पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 3 जानेवारी 2022


दीर्घकथा

नमुला मी कधी ताई म्हणून बिलगले नाही. ती नेहमी कुणीतरी परग्रहावरची राहिली माझ्यासाठी! यावेळेपर्यंत आई जरा उतरणीला लागली होती नि बाबा रिटायर झाले होले. मी घरात एकटी त्यांना न झेपणारी या कॅटेगरीतली मुलगी उरले. एक खरं, चाळिशीनंतर शहाण्या बाईनं पोर होऊ देऊ नये! मी माझ्या आईला इतकी लेट वयात झाले, की ती बघावं तेव्हा दमलेली असे. ना ती कधी माझ्याबरोबर खेळायला आली ना तिचा नि माझा गाण्यांचा, सिनेमांचा, फॅशन्सचा चॉईस जमला! बाबा तर एकदम पुस्तकांच्या राज्यात हरवलेले असायचे. सांगायचं हे की मला घरात करमावं असं काहीही नव्हतं.

यंदा दिवाळी उशिरा उगवली होती, शिवाय येताना नेहमीसारखी मऊसूत थंडी नाहीच आणली बरोबर. पहाटवारं तर सोडाच, पण साधी वाऱ्याची झुळूकसुद्धा नाही. उंच लटकावलेले आकाशकंदील अजून तसेच होते, आपली जागा पकडून. अगदी सकाळी नावाला घराबाहेर पडलं, तरी ऊन जाणवायला लागलेलं. अशातच एक दिवस ‘बिन बुलाये मेहमान’ बनून सकाळीच आला अवकाळी पाऊस. बरं आला तो आला, पण शांत हळू यायचं सोडून एकदम धडामऽऽऽ धडामऽऽऽ कोसळायलाच लागला. बघता बघता अंगणातल्या बकुळीच्या आणि बुचाच्या झाडांच्या बुंध्यापाशी आणि तुळशीच्या कट्ट्यावर बोराएवढ्या गारा पडायला सुरुवात झालेली. 

मला कुठलीही गोष्ट दमानं घेता येत नाही. त्यापायी कितीवेळा मी माझी ढोपरं फोडून घेतली आणि हाताची कोपरं खरचटून घेतली असतील त्याची गणती करणं अशक्य आहे. सध्या फक्त उजव्या हाताला थोडसं हेअर लाईन फ्रॅक्चर आहे इतकंच! 

मी खिडकीतून बघत होते, आता चांगल्या बोराएवढ्या आकाराच्या गारा अंगणभर पडायला लागल्या... हात गळ्यात अडकवलेल्या अवस्थेत मी अंगणात धावत गेले नि सरळ गारा वेचायला सुरुवात केली. आता गारा माझ्या मुठीत आणि लगेच तोंडात, डाव्या हाताचा तळवा गार पडलेला आणि मन आनंदानं तुडुंब!

मागं येऊन उभ्या राहिलेल्या आईनं चिडून म्हटलं, ‘‘हात मोडलाय तेवढं पुरलं नाही? अंगणात निसरडं झालंय किती, तिथं धावत जाऊन आता काय पाय मोडून घ्यायचा बेत होता? किती सोसायचं गं आम्ही!’’

तिच्या त्या ‘किती सोसायचं गं आम्ही!’ या वाक्याचा खरंतर मला आता अगदी वीट आलेला. जरा कुठं युनिट टेस्टमध्ये गणितात गटांगळी खाल्ली रे खाल्ली की हिचं सुरू.. ‘काय दिवे लावणाराय पुढं जाऊन देव जाणे! ना मला कधी इतके कमी मार्क्स मिळाले ना हिच्या बापाला! किती वेळा सांगितलं, त्या मक्याच्या नादाला लागू नको म्हणून, त्याची आई जाते नोकरीला आणि बाप जातो बिझनेसच्या नावाखाली सकाळपासून बाहेर! सगळं नोकरांचं राज्य. सक्काळपासूनच नुसता उधळलेला असतो. ना अभ्यास ना टभ्यास! नापास होणारे! तू नको जात जाऊ त्याच्याबरोबर खेळायला. पण तू माझं ऐकशील तर शप्पथ! तो गोट्या खेळतो, हीचं लगेच ते बच्चू आणि राणी आणि काय काय सुरूऽऽ! मार मिळाला तरी फरक म्हणून नाही. असली कार्टी नेमकी माझ्याच पदरात का टाकलीस रे बाबा! भगवंता!!’ इत्यादी...इत्यादी...

मधल्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. आमच्या सदाशिव पेठेतल्या पिढीजात घराला भलताच भाव आल्यानं बाबा आणि काका दोघं एकदम एकमतात आले. सदाशिव पेठेतला आमचा जुना वाडा पाडून तिथं अपार्टमेंट्स बांधण्याचं सुरू झालं. लगेच त्या निर्णयाचा परिणाम म्हणून आमच्या घरातल्या प्रत्येक मोठ्या माणसात लळा, प्रेम, करुणा, नीतिनियम वगैरेचं इनबिल्ट सॉफ्टवेअर तयार झालं होतं... (ते नेहमी त्यांच्यावरच्या उत्तम संस्कारांची, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची महती गात असत. हे सॉफ्टवेअर त्यामुळेच तयात झालं असा त्यांचा दावा होता. असो.) पण मिळणाऱ्या पैशांचा धबधबाच इतका जोरकस, की वेळ येताच ते इनबिल्ट सॉफ्टवेअर ताबडतोब अनबिल्ट झालं. प्रत्येकाला किती पैसा.. किती जागा आणि कुमी आत्याकडे किती पैसा द्यायचा यावरून तुंबळ युद्धं व्हायला लागलेली. 

झाडं पडताना झालेल्या कडऽऽकडऽऽ आवाजानं आम्ही मुलं जाम हादरलो. कारण घराला असलेलं अंगण सफाचट.. बुचाच्या लांब दांड्याच्या फुलांनी अंगणभर पसरणं सफाचट.. बकुळीच्या फुलांचा पडणारा मोहक सडा आणि दरवळणारा वास सफाचट.. तुळशी वृंदावन ऑफ कोर्स सफाचट.. हे सफाचट प्रकरण ‘विदीन नो टाईम’ घडावं म्हणून सपासप कुऱ्हाडीचे घाव घालून नव्हे, तर सरळ जेसीबी आणून क्षणात मुळांसकट उखडून काढून सगळं धुळीला मिळवण्यात आलं. अर्थात त्याबद्दल सगळ्यांनी सामुदायिकपणे थोडे अश्रू ढाळले, पण एकूणच सपाटीकरण झट की पट झालं म्हणून घरातल्या वडिलधाऱ्यांना आनंद वाटला हे जास्त खरं! त्या दिवशी आम्ही मुलं म्हणजे फक्त मी आणि मक्या गळ्यात गळे घालून रडलो! नमुताई म्हणजे माझी मोठी बहीण, जिच्या वाऱ्यालासुद्धा आम्ही उभं राहत नसू, ती नुसती ढिम्म! आईजवळ तिच्या हाताला धरून उभी राहिली. 

तर या अशा घरात मी फ्रॉकमधून आधी सलवार कुर्त्यात आले. माझी वाचनाची सवय याच काळात तरारून आली. वाचनाला काही शिस्त? नाही. दिसेल ते मी वाचत होते. त्याच दिवसात एकदा माझ्या हातात माझ्या मैत्रिणीकडचं शोमाकडचं वात्स्यायनानं लिहिलेलं, पण नंतर ते कुणीतरी इंग्रजीत भाषांतर  केलेलं ‘शृंगारशास्त्र’ हे पुस्तक लागलं. या पुस्तकाचं पहिलं पान फाटलेलं होतं त्यामुळे हे भाषांतर कुणी केलं, पुस्तकाचं मूळ नाव काय आहे, वगैरे समजलं नाही. पण त्यामुळे सेंट  मेरीजमध्ये शिकलेल्या मला काहीही फरक पडला नाही.

