पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

दीर्घकथा

..आणि आईनं माझ्या आठवणीत पहिल्यांदाच मला पोटाशी धरलं. मी बिलगले होते तिला अगदी बाळासारखी. मला माझ्या आतला सुप्त धुमसता अग्नी शांतावल्यासारखा वाटला. मी डोळे मिटून तिच्या कुशीच्या उबेत लहान बाळासारखी विसावले होते. त्या एका क्षणी काळ थांबल्याचा मला भास झाला...

ल ग्न झाल्यापासून पहिल्यांदाच भारतात आले होते आणि माझं माहेरपण चालू झालेलं. आईकडे येणाऱ्या भिशीच्या बायका अजून आल्या नव्हत्या. मी मग वर्तमानपत्र घेतलं नि माझ्या खोलीत वाचायला गेले. वर्षाचा शेवटचा आठवडा संपत आला म्हणताना त्या वर्षातल्या अनेक मोठ्या घटनांची जंत्रीच दिली होती संपादकांनी. खूप वर्षांनी हातात वर्तमानपत्र धरून वाचत होते. एरवी शिकागो किंवा जर्सी सिटीत राहात होतो, तेव्हासुद्धा झाडून सगळी मराठी वर्तमानपत्रं ऑनलाइन वाचायची मी, पण त्या वाचण्याला हे असं वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्यातलं सुख नव्हतं. 

मी वाचत होते, इस्रोनं अवकाशात शंभराव्यांदा उपग्रह सोडला होता. त्यानंतर बरीच काही तांत्रिक माहिती होती लिहिलेली. अर्थात ती डोक्यावरून गेली आणि भावेशची आठवण आली. आज तो इथं असता आणि जर त्याचे नि आपले संबंध चांगले असते, म्हणजे दोघांपैकी कुणीही म्यूट मोडवर गेलेलं नसतं तर भावेशनं सोप्पं करून सांगितलं असतं सगळं.. जाऊ दे!

त्यानंतरचं पान बॉलिवूडमधल्या नवदाम्पत्यांच्या फोटोंनी व्यापलेलं होतं.. दीपिका-रणवीर सिंग, प्रियांका-निक जोनास, इशा अंबानी- आनंद पिरामल.. धुमधडाक्यात झालेली ही लग्नं या देशात खरंच गरिबी आहे? असा प्रश्र्न विचारायला लावणारी..

मी हे सगळं पाहण्यात-वाचण्यात दंग असल्यामुळे आई आत आलेली मला समजलं नाही. माझ्या जवळ येत तिनं माझा मोबाईल माझ्या हातात ठेवत म्हटलं, ‘‘जावईबापूंचा फोन आहे.. घे!’’

फोन मी हातात घेतला तर फोन लगेच बंद झाला.

माझा नवरा लई हुश्शार राव! मी कुठं आहे हे ओळखण्यासाठीच त्यानं हा फोन केला. आत्ता तिकडे अमेरिकेत सगळे म्हणजे हा भावेशसुद्धा ढाराढूर झोपलेला असायला हवा होता. ते सोडून यानं फोन केला. पण मी बोलायला लागले तर फोन बंद केला खुशाल! किती पोचलेला आहे माझा नवरा! आज समजलं. प्रेमात आंधळी असताना त्याचे हे गुण माझ्या लक्षात आले नव्हते!!

मला आता चांगली भूक लागली होती. काही खायला म्हणून स्वयंपाकघरात जायला उठले तर मोबाईलवर एसएमएस आला होता. मी वाचायला लागले, ‘कमला इज गेटिंग मॅरीड टू विहान. प्लीज गो ॲण्ड पर्सनली टॉक टू बा ॲण्ड बापू!’

मी फोनवर आलेय म्हणताना हा दीडशहाणा खुशाल फोन ठेवून देतो, तरीही हा मला असं फर्मान कसं सोडू शकतो?

माझी चिडचिड हाईटला पोचली असताना पुन्हा फोन वाजला, तेव्हा मी जवळ जवळ ओरडलेच...‘‘हॅलो!’’

