पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

दीर्घकथा

त्याच्या मनाच्या तळात असलेला संताप, त्यानं बोलून मोकळं झाल्याशिवाय शांतावायचा नाही हे माहीत होतं मला. किती वेळा, किती प्रकारे त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. कधी रागावले.. कधी हसून विचारलं, त्याला म्हटलं, ‘बोल तुझ्या जिव्हारीच्या जखमांबद्दल! तू माझा आहेस! माझ्या जिवाचा कोट करून मी तुला जपेन..’ असंच बरंच काही. पण तो एकदाही ओपन झाला नाही! महाअहंकारी!! माझ्या जिवाचा आता संताप संताप झाला...

आम्ही मुद्दाम मूल होऊ देत नाही असं तर नाही ना, या बांच्या शंकेला जरी आम्ही एक फळी होऊन ताकासतूर लागू दिला नव्हता, तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या माणसांना समजून घ्यायला हवं हे माझ्या लक्षात आलं.

बांचं भावेशवर अफाट प्रेम होतं. लग्न करून त्यांच्या पाया पडायला गेलो होतो तेव्हा त्या रागावल्या होत्या आमच्यावर, कारण त्यांच्या डोक्यात परंपरा ठासून भरलेल्या होत्या... ‘भावेशच्या शादीमध्ये मी मुलीच्या बापाकडून हक्कानं असा दागिना मागीन आणि तश्शी साडी माझ्या वहिनीला द्यायला लावीन.. आणि यंव करीन आणि त्यंव करीन..’ पण जेव्हा त्यांची स्वप्न सत्यात उतरली नाहीत तेव्हा त्या नाराज झाल्या होत्या.

काही असलं तरी बा म्हणजे काही पीडीएफ केलेली फाईल नव्हती की जी बदलणं अशक्य! मग मी त्यांच्यातलं काही थोडं डिलीट करायचा चंग बांधला. भारतात जाणाऱ्या एका दोस्ताबरोबर त्यांच्यासाठी एक एल्व्हिसची पर्स पाठवून दिली. शिवाय त्यांना सांगितलं, ‘‘तुम्ही इकडे या, आपण दोघी मिळून भावेशचा क्षणोक्षणी रागावण्याचा स्वभाव मोडून काढू. शिवाय तुम्ही मला खाकरे करायला शिकवा. छुंदा तर तुमच्या हातचाच हवा असं भावेश म्हणत असतो...’ असे काही अवीट गोड इनपूट टाकून मी बांची फाईल मस्तपैकी झिप केली नि आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. बापू तर नो प्रॉब्लेम मोडवर कधीच जाऊन बसलेले.

त्या दोघांना एकच चिंता, त्यांना जसं खूप उशिरा मूल झालं तसं आमचं होतं की कसं? त्यांना आधुनिक जोडपी किती पोचलेली असतात ते ऐकून माहीत होतं, पण आम्ही त्यातलेच आहोत हे माहीत नव्हतं. त्यांना गोंडस नातवाची आस होती. सून तेवढ्यासाठी महत्त्वाची होती आणि सून खूप छान बोलत होती, आशेला लावत होती.

एक खरं, माणसाच्या आयुष्यातून ‘उद्या’ ही कन्सेप्ट जर डिलीट झाली आणि प्रत्येक जण फक्त ‘आज’ या एकाच भोज्यापाशी जगू लागला, तर सगळी मजा एकदम सजा होऊन जाईल! ‘उद्या’ आहे म्हणजे स्वप्न आहेत.. बापू आणि बा मला उद्या केव्हातरी आपली म्हणावेत हे माझं स्वप्न! तो ‘उद्या’ उगवला नि माझं ते स्वप्न साकारायच्या मार्गाला लागलं. 