डिक्शनरी जवळ घेऊन मी वाचतेय ही गोष्ट आईला फारच आवडली. मीही मन लावून ‘ते’ वाचून काढलं. शाळेत आम्हाला सेक्स एज्युकेशन देत नव्हते, पण म्हणून शोमा आणि मी मागं राहिलो नाही. आम्ही जमली तशी आमची शंका एकमेकींना विचारून सोडवून घेतली. जर का आम्ही आमच्या शंका घरात विचारल्या असत्या तर...? तर काय झालं असतं ते केवळ एक देवच जाणे! असो. तर या काळात मिळवलेल्या अगाध ज्ञानामुळे मला असा शोध लागलेला, की ‘आय ॲम प्रॉबेब्ली अनवाँटेड बेबी फॉर माय मदर!’ तसं नसतं तर ती मला जाता येता इतकं टाकून बोलली असती का? कायम आपलं.. असली कार्टी नेमकी माझ्याच पदरात का टाकलीस रे बाबाऽऽऽ भगवंताऽऽ!!

मग एकदा एका तिरीमिरीत बाबा आरामखुर्चीत काहीतरी वाचत बसलेले असताना आई बाबांना काहीतरी नेहमीसारखंच माझ्यावरून टोमणे मारत असताना धाडदिशी विचारलं होतं, ‘‘आई तुम्ही काही काँट्रासेप्टीव्ह्ज नव्हता वापरत? इतक्या लेट एजला तुम्ही मला का जन्माला घातलीत? बघावी तेव्हा तू बाबांना माझ्यावरून टाँट मारतेस ते मारतेस... मलाही टाकून बोलत असतेस..’’ बाबांच्या हातून ते वाचत असलेलं पुस्तक गळून पडल्याचा आवाज झाला, पण त्याहून मोठा आवाज झाला तो आईनं ‘महामूर्ख मुलगी!’ असं म्हणून माझ्या खाडकन थोबाडीत मारली त्याचा! 

तरीही मला पडणारे प्रश्र्न मी विचारायचं सोडलं नाही. मला थोडंच व्हायचं होतं आई बाबांचं लाडकं!

नमुताई आईच्या कडक शिस्तीत मोठी झालेली तिची लाडकी लेक, तरी तिला एकोणिसाव्या वर्षीच आईनं स्थळं बघायला सुरुवात केली. एक दिवस नमुताईला जो मुलगा बघायला आलेला तो एकसारखा त्याच्या केसांवरून हात फिरवत होता. मला संशय आला, यानं डोक्यावर टोप तर नाही ना घातलेला? मी मग माझ्या नमुताईच्या कानात तसं बोलले. जरी माझ्या मते मी हळू बोलले होते, तरी ते म्हणे ऐकू गेलं त्या मुलाच्या आईला.. त्याला स्वतःला. शेवटी त्याला सांगावं लागलं, त्याचे केस जरा जरा अकाली पांढरे होऊ लागले आहेत म्हणून त्यानं पहिल्यांदाच कलप लावलाय, तो कलप त्याच्या केसात खाज पसरवत होता..! 

एनिवेज सोयरीक तुटली! आता यात माझा काय दोष? खरंतर हा असला पांढऱ्या केसांचा, शिवाय काही दिवसांत डोक्याचा टेबलटॉप होऊ घातलेला नवरा गळ्यात पडला नाही म्हणून निदान नमुताईनं तरी माझ्यावर रागवायला नको होतं. पण ती रागावली. वर मला म्हणाली, ‘‘आता तू काही लहान राहिली नाहीयेस. तो तसा चांगला होता, स्वतःची कंपनी चालवत होता, म्हणजे हुशारच असला पाहिजे. या मुलाचे केस पांढरे होऊ लागलेत.. डोक्यावरचे केस जरा जास्त विरळ दिसतायत, हे त्याच्या पाहिलेल्या फोटोवरून आईच्या नि माझ्या लक्षात आलं होतं. असले दोनचार केस पांढरे म्हणून काय झालं? आईसुद्धा याच मताची होती. आम्हाला पसंत होता हा हुशार मुलगा, तुझ्या आचरटपणामुळे फिस्कटलं सगळं!’’

माझ्या ताबडतोब लक्षात आलं, आईनं पढवलेली पट्टी नमुताई बोलतेय. मी फक्त मोठ्यांदा हसले, तर त्याचा आईला राग आला. असो. असे प्रसंग अधूनमधून घडतच होते. त्यामुळे घरातल्यांसाठी मी जास्तच अवघड बनत चालले होते. माझी नमुताई... माझ्यापेक्षा सरळ सरळ दहा वर्षांनी मोठी! आणि सतत खूप शहाणी मुलगी ठरलेली. तर सांगायचं हे की, घरात मी एकदम अनपॉप्युलर!! 

नमुताईचं लग्न होईपर्यंत येता जाता आई म्हणत राही..‘‘घेता आलं तर घे तिच्याकडून काही शहाणपण..!’’

मग लगेच मी मनात म्हणे, ‘नाहीच आहे मी एकसारखं शहाण्यासारखं वागणारी नमुताईछाप! नसेन मी गणितात सशक्त (त्या काळात माझी मराठी शब्दसंपदा बेताचीच होती), पण मी चित्र काढते. गाणं म्हणते, नमुताई आणि तूसुद्धा चित्र काढत नाही की गाणं म्हणत नाही. म्हणजे तुम्ही दोघीसुद्धा या दोन्ही गोष्टीत अशक्त आहात.’

काळ थांबला नव्हताच. मी नक्की मोठी झाले. हाती-पायी धड अशा अवस्थेत. एकदम जीन्स-टीशर्टमध्ये शिरण्याइतपत मोठी झाले. त्या मोठं होण्याचा भाग म्हणून माझ्या ब्राचा नंबर वाढत गेला आणि माझ्यावर आई बारीक लक्ष ठेवायला लागली. ज्या प्रमाणात ती माझी उलट तपासणी करी, त्यापेक्षा अधिक जास्त हुशारीनं मी तिला चकवू लागले. एकूण मी इतकी मोठी झाले की मग उघड युद्धं होऊ लागली आणि येता जाता मला ऐकवण्यात येऊ लागलं, ‘त्या नमुकडे बघ जरा. कधी म्हणून आमच्या पोटातलं पाणीसुद्धा या मुलीनं हलू दिलं नाही, नि तू! जे जे करू नको म्हणावं ते ते करत असतेस! पुढं जाऊन काय दिवे लावणारे देव जाणे!!’

मी चांगले दिवे लावले. बोर्डाच्या परीक्षेत गणितात पायचीत न होता एकदम षटकार मारून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंग्शन पास झाले नि एकदाची कॉलेजला जायला लागले. त्यानंतर पुन्हा ‘गणित’ या विषयाचं तोंड पाहायला गेले नाही. 

नमुताई नक्कीच रूढ मोजपट्ट्यांनुसार सुंदर होती. पांढरी म्हणावी इतकी गोरी! ‘आईवर गेलीय’ असं सगळे म्हणायचे. बाकी सगळा आनंदच होता, म्हणजे होती नकटी, घारोळी, ‘बिग किसर’ म्हणावं अशी जाड ओठवाली. पण राही एकदम झकपक! ती कधी तिचा फ्रॉक खराब होईल असं मातीत खेळली नव्हती की तिनं कधी पावसात धावत जाऊन पायांना माती लागू दिली नव्हती. तिनं कधी रस्त्यावरचं पावसात भिजणारं कुत्र्याचं पिल्लू घरात आणलं नाही की आईचा डोळा चुकवून शेजारच्या पम्मी आंटीच्या डॅनीला (हे त्यांच्या बोक्याचं नाव) दुधावरची थोडी साय नि अर्धा कप दूध त्याच्या बशीत नेऊन घातलं नाही. हे सगळं मक्या करायचा. मी नाही. माझा फक्त त्याला सक्रिय पाठिंबा असायचा, म्हणजे आमच्या घरातलं दूध कपात घालून देणं वगैरे..! मला कुत्री, मांजरं यांचा नाद बिलकूल नव्हता. पण मी पतंगासाठी काचा कुटून मांजा तयार करायला मक्याला अनेकदा मदत केली होती, तेदेखील आईचा डोळा चुकवून. हे कृत्य आईला माहीत नव्हतं.

नव्यानं बांधलेल्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाईपर्यंत नमुताई आईबाबांनी बघून दिलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकेत गेली. तिचं सगळं कसं आखीव रेखीव उत्तमच होत गेलं. नमुला मी कधी ताई म्हणून बिलगले नाही. ती नेहमी कुणीतरी परग्रहावरची राहिली माझ्यासाठी!

