गोडाची संगत, जेवणाला रंगत!

शुभा मुडिकेरी
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
सणावाराला गोडधोड पदार्थांशिवाय जेवणाला रंगत नाही. पंचपक्वान्नांचा घाट घालणं शक्य नसलं, तरी एखादा तरी गोड पदार्थ हवाच! त्यासाठीच गोड पदार्थांच्या या काही वेगळ्या रेसिपीज... 

ड्रायफ्रूट्स हलवा
साहित्य : अर्धा कप तूप, पाव कप बारीक चिरलेले काजू, पाव कप बारीक चिरलेले बदाम, अर्धा कप बारीक चिरलेले अंजीर, अर्धा कप खजुराचे बारीक तुकडे, २ चमचे खसखस, २ चमचे साखर, वेलची पूड.
कृती : ड्रायफ्रूट्स हलवा तयार करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढई वापरवी. कढई गॅसवर गरम करून त्यावर आधी खसखस भाजून घ्यावी. खसखस गार झाल्यावर मिक्सरमधून थोडी बारीक करून घ्यावी. अंजिराचे आणि खजुराचे तुकडे कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून मगच घ्यावेत. कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यात काजू, बदामाचे तुकडे तळून घ्यावेत व बाजूला ठेवावेत. नंतर गरम तुपात भिजवलेले अंजीर आणि खजुराचे तुकडे घालून छान परतावे. त्यात अर्धा कप गरम पाणी आणि साखर घालून व्यवस्थित फिरवावे. नंतर ४ ते ५ मिनिटे झाकण ठेवून वाफ द्यावी. मग, तळून ठेवलेले काजू, बदामाचे तुकडे, बारीक केलेली खसखस आणि वेलची पूड घालावी व छान एकत्र करावे. गॅसवरून उतरवून सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे.
टीप : हवे असल्यास आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि तुपाचे प्रमाणही कमी-जास्त करू शकता.


पुरणाची खीर
साहित्य ः  एक वाटी पुरण, १ वाटी खवलेला ओला नारळ, ४ ते ५ वेलची, २ चमचे साखर, २ चमचे तूप, काजू आणि बदामाचे तुकडे.
कृती : एक वाटी पुरण तयार करून घ्यावे. पुरणपोळीसाठी करतो, त्याप्रमाणे पुरण असावे. १ वाटी खवलेला ओला नारळ घेऊन त्यामध्ये ४-५ वेलची, २ चमचे साखर घालावी. या मिश्रणात १ कप पाणी घालावे व मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यावी. तयार झालेले खोबऱ्याचे मिश्रण पुराणात व्यवस्थित मिसळावे. पुरण आणि वाटलेले मिश्रण घट्ट वाटत असल्यास, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालावे व व्यवस्थित एकजीव करावे. नंतर त्यामध्ये तूप, चिरलेले काजू आणि बदाम घालावेत. मग, गॅसवर ठेवून एक उकळी येईपर्यंत शिजवावे. शिजवताना सतत चमच्याने फिरवत राहावे. पुरणाची खीर चविष्ट लागते.


नारळाच्या दुधातील शेवयांची खीर
साहित्य : एक कप शेवई, दीड ते २ कप नारळाचे दूध, पाऊण कप साखर किंवा गूळ, २ चमचे तूप, २ चमचे काजू तुकडे, २ चमचे बदामाचे तुकडे, अर्धा चमचा वेलची पूड. 
कृती : आजकाल नारळाचे दूध विकत मिळते. पण आपण घरीसुद्धा नारळाचे दूध तयार करू शकतो. त्यासाठी एका नारळाच्या चवामध्ये दीड कप कोमट पाणी घालावे व अर्धा तास ठेवावे. नंतर मिक्सरमध्ये वाटून अतिशय बारीक पेस्ट करावी. वाटलेल्या नारळाचे दूध एखाद्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रातून गळून घ्यावे. नारळाच्या दुधात साखर किंवा गूळ आणि वेलची पूड घालावी. साखर किंवा गूळ विरघळेपर्यंत फिरवावे. गॅसवर कढ‌ई चढवून त्यामध्ये तूप घ्यावे. तुपामध्ये शेवई घालून परतावी. परतून झाल्यानंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवावे. ४-५ मिनिटे वाफ आणावी व नंतर खाली उतरवावे. गार झाल्यावर हलक्या हाताने शेवया मोकळ्या करून घ्याव्यात. गोड नारळाच्या दुधात व्यवस्थित एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवावे. नारळ शेवयांची खीर गारच सर्व्ह करावी. सर्व्ह करताना वरून काजू, बदामाचे तुकडे अवश्‍य घालावेत.


सफरचंदाचा शिरा
साहित्य : एक कप उपम्याचा रवा, अर्धा कप तूप, १ कप साखर, १ कप साल काढून बारीक चिरलेले सफरचंद, सजावटीसाठी काजू आणि बदामाचे तुकडे.
कृती : कढईत अर्धा कप तूप घेऊन गॅसवर गरम करावे. त्यात रवा घालून ३-४ मिनिटे परतून घ्यावा. नंतर त्यात सफरचंदाच्या फोडी घाव्यात. फोडी घातल्यानंतर आणखी ३ ते ४ मिनिटे परतावे. मग, त्यात २ कप गरम पाणी आणि एक कप साखर घालून व्यवस्थित एकत्र करावे. कढईवर झाकण ठेवून, कढई मंद आचेवर १० मिनिटे ठेवावी. १० मिनिटांनी सफरचंदाचा शिरा तयार. ताटलीमध्ये वाढताना वरून काजू व बदामाचे तुकडे, तसेच सफरचंदाच्या फोडींनी सजवावे. दिसायलाही छान दिसते आणि चवही येते.
टीप ः सफरचंद चिरल्या चिरल्या त्याला अर्धा चमचा लिंबाचा रस लावून ठेवावा. त्यामुळे सफरचंद काळे पडणार नाही.