आता आईसाहेबांना मनवायचं होतं. पण खूप प्रयत्न करूनही तिकडे मात्र आमची डाळ शिजत नव्हती. माझे बाबा कधीच बापूंसारखे ‘नो प्रॉब्लेम’ मोडमध्ये शिरले होते, अर्थात ते तसेच होते! फार काथ्याकूट करतच नसत कोणत्याच गोष्टीचा. आईबरोबर लढाया करून कंटाळले असावेत बहुधा. एनिवे, ते आता आमच्या पार्टीत होते.

या दोन्हीकडच्या म्हाताऱ्यांना कसं सांगायचं, की मूल होऊ देणं हे फारच एक्सपेन्सिव्ह प्रपोजल असतं म्हणून! त्यांनी ताबडतोब ‘भारतात परत या,’ म्हणून धोशा लावला असता. पण आमचं आम्हाला माहीत होतं, नोकरी गेली की काय होतं ते! आणि भारतात पाऊल टाकायचं ते कुणीतरी होऊनच, ही आमची जिद्द होती!

सलग तीन महिने भावेशची नोकरी टिकली. माझे लेक्चर्स आणि कन्सलटेशनच्या मानधनाचे पैसेसुद्धा बऱ्यापैकी जमले, तेव्हा आम्ही लॉज एन्जलिसला राहणाऱ्या माझ्या नमुताईकडे गेलो. गुडफ्रायडेची सलग सुट्टी मिळाली होती. नमुताई जरी अमेरिकन सिटीझन झाली होती, तरी तिच्या घरच्यांना इथेच एक सदाशिव पेठ निर्माण केल्याचा कोण अभिमान होता! मुख्य म्हणजे नमुताईला यात काही गैर वाटत नव्हतं. सगळे सणवार, उपास-तापास कसे पद्धतशीर केले जातात... मुलं कशी रोज तिन्हीसांजा ‘शुभंकरोति’ म्हणतात हेच ऐकायला मिळालं. नमुताई घरातच अडकून पडली. तिला कशाची हौस आहे कळायला मार्ग नव्हता. एक मात्र मी अनुभवलं, तिचं खळखळून हसणं अगदीच आटलं होतं. एकसारखं मला म्हणत राहिली, ‘‘तू बरी वेगळी निघालीस! तू ब्लॉग्ज लिहितेस ते मला आवडतं. लिही गं, सपाटून लिही.’’ आणि तिनं माझ्याकडे पाठ फिरवली.

मला तिला सांगावसं वाटत होतं, ‘‘बाई गं! तूसुद्धा कर काहीतरी, जे तुला करावसं वाटतंय ते. नको या दंभात स्वतःला अडकवून घेऊ. लिबर्टी म्हणजे काही पॅकेज नाही कुणी कुणाला उचलून द्यावं. ते स्वतः मिळवायचं असतं!!’ 

 पण मला ते सांगायला जमलं नाही. बाहेर जाऊन इतर बायकांना कन्सल्ट करणारी मी माझ्या ताईला नाही पटवून देऊ शकले, ‘या जगात तुला जे आणि जसं जगावंसं वाटतंय, तसं जगायला तुला स्वतःला उभं राहायला हवं, तू उभी राहिल्याशिवाय तुला कुणीही मदत करू शकणार नाही!’ मी गप्प राहिले. अलीकडे गप्प बसणं नितांत फायद्याचं असतं, हे नमुताईच्या संदर्भात, अगदी तिच्या लग्नापासून अनेक जखमा घेऊन झाल्यावर आलेलं शहाणपण होतं माझ्याजवळ.

त्या एका भेटीनंतर पुन्हा बरेच दिवस काय, महिने गेले तरी मी तिच्या घरी गेले नाही. जे बोलणं होई ते फक्त फोनवरून. अजून आपण आईच्या लाडक्या आहोत, या आनंदात ती आहे हे बघून मी थक्क झाले नि वाटलं, प्रेम जर माणसाला हे असं दुबळं करत असेल तर ते खरं प्रेम नाही! आईनं तिला सतत, ती तिची फार लाडकी आहे अशी इमेज देऊन एक मांडलिक निर्माण केला, तिच्या प्रेमासाठी आसुसलेला! 