यावेळेपर्यंत आई जरा उतरणीला लागली होती नि बाबा रिटायर झाले होले. मी घरात एकटी त्यांना न झेपणारी या कॅटेगरीतली मुलगी उरले. एक खरं, चाळिशीनंतर शहाण्या बाईनं पोर होऊ देऊ नये! मी माझ्या आईला इतकी लेट वयात झाले, की ती बघावं तेव्हा दमलेली असे. ना ती कधी माझ्याबरोबर खेळायला आली ना तिचा नि माझा गाण्यांचा, सिनेमांचा, फॅशन्सचा चॉईस जमला! बाबा तर एकदम पुस्तकांच्या राज्यात हरवलेले असायचे. मक्या म्हणजे ज्याच्या गळ्यात गळा घालून झाडं पाडल्यानंतर मी रडले होते आणि आम्ही दोघांनी मिळून अनंत उद्योग केले होते, त्याला काकानं पाचगणीला हॉस्टेलला टाकला, का? तर म्हणे तिथं शिस्त चांगली लागते! एनीवे, सांगायचं हे की मला घरात करमावं असं काहीही नव्हतं.

आम्हाला आणि काकाला भल्या मोठ्या पैशांच्या गठुड्यासकट प्रत्येकी तीन मोठाले फ्लॅट मिळाले होते. आत्या खमकी निघाली म्हणून तिला काही वाटा द्यावा लागला. पण त्यानंतर आत्या कटाप झाली, अगदी कायमची कटाप!

‘हार्ट ऑफ द सिटी’त असलेल्या आमच्या नव्यानं बांधलेल्या अपार्टमेंटची किंमत इतकी जास्त की इथं कॉस्मॉपॉलिटन लोक राहायला येणं अपरिहार्यच! 

आता आमचे शेजारी बदलले होते. खालच्या मजल्यावर उजवीकडच्या घरात माझी मानलेली पिशी राहात होती. कळलं ना? पिशी म्हणजे आत्या किंवा गेला बाजार मावशी! तिच्याकडे बंगाली रोशोगुल्ले नि फिश करी चापता चापता ती जे बोले ते मला समजायला लागलं, तिच्या सुबीरबरोबर दोस्ती जमायला लागली. त्याच मजल्यावर डावीकडच्या टू बेडरूम ब्लॉकमध्ये पम्मी आंटी राहायची. ती तर माझी खासच लाडकी. तिच्याजवळ आर्टिफिशिअल ज्वेलरीचं झक्कास कलेक्शन होतं. शिवाय लिपस्टिकच्या कितीतरी सुंदर शेड्स आणि नेलपॉलिशच्यादेखील अनंत शेड्स होत्या. ते सगळं ती मला वापरायला देत असे. अर्थात असे नखरे करून घरात जायची माझी शामत नव्हती, नाहीतर आईनं खरोखर तंगडं मोडून हातात दिलं असतं. तर सगळे नखरे करून आंटीच्या घरातल्या आरशासमोर लचकून मुरडून झालं की शांतपणे तोंड धुऊन मी साळसूदपणे घरी जात असे. 

मी गाणी म्हणत असे आणि मला माणसं, मग ती कुणीही असोत, आवडत. माणसांशी बोलणं, गप्पा मारणं, हसणं आणि अदरकवाली चाय पिणं हे माझे छंद होते. एक गणिताशी नातेसंबंध नाही जुळवता आले, तरी पण बाकी मला नवं शिकायला प्रॉब्लेम नव्हता.  

पम्मी आंटी जेव्हा त्यांच्या पंजाबीत, ‘पुत्तरऽऽऽ’ अशी हाक मारून नवज्योतशी बोलत, तेव्हा हळूहळू मला त्या काय बोलतात ते समजायला लागलं आणि बंगाली तर मी रीतसर शिकले, माझ्या पिशी काकुलीकडे.

इथं एक कबूल करायला हवं. या दोन्ही कुटुंबांनी मला आपली मानलं. वास्तविक आमच्या घरात जर असं कुणी वाट्टेल तेव्हा आलं असतं तर.. तर खपवून घेतलं गेलं असतं का? नसतं. पण बहुधा आम्ही मालक होतो त्या जागेचे म्हणून असेल, पण या दोन्ही कुटुंबांनी मला लळा लावला.

मी आता माझी कायनेटिक घेऊन युनिव्हर्सिटीत सोशॉलॉजी डिपार्टमेंटला जाण्याइतकी समजूतदार झाले.