‘‘मक्या बोलतोय. माझ्या बायकोला आपण केलेल्या धतिंगच्या लई कहाण्या सुनावल्या आहेत म्हणून तिला तुला पाहायचंच आहे!’’

‘‘तिला सांग, आता निवळलंय काम! ए, पण तुझ्या पोरी फार गोड आहेत हं! मी आले ना तेव्हा खेळत होत्या गेटजवळ.’’

‘‘त्या पोरींचं काही सांगू नकोस. दिसायला जेवढ्या गोड आहेत तेवढ्याच महाडांबीस आहेत. ऐकत नाहीत अगदी! म्हणूनच माझ्या बायकोला तुला पाहायचंय. काकी म्हणत असते तिला, ‘इरा अशीच होती’..’’

‘‘येईन नक्की. अजून आठ पंधरा दिवस आहे मी इथे. कळवीन तसं.’’

पुन्हा मोबाईल वाजला तेव्हा मला रागच आला, पण फोन घ्यावाच लागला कारण स्क्रीनवर नाव आलं ‘बा’!

‘‘हॅलो! बा कशा आहात?’’

‘‘मजेत. तू आल्याचं कळलं. भावेशनं सांगितलं नाही. तुला आश्र्चर्य वाटेल पवार फॅमिली भलतीच दूरवर फैलावलीय बरं. एअरपोर्टवर तुला विहाननं बघितलं, त्याची एअर इंडियाची खूप लेट झालेली फ्लाइट दिल्लीहून नेमकी त्याचवेळी आली. तर लगेच त्यानं कमलाला मुद्दाम फोन केला आणि तू आल्याचं सांगितलं. आता बोल! आहे ना पठ्ठ्या ग्रेट!!.’’

मी थक्क! घाईनं म्हणाले, ‘‘बा, कालच आलेय ना, खूप दमले होते. आज जरा जास्तच झोप लागली. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करणारच होते.’’

‘‘हे बघ सॅलसबरीतलं आपलं घर हे आता लग्नघर आहे. हक्कानं सांगतेय, कंबर कसून तुला उभं राहायचंय, कमलानं लग्न ठरवलं  

विहानशी. घरातच लग्न करायचं असलं आणि फार फाफटपसारा नसला, तरी लग्न म्हटलं की खूप काम असतं. तेव्हा लगेच ये इथं. इरा, खरं बोलू, सून म्हणून तू या वास्तूत राहिलीच नाहीस, आम्हाला पण कौतुक आहे आमच्या एकुलत्या एक सुनेचं. येशील ना? मनात नको धरून ठेवू मागचं काही..’’

त्यांचा आवाज रडवेला झाला. मला कसं तरी वाटायला लागलं. कुठल्या तोंडानं मी त्यांना सांगणार होते, तुम्ही जिला बोलावताय ती आता तुमची सून राहिलेली नाही.

उलट मी म्हणाले, ‘‘बा! अजिबात काळजी करू नका, मी आले की सगळं करीन आणि आता भावेश विरुद्ध आपली टीम ठरलीय ना! मग मनात धरून ठेवणं वगैरे कुठून काढलंत? काहीतरीच आपलं!’’

‘‘सॉरी गं! माझी झालेली चूक माझं मन एकसारखं ऐकवत राहातं. खरं सांगते, कधी कधी मनात येतं तू का येशील आमच्याकडे? तू आलीस भावेशबरोबर तेव्हा नाहीच वागले चांगली! मन खातं एकटी असले की. एक कबूल करते, तू आपलीशी वाटायला लागलीस, ती आमच्या तिरशिंगरावला छान सांभाळतेस हे लक्षात आल्यावर. कमलाचं नि त्याचं सारखं वाजायचं! तू बरी सापडलीस त्याला एवढं सांभाळून घेणारी. खूप कौतुक वाटत गं तुझं. मी वाट पाहतेय. ये लवकर.’’