एकूण अवघड होतं तिचं आणि आईचंसुद्धा!

कमला खूश होती. तिला नवी नाटकं मिळत होती आणि या क्षेत्रात तिची स्वतंत्र ओळख तयार होत होती. ती मेलवरून आमच्याशी नेहमी कनेक्टेड राहिली होती. मक्या आता स्वतःचा स्वतंत्र उद्योग करत होता, ही गोष्ट नमुताईनं सांगितली, पण त्याचा नि माझा फारसा काँटॅक्ट राहिला नव्हता. एकूणच तो हॉस्टेलला गेला नि दुरावला. 

हा एवढाच आमचा संसार नव्हता. यावेळ पावेतो भावेशनं त्याचं आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधलं स्किल वापरून म्युझिक कंपनीसाठी एक सर्किट डेव्हलप केलं, जे वापरून झिप केलेली फाईल कितीही मोठी असली तरी झटकन ट्रान्सफर करणं शक्य होत होतं. त्याचा कंपनीतला रुबाब वाढला होता नि पगारसुद्धा! आता सिनर्जी कॉम्प्युटर्समध्ये तो डेप्युटी जनरल मॅनेजरच्या पोस्टवर गेला होता. आम्ही आनंदात होतो. 

आता त्याच्या डोक्यात नवीच आयडिया येरझाऱ्या घालायला लागलेली. तो रात्रंदिवस त्याच्या कामात दंग राहू लागला नि मी त्याच्यासाठी फक्त एंटरटेन्मेंटचं साधन होते की काय अशी मला भीती वाटायला लागली. कारण आता माझ्या होकार-नकाराला महत्त्व उरलं नव्हतं. मोटोरोला कंपनी अचानक ज्या दिवशी त्यानं सोडली, त्या दिवशी जे घडलं ते आता अनेकदा घडू लागलं. तो त्याची इच्छा असेल तर हक्कानं जवळ ओढायचा, तेदेखील खस्सकन्. 

लवकरच त्याच्या हॉट टेंपरचा तडाखा बसलाच! सलग एक वर्ष सहा महिने टिकलेली नोकरी गेली आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या झालं... आणि आमची वणवण सुरू झाली. त्याची चिडचिड वाढत होती. नव्या विचारांच्या आणि अभ्यासाच्या झंझावातात त्यानं लिखाणसुद्धा केलं. टेक्निकल लिखाण!  खूप नवे विचार मांडले. त्याचा पेपर ‘कॉम्प्युटर सायन्स जर्नल ऑफ मालदोवा’मध्ये यथावकाश प्रसिद्धदेखील झाला. पेपर प्रसिद्ध झाला त्याचं त्याला फार कौतुक वाटलं असं नाही, पण आता त्यानं नवंच खूळ डोक्यात घेतलं.  

नेहमीप्रमाणे त्याला त्याच्या कामाच्या एक्सलन्समुळे कॉल्स येत होते. कधी कुठे ऑन साईट जाऊन प्रॉजेक्ट कंडक्ट करायचा असे, तर कधी रिसर्च विंगमध्ये जस्ट मॅनेजरची पोस्ट असे. पण या खेपी तो हटून बसला, एकदा ‘डेप्युटी जनरल मॅनेजर’च्या पोस्टवर काम केलंय आता त्याच्या खालची पोस्ट ‘नॉट ॲक्सेप्टेबल!’ सहा महिने होऊन गेले तरी त्याला जॉब मिळत नव्हता.