पावसाळ्यात युनिव्हर्सिटी कविता न करणाऱ्या माणसालादेखील कविता करायला लावेल इतकी सुंदर दिसते. लांबवर पसरलेल्या काळ्याभोर रस्त्यांना खेटून उभी वडा-पिंपळाची नि चिंचांची झाडं भर पावसात एकदम खुदकन हसल्यासारखी प्रसन्न दिसत आणि जरा आत तर दाट झाडी आहे इथं. त्या झुडुपांच्या शेजारी सुंदर हिरवळ आहे. त्या किंचित पिवळट हिरवट गवतावर पिवळी, जांभळट नाजूक फुलं वाऱ्यावर डुलत असतात. या ‘आय कॅचिंग’ वातावरणाचा उपयोग कँटिनच्या हुशार काँट्रॅक्टरनं करून घेतलाय. त्याच्या मेन बिल्डिंगजवळच्या कँटिनची एक शाखा त्यानं इथं उघडली. या सगळ्या नैसर्गिक बॅकड्रॉपवर इथलं कँटिन तुफान चालतं. इथल्यासारखा वडा-पाव आणि अदरकवाली चाय आख्ख्या जगात कुठ्ठंच मिळत नाही, असं युनिव्हर्सिटीतल्या तमाम वारकऱ्यांचं पक्क मत!

अशा स्नेहाळ आणि चिरतरुण वातावरणात फक्त अभ्यास होत नसतो. इथं मनं जुळतात.. क्वचित कुणाची फाटतात.. उसवतात.. पुन्हा शिवली जातात. अशा अलौकिक वातावरणाचा परिणाम माझ्यावर झाला. कँटिनला बसून पावसावरची गाणी ऐकताना आम्ही रंगून जायचो, आमचा अड्डा पडायचा तिकडं. पण एक खरं, लेक्चर्स बुडवायचं पाप जरी थोडं फार घडत होतं, तरी जयकर लायब्ररीला गेल्याशिवाय नि तिथली अनेक पुस्तकं वाचल्याशिवाय आमची टर्म पालथी पडत नसे. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कमला आमच्या अड्ड्यात शरीक झाली. ती तशी नाटकं आणि काय काय यात रस असलेली ललितकला केंद्राची स्टुडंट. तिच्या नादानं आम्हालापण कपडेपट.. बॅकग्राऊंड म्युझिक.. कॅरॅक्टरनुसार बदलता मेकअप.. भूमिकेत शिरणं.. कॅरॅक्टर पकडणं.. असंच बरंच माहिती व्हायला लागलं. तिच्या नाटकांना आम्ही जायला लागलो. एखाद्या नाटकाचं प्रॉडक्शन करायचं म्हणजे काय करायचं असतं, हे तिच्या धावाधावीवरून समजायला लागलं. तिच्या भावाशी ओळख झाली. भावेश माझा मित्र झाला तेव्हा कमला म्हणाली, ‘‘वैसा वो बुरा नही। दिल का बहुत अच्छा है, लेकिन उसका गुस्सा.. माय! माय!!’’

तेव्हा वाटलं, हिरा धारदारच असायचा, त्याला कनवटीला लावून जी मिरवेल ती खरी कुशल बाई! कुणा टॉम.. डिक.. हॅरी टाइप शेळपटाशी संसार करण्यात काय थ्रील!! 

बरेच दिवस आमच्यात फक्त मैत्रीच होती. आम्ही कमलाबरोबर बालगंधर्वला जात होतो, तर कधी ती आम्हाला गाण्याचे ट्रॅक्स कसे तयार करतात आणि मग गायक गायिका येऊन कसं काम करतात हे दाखवायला घेऊन जात असे. भावेशला म्युझिक आवडायचं. तो कॉम्प्युटरचा वापर करून काय काय करामती करायचा... माझं आश्र्चर्य आणि त्याचवेळी भावेशबद्दलचा वाढता आदर! 