मी हसले, पण त्यांना सांगितलं नाही, ‘नका कौतुक करू माझं. मी नाही टिकाव धरू शकले भावेशच्या एकसारखं टाकून बोलण्याला नि जरा काही घडलं की नोकरीवर लाथ मारून बेरोजगार होण्याच्या सवयीला!’ 

मी त्याचे दोन रिसर्च पेपर्स कसे महत्त्वाच्या मॅगझिनमध्ये छापून आलेत आणि लोक त्याचं कसं कौतुक करतायत ते सांगत राहिले. वर असंही बोलले, ‘‘बहिणीच्या अचानक ठरलेल्या लग्नाला भाऊ नाही येऊ शकलाय, पण तिची वहिनी आहे...’’ आणि मी फोन ठेवून दिला.

मला माझंच आश्र्चर्य वाटत होतं, मी का त्याची बाजू घेतली? मी का नाही सांगून टाकलं की तुमचा मुलगा अजिबातच चांगला ‘हजबंड मटेरिअल’ नाहीये. माझी आई म्हणाली होती ते अगदी बरोबर होतं म्हणून. खरंतर मी त्यांना ठणकावून सांगायला हवं होतं.. भावेश साधं माझ्याशी फोनवर बोलत नाही.. आता भावेशशी माझा संबंध उरला नाही, तर तुम्ही कोण?

खूप अस्वस्थ वाटायला लागलं. पुन्हा जाऊन झोपले तर आपलं मनात काहीतरी जुनंच यायला लागलं, बाहेर बेदम पडणारं बर्फ.. घरासमोर तर जाड थर जमलेला बर्फाचा... हातात फावडं घेऊन ते बर्फ साफ केल्याशिवाय कुठंही जाणं शक्य नाही. ताप आलेला, नाक वाहत होतं, घसा दुखत होता, गिळायला त्रास होत होता. भावेशनं किती केलं त्या दिवसांत. लहान मुलाला जपतात तसं जपलं. अचानक पाळी सुरू झाली, तर जवळ घेऊन थोपटत राहिला रात्रभर! आणि त्याच भावेशनं जेव्हा तब्येत ठणठणीत झाली तेव्हा किती आडदांडपणा करावा याला काही सीमा? 

अचानक इंटरनेट बंद, पाथ सर्व्हिस ठप्प अशी परिस्थिती निर्माण झाली! बर्फ वर्षाव आटोक्यात आला तरी पण पाऊस सुरू झाला. भर पावसात गाडीनं जायला भाग पाडलं त्यानं थेट न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला. तिथं असलेल्या कुठल्याशा मॅगझिनच्या ऑफिसात रिसर्च पेपर पोचवणं त्याला फार महत्त्वाचं वाटत होतं म्हणून. पण तिथं ताबडतोब जाण्याइतपत त्याच्याजवळ वेळ नव्हता. रजा टाकून तो जाऊ शकला असता, पण तसं त्यानं केलं नाही. त्यावेळी कॅमरी होती आमच्याकडे. तो स्वतः गेला टॉमबरोबर त्याच्या गाडीनं आणि मी चिकचिकीत ओल्या, निसरड्या झालेल्या रस्त्यावरून घसरत्या चाकांचा तोल सांभाळत झक्कत गेले न्यू यॉर्कला आणि केला होता सबमीट त्याचा पेपर! इतकी मोठी रिस्क घेतली ती फक्त त्याच्या शब्दाखातर! पण आता बास! मनाला बजावलं, शक्यतो लवकरात लवकर बा, बापू, कमला या सगळ्यांना सांगून टाकायचं स्पष्टपणे, की आता संपलंय सगळं!

मनाला समजावलं, टफ डिसिजन्स नीड टफ माइंड! तेव्हा बा मना, आता कुणाची गय करायची नाही! आपण भरपूर सोसलंय!! 

मी परत स्वयंपाकघरात आले. तिथल्या डायनिंग टेबलाभोवती आठ बायका हसत खिदळत बसलेल्या होत्या. एकजात सगळ्याजणी म्हणजे पिकली पानं! सगळ्याजणींच्या डोक्यात मोगऱ्याचे गजरे. हातात कोकम सरबत. 

मला बघताच डाव्या कोपऱ्यात बसलेली एकजण म्हणाली, ‘‘नमुच्या आई, ही तुमची धाकटी लेक ना!’’

‘‘हो!’’ आईनं उत्तर दिलं तशी ती बाई माझ्याकडे बघत म्हणाली, ‘‘अगदी मोठ्या बहिणीला खोऽऽ देत आलीस गं!’’

मी आश्र्चर्यानं आईकडे बघायला लागले, तर तीच बाई म्हणाली, ‘‘नमुताई आली होती पंधरा दिवसांखाली. तुम्ही दोघींनी एकत्रच नाही का यायचं, म्हणजे दोघींना एकत्र माहेरपण एन्जॉय करता आलं असतं.’’

मी आपली कसंबसं म्हणाले, ‘‘हो ना, पण जमायला हवं ना?’’

मला कमालीचा धक्का बसला होता. आई काही बोलली नाही नमुताई येऊन गेली ते. असं का? आणि या नव्या मैत्रिणीसुद्धा तिला ‘नमुची आई’ म्हणून ओळखतात! ‘इराची आई’ अशी हाक तिला कुणी कधीच मारलेली नाही म्हणा!

बायका पुन्हा गप्पात रंगून गेल्या, पण आईनं ओळखलं, मी का आत आली असेन ते. ती पटकन उठली तिनं मला प्लेटमध्ये शिरा आणि बटाटावडा दिला नि म्हणाली, ‘‘बघ बरं कसं झालंय ते.’’

मी हातात प्लेट घेऊन स्वयंपाकाच्या कट्ट्याजवळ उभी राहिले. मला हजारवेळा वाटलं विचारावं तिला, ‘का बोलली नाहीस नमुताई येऊन गेली ते? मला माहीत आहे ती तुझी खूप लाडकी आहे नि तू तिला नेहमी नेहमी काहीतरी देत असतेस ते.’

पण मी जेव्हा आईकडे पाहिलं तेव्हा तिचा चेहरा मला एकाएकी ओढलेला वाटला, मग मी गप्प बसले. पण मनात सलायला लागलं तिचं हे वागणं!

मी माझ्या खोलीत आले. बॅग उघडली त्यातून ‘बॉक्स डे’ला विकत घेतलेली चॉकलेट बाहेर काढली. ते पुडकं आईच्या मैत्रिणींसमोर ठेवलं तर आईच्या म्हाताऱ्या मैत्रिणी खूश झाल्या अगदी! लहान पोरींसारखी त्यांनी चटचट चॉकलेट उचलली नि सोलून टाकली तोंडात.

ते बघितलं नि वाटलं, खरंच या आख्ख्या लॉटचाच स्वतःचं जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न चाललाय, हे काहीतरी विशेष आहे. आईला नको आत्ता दुखवायला.

‘‘मी बांकडे जाऊन येते गं!’’ असं आईकडे बघत म्हणाले नि बाहेर पडले.

सॅलिसबरी पार्कला गोल्डन पार्कमधल्या ए विंगमध्ये चौथ्या मजल्यावर पवार फॅमिली राहायची. खूप पूर्वी एकदा कमलाबरोबर मी आले होते इथं, आणि त्यानंतर भावेशशी रजिस्टर लग्न केल्यावर नवी नवरी म्हणून बा आणि बापूंच्या पाया पडायला म्हणून आलेले. आता आज खूप वर्षांनी येत होते. बिल्डिंगभोवतीच्या मोकळ्या जागेत लावलेला गुलमोहर हिरवाकंच दिसत होता. डिसेंबरचा शेवटचा दिवस तरी थंडी नव्हती, उलट आता ऊनच चांगलं तापलं होतं. लिफ्टनं मी चौथ्या मजल्यावर आले नि दारावरची बेल दाबली. दार उघडलं बांनी आणि मी काही बोलायच्या आत त्यांनी मला मिठी मारून माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले नि म्हणाल्या, ‘‘थांब इथेच. भाकर तुकडा ओवाळून टाकल्याशिवाय आत येऊ नको.’’

लगबगीनं त्या आत गेल्या त्यांनी भाकर आणली. माझ्यावरून तुकडा ओवाळून टाकला, पायावर पाणी ओतलं नि मग म्हणाल्या, ‘‘ हं! ये आता आत. अजून आम्ही जेवायला नाही बसलोय, चल पटकन पानावर बैस!’’

खरंतर मी तयारी करून आले होते, सगळं एका घावात संपवायचं म्हणून आणि आता..

आजपासून बरोबर चार दिवसांनी कमलाचं लग्न होतं. नव्या वर्षातली पहिली महत्त्वाची घटना ठरणार होती कमलाचं लग्न म्हणजे. 

पाच वाजायला आले तेव्हा आईचा फोन आला. आता निघायला हवं होतं. या घरात पाऊल टाकल्यापासून मी संधी पाहत होते, ठरवल्याप्रमाणे बोलून सगळं संपवून टाकण्याची... पण बा! खरंच भावेश म्हणाला तसं त्यांना दुःख द्यायला मन धजत नव्हतं.

कमलाच्या लग्नाला जायच्या आदल्या दिवशी मी आईला म्हणाले, ‘‘आई उद्या लग्नाला जाताना मी तुझे बिलवर आणि लक्ष्मी हार घालीन. हे सगळं घरातच ठेवलेलं आहे की आणायचंय बँकेच्या लॉकरमधून?’’

तर ती एकदम म्हणाली, ‘‘तिनं शिकवून पाठवलं ना?’’

‘‘ती कोण?’’

‘‘उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. नमु आली नि माझे गोठ घेऊन गेली. तिलासुद्धा इथं फ्लॅट घ्यायचाय म्हणून म्हणत होती, ‘वाटण्या करा एकदाच्या, नि माझ्यावाटचं जे असेल ते आत्ताच देऊन टाका. हो उगाच नंतर भांडणं नकोत,’ असं आल्यापासून म्हणत होती. मग तिला ह्यांनी आधीच केलेला कागद दाखवला तर..’’

वाटणी मागायला नमुताई इंडियाला आली होती? आईनं मला हे का सांगितलं नाही? मी चिडलेच होते. मग म्हणाले तिला, ‘‘सगळी जरी तुला नमुच्या आई म्हणून हाक मारत असले, तरी तू माझीपण आईच आहेस! ती तुझी लाडकी, तू तिला द्यायचं ते दे सगळं.. सगळं म्हणजे तुझे दागिने, भांडीकुंडी, पैठण्या, बनारसी शालू, शेले.. खुशाल दे, मला काही कमी नाही. पण जे देशील ते मला कळलंच पाहिजे. निदान तेवढा तरी हक्क आहे माझा तुझ्यावर, कारण तू मला जन्म दिलायस.’’ 

आईपण भडकली होती. बाबा नव्हते घरात. ते गेले होते भारत इतिहास संशोधक मंडळात कसल्या तरी गड किल्ल्यांवरच्या भाषणाला..

ती संतापून म्हणाली, ‘‘तिनीच तुला पाठवली ना, मी तिला नक्की काय काय देणार आहे ते तिला कळावं म्हणून! तरीच मी विचार करत होते तू इतकी निवळलीस कशी? आलीस त्या संध्याकाळी मी तुला तिन्हीसांजा कुंकू लावून ये म्हणाले नि तू चक्क नीट आवरून आलीस.. नवलच होतं ते. एरवी ऐकून नसतं घेतलंस. आणि मी तुला चहासुद्धा न देता अंघोळ करून ये म्हटलं तर खरंच गेलीस लगेच अंघोळीला. तेव्हाच मला संशय आला, नक्कीच काहीतरी शिजतंय या दोघींमध्ये. नाहीतर तू माझा शब्द कधी मानला होतास का गं?’’