याच अवघड होत चाललेल्या जगण्याच्या काळात एकदा मी जाम भडकायचं कारण, त्यावेळी भावेशनं आणलेली कुत्री! (आता मागं वळून पाहताना मजेशीर वाटतंय) नोकरी सुटलेल्या अवस्थेत त्यावेळी आम्ही शिकागोला राहत होतो. नेहमीप्रमाणे त्यानं कुत्रं आणलं. यावेळी जरा मोठ्या वयाची कुत्री आणली होती त्यानं. अगदी जातिवंत डॉबरमन कुत्री! ती लवकरच वयात आली. तिला मित्र मिळायला लागले आणि तिला फिरायला घेऊन जाणं म्हणजे संकट ठरू लागलं. कोण कुठला कुत्रा तिच्यामागे येईल.. कुठला कुत्रा कधी इतर कुत्र्यांशी भांडणं काढील नेम नसे. मला ती कुत्री मुळीच आवडेनाशी झाली, कारण ती आता तिचा आवडता मित्र दिसला की खुशाल हाताला झटका मारून पळून जाई. परत येई ती तिला हवे ते उद्योग करून झाल्यावर. मला तिचं हे वागणं पटत नव्हतं. यथावकाश तिनं चार पिल्लं दिली, पण ही पिल्लं होती गावठी. त्यांना कुणी न्यायला तयार नव्हतं, तीन पिल्लं कुणा मरियम खन्ना नामक बाईनं अगदी फुकट मिळाली म्हणून कशीबशी नेली. चौथं पिल्लू जरा जास्तच काळं! ही बया गेली पळून. त्या पिल्लाची उस्तवार मला झेपेना. मी भावेशला सांगितलं तसं, ‘जर अति झालं तर मी ते उचलीन नि बागेत सोडून देईन.... ’

आणि त्यानं संतापून रागानं लाल होत माझ्यावर हात उचलला, खाडकन बसली ना थोबाडीत!!

मी हेलपाटले आणि मग संतापून बोलले त्याला. ‘‘मूल नको. का? तर परवडत नाही. मग ही कुत्रीसुद्धा नको. जाईल कुठेतरी, मी काय ठेका घेतलाय या बदफैली कुत्रीच्या पोराचा? तू असली कुत्री आणलीस. तुझं तू बघ. मी चालले.’’

आणि मग खूप वेळानं घराच्या मागच्या पायरीवर बसून पोटभर रडून झाल्यावर लक्षात आलं, आम्ही इतके जवळचे झालो असूनही अजूनही भावेशनं आपणहून मला सांगितलं नाहीये, की तो अगदी तान्हं बाळ असताना बापूंना बागेत बाकड्यावर कुणीतरी सोडून दिलेला सापडला होता ते.

त्याच्या खूप खोल असलेल्या भळभळत्या जखमेवरची खपली मी आज कुत्रीच्या काळ्या पिल्लाला बागेत सोडून येईन असं बोलून काढली! न कळत असेल पण मी त्याला खूप दुःख दिलं! पण त्याला तरी एवढं समजू नये, आपल्या बायकोला एकदा सांगायला हवं, आपल्या या खूप खोल असलेल्या भळभळत्या जखमेबद्दल! मी आता रडत नव्हते, पण रागावले होते. एकसारखं वाटत होतं, आपण उगाच समजत आलो भावेश आपल्या जिवाचा अगदी तुकडा आहे म्हणून, पण ते तसं नाहीये. त्याच्यासाठी आपण फक्त एक सवयीची झालेली गरज आहोत!

त्याच्या मनाच्या तळात असलेला संताप, त्यानं बोलून मोकळं झाल्याशिवाय शांतावायचा नाही हे माहीत होतं मला. किती वेळा, किती प्रकारे त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. कधी रागावले.. कधी हसून विचारलं, त्याला म्हटलं, ‘बोल तुझ्या जिव्हारीच्या जखमांबद्दल! तू माझा आहेस! माझ्या जिवाचा कोट करून मी तुला जपेन..’ असंच बरंच काही. पण तो एकदाही ओपन झाला नाही! पुरुष तो! महाअहंकारी!! माझ्या जिवाचा आता संताप संताप झाला...