या प्रचंड आनंद आणि सुगंध लाभलेल्या काळात भावेशचा फोन आला तर मी धावत जायला लागले त्याला भेटायला. कधी भर पावसात, तर कधी अंधार पडायला लागलेला असताना.. त्याच्या उंच सडसडीत देहाचं, कुरळ्या केसांचं, टपोऱ्या पिंगट मधाळ रंगाच्या डोळ्यांचं गारूड माझ्या मनावर पडलं. त्या वेड्या दिवसांत एकदाही हा विचार मनात आला नाही, की कमला घाऱ्या डोळ्यांची आणि गव्हाळ रंगाची, तिची बा आणि बापू तर चक्क निळसर घाऱ्या रंगाच्या डोळ्यांचे आणि धक्क गोरे. मग हा भावेश जरा जास्तच काळा.. कुरळ्या केसांचा आणि पिंगट मधाळ रंगाच्या डोळ्यांचा.. यांच्या कुटुंबात कसा? 

आमच्या गप्पा रंगत असत आणि खूप साऱ्या आवडीदेखील जुळत असत, जसं की तोदेखील लहानपणी आवडीनं रस्त्यावरच्या खड्ड्यातल्या रंगीत पाण्यात उड्या मारून जाम खेळला होता, पतंगांमागे धावला होता आणि त्यानं तर लीड घेऊन काचा प्रत्यक्ष कुटून बांचा डोळा चुकवून शंभरवेळा तरी काची मांजा खास पतंगांच्या लढतीसाठी तयार केला होता, अगदी माझ्यासारखा. आणखी काय हवं एखादं माणूस आपलं वाटण्यासाठी!! वूमेन स्टडीजमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला घेतलं. केस स्टडीज्, जर्नलचं काम.. एकूण फारच बिझी शेड्युल झालं माझं. मग जमेनासं झालं नाटकं आणि गाण्याचे कार्यक्रम अटेंड करायला. भावेशचं पवईत पीएचडीदेखील होत आलं. 

त्यानं पीएचडीसाठी निवडलेल्या विषयाबद्दल जेव्हा माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती, तेव्हा माझ्यासाठी ते सगळेच्या सगळे ‘वाईड बॉल्स’ होते! लक्षात राहिलं ते एवढंच, की आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या विषयात तो ‘दादामाणूस’ होण्याचं स्वप्न पाहात होता. पण म्हणून त्यानं कधीही कॉम्प्युटरवर रोमँटिक गाणं कंपोझ करणं थांबवलं नाही, की दर वीकएंडला पुण्याला येणं! 

तो येत राहिला, आमच्यात गप्पा होत राहिल्या.. मला प्रश्र्न पडत राहिले, हा कसं जमवतो हे सगळं?  कमलाला म्हटलं तसं, तर ती म्हणाली, ‘‘वो तो प्रतिभाशाली गिफ्टेड बेबी है! एकबार कुचभी उसने पढा, देखा, तो उसकी कॉपी उसके दिमाग की हार्डडिस्क में फाईल हो गयी समझो। वो सिर्फ अपने दिल की सुननेवाला याने के ‘बा’ उसको ‘नतद्रष्ट कार्टा’ बोलती है.. वैसाच है!’’ आणि ती जोरात हसली होती.
दिवस पळाले भराभरा. मलादेखील डोक्यात खोवायला एक पीस तयार झालं, ते म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन फार शायनिंग नाही, पण फर्स्ट क्लासमध्ये पार पडलं. त्यानंतर अजून एक छोटं ‘पीस’! ते म्हणजे ट्रेण्ड सोशल वर्करचा डिप्लोमा, मी त्या परीक्षेत पहिली येऊन मिळवला.  

नोकरीच्या शोधात होते. आई मागं लागली लग्न कर म्हणून. वर तिनं असंही सुरू केलं, ‘‘आधीच लेट झालाय तुझ्या लग्नाला. नमु बघ कशी विसावं सरता सरता पहिल्या बाळंतपणाला आलीसुद्धा होती आणि तू?.. तिशी आली तरी कसला पत्ता नाही. कठीण गं बाई तुम्हा आजकालच्या मुलींचं! आलेलं प्रत्येक स्थळ असं टोलवत राहिलीस, तर शेवटी लग्नाच्या बाजारातला उरलेला गाळ पाहत बसायची वेळ येईल. आणि मग हातघाईला आलीस की गळ्यात पडेल एखादं वेडंविद्र रत्न!...’’
आणि तरीही मला कसलीच घाई पसंत नव्हती!
                                  (क्रमशः)

संबंधित बातम्या