बीट, गाजर आणि केळ्याचा हलवा
साहित्य : एक मोठा बीट, २ मध्यम आकाराची गाजरे, २ केळी, अर्धा कप जाड रवा, ५ ते ६ चमचे तूप, १ कप साखर, ३ कप दूध, अर्धा चमचा वेलची पूड. 
कृती : बीट व गाजर किसून घ्यावे. जाड रवा उपम्यासाठी भाजतो तसा भाजून बाजूला काढून घ्यावा. त्याच कढईत तूप घालून गरम करावे. गरम तुपात किसलेले बीट आणि गाजर घालावे. त्याचा कच्चट वास जाईपर्यंत भाजावे. नंतर त्यात केळी कुस्करून टाकावीत व पुन्हा ३ मिनिटे परतावे. या मिश्रणात भाजलेला रवा घालावा व वरून गरम दूध घालावे. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून कढईवर झाकण ठेवावे. नंतर त्यात साखर घालावी व पुन्हा व्यवस्थित एकत्र करून झाकण ठेवावे. शेवटी वेलची पूड घालून एकत्र करून सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावे.


पंढरपुरी डाळीच्या पोळ्या 
हा पदार्थ कर्नाटकात केला जातो. आपल्याकडे गुळाच्या पोळ्या केल्या जातात, तसाच हा प्रकार आहे.
साहित्य : एक कप पंढरपुरी डाळ, पाऊण कप किसलेला मऊ गूळ, २-३ चमचे तूप, ४ चमचे पाणी.
वरच्या पारीसाठी : अर्धा कप कणीक, पाव कप मैदा, पाव कप बारीक रवा, २ चमचे तांदळाची पिठी, ४ चमचे तेल.
कृती : सारण ः पंढरपुरी डाळीची मिक्सरमधून बारीक पिठी करावी व चाळून घ्यावी. कढईत तूप घालून तापवत ठेवावे. तूप थोडेसे गरम झाले की त्यात चिरलेला गूळ घालावा. मिश्रण सतत फिरवत रहावे. गूळ वितळला की त्यात ४ चमचे पाणी घालावे व पुन्हा फिरवावे. नंतर लगेच कढई खाली उतरवून ठेवावी. त्यात दळलेली डाळ, वेलची पूड घालून एकत्र करून ठेवावे.
पारी : कणीक, मैदा, बारीक रवा, तेल, तांदळाची पिठी असे सर्व जिन्नस एकत्र करून मळून घ्यावेत. चपातीच्या कणकेप्रमाणेच मळावेत. पोळ्या करताना सारणाचे लिंबाएवढे गोळे तयार करून ठेवावेत. कणीक छान मळून मऊ करावी. कणकेचा सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यावा, त्यात सारणाचा गोळा भरावा आणि पुरीएवढी पोळी लाटावी. लाटताना लावण्यासाठी मैदा किंवा तांदूळपिठी वापरू शकता. लाटून नॉनस्टिक तव्यावर भाजून घ्यावे.


पान मलई
साहित्य : एक लिटर दूध, १५ काजू, ३ मसाला पान (बिना सुपारी आणि चुना कुठल्याही पानपट्टीचा दुकानातून आणू शकतो.), १ कप साखर.
कृती : काजू कोमट पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर काजूची मसाला पानाबरोबर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि साखर एकत्र करावी व दूध आटवून घ्यावे. दूध आटवताना सतत ढवळत राहावे. मग त्यात काजू आणि पानाची पेस्ट घालून छान ढवळावे. ढवळून झाल्यानंतर भांडे खाली उतरवून घ्यावे. हे फ्रीजमध्ये ठेवून गार करावे व थंडच सर्व्ह करावे. हा पदार्थ गारच खूप छान लागतो.


पाल पायस (पुरीची खीर)
साहित्य : अर्धा लिटर दूध, १ कप साखर, अर्धा चमचा वेलची पूड, २ चमचे तूप, पुऱ्यांसाठी रवा, मैदा, कणीक, मीठ आणि थोडेसे तेल. 
कृती : रवा, मैदा, कणीक एकत्र करून त्यामध्ये थोडे मीठ व थोडेसे तेल घालून घट्ट मळून घ्यावे. तयार झालेल्या पिठाच्या पुऱ्या करून घ्याव्यात. या पुऱ्यांचे तुकडे करून ठेवावेत. दुधात २ चमचे तूप आणि १ कप साखर घालावी व व्यवस्थित एकत्र करावी. दुधाचे हे मिश्रण गॅसवर ठेवून थोडे आटवून घ्यावे. नंतर गॅस बंद करून आटवलेल्या दुधामध्ये तळून ठेवलेल्या पुऱ्यांचे तुकडे घालावेत व व्यवस्थित एकत्र करावे. अर्धा लिटर दुधामध्ये ८ ते १० पुऱ्या घालाव्यात. खिरीचा हा वेगळा प्रकार मस्त लागतो.    

संबंधित बातम्या