सामान बांधलं नि त्या एका हीटमध्ये टॅक्सी करून गेले ‘ओ हारे’ एअरपोर्टला, संध्याकाळ हळूहळू उतरायला लागली. शिकागोहून इंडियाची फ्लाईट मिळणं शक्य दिसत नव्हतं. मग नेवर्क एअरपोर्टचं तिकीट मिळवायला ट्राय केला, ते मिळणं तर अशक्य दिसलं. ज्याला त्याला आपल्या प्रेमीजनांकडे धावायची कोण ओढ लागलेली. मग जिद्दीनं पुन्हा ट्राय केलं, तेव्हा वेटिंग मिळालं. म्हटलं लक ट्राय करू, नाहीतरी आता बाहेरच पडलोय तर! 

दोन तासात माझं तिकीट क्लिअर झालं, खूप महाग तिकीट होतं ते. ऐनवेळी काढलेलं. पण माझाही नाइलाजच झाला!

सेक्युरिटी चेकला ही गर्दी! साहजिक होतं, ऐन गर्दीचेच दिवस हे. सगळे सोपस्कार उरकून गेट नंबर तेवीसला पोहोचले नि बाकावर बसून पहिली मिशेलला मेल टाकली. ‘कमिंग टुमारो मॉर्निंग! वुड यू प्लीज फाइंड अॅकमोडेशन फॉर मी?... सॉरी टू रिक्वेट यू सोऽऽ लेट!’

आणि विदीन नो टाईम तिचा रिप्लाय आला. ‘येस शुअर. डोंट बी सो फॉर्मल! डू कम ॲण्ड स्टे विथ मी..!!’

अपेक्षा नव्हतीच भावेश मनवायला येईल म्हणून. डिसेंबरचा महिना, ख्रिसमस दोन दिवसांवर आलेला. आख्खं एअरपोर्ट सजलेलं. लाल निळ्या दिव्यांच्या माळा सोडलेल्या सगळीकडे. एका ठिकाणी छताजवळ सस्पेन्शनमध्ये तांबडी टोपी आणि अंगात ढगळ निळसर चट्यापट्याचा अंगरखा घातलेला पाठीवर गुडीजचं गाठोडं घेतलेला नाताळबाबा झुपकेदार मिशा हलवत रुंद जिवणीतून हसत होता. एका कोपऱ्यात हिरवंगार ख्रिसमस ट्री दिव्यांच्या झगमगाटात अनेक घंटा आणि झिरमिळ्या वागवत उभं होतं. या ट्रीवर लाल, निळ्या, हिरव्या चकाकत्या रॅपर्समध्ये गिफ्टच्या बॉक्सेस कुणासाठीतरी लटकवल्या होत्या. दूर आकाशात उंचावर डेव्हिडचा निळा तारा चमचमत होता. असं सगळं अमेरिकाभर आनंदाचं वातावरण असताना आमचा मात्र हौसेनं मांडलेला संसार मोडला होता. 

भावेशच्या प्रेमात बुडण्याच्या सुमाराला किती ताठ्यात मी म्हटलं होतं, कुणा टॉम डिक हॅरीसारख्या शेळपटाशी संसार करण्यात काय थ्रील? हिरा धारदारच असायचा, जी तो आपल्या कनवटीला लावून मिरवेल ती खरी कुशल बाई!! 

मूर्ख होते मी! पुरुषाचा अहंकार किती महान असतो याची पुरेशी जाण नव्हती, म्हणून मारलेल्या फक्त गमजा होत्या त्या!!

आज मी माझी ती सगळी वाक्यं परत घ्यायला तयार होते आणि तरीही माझी झालेली हार आईपासून काहीही करून झाकावी असंच वाटत होतं.

इतकी वर्ष इतक्या वेळा भावेशच्या नोकऱ्या गेल्या, कठीण काळ आला, तरी आम्ही ते सगळं कशासाठी सहन केलं? त्याकाळी दर खेपी म्हणत राहिलो, नक्की जायचं भारतात परत, पण कोणीतरी ‘खास’ असं होऊन! ऐऱ्यागैऱ्या अवस्थेत नाही परतायचं. लोकांची सहानुभूती नको आपल्याला! 