‘‘आई मी खरं सांगते. नमुताई माझ्याशी फार बोलत नाही. मी तिला फोन केल्याशिवाय ती आपणहून मला फोनसुद्धा करत नाही. माझ्या मनात काही नाही. नसलं सांगायचं तर नको सांगूस. पण आमच्यात काही राजकारण शिजतंय असं मात्र नको बोलूस. मला खरंच काहीही नकोय. लिहून देऊ तसं?’’

‘‘मग पवार मंडळी तुला एवढी गोड कशी वाटायला लागली गं? तू इथं येताच लगेच त्या भावेशचा फोन.. मग त्या बांचा फोन! खरं सांग, भावेशच सांगतोय ना तुला, ‘घे घरात वाटा मागून! म्हणजे उद्या इंडियात परत गेलो की आपल्याला मोठा फ्लॅट विकत घेता येईल एखाद्या पॉश वस्तीत!’ नमुच्या नवऱ्यानं हेच केलंन. आता भावेश..’’

‘‘माय गॉड! असलं काही भावेशच्या डोक्यातसुद्धा येणार नाही. त्याला कधी पैशांचा मोह नव्हता आणि नाही. आणि माझं म्हणशील तर या आयुष्यानं मला इतकं शिकवलंय की आता मलादेखील कसला मोह उरला नाहीये. तू फक्त सांग कधी ‘हक्क सोड’ कागद तयार करायचा ते, मी लगेच सही करीन!’’ 

माझ्या डोळ्यांना धारा लागल्या. नमुताई इथं येते, मला कळवतसुद्धा नाही आणि ती आईकडे तिचा हिस्सा मागते! इतकी गडगंज श्रीमंत असलेली नमुताई, तिला इतकी हाव? नवरा नाचवतोय ही नाचतेय.. खुशाल मागतेय आपल्या आई-बापाकडे प्रॉपर्टीत वाटा? मी स्वतःशी बडबडत होते..

इतक्यात बाबा आले. ते अजून गडकोट किल्ल्यातच होते. आत आल्या आल्या त्यांनी माझ्या डोक्यावर टप्पल मारत म्हटलं, ‘‘काय जायचं का सिंहगडावर? जिथं तानाजी आणि मावळे लढले ती जागा पाहू, भजीबिजी खाऊ मस्त!’’

पण मग त्यांचं माझ्या डोळ्यांकडे लक्ष गेल्यावर ते म्हणाले, ‘‘इरू, अगं आहे ते सगळं तुमचंच आहे. तुम्हा दोघींच्या नावानं ब्लॉक्स केलेत केव्हाच. डावीकडचा तुझा आणि उजवीकडचा नमुचा. आम्ही राहतो ती जागा मात्र आम्ही गेलो की विका आणि पैसे वाटून घ्या! इतकं सगळं सोपं केलेलं पण नमुनं तिच्या वाटचा ब्लॉक विकायचा म्हटलं, त्यामुळे अडचण आलीय जरा एवढंच.’’

‘‘काय? नमुताई तिच्या वाटणीत एक ब्लॉक घेऊन मोकळी झाली? तेवढ्यासाठी इथं आली ही, तरीच बोलली नाही काहीसुद्धा! वर तो ब्लॉक आई बाबा जिवंत असताना विकायचा म्हणतेय? जोड्यानं मारायच्या लायकीची आहे ही बाई!’’ मी अगदी पोटतिडकीनं बोलले!

आई बरीच घायाळ झाली होती. मटकन खुर्चीत बसत ती एकदम पडेल आवाजात म्हणाली, ‘‘तुला अजून बोलले नव्हते, पण या खेपी तिनं जरा अतिच केलं. झालं असं की माझे शिंदेशाही तोडे ती चार चार वेळा आवडले म्हणाली म्हणून मग मी दिले तिला. पण जाताना ती माझ्या पाटल्यादेखील घेऊन गेली. अशीच कुणाच्या लग्नाला म्हणून घालून गेली, ती परत कपाटात न ठेवताच बरोबर घेऊन गेली. नाहीतरी मी ते तिला देणारच होते. पण हे असं मला न सांगता.. न विचारता? मनाला त्रास झाला ना! आणि तू आता दागिने मागितलेस घालायला! आधीच जीव चुरगळल्यागत झालाय गं!

तू तुझ्या वाटचा ब्लॉक विकून इथं दुसरीकडे कुठे फ्लॅट घेऊन राहायला येणार असलीस तरी माझी काही हरकत नाही. पण प्रश्र्न असा आहे की यांना पेन्शन नाहीये आणि मी कधी पैसा मिळवायला घराबाहेर गेले नाही. या दोन्ही ब्लॉक्सचं भाडं येतंय म्हणून हे सगळं चाललंय. उद्या हे इन्कम बंद झालं.. आम्ही आजारी पडलो.. नोकरचाकर ठेवून जगायची वेळ आली तर आमचे हाल कुत्रं खायचं नाही गं!’’ आणि तिनं डोळ्यांना पदर लावला!

मला एकदम अपराधी वाटायला लागलं आई-बाबांनी का म्हणून हे सोसायचं? आमच्यासारख्या, नव्हे नमुसारख्या अप्पलपोट्या स्वतःचा स्वतंत्र विचार नसलेल्या मुलीला जन्म दिला म्हणून?

मी तिला जवळ घेतलेलं नि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, ‘‘आई ही तुझी इरू भले भांडखोर असेल.. तुला तिनं लाखवेळा उलट उत्तरं दिली असतील.. तुझ्या मनाविरुद्ध लग्न केलं असेल, पण.. पण ती हिणकस कधीच नव्हती आणि नाही. तुझं सगळं आजवर जसं होत राहिलं तसंच ते कायम होत राहील. हा ब्लॉक जो तुम्ही माझ्या नावावर केलाय म्हणताय, तो वेळ आली तर खुशाल विकून टाका. भावेशसुद्धा कधी काहीही म्हणणार नाही. आणि मी तुम्हाला यापुढे कायम पैसे पाठवत राहीन. काळजी करायची नाही! नमुताई असू दे तुझी लाडकी, पण मी काही अगदीच वाईट मुलगी नाहीये..!’’

मी असं म्हणाले नि कमरेत किंचित वाकलेली आई जागची उठली नि तिनं मला मिठीत घेतलं. ती म्हणाली, ‘‘इरू माझं चुकलं. मी तुला कधी समजूनच घेतलं नाही गं! खरं बोलू, तुझ्यावर अन्याय झाला. पण मीसुद्धा किती आशेला लागले होते तुझ्यावेळी दिवस गेले तेव्हा. इतक्या वर्षांनी दिवस राहिलेले सगळी लक्षणं नेमकी मुलाची. फार.. फार जड गेलं ते बाळंतपण, जगते का मरते अशी अवस्था झालेली. आणि तू आलीस जन्माला. त्यातून तू सगळंच चुकीच कॉम्बिनेशन घेऊन जन्माला आलीस. ह्यांच्यासारखी म्हणजे खास देशपांडे वर्णाची बरीच काळी, पण धिप्पाड अंगकाठी मात्र माझी. खेळणंसुद्धा आडदांडच! मनातूनच उतर गेलीस तू. इथंच चुकलं माझं, बाळा मी तुला नाही कधी जवळ घेतली की तुझे प्रेमानं मटामटा मुके घेतले..! ’’

आणि तिनं माझ्या आठवणीत पहिल्यांदाच मला पोटाशी धरलं. मी बिलगले होते तिला अगदी बाळासारखी. मला माझ्या आतला सुप्त धुमसता अग्नी शांतावल्यासारखा वाटला. मी डोळे मिटून तिच्या कुशीच्या उबेत लहान बाळासारखी विसावले होते. त्या एका क्षणी काळ थांबल्याचा मला भास झाला.

                               (क्रमशः)

संबंधित बातम्या