एकाच वेळी घेऊ शकता. याची खासियत म्हणजे आवाज खणखणीत असूनही बाहेर जात नाही. यामध्ये फ्रेम्सची बरीच डिझाइन्स उपलब्ध आहेत.

नॅनोलिफ मॉड्युलर लाइट पॅनल 
तुम्ही जर फ्युचर होम आणि स्मार्टहोम डिझाइन करत असाल, तर गृहसजावट करताना प्रकाश योजनेत या दिव्यांचा समावेश करू शकता. त्यांची एलईडीची दोरीसारखी माळ तुमच्या भिंतीवरील डिझाइनमध्ये हवी तशी लावा आणि ते तुमच्या मोबाईलच्या ॲप मधून कंट्रोल करा. यात तुम्हाला हजारो रंग आणि त्याच बरोबर वेगवेगळे मोड्सदेखील मिळतील. तुम्ही ऐकत असलेल्या म्युझिकशीदेखील त्याचा ताल जोडू शकता किंवा तुम्ही ध्यान करत असाल, तर त्याप्रमाणे रंग ठेवू शकता किंवा सूर्योदयासारखेदेखील रंग त्यात सेट करू शकता. तुम्ही यात त्यांचे त्रिकोणी पॅनल्स घेऊ शकता. तुम्ही या वर्षाअखेरपर्यंत थांबलात तर त्यांचे षट्कोनी पॅनेल्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. या नॅनोलिफ लाइटचे बरेच फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला भिंतीवर वेगळे डिझाइन किंवा प्रकाशासाठी खास दिवे लावण्याची गरज नाही.    
 

संबंधित बातम्या