पण आज..

मला ढसढसा रडू यायला लागलं.. 

गेट्स उघडली. रात्री आठला विमानानं आकाशात झेप घेतली नि मी निग्रहानं डोळे पुसले. आता माझा नवा प्रवास सुरू झाला होता.

पहाटे अडीचला विमान धावपट्टीला टच झालं, त्या खडखडाटानं मी पुन्हा एकदा भानावर आले. मी मिशेलला तिच्या घराचा पत्ता विचारला नव्हता. मग मी एअरपोर्टवरच बसायचं ठरवलं. म्हटलं सकाळ झाली की तिला पत्ता विचारू नि जाऊ ‘पाथ’नं तिच्या घरापर्यंत. फारसं सामान नव्हतंच बरोबर, एक कॅरिऑन, लॅपटॉपची बॅग आणि हातातली पर्स फक्त.

तिच्या घरी जायचा विचार मनात रेंगाळत असताना मनात आलं, आपण नाताळच्या सणाला नेमक्या तिच्या घरी चाललोय. भले आपला संसार मोडलाय, त्याचं रडगाणं तिला कशासाठी ऐकवायचं? सकाळी एअरपोर्ट सोडताना इथूनच चॉकलेट्स आणि एखादा छानसा बुके घेऊन जाऊ तिच्याकडे.  

मी बसले होते पाय पोटाशी घेऊन, अंगातला कोट अंगावर जरा जास्तच ओढून घेऊन. हलकेच डोळा लागला माझा. कितीवेळ माझा मोबाईल वाजत राहिला होता कोण जाणे!

मी फोन घेत म्हटलं, ‘‘हॅलो!’

‘‘डियर, वेटिंग आउटसाइड..!!’’ मिशेलचा आवाज ऐकला नि मी थक्क झाले. हिला कसं कळलं मी या

फ्लाईटनं आलेय? मी काही विचारणार तोच ती म्हणाली,

‘‘नाऊ बी क्वीक! आय कान्ट वेट आउटसाइड फॉर अ लॉँग टाईम.’’ 

‘‘ मिशेल..डियर थँक्स!’’ 

झटकन बॅग घेतली नि बाहेर आले. मिशेल तिची गाडी घेऊन आली होती. झटकन मी माझी बॅग डिकीत टाकली नि आम्ही रस्त्याला लागलो. ती आता राहत होती ग्रिनव्हिलेत, खास त्यांच्या लोकांच्या वस्तीत.

तिच्याकडे कॅमरी होती. गाडीचा स्पीड चांगला होता, आत्ता ऑड टाईमला रस्त्याला फारसं ट्रॅफिक नव्हतं.  

तासाभरात आम्ही तिच्या घरी पोहोचलो. ड्रॉइंग रूममध्येच कोपऱ्यात ख्रिसमस ट्री, झिरमिळ्या, रंगीत गोलक आणि चांदण्यांनी नटवून सजवून उभा केलेला. वरच्या बाजूला डेव्हिडचा निळा तारा होताच. शिवाय प्रत्येक फांदीवर चकचकीत कागदात गुंडाळून कुणाकुणासाठी आणलेली प्रेझेंट्स लटकत असलेली दिसत होती. ते पाहिलं नि मला अगदी ओशाळवाणं झालं. ऐन सणाला आले होते ती अगदी रिकाम्या हातानं. भले घरातून बाहेर पडताना डोकं आऊट होतं, पण इथे नेवर्क एअरपोर्टवर ठरवलं होतं तिच्यासाठी चॉकलेट्स, बुके घ्यायचं, तेही राहिलं ती न्यायला आली म्हणताना..

तिनं मला माझी खोली दाखवली नि ती अगदी सहज म्हणाली, ‘‘कम हॅव सम टी, यू विल फील फ्रेश!’’

