पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

दीर्घकथा

भावेशला नोकरी नसे त्या मधल्या काळात त्याच्या जिभेला तलवारीची धार चढे. मग छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरून तो माझे वाभाडे काढी आणि बरेचवेळा या स्फोटाचा शेवट माझ्या अंगावर वस्कन ओरडण्यात किंवा ‘महाबिनडोक कुठलीऽऽ’ अशा स्वरूपाच्या बोलण्यानं होत असे. मग आमच्यात अबोला सुरू होई. हा अबोला किती दिवस टिकेल याचा काही भरवसा नसे... 

नवरा बायकोच्या भांडणाची गोडी टिकून राहते ती नवऱ्यानं बायकोला मनवल्यावर! आमच्यातल्या रागवारागवीनंतर मी गप्प. घर गप्प. मग लगेच घरात स्मशानशांतता का काय म्हणतात ते पर्व सुरू व्हायचं. भावेशला असलं काहीच सहन व्हायचं नाही, मग त्याची तगमग सुरू. त्यानं गुढघे टेकले की आमचा समझोता होणार हे ठरलेलं! पण या प्रत्येकवेळी वाटायचं आमच्या प्रणयाराधनाच्या काळात मी सामान्य आहे, हे याला दिसलं नव्हतं? पण आता असले प्रश्र्न निरर्थक होते. त्या मंतरलेल्या काळासारखं काहीही उरलं नव्हतं. फक्त पैसा मिळवणं आणि त्यासाठी धावत सुटणं एवढंच बाकी उरलेलं.. गाणं ऐकणं, ते कॉम्प्युटरवर कंपोज करण.. मित्र गोळा करून गप्पांचे फड रंगवणं.. नव्हतंच यातलं काही शिल्लक उरलेलं! हौसेनं आणलेल्या मोरपंखी साडीचा रंग उडताना मन व्याकूळ व्हावं तसं व्हायला लागलं.

आम्ही राहत होतो त्या घरांच्या पुंजक्याजवळ एशियन शॉप नव्हतं. याचा अर्थ डाळी, आमच्या आवडीच्या भाज्या, लोणची, पापड, मसाले असलं मिळणं अवघड होतं. भावेशच्या सवडीनं किंवा त्याची मर्जी असेल तेव्हाच फक्त शॉपिंगला जायचं हे मला मंजूर नव्हतं. मला जर माझ्या मनात येईल तेव्हा शॉपिंगला किंवा आणखी कुठं जायचं असेल आणि अजून मी कुबड्या म्हणजे एखादी हिंदुस्तानी मैत्रीण मिळवली नसेल, तर स्वावलंबी होण्याशिवाय पर्याय नव्हता.

एक दिवस... हो प्रत्येक गोष्टीची सुरुवात एखाद्या दिवशी केलेल्या वेगळ्या गोष्टीतूनच होत असते. भावेश ऑफिसला गेल्याबरोबर मी बाहेर पडले. भावेशला माझ्या बरोबर यायला वेळ नाही आणि मी एकटीनं कुठं जाणार नाही असं म्हणत बसले असते तर माझं कल्याणच झालं असतं! होमसिक होऊन आईनं दिलेल्या आशीर्वादानुसार भांडून परत गेले असते. पण मला तिचा आशीर्वाद खोटा ठरवायचा होता, शिवाय ‘भावेश, तुझ्याविना हे शहर मला एकटीला पालथं घालता येतं!’ हे त्याच्या नाकावर टिच्चून सिद्ध करायचं होतं.

मग काय, मी सिटी बस घ्यायचे नि जायचे एशियन शॉपमध्ये. या धावपळीत मला स्मार्ट फोन मिळाला भावेशकडून, सरप्राईज गिफ्ट! का तर मी त्याची ‘गुड गर्ल’ आहे म्हणून. मग हळूहळू हातात मोबाईल धरून मॅप वाचायला शिकले. कसं असतं ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे खरंच! 

