पावसाचा काही नेम नाही...

योगिनी वेंगुर्लेकर
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

दीर्घकथा

मला फार उदास वाटायला लागलं, तशी मी गाणी बंद करून टाकली. डोक्याखाली एक.. दोन पायात एक.. हाताखाली एक अशा उशा घेऊन मी झोपायचा प्रयत्न करू लागले. जसजसा प्रयत्न गहिरा करू लागले तसतसं मन म्हणायला लागलं.. कुत्रीला कुठलं खानदान? ती खरोखर पिल्लांना सोडून पळाली की तुमची नजर चुकवून बाहेर गेली नि कार खाली येऊन अचानक मेली.. तुला काय माहीत? कसं बोलत होतीस तू? जशी कंपल्सरी वांझपण भोगणारी बाई कुणा लेकुरवाळीचं मूल सांभाळताना करवदावी तसं..!

मला झोप लागत नव्हती. एकसारखं वाटायला लागलं, मेंदूच्या हार्डड्राईव्हमध्ये किती अनुभव आपण सेव्ह करून ठेवतो, प्रत्येक अनुभव आणि त्या अनुभवाला चिकटलेली व्यक्ती आपण एक लेबल लावून कप्प्यात बंद करून टाकतो. आई... बा.. यांच्या बाबतीत असंच झालेलं!

पण याखेपी त्यांच्या सहवासात वाटलं, मागच्या वेळच्या अनुभवांच्या फाईल्स आऊडेटेड म्हणायला हव्यात. वेळीच त्या डिलीट नाही केल्या तर जगणं सुंदर नाही व्हायचं! भावेश म्हणत होता ते मला पटलं; आपलं लग्न मोडलंय हे सांगून नको दुःख द्यायला बा-बापूंना किंवा आपल्या आई-बाबांना. मी मोठ्या तोंडानं आईला म्हणाले होते नाही का, यापुढे कसलीही काळजी नाही करायची, मी पैसे पाठवीन! 

त्या आठवणीनं झटका बसल्यासारखी पलंगावर उठून बसले आणि पुढ्यात लॅपटॉप ओढला. धडाधडा मेल टाकायला सुरुवात केली, मिशेलला, ‘हेल्प युवरसेल्फ’च्या मिसेस सिंथिया कोलमन, न्यू जर्सीत भेटलेली मिसेस मार्था ब्लॅक स्मिथ... अनेक ओळखीच्या सरकारी संस्था ज्या खास करून एशियन स्त्रिया आणि लहान मुलांच्या मदतीसाठी काम करत असत. तिथल्या एव्हाना माहितीच्या झालेल्या पदाधिकारी, तसंच प्रायव्हेट एनजीओ चालवणाऱ्या, माझ्या ब्लॉग्जमुळे ओळखीच्या झालेल्या कितीतरी स्त्रिया होत्या. त्यांनी बोलावल्यावर त्या जिथं बोलावतील तिथं जाऊन मी बायकांच्या, विशेषतः एशियन बायकांच्या डोमेस्टिक प्रॉब्लेम्सवर बोलले होते, त्यांचे प्रश्र्न सोडवायला मदत केली होती. सटासटा या सगळ्या स्त्रियांना मला नोकरी हवी असल्याचं कळवलं. मग निरनिराळ्या साईट्स उघडून कुठे व्हेकन्सिज आहेत, ते शोधून अर्ज करून टाकले.

एवढं होईपर्यंत पहाट झाली. पण आता मला जाम झोप आली. आज तर कमलाचं लग्न! मला वेळेवर तिथं जायला हवं होतं. तरीही जरा लवंडले, कारण त्याशिवाय मी उभीसुद्धा राहू शकले नसते. लग्न यथासांग पार पडलं नि मी भारतातून बाहेर पडले.

२०१९ सालात तुम्ही अमेरिकेत असाल, एवढंच नव्हे तर नवऱ्याला दुखावून, त्याला फाट्यावर मारून स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवून तिथं गेलेल्या असाल, असं जर कुणी मला २०१८च्या सप्टेंबरात माझं भविष्य सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण खरोखर २०१९ सालात  फेब्रुवारीतल्या पहिल्या शनिवारी पहाटे चारला मी नेवर्क लिबर्टी इंटरनॅशनल एअरपोर्टला टेकले होते. 

मला भारतात कुठंही नोकरी मिळत नव्हती आणि पहिला कॉल आला तो नेमका मिसेस मार्था ब्लॅकस्मिथ यांच्याकडून. माझं अन्नोदक इथं अमेरिकेतच आहे अशी खूणगाठ पटून मी मुकाट्यानं इथं आले.

मी बाकीच्या गोष्टी क्लिअर करून एअरपोर्टच्या बाहेर आले नि माझ्या पोटऱ्यांमध्ये गोळे आल्यासारखं झालं. मी जरा कडेला थांबले. फेब्रुवारीत तशी थंडीच असते, तरी मला किंचित घाम आला. माझ्या लक्षात आलं माझे पिरियड्स सुरू झालेत, अगदी अनटाइमली! सरळ टॅक्सी केली नि इझलिनला आले.

सकाळचे सात वाजायला आले होते. टॅक्सी ‘ब्राईट होम्स’ या हाउसिंग कॉम्प्लेक्समधल्या चौदा नंबरच्या बिल्डिंगसमोर थांबली. इथं तिसऱ्‍या मजल्यावर फ्लॅट नंबर ३०२मध्ये मला जागा मिळाली होती. सोसायटीच्या ऑफिसवर गेले नि माझा मोबाईल पुढे करत त्यांचा आलेला मेसेज दाखवला, तर तिथं खुर्चीत बसलेल्या इसमानं रुंद हसून म्हटलं, ‘‘गूड मॉर्निंग, दीज आर युवर कीज.’’