फ्रेश होऊन कपडे बदलून मी ड्रॉइंग रूममध्ये आले. मिशेलनं एव्हाना चहाचा सगळा तामझाम, म्हणजे टिकोझीसकट चहाची किटली आणि मग्ज टेबलावर मांडले होते. शिवाय कुकीज्, क्रोश्ये, केक्स आणि टी टाईम बिस्कीट्स होतीच. 

म्हटलं तिला, ‘‘मिशेल, आय ॲम सॉरी, कुड नॉट बाय इव्हन चॉकलेट्स..’’

तर ती माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, ‘‘आय कॅन अंडरस्टँड डियर. नो प्रॉब्लेम!’’ 

भावेश आमच्या दोघांच्या सहीचं ग्रीटिंगकार्ड आम्ही जिथे असू तिथून दर वर्षी न चुकता त्या दोघांना ‘थँक्स गिव्हिंग’ला आणि ख्रिसमसला पाठवत होता. फक्त या वर्षी अजून त्याचं ग्रीटिंग आलं नव्हतं म्हणून त्यांना जरा आश्र्चर्यच वाटत होतं.

आम्ही चहा पिता पिता गप्पा मारत होतो. त्यांच्या लायब्ररीत डेटाबेसला रिसर्च रेफरन्सचा सेक्शन आहे, तिथल्या ‘बुलेटिन ऑफ दी युरोपियन असोसिएशन फॉर थिअरॉटिकल कॉम्प्युटर सायन्स’ या जर्नलमध्ये आणि ‘कॉम्प्युटर सायन्स जर्नल ऑफ मालदोवा’मध्ये भावेशचे प्रसिद्ध झालेले पेपर्स कसे गाजतायत ते ती मला कौतुकानं सांगत होती. मी नुसतं हू..हू करत राहीले.

तिच्या मोबाईलवर मेसेज आला तशी ती मला म्हणाली, ‘‘ग्रीटिंग फ्रॉम भावेश ॲण्ड इरा!!’’

त्याला माहीत नाही मी इथे आहे, मी मनात म्हणाले नि हसले.. तर तिनं भावेशला फोन लावला नि म्हणाली, ‘‘भावेश यू हॅव गिव्हन अस सच अ गूड सरप्राईज! लूक, नाऊ युवर वाईफ इज पर्सनली गिव्हिंग अस युवर बेस्ट विशेस!!’’

मग तिनं फोन माझ्याकडे दिला, मी अगदी कॅज्युअली म्हटलं, ‘‘हाय!’’

तर त्यानं म्हटलं, ‘‘चेक युवर मेल’’ आणि फोन ठेऊन दिला.

मी थक्क! बायको घर सोडून गेली, या गृहस्थाला फरक पडला नाही. बायको परक्या देशात कुठे गेली असेल हा विचार सुचलासुद्धा नसेल याला? आणि आपण आपलं सगळं करिअर धुळीला मिळवून याच्यामागे आलो परक्या देशात. तो म्हणाला, ‘‘तू मला सोडून एकटीनं दुसऱ्या स्टेटमध्ये नोकरीला जायचं नाहीस!’’ मी गेले नाही. 

आई म्हणाली होती ते किती खरं होतं! आपण मूर्ख! साधे मूर्ख नाही, महामूर्ख!!

डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. चटकन टेबलापासून दूर जात मिशेलला म्हणाले, ‘‘डियर, प्लीज एक्सक्युज मी. आय विल हॅव टू चेक मेल्स ॲण्ड बाय टिकेट फॉर मुंबई अल्सो!’’ आणि मी टेबलापासून उठून मला दिलेल्या खोलीत गेले. 

मेल चेक करणं भागच होतं. भावेशनं आणखी काय करून ठेवलंय की त्यानं मी फोन हातात घेताच कशी आहेस वगैरे फॉर्मल असं न बोलता फक्त ‘मेल चेक कर’ एवढंच बोलावं.

मी लॅपटॉप उघडला... 

संबंधित बातम्या