आणखी एक, कोणतंही शहर हे पायी आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून केलेल्या भ्रमंतीनंतर जेवढं नि जसं समजतं, तसं ते नवरा ड्रायव्हिंग करतोय आपण नुसतं शेजारी बसलोय, अशा भटकण्यात नाही तितकसं समजत. नवख्या ठिकाणी दोनचार वेळा रस्ते चुकले, पत्ते शोधताना नवनवे घोळ तयार झाले नि ते सगळं निस्तरताना जरी घाम फुटला, तरी त्या शहराचं जे दर्शन अंतः चक्षुना होतं त्याला तोड नाही. या अशा गोंधळ घालण्यानंच मग आपण त्या नव्या जागेत मुरायला लागतो. मी जर्सी सिटीत बिनधास्त हिंडायला लागले, ते हे सगळं यथासांग घडल्यामुळे.

जर्सी सिटीत रात्रीचं एकेकट्यानं हिंडणं तसं धोक्याचं, या देशाला ड्रग्जचा शाप आहे. रात्र पडली की धोका वाढतो. या शहरातल्या दक्षिणेकडील भागात तसा धोका रात्र पडली की वाढीला लागायचा. म्हणून अंधार पडायला लागला की तिकडं जायचं नाही. ग्रीनव्हिलेत जर काही काम असलं, कुणाला भेटायचं वगैरे असलं तर दिवसाढवळ्याच फक्त जायचं. हे पथ्य मी नीटच पळत होते.

पाथ ट्रेन घ्यायची नि भटकायचं एकटंच, पर राईड ओन्ली टू ॲण्ड हाफ डॉलर तिकीट! स्वस्त आणि मस्त! या भटकंतीत जर्नल स्क्वेअर, ग्रोव्ह स्ट्रीट, एक्सचेंजप्लेस किती तरी नव्या ठिकाणी मी गेले नि हे शहर माझं झालं. इथं हिंडताना मान वर करकरून मी तीस, पस्तीस, चाळीस मजली इमारती पाहिल्या. जर्सी सिटीच्या एका भागाला ‘वॉलस्ट्रीट वेस्ट’ हे टोपण नाव पडलं ही गोष्ट माझ्या भटकंतीत मला समजली. आता अशी परिस्थिती आली होती, की भावेशपेक्षा मला या शहराची जास्त माहिती झाली होती. 

अमेरिकेत येण्याआधी जरी अमेरिकन सोसायटीच्या कल्चरची माहिती त्यांचं साहित्य वाचून मला मिळाली होती, तरी आफ्रिकन अमेरिकन मुली, प्रौढ स्त्रिया, पुरुष, लहान मुलं.. त्यांच्या वस्त्या 

हे सगळं पहिल्यांदाच पाहत होते. इथे मी रस्त्यावर फुटबॉल खेळणारी मुलं पाहिली नि मला  पुण्यातल्या काही भागांची आठवण आली. तिथं अशाच गरीब वस्त्या आणि रस्त्यावर खेळणारी मुलंदेखील अशीच! 

आता मी इथल्या लायब्ररीत जायला लागले. तिथल्या लायब्रेरियन मुलीशी माझी ओळख झाली. मिशेल आफ्रिकन अमेरिकन, दाट कुरळ्या केसांची, अतिशय जाणीवपूर्वक घाटदार बांधा राखलेली, सडसडीत आणि पुरेशी उंच अशी छान मुलगी! तिनं न मागता मला पहिल्यांदा टोनी मॉरेसनची ‘ब्लू आय’ ही कादंबरी वाचायला दिली आणि म्हणाली, ‘‘अजून परिस्थिती फार बदललीय असं नाही.’’ त्यानंतर मीच तिच्याकडे ‘द रूट्स’ ही ॲलेक्स हेलीची कादंबरी वाचायला मागितली. त्या कादंबरीवर तिच्याशी बोलताना तिला आपल्या साहित्याची ओळख करून देताना मी तिला म्हणाले, ‘‘आफ्रिकन-अमेरिकन लेखकांनी जशी त्यांच्या लेखनातून व्यथांना वाचा फोडली तसंच काहीसं भारतातल्या दलित वर्गातल्या लेखकांनी आपल्या लेखनातून त्यांची दुःख मांडली. यातली काही दुःख परंपरेतून आलेली, तर काही देशाच्या प्रगतीच्या झंझावातात मागं राहिल्यामुळे अजून पुसली न गेलेली होती. भारतीय साहित्य समृद्ध झालं ते या अशा लेखकांच्या काँट्रिब्युशनमुळे!’’ त्याचवेळी ग्रामीण भागातला गावगाडा आणि भारतीय समाज याबद्दलदेखील मी तिच्याशी बोलले. दया पवार यांचं ‘बलुतं’, लक्ष्मण मानेंचं ‘उचल्या’ ..असं काहीबाही बोलले मी तिच्याशी. त्यानंतर हळूहळू आमच्यात छान मैत्री व्हायला लागली.

मला अलिबाबाच्या गुहेचा पासवर्ड सापडावा तसं काहीसं झालं. मिशेल स्वतः आफ्रिकन -अमेरिकन, चांगली शिकलेली, पगारदार मुलगी, छान जगू पाहणारी. तिनं कुतूहल म्हणून पहिल्यांदा मला कॉफी प्यायला बोलावलं, आमच्या गप्पा छान रंगल्या. त्यानंतर तिनं मला सोडलं नाही. सरळ खंडीभर प्रश्र्न विचारले..‘‘तुम्ही एकाच पुरुषाबरोबर आख्खं आयुष्य काढता, वर नेक्स्ट बर्थमध्येपण तोच लाईफ पार्टनर हवा म्हणून पूजा करता हे खरं का? किंवा प्रत्येक मुलगी लग्नानंतरच तिची व्हर्जिनिटी गमावते त्याआधी नाही, हे जे चित्र निर्माण केलं गेलंय ते खरं आहे का? आणि खरं असेल तर पुरुषांचं काय? तेसुद्धा तसेच राहू शकतात? पंचविशी.. तिशी ओलांडली तरी?’’ 

हे प्रश्र्न विचारताना तिनं तिच्या आयुष्यातले अगदी टीनएजर असल्यापासूनचे आवेग आणि भोग अगदी सहजतेनं जेव्हा सांगितले तेव्हा मी थक्क झाले. आत्तासुद्धा ती रिलेशनशीपमध्ये राहत होती एका व्हायोलिन वादकासोबत. तो गोरा अमेरिकी तर ही आफ्रिकन- अमेरिकन, मग कधी वाजायचं त्यांचं. त्याबद्दलसुद्धा ती जेव्हा मोकळेपणानं बोलली, तेव्हा तिच्या प्रश्र्नांना खोलात जाऊन उत्तरं द्यायचं मी ठरवलं. मग भारतीय समाजाची मूल्यं, संस्कृती याबद्दल जरा सविस्तर सांगितलं. इतकं बोलले की माझं मलाच वाटलं, ‘बयो, बोलून बोलून लई बिल केलंस हो!’ 

तिचा निरोप घेऊन निघताना तिनं सुचवलं, ‘‘तू लिहीत का नाहीस हे सगळं? लिही नि प्रसिद्ध कर सोशल मीडियावर. तुझा स्वतंत्र ब्लॉग तयार कर. खूप फॉलोअर्स मिळवशील तू.’’

आणि त्यानंतर माझी गाडी सुरू झाली, मी लिहायला लागले. 

माझ्या पहिल्याच लेखाचं शिर्षक होतं..‘आम्ही आणि आमची गोची संस्कृती!’ त्याचा साधारण गोषवारा असा, आमच्या वात्सायनानं शृंगारशास्त्र कोळून पिऊन उत्तम ग्रंथ लिहिला, पण आधुनिक होता होता आम्हाला आमच्या मुलांना सेक्स एज्युकेशन देणं मात्र मुळीसुद्धा मानवत नाही. आम्ही खुशाल पॉर्न फिल्म्स बघतो, पण नॉलेज म्हटलं की नको! असो. तर आमची बरीचशी तरुण मुलं आणि मुली संसाराला लागतात ती गोंधळ घालत. मग मोडतात ना लग्नं! या गोची संस्कृतीचा फटका आमच्या परदेशस्थ पोरांना जास्तच बसतो. बिचारे एकटे पडलेले करिअरिस्ट जीव ते. मग काही चाणाक्ष ‘गुगलू’न किंवा अन्य उपदव्याप करून ते ‘ज्ञान’ मिळवून आपल्या पार्टनरबरोबर सुंदर शेजरनातं बांधतात. पण हे सगळं वेळच्यावेळी ज्यांनी साधलं ते जिंकले. तर असा महिमा आहे आमच्या गोची संस्कृतीचा!

त्यानंतर दर आठवड्याला सटासटा ब्लॉग लिहीत गेले. कल्चरल शॉक्स.. प्रॉब्लेम्स वी फेस.. दरवेळी नवे विषय, नव्या कहाण्या..! एशियन कम्युनिटी, इंडियन.. पाकिस्तानी.. बांगलादेशी बायका हे माझं मेन टार्गेट होतं. विषयांना तोटा नव्हता. हळूहळू, पण डेफिनेटली, माझे ब्लॉग्ज मिशेल म्हणाली होती तसे पॉप्युलर होऊ लागले. अमेरिकी बायकांचेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेसेजेस येत असत. म्हणत असत, ‘का फक्त एशियन बायकांबद्दल लिहितेस? एकूणच ‘बाई’ या जमातीबद्दल लिही! तिच्या शरीराची मागणी आणि तिची स्वतःला प्रुव्ह करायची धडपड.. सगळीकडे कितीतरी सारखंच दिसेल. उचल पेन कर सुरुवात...’

आणि एक दिवस मला ‘हेल्प युवरसेल्फ’ या नो प्रॉफिट नो लॉस तत्त्वावर चालणाऱ्या ऑर्गनायझेशनच्या मिसेस सिंथिया कोलमन यांचा फोन आला. विचारात होत्या, ‘‘आमच्या ग्रुपच्या मेंबर्सशी गप्पावजा बोलायला याल का?’’ 

मी दणदणीत होकार भरला नि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेले भाषण करायला. खूप मजा आली. न्यू जर्सी म्हणजे साक्षात लिटल इंडिया! ‘हेल्प युवरसेल्फ’ ग्रुपमध्ये गुज्जू, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळी भाषिक भारतीय आणि उर्दू भाषिक पाकिस्तानी, बांगलादेशीसुद्धा होत्या. त्यामानानं अमेरिकी पब्लिक कमी होतं.

मी त्यांच्याशी खूप बोलले, तेव्हा जाणवलं भारताची राष्ट्रीय भाषा खास खिचडी छाप इंग्लिश आहे! जो तो मेन इंग्लिशशी इमान राखत आपल्या भाषेतले शब्द घुसडत बोलत असतो. असो. मुख्य म्हणजे मानधन मिळालं. या परक्या भूमीत पाऊल ठेवल्यापासून मला माझा पैसा दिसला! मला आता कन्सल्टेशनसाठी बोलावणी येत असत. मी तर ट्रेण्ड सोशल वर्कर होतेच. हा जॉब नव्हता पण मला केलेल्या कामाचं मानधन मिळायला लागलं. केसेस सोडवताना हलकेच मला माझा स्वतःचा संसार आठवे...

काय चाललं होतं आमचं?

भावेश जरी खूप मन लावून काम करत होता तरी समोरचा माणूस मठ्ठ असेल, त्याला याच्या नव्या आयडियाज् पटापट समजत नसतील तर, भले मग तो कंपनीचा सीनियर मॅनेजर हॅरी असो की प्रेसिडेंट डिक, हा चिडणार. अगदी त्याच्या तोंडावर त्याला म्हणणार ‘‘व्हॉट नॉन्सेन्स! व्हाय शूड आय एक्सप्लेन अगेन ॲण्ड अगेन, सच अ सिंपल कन्सेप्ट?’’

मग कधी त्याला राजीनामा द्यायला सांगितला जाई, तर कधी हा स्वतः बॉसच्या सततच्या कमालीच्या डल वागणुकीला कंटाळून राजीनामा देई. ग्रीनकार्ड हातात होतं त्यामुळे ना त्याला नोकरी सोडण्याची भीती वाटे ना नवी नोकरी मिळायला त्रास पडे. 

माझंदेखील ग्रीन कार्ड झालेलं होतं. आता मला नोकरीचे दरवाजे उघडे होते, पण भावेशच्या सततच्या नोकऱ्या सोडण्यामुळे आम्हाला कुठं जावं लागेल याचा नेम नसे. गोळाबेरीज, मी नवऱ्यावर अजूनही डिपेंडन्ट असलेली बाई होते.

नव्या नोकरीच्या निमित्तानं मग आम्ही जर्सी सिटी सोडून कधी न्यू हॅम्पशायरला गेलो, तर कधी टेक्सासला. तिथून पुन्हा न्यू यॉर्क म्हणून पुन्हा जर्सी सिटी. मग न्यू ऑर्लिन्स.. पुन्हा न्यू यॉर्क.. जर्सी सिटी.. शिकागो.. अमेरिकेत बरीच भ्रमंती झाली. ओबामांचं राज्य गेलं, ट्रम्प अंकल आले तरी परिस्थिती फार बदलली नाही, निदान आमच्यासाठी तरी!!

एक मात्र खरं होतं भावेशचं कुठल्याही सिस्टीममध्ये आलेल्या प्रॉब्लेमबद्दलचं अंडरस्टँडिंग इतकं परफेक्ट असे की त्याला सोल्यूशन मिळवायला मुळीच वेळ लागत नसे. त्यामुळेच नवी नोकरी मिळायला कधीच अडचण आली नाही. दुसरी नोकरी किती दिवसांनी मिळेल हे मात्र सांगता येत 

नसे. त्यामुळे आम्ही फारच जपून खर्च करायचो. शेवटी आमचा संसार मी मिळवत असलेल्या एवढ्या तेवढ्या मानधनावर चालत नसून भावेशच्या मिळकतीवर चालत होता, म्हणजे तसा तो एकखांबी तंबूच होता! 

या तणावाच्या दिवसांत जर आम्ही जर्सी सिटीत असलो, तर भावेश आणि मी मग पाथ घेऊन थेट न्यू यॉर्कला जायचो. तिथल्या सेंट्रल पार्कमध्ये सैरसपाटा करत जो सीझन असेल त्या सीझनची मजा घ्यायचो. मग विंटर असला तर बर्फाच्या राशी डोळ्यांनी पाहून बर्फात खेळून मन शांत करून परत फिरायचो. तर कधी वॉल स्ट्रीट. शिंगं पुढं करत अंगावर धावून येणाऱ्या काळसर बैलाला टेकून उभं राहून फोटो काढायचे. डिजिटल कॅमेऱ्याची जय हो! आता फोटो प्रिंटिंगचा खर्च कटाप आहे, त्यामुळे डिजिटल कॅमेरा आणि तुमचा हात बास! वाटेल तेवढे फोटो काढा, आवडले ठेवा नाहीतर खुशाल डिलीट मारा. 

न्यू यॉर्कला आलो की भटकताना मॅडिसन ॲव्हेन्यूला जायचं नि प्राडा, नाईके, व्होग आणि कितीतरी ब्रँडेड मालानं भरलेल्या दुकानांच्या समोरच्या फुटपाथवरून चालताना विंडो शॉपिंग करायचा आनंद लुटायचा! 

एकदा तर असेच हिंडत ‘मॅकिज हेरल्ड स्क्वेअर’ या अफाट मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्सला जाऊन गंमत करून आलो. एम्पायर स्टेट बिल्डिंगवरून चमचमतं न्यू यॉर्क पाहिलं. त्याच काळात पैसा साठवून एक सेकंडहँड गाडी पण घेतली, बीएमडब्ल्यू! काळी कुळकुळीत डौलदार गाडी. ज्या दिवशी गाडी आली, त्या दिवशी मला खूप आनंद झाला. लगेच गाडीचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर आईला पाठवून दिला. 

फोटो पाठवला नि वाटलं आपण काहीतरी झाकपाक तर करायचा प्रयत्न करत नाही ना! माणूस आपल्या मनाचा दाह लपवून ठेवत असतो आनंदाचा बुरखा पांघरून! म्हणून तर इतके सुखी संसार दिसतात. असो.

भावेश महिना दीड महिन्यावर जास्त काळ नोकरी न मिळता राहत नव्हता. पण नोकरी सुटलेल्या तणावाच्या परिस्थितीत तो जेव्हा दुकानात जाऊन कुत्रं विकत आणी (इथं रस्त्यावर बेवारस कुत्री दिसत नाहीत उचलून आणायला) तेव्हा मला फार राग येई. इथं आम्ही मूल नको म्हणत होतो, कारण ते आम्ही ॲफोर्ड करू शकत नव्हतो. तर हा खुशाल कुत्रं विकत आणी. मक्यासारखा हा प्राण्यांवर प्रेम करतो ही गोष्टी ‘त्या वेगळ्या’ म्हणजे प्रेमात बुडण्याच्या काळात मला आवडली होती नाही का! आता भोगा!!

नोकरी सुटली की भावेश एकतर स्वतः नोकरीच्या शोधात बाहेर जाई किंवा डोक्यातल्या अनेक आयडियाजवर काहीतरी लिहीत बसे. कुत्रं मात्र माझ्या गळ्यात. मला माझं लेखन, लायब्ररीत जाणं सांभाळून त्या कुत्तरड्याचं करावं लागे. बापरे! किती खातात ही कुत्री! अधून मधून म्हणजे बरेचवेळा कुत्र्यांचं फूड आम्ही आणत होतो. पण या कुत्तरड्याचं विकत आणलेलं फूड संपलं असेल आणि अजून आणलं गेलं नसेल, तर मला एकवेळ भाकरी, पोळी, नसली तरी चालेल पण त्याच्यासाठी खायला केलं पाहिजे. मी ब्यूटीपार्लरला दोन दोन महिन्यांत गेले नाही तरी पर्वा नाही, पण या कुत्र्याची नखं कापली पाहिजेत, अंघोळ घातली पाहिजे, पाठीवरच्या गोचिड्या नष्ट केल्या पाहिजेत. त्याला फक्त बर्फ पडत असेल तेव्हा बाहेर न्यावं लागत नसे, पण एरवी रोज बाहेर न्यावं लागे आणि ते मी न्यायचं असे. असं त्याला बाहेर नेताना इथं त्याची विष्ठा रस्त्यात पडून चालत नाही, म्हणून ती गोळा करायचं फावडं बरोबर न्यायचं मी! शिवाय त्याची सगळी इन्जेक्शन्सदेखील वेळोवेळी पार पाडायची. हा खर्च झेपणारा नसला तरी करायचा. का तर भावेशला त्याचं फार प्रेम म्हणून!

नव्या नोकरीबरोबर गाव बदललं की ही कुत्री बरोबर नेणं अनेकदा जमत नसे. जिथं आम्हाला नवी जागा कुठं मिळणार, कशी मिळणार, याचा पत्ता नसे तिथं कुत्रं कुठं नाचवणार? मग या भावेशच्या लाडक्या कुत्तरड्याला मीच खटपट करून एखाद्या मित्राला देऊन टाकायचं. मग भावेश दोन दिवस तोंड लटकवून बसणार. 

भावेशला नोकरी नसे त्या मधल्या काळात त्याच्या जिभेला तलवारीची धार चढे. मग छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरून तो माझे वाभाडे काढी आणि बरेचवेळा या स्फोटाचा शेवट माझ्या अंगावर वस्कन ओरडण्यात किंवा ‘महाबिनडोक कुठलीऽऽ’ अशा स्वरूपाच्या बोलण्यानं होत असे. 

मग आमच्यात अबोला सुरू होई. हा अबोला किती दिवस टिकेल याचा काही भरवसा नसे. कधी त्याच्या घरून व्हिडिओ कॉल यायचा, बा विचारायच्या ‘‘बबलू,’’ भावेशचं लाडाचं घरातलं नाव होतं ते, ‘‘कसं चाललंय ? ठीक? सूनबाई कुठाय? हाक मार तिला, मला बोलायचंय तिच्याशी..’’

आता आली का पंचाईत, मग हा दीडशहाणा हातातल्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल चालू असताना ओरडायचा.. ‘‘ए, बा बोलावतेय.. बास झालं खाकरे करणं ये इकडे’’ किंवा ‘बा, हिला अजिबात तुझ्यासारखे ढोकळे येत नाहीत सांग जरा कसे करायचे ते..’’

मी ऐकत असे सगळंच, मी काय कमी खट होते! मी मुद्दाम मग मागच्या दारी पायऱ्यांवर जाऊन बसायची. 

बा म्हणत असायच्या, ‘‘बरा करते ना स्वयंपाक? की मागवता बाहेरचं खाणं आणि बसता नाटकं आणि काय काय विषयांवर गप्पा मारत! बायकोला चांगलं ताब्यात ठेवलंयस की तीच वाटतेय तुझ्या डोक्यावर मिऱ्या? बहुधा तिनंच तुला आंगठ्याखाली ठेवलेलं दिसतंय! तू हाक मारलीस, मी बोलवलंय म्हणून सांगितलंस तरी अजून आली कशी नाही समोर? घरात नाहीये वाटतं.’’ 

प्रश्र्नांची फैर चालू असायची आणि हा रागानं लाल होत माझ्या मागे येऊन उभा राही. आता मी व्हिडिओ कॉलचा भाग झालेली असे, ‘‘नमस्ते आंटी! ‘बां’ना डायरेक्ट ‘बा’ हाक मारण्याची माझी हिंमत नव्हती. मग थोडं वरवरचं इकडचं तिकडं बोलून बा हलकंच मुद्द्यावर येत, ‘‘बेटी!’’ मी सर्द! पण मग या आपलेपणाचा लगेच खुलासा होई. त्या कुठल्या तरी फालतू प्रश्र्नाच्या आडून आम्ही फॅमिली प्लॅनिंग तर करत नाही ना, 

याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असत. या कामी भावशेसारख्या आडमुठ्यापेक्षा आपली बहू 

जरा जास्त मदत करू शकते, असा त्यांचा अंदाज असल्यामुळे मला ‘बेटी’ वगैरेचा मस्का त्या लावत होत्या इतकंच. या गनिमी हल्ल्याला तोंड देताना आम्ही दोघं एक फळी होऊन त्यांना अजिबात अंदाज लागू देत नसू. असे होते ते दिवस!!

                              (क्रमशः)

संबंधित बातम्या