मी किल्ल्या पकडत बॅग उचलली नि पुन्हा बिल्डिंग नंबर चौदापाशी येऊन जवळच्या किल्लीनं खालचं दार उघडलं. समोर काळपट लाल कार्पेट बसवलेल्या पायऱ्यांचा जिना. पण हा जिना चढून वर माझ्या अपार्टमेंटमध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. 

जास्त विचार न करता मी अंघोळीला गेले नि शॉवर सुरू केला. गरम पाण्याच्या धारा अंग रगडत होत्या. बाईपणाची शिक्षा चालू असताना गरम पाणी अंगावर पडल्यानं जरा बरं वाटलं. डोक्यावरून छान अंघोळ करून बाहेर आले, तरी अजून ओटीपोटात दुखतच होतं. म्हणून पर्समधून गोळी काढली नि पाण्याच्या घोटाबरोबर घेतली. मग लॅपटॉप समोर घेऊन बसले. मिसेस मार्था ब्लॅकस्मिथना इथे पोहोचले असून दहा वाजता ऑफिसला येत असल्याचं कळवून टाकलं.

बरोबर दहा वाजता मी ऑफिसात आले. मिसेस मार्था ब्लॅकस्मिथ आलेल्या होत्या आणि कामात बुडाल्या होत्या. त्यांनी बुके देऊन माझं स्वागत केलं. ही नॉन प्रॉफिट अर्निंग एनजीओ होती, तरी त्याला सरकारची मदत मिळत होती. शिवाय डोनेशनदेखील बरीच मिळत होती. ही एनजीओ ‘मानवी’ या संघटनेशी जोडलेली होती, तशीच ती ‘सखी’ या मुख्यतः दक्षिण आशियायी देशातल्या महिला आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशीदेखील जोडलेली होती.

 आज मी भले दहा वाजता आले असेन, पण सोमवार ते शुक्रवार रोज ठीक नऊ वाजता मला ऑफिसला यायचं होतं आणि पाच वाजेपर्यंत काम करायचं होतं. मधे एक तासाचा लंच ब्रेक होता, पण म्हणजे एवढा वेळ सतत काम करावं लागणार होतं.

दुसऱ्या दिवशी मी ठीक नवाला ऑफिसमध्ये येऊन पोहोचले, तर मिसेस मार्थासकट सगळी हजर होती आणि कामात व्यग्र होती. माझी नेमणूक झाली होती ती मुख्यतः भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी महिलांच्या प्रश्र्नांची सोडवणूक करण्यासाठी.

इथं कामाला सुरुवात करून आता महिना होत आला होता. एवढा वेळ सलग काम करणं मला माहीतच नव्हतं. असं काम केलं ते भावेशनं. त्याच्या कष्टांची तीव्रता आज पहिल्यांदा माझ्या मनाला स्पर्शून गेली.

सोमवार उजाडला की कधी एकदा शनिवार उजाडतोय असं होऊन जायचं. इथे कामाला लागल्यावर मला आणखी एक शोध लागला, मी जे ब्लॉग्ज लिही त्यापेक्षाही वास्तव अधिक बोलकं होतं. मी इथं आधी कामाला लागले असते तर माझे ब्लॉग्ज अधिक सखोल लिहिले गेले असते.

अस्वस्थ मन, अस्वस्थ शरीर आणि आपली स्वप्न पुरी होतील की नाही याची धास्ती, असलं काहीतरी मी माझ्या आजूबाजूला पाहत होते, टिपकागदासारखं बरंच मनात नोंदवून घेत होते.. भसाभसा लिहीत होते. न चुकता आई-बाबा आणि बा-बापूंना व्हिडिओ कॉल करत होते.

मिशेललासुद्धा भेटायला जाणं जमत नसे. हा जॉब थकवणारा होता. सतत मुलालेकरांच्या हालअपेष्टांवर काही तोडगा मिळतो का पाहणं.. आया-बायांच्या अडचणी ऐकणं, त्यांना धीर देणं.. एखादी पोरंबाळं असलेली बाई नवऱ्याच्या छळाला विटलेली, नवऱ्याचा मार खाऊन आलेली मदत मागायला आली तर सावधपणे तिचं निरीक्षण करावं लागे. तिला सुरुवातीला आलेला राग, संताप जर एकाएकी थंड झाल्यासारखा वाटला.. ती अचानक बोलायचीच बंद झाली.. तर तिला समजावून सांगताना आवर्जून या मुद्द्यावर भर द्यायचा, की बाई तुझ्यासारख्या खूप आहेत, जर तुला एकदम सुन्न व्हायला झालं.. सारंच नकोस वाटलं तर हताश व्हायच्या आधी ताबडतोब फोन कर. आमच्यापैकी कुणाशीही बोल. तू एकटी नाहीस. तू खूप मोलाची आहेस हे विसरू नकोस. 

अनेक गोष्टी या नोकरीमुळे मला शिकायला मिळाल्या. जसं की बायका किंवा पुरुष काय, ते जे सांगतात त्यावर चटकन विश्र्वास ठेवायचा नाही, बरेचदा बढाचढाके सांगितलं जातं. खरं शोधायला त्रास पडला तरी ते शोधायचं, म्हणजे केस घेऊन आलेल्या व्यक्तीला खरीखुरी मदत करता येते.

थकून भागून घरी आले की पुन्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येई. काहीतरी खाऊन अंथरुणाला पाठ टेकली की हल्ली खूप एकटं वाटायला लागलं होतं. वाटे या जगात आपलं कुणीसुद्धा नाही. आयुष्याची इतकी वर्षं ज्या भावेशसाठी गