पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 10 जानेवारी 2022

 
दीर्घकथा

अलीकडे भावेश फार उदास राहायला लागला. त्याचं कशातच लक्ष नसे. खूप महिने ज्या भावेशबरोबर पुण्यात हिंडले फिरले, गप्पा मारल्या, त्या भावेशच्या स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांना मी ओळखलं नव्हतं. अनेकदा वाटायचं अगदी अनोळखी माणसाबरोबर आपण वावरतोय... 

आईनं लग्नाचा विषय काढला की मन एकदम गप्प व्हायचं. कारण अलीकडे मनाला एक विचित्र हुरहूर जाणवायला लागलेली, कशात म्हणून लक्ष लागत नसे आणि काही सुचत नसे. सदान कदा मन बेटं बेचैन. त्या तसल्या अवस्थेत एक दिवस सरळ उठले नि युनिव्हर्सिटी गाठली. 

कॅम्पसवरच्या लांब दांड्याच्या पिवळसर आणि निळसर फुलांनी सजलेल्या हिरवळीलगत असलेल्या कँटिनला भावेश आलेला, मी तिथं जाऊन बसले. नेहमीसारख्या आमच्या गप्पा सुरू झालेल्या. हलके हलके संध्याकाळ पळून जायला लागली, पश्र्चिमेला एकेक चांदणी उगवायला सुरुवात झाली. या वेड्यावेळी भावेशनं सरळच मला विचारलं, ‘‘हे असं किती दिवस भेटणार आपण? माझं पीएचडी झालं. डॉक्टर डेरेक यांनी सुचवलं नि मी अर्ज केला मोटोरोलामध्ये. काल टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालाय. न्यू यॉर्कला मोटारोलामध्ये नोकरी मिळालीय, आता थोडं व्हिसाचं काम बाकी आहे. ते झालं की लगेच जायचंय. तुझ्यासारखी स्वच्छ मनाची नि आनंदी वृत्तीची मुलगीच मला हवी होती. येशील ना माझ्याबरोबर तिकडे? तू फक्त ‘आय लव्ह यू’ एवढंच म्हण!!’’

भावेश बोलत होता नि मी त्याच्याकडे टक लावून पाहत होते. जो माझ्या मनात भरलेला त्यानं मला हे असं प्रपोझ करावं! मी चटकन पुढे सरकले नि त्याच्या ओठांवर ओठ टेकले नि तिथून धूम पळत सुटले. मन एकाएकी निवलं होतं.

ज्या मुलावर मी जीव ओवाळून टाकला होता त्या मुलाबद्दल किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल मात्र मला घंटा माहिती होती.

आमचं प्रेमाराधन ऐन मोसमात आलं असताना एक दिवस विहानचा म्हणजे कमलाच्या मामेभावाचा मला फोन आला. विहान कमलावर लाईन मारतो हे मला माहीत होतं, पण तसा तो आमच्या अड्ड्याचा वारकरी नव्हता. एकदोन वेळा त्याची नि माझी भेट झाली होती इतकंच; तीदेखील कमलाच्या घरी तिच्या वाढदिवसाला गेले होते म्हणून.

मी फोन उचलला नि नुसतं, ‘‘ हॅलो!’’ म्हटलं तर त्यानं तोफ डागावी तशा आवाजात सुरूच केलं. म्हणाला, ‘‘आमच्या भावेशशी लग्न करणार म्हणे तू! हार्टी काँग्रॅट्स! ए, पण तुला त्यानं हे सांगितलं असेलच ना, की तो जस्ट काही दिवसांचा असताना बापूंना एका बागेत बाकड्यावर सोडून दिलेला सापडला. त्याला बापू घरी घेऊन आले. म्हणजेच कमलाच्या घरात तो केवळ आश्रित म्हणूनच लहानाचा मोठा झालाय. असो. रागवू नकोस. गेलं माझ्या तोंडून झालं.’’

मी ऐकत होते, हूऽऽहूऽऽ करत होते. खरंतर माझी नि भावेशची मैत्री आमच्या अड्ड्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर यावी इतकी दाट व्हायला लागली होती, तरी कमलानं यातलं कधीही काहीही मला सांगितलं नव्हतं.

मी न राहवून विचारलं, ‘‘..पण कमला असताना बापू कशाला असं मूल घरात आणतील?’’

‘‘भले शाब्बास! म्हणजे तुला हेही माहीत नाही का की भावेश एक वर्षाचा झाला नि मग कमलाचा जन्म झाला. बापू कितीवेळा भावेशला त्यांचा ‘लकी चार्म’ म्हणायचे. ए, निदान आता मला हे ऐकायला मुळीच आवडणार नाहीये की भावेशला पवारांच्या इस्टेटीतला छदामदेखील मिळणार नाहीये हे त्यानं तुला सांगितलं नाहीये म्हणून. कमलाच फक्त पवारांच्या इस्टेटीची वारस आहे कारण ती त्या दोघांची मुलगी आहे!’’

‘‘बापू आणि बांचा भावेश खूप लाडका आहे मला बोललाय भावेश, असं असताना ते असा भेदभाव कसा करतील?’’ मी विचारलं तेव्हा विहान एकदम ट्रायम्फन्टली ओरडला, ‘‘भेदभाव ऑलरेडी करून झालाय! बापूंच्या आईनं कमलाच्या जन्मानंतर याच एकमेव अटीवर बापूंना पवारांच्या इस्टेटीतला हक्क दिला आणि मी कमलाचा मामेभाऊ! सख्खा नात्यातला.. मला हे माहीत नसणार तर कुणाला? मी तुला हे सांगितलंय हे भावेशला सांगू नकोस नाहीतर तो माझ्यावर रागवेल.’’

फोन कट झालेला.

त्यानंतर पहिल्यांदाच मला भावेशच्या कुरळ्या केसांचं नि पिंगट, मधाळ, टप्पो-या डोळ्याचं वैषम्य वाटलं! त्यानं हे सगळं स्वतः सांगितलं का नाही असा प्रश्नसुद्धा पडला. पण तो प्रश्न एवढा भारी वाटला नाही की त्यामुळे भावेश मला दूरचा झाला! उलट आता तर तो मला अधिकच आवडायला लागला. मनात म्हणत राहिले, अधिक जवळचे झालो की सांगेल तो आपणहून!! 

हे सगळं घरात सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे आई आणि बाबांनी

 विरोध तर केलाच वर आशीर्वादपर हेही सुनावलं, ‘ना त्याच्याजवळ 

पैसा ना आडका. ना आपल्या जातीच ना पातीचा. तुझी एकदेखील हौस मौज करू शकणार नाही तो. ‘हजबंड मटेरियल’ म्हणून एकदम कंडम आहे!’ 

आई उवाच... ‘ पैसा नसला की मग वादांना सुरुवात होते नि मग प्रेमबिम आटायला लागतं. मी आत्ता सांगते, तुझं त्याच्याशी पटायचं नाही. तू ही अशी भलतुकडी! तुला केव्हा काय करावं, काय बोलावं याची अक्कल नाही. सोशिकपणा नाही. लहानाची मोठी झालीस ती तुझे सगळे नखरे यथास्थित पार पडत असताना. तुला पैसा नसणं म्हणजे काय याचा अनुभव नाहीये! चार दिवसांत लग्न मोडून परत येशील नि पुन्हा बसशील आमच्या..’’

‘आमच्या.. बोकांडी!’ त्याच घरात वाढलेली असल्यामुळे मला बरोब्बर समजलं त्या दोघांना काय म्हणायचं होतं ते.

आम्ही रजिस्टर लग्न केलं नि गेलो बा आणि बापूंच्या पाया पडायला, तेव्हा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. म्हणाले, ‘‘जुग जुग जिओ! सदा सुहागन रहो!!’’ बाकी काही नाही. ना मला कंगन मिळाले, ना मुहुर्ताची साडी, ना तोंड गोड केलं गेलं. चूक भावेशची होती. एवढा खर्च झाला त्याला लहानाचा मोठा करण्यात, एवढ्या खस्ता खाल्ल्या होत्या त्या दोघांनी या बेवारस मुलाला मोठा करताना, पण या मुलानं लग्न केलं ते त्यांना न विचारता, एका ब्राह्मण मुलीशी. दहेज तो दूर की बात.. सोना.. चांदी.. स्कूटर.. कुछ नही लायी ये लडकी!

भावेश आता या घरातून नक्की जाणार याचा आनंद झाला तो विहानला. आता त्याला येता जाता ‘भावेश बघ कसा गुणी आहे’ हे ऐकावं लागणार नव्हतं की कमलाचं भावेशला सदान कदा झुकतं माप देणं सहन करावं लागणार नव्हतं. कमला आपल्याच विवंचनेत होती. तिला दिल्लीला आता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला ॲडमिशन घेऊन तिकडे जायचं होतं, पण भावेशनं हे दिवे लावले! त्यानं बा बापूंच्या मनाविरुद्ध लग्न केलं त्यामुळे आता तिचं दिल्ली बोंबललं होतं आणि हे लोक तिच्या लग्नासाठी तिच्यामागं लागले. ती नाराज होती आमच्यावर.

त्याचवेळी अमेरिकेत नॅशनॅलिटी मिळवून राहाणाऱ्या नमुताईच्या नव्या रोल्सरॉइसची कौतुकं आमच्या घरात चाललेली! तिच्यापुढे भावेश म्हणजे ‘हुडूत, असल्या मुलाचा विचारसुद्धा आम्ही कधी केला नसता,’ या कॅटेगरीत गेला. 

चार दिवसांत आम्ही आपापली घरं सोडली, मुंबईला आलो. युथ हॉस्टेलवर एक आठवडा काढला आणि एका मध्यरात्री नेवर्क एअरपोर्टला घेऊन जाणाऱ्या लुफ्तान्साच्या विमानात बसून फ्लाय झालो. 

अमेरिकेत आमचं पहिलं पाऊल पडलं ते जर्सी सिटीत. आम्हाला कंपनीनं उतरवलं होतं त्यांच्या गेस्ट हाऊसवर. दोन दिवसांत घर बघून आम्ही तिकडे शिफ्ट होणार होतो. भावेशनं ऑफिसमधून फोन करून सांगितलं, ‘‘हे बघ आपल्याला आज घर बघायला जायचंय तेव्हा तू डाऊनटाऊनला बरोबर दुपारी चारला पोच.’’

आता डाऊनटाऊनला पोहोचायचं म्हणजे नेमकं कुठे जायचं? कसं जायचं? मला समजेना म्हणून मग मी त्याला फोन केला. कारण मला डाऊनटाऊनला यायला सांगून भावेशनं फोन कट केलेला. माझा फोन आला म्हणताना जरा चिडूनच फोनवर तो म्हणाला, ‘‘रिसेप्शनवरून जर्सी सिटीचा मॅप घेऊन यायचं दिलेल्या पत्त्यावर एवढं साधं तुला समजू नये? आश्र्चर्य आहे! मी ॲड्रेससुद्धा सेंड केलाय तुझ्या मोबाईलवर. वेळेवर ये.’’ आणि त्यानं फोन आपटल्याचा मला आवाज आला. आयुष्यात कधी हातात मॅप घेऊन नवख्याच काय पण माझ्या ओळखीच्या शहरातसुद्धा पत्ता शोधत गेले नव्हते.

आता आली का पंचाईत! मी जरी भलतुकडी होते तरी माझी अजून एक सॉलिड गोची झाली होती. आपण जशा पद्धतीत इंग्रजीचा खातमा करत असतो, इंग्रजी शब्दांचे मराठीला घासून उच्चार करत असतो तसं इथं नाही. मुळात या यांकींचे अमेरिकी उच्चार मला समजायला अम्मळ जड जात होते. त्यात भर पडली त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या अनेक अगदी नवख्या अशा खास अमेरिकी शब्दांची. ते लिफ्टला ‘एलेव्हेटर’ म्हणत आणि पेट्रोलला गॅस.

कधीच न ऐकलेले अनेक नवे शब्द तर चक्क माझ्यासाठी बाऊन्सर्स ठरत होते. तरीही मुकाट्यानं आज्ञाधारक पत्नीप्रमाणे गेस्ट हाऊसच्या रिसेप्शनला जाऊन शहराचा मॅप मागितला. रिसेप्शनच्या मुलीनं मॅप हातात ठेवला नि ती माझ्याकडे पाहत बसली. कदाचित तिला इंडियातून येणाऱ्या तमाम मुली किती येरू असतात ते माहीत असावं. मॅप हातात घेऊन मी त्यावरचे ॲरो, बसस्टॉप आणि स्थानिक प्रवासासाठी असलेल्या आपल्यासारख्या लोकल्सच्या जातीच्या रेल्वेलाईन्सच्या, त्यांच्या स्टेशन्सच्या खुणा, रस्त्यांची आणि चौकांची नावं एक ना दोन अनेक गोष्टी त्या मॅपमध्ये दाखवलेल्या पाहत राहिले.

माझ्या डोळ्यात आता बहुधा पाणी येणार असं मला वाटायला लागलं. त्या क्षणी असंही वाटलं, जवळ पैसे असते तर सरळ टॅक्सी बोलावली असती नि गेले असते त्यानं सांगितलेल्या पत्त्यावर. पण अजून खुद्द भावेशजवळ फारच थोडे डॉलर्स होते, तर माझ्या पर्समध्ये कुठून असणार? 

काय करावं काहीही समजात नव्हतं. एकीकडे भावेशचा राग यायला लागला. त्याला एवढं समजू नये, पहिल्यांदाच अमेरिकेत पाऊल ठेवलेली नि सदाशिव पेठेच्या बाहेर फार कुठं न गेलेली आपली नवीकोरी बायको मॅप हातात घेऊन कसा प्रवास करायचा ते काहीही नाही समजलं तर ती काय करेल? तिच्या पर्समध्ये डॉलर्स किंवा क्रेडिट कार्ड नसताना कशी येईल सांगितलेल्या पत्त्यावर? भावेशनं फोन खाली ठेवण्यापूर्वी निदान एवढं तरी विचारायला हवं होतं, ‘हातात मॅप धरून त्यावरून पत्ता शोधणं जमेल ना गं तुला?’ पण भावेश तसलं काही विचारणाऱ्यांच्या जातीचा नव्हता. 

आता काय करायचं? सांगावं का भावेशला, मला न्यायला ये म्हणून? मला नाही जमायचं एकटीनं येणं!! 

तीन वाजायला आले आणि मी रडायच्या घाईला आले. आईची खूप आठवण यायला लागली. मी मुकाट्यानं आमच्या सूटवर आले नि तिथल्या बाल्कनीत जाऊन बसले, डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. 

कितीवेळ अशी बसून होते कोण जाणे. भावेश आलेला मला समजलं नाही. त्यानं जेव्हा माझ्या खांद्याला स्पर्श करत हातात मशिनचा चहा ठेवला तेव्हा मी त्याच्याकडे मान वर करून पाहिलं.

त्याच्या चिडलेल्या चेहऱ्यावरून मी समजले काय समजायचंय ते. मी गेले नव्हते त्यानं सांगितलेल्या पत्त्यावर म्हणून रागावला बहुधा! मी त्याच्या नजरेला नजर द्यायचं टाळत होते. मला मुळीच न आवडणारा तो बंडल चहा मन लावून पितेय असं नाटक करत होते. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत माझ्या शेजारी बसत त्यानं पहिली फैर झाडली, ‘‘एवढी रडारड करायला काय झालं?’’ 

मी समोरून दिसणाऱ्या काळवंडत चाललेल्या आकाशाच्या तुकड्याकडे पाहत राहिले, पण त्याच्या प्रश्र्नाला उत्तर दिलं नाही. संसाराला सुरुवात झाल्यानंतरच्या आमच्यातल्या पहिल्या भांडणाची ही सुरुवात होती.

‘‘साधा मॅप वाचता येऊ नये? कमाल आहे़!..’’

‘‘आम्ही पुण्यात काय मॅप वाचण्याचे धडे गिरवत असतो की काय?’’

‘‘मुर्खासारखं बोलू नकोस. प्रत्येक गोष्टीचे धडे नाही गिरवावे लागत, साधा कॉमनसेन्स वापरायचा बस! मी इथे नोकरीला पहिल्या दिवशी गेलोच ना मॅप हातात घेऊन ऑरेंज लाईन पकडून?’’

‘‘मला नाही जमणार.’’

‘‘मग काय परत जाणार?’’

मी दचकले हा असं बोलेल असं वाटलं नव्हतं कधीसुद्धा. पण तो तसं बोलला होता आणि मी दुखावली गेले होते.

आता मागं वळून पाहते तेव्हा माझं मला हसू येतं. खरंतर कमला एकदा म्हणालेली, ‘उसका घुस्सा... तौबा...तौबा..!’ एकदा ती असंही म्हणालेली, भावेश है दिल का एकदम साफसुधरा लेकिन उसकी जबान कैच्ची माफीक चलती है!’’ पूज्य आईनं वॉर्न केलेलं.. पैसा नसेल तर वाद होतात आणि प्रेमाला ओहोटी लागते, पण या गोष्टी मला तेव्हा समजल्या नव्हत्या. आमचा नवा संसार सुरू झाला तो या अशा नोटवर!!

एकट्यानं जाऊन भावेशनं घर फायनल केलं. मुळात आम्ही जर्सी सिटीत का राहायला आलो जर नोकरी न्यू यॉर्कला होती. उत्तर सोपं. इथं राहणं स्वस्त. शिवाय इथून न्यू यॉर्कला जायला रेल्वेच्या सोयीसुद्धा खूप छान आणि पुन्हा स्वस्त! न्यू यॉर्कला नोकरीला जाणारं तमाम पब्लिक म्हणूनच इथंच बस्तान ठोकायचं, आम्हीदेखील म्हणून तर आमचा तंबू इथं ठोकला. 

वेस्ट साईडला ‘वागदू अपार्टमेंट्स, ४०, गेफर्ड ॲव्हेन्यू’ हा होता आमच्या घराचा पत्ता... आणि आम्ही शिफ्ट झालो. वेस्ट साईड हे जर्सी सिटीतलं उपनगर, हा भाग उंच उंच इमारतींनी गजबजलेला, इथं खूपसारी कॉफी शॉप्स होती. त्याच्या जोडीनं बार होते आणि सुंदर बागासुद्धा होत्या. या उपनगरात लिबरल असं ‘भेळ’ कल्चर होतं आणि ते बनवलं गेलं होतं इथं राहायला आलेल्या ढेरसाऱ्या आफ्रिकी अमेरिकन, हिस्पॅनियन, अमेरिकी आणि थोड्या इंडियन्सनी मिळून.

भावेश कामात इतका बुडालेला असायचा की सकाळी आठच्या सुमाराला तो जो गायब व्हायचा तो एकदम संध्याकाळ टळत चालली की म्हणजे सात-साडेसातला उगवायचा. 

हाउसिंग कॉप्लेक्सजवळ एक बाग होती. त्या बागेत मी कितीतरी वेळा गेले. बाकड्यावर बसायचं नि आजूबाजूला खेळणाऱ्या मुलाबाळांकडे पाहायचं. याच बागेत अशीच एकटं बसायची सवय करून घेताना बाकड्यावर बसून राजरोस प्रेम करणाऱ्या कपल्सकडे दुर्लक्ष करायचे धडे गिरवले. असे धडे गिरवताना सुरुवातीला बसले होते कल्चरल शॉक्स.. पहिल्याच दिवशी भर बाजारात पहिला शॉक बसला.. त्यानंतर तोकडे कपडे, उंच टाचेचे शूज घालून तरातरा चालणाऱ्या सुंदरी पाहिल्या, त्यावेळी पुरुषांची किती वाईट अवस्था होत असेल, असं आपलं मला वाटलं, पण मी आजूबाजूला बघितलं तर त्या रंभा उर्वशींकडे कुणीसुद्धा पाहत नव्हतं; त्याहून नवल, त्या पोरींनाही आपला जामानिमा वाया गेला असं वाटत नव्हतं! धन्य गंऽऽ बायांनो!! थोड्याच काळात सरावली माझीही नजर आणि मग नेहमीचंच झालं हे सगळं माझ्यासाठीसुद्धा! 

शनिवार आळसात जायचा, कारण रोजच्या धावपळीवर तोच एक स्वस्त आणि मस्त तोडगा होता. सलग आठ तासांहून जास्त वेळ आम्ही एकमेकांसोबत असायचो. तेवढ्या वेळात रागवारागवी, रुसवे फुगवे, मनवणं, लाड, कौतुकं, प्रेम करणं असं सगळं चालायचं. आणि रविवार! तो सारा दिवस पुन्हा दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या धावाधावीसाठी तयारी करण्यात संपून जायचा. या दोन दिवसांतच  नव्या संसारासाठीची पिटुकली खरेदीसुद्धा व्हायची.

भावेशचा हात धरून इथं आले होते ती डिपेंडंट व्हिसावर आणि ओबामा प्रेसिडेंटसाहेबांनी चक्क डिपेंडंट व्हिसावाल्यांना नोकरी करण्याची मनाई केलेली. साहजिकच भावेशची नोकरी अति महत्त्वाची! नव्या नोकरीत स्वतःला सिद्ध करता करता त्याला कशालाच वेळ नव्हता. दोन वर्षांत मोटोरोलात त्यानं दोन नवी प्रॉडक्ट्स डेव्हलप केली. कंपनीला हा माणूस हवाच होता. कंपनीनं त्याचं ग्रीनकार्ड प्रोसेस करायला सुरुवात केली. नळाबरोबर दांडा तशी माझीपण ग्रीनकार्डसाठीची प्रोसेस सुरू केली गेली.

कधीतरी भावेशला मनापासून वाटे, आपण काय काय करामती करतोय ते आपल्या बायकोला समजावं तिनं आपलं कौतुक करावं, त्या एकमेव उद्देशानं तो मला सांगत राही... ‘‘हे बघ इरा, आपला तळहात आणि हाताची बोटं आहेत ना तेवढी सामग्री पुरे आहे संपूर्ण लॅपटॉपवर आपण जे काम करतो ते करायला.’’

‘‘पण लॅपटॉपचा स्क्रीन तर तळहातापेक्षा केवढा तरी मोठा असतो. ते सगळं हातावर कसं मावायचं रे?’’

तर तो माझ्याकडे बघून हसून म्हणे, ‘‘इकडे बघ. ही समोरची भिंत दिसतेय तुला?’’

‘‘हो!’’

‘‘तीच वापरायची स्क्रीन म्हणून?’’

‘‘कायच्या कायचं तुझं!’’

‘‘हे बघ, त्यासाठी फक्त पंजावर एक चीप बसवायची नि बोटांना पंजाला जोडलेली वायर! बोटांनी भिंतीवर लिहायचं की झालं काम.’’

‘‘पण ते सेव्ह नाही केलं, फाईल नाही केलं तर पुसून जाईल की.’’

‘‘मग ती चीप कशाला बसवलीय? ती लगेच सेव्ह करू शकेल किंवा सांगाल त्या फोल्डरमध्ये मॅटर फाईलपण करू शकेल. मी सध्या त्यावरच काम करतोय. एकदा का ते झालं की मग लॅपटॉपची बॅग बाळगायची गरज उरायची नाही.’’

मी त्याच्याकडे पाहत बसे. अशावेळी कमला म्हणालेली ते वाक्य आठवत राही..‘‘ही इज अ प्रतिभाशाली गिफ्टेड बेबी..!’’ अभिमानानं माझा ऊर भरून येई.

त्याचा तो प्रॉजेक्ट समहाऊ रखडत गेला. पण मधल्या काळात आमचं ग्रीनकार्ड झालं. इतक्या झटकन का झालं, तर ते केवळ भावेशमुळे. तो ठरवला गेला स्पेशल कॅटॅगरीतला हायली स्कील्ड माणूस. असो. नळ्याबरोबरच्या दांड्याचंपण ग्रीन कार्ड झालं!

मी खूप जोरात आईला ही ‘गूड न्यूज’ देऊन टाकली. वर असंही कळवलं, ‘बघ मी कसा निवडून पारखून हिरा मिळवलाय, ग्रेट ना!’

...आणि नियती मला हसली. भावेश फार उदास राहायला लागला. त्याचं कशाताच लक्ष नसे. धड प्रेमदेखील नीट करू शकत नव्हता तो. एक दिवस नेहमीच्या खूप वेळेआधी तो कंपनीतून परत आला नि पहिल्यांदाच त्यानं सरळ कपाटातून व्हिस्की काढली. त्यात चार बर्फाचे खडे टाकले नि तोंडाला लावली ना त्यात कोकाकोला मिसळला ना सोडा, कोरी नुसती व्हिस्की!

मी गप्प बसले. समजत नव्हतं काय झालंय ते, जवळ गेले तर म्हणाला ‘‘प्लीज, आय वाँट टू बी अलोन.’’

रात्र वाईट गेली. प्रेमालाप न करताच ओरबाडल्यासारखा आमचा शृंगार झाला. मला वाईट वाटलं पण मी गप्प राहिले. सकाळी उठून नेहमीसारखी चाय करून टोस्टला बटर लावून त्याला हाक मारली, तर तो अजून गाढ झोपेतच होता. आजवर असं कधी झालं नव्हतं. खरंतर रोज सकाळचा पहिला चहा भावेश करायचा मी नाही. मी त्याला हाक मारली तर म्हणाला, ‘‘आज कसलीही गडबड नाहीये.’’

मला विचावसं वाटलं का? पण मी विचारलं नाही समजूत घेत राहिले. म्हटलं, नसेल बरं वाटत किंवा हँगओव्हर आला असेल, काल आचरटासारखी ढोसलीय तीसुद्धा सवय नसताना!

दुसरा दिवस. पुन्हा सगळं नाटक तेच. तिसरा दिवस. नाटक तेच. मग मात्र मी विचारलं, ‘‘बा नवऱ्या प्रकार काय आहे? उचकटा एकदाचं आपलं तोंड!’’

समजलं ते एवढंच, की त्याच्या चालू प्रॉजेक्टला एकाएकी खीळ घालण्यात आली. कारण दिलं नाही. आणि त्याचं बिनलसं. बास. तो कंपनीच्या बाहेर पडला होता. त्याचा पेशन्स एरवीसुद्धा कमीच, त्याची एकसारखी चिडचिड चालायची. माझीपण चिडचिड व्हायची, पण माझ्या चिडचिडीची कारणं वेगळी होती. 

इथं हॉट प्लेटवर स्वयंपाक करणं हा एक अजब अनुभव होता. पेटवल्यावर तापायला वेळ घेणार, पण एकदा गरम झाली की इतकी गरम होणार की विचारता सोय नाही. त्यामुळे कधी भात करपत होता, पोळ्या कच्च्या राहत होत्या, तर कधी त्यांच्यावर भरपूर काळे डाग पडून त्या कडक होत होत्या. इतका काळ त्यांच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न करूनही मनस्ताप होतच होता. कसबसं एकदाचं या हॉट प्लेटशी जमवलं, पण खूप महिने ज्या भावेशबरोबर पुण्यात हिंडले फिरले, गप्पा मारल्या, त्या भावेशच्या स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांना मी ओळखलं नव्हतं. अनेकदा वाटायचं अगदी अनोळखी माणसाबरोबर आपण वावरतोय. हौसेनं केलेला लाडका नवरा रागवून दिवस दिवस एकदम म्यूट व्हायचा, तर कधी एवढ्यातेवढ्या चुकीवर फाडदिशी म्हणायचा..‘बिंडोक कुठलीऽऽ!’ माझ्या जिव्हारी लागायचं त्याचं हे बोलणं. मग मी म्यूट मोडमध्ये! असा होता आमचा संसार! 

                              (क्रमशः)

संबंधित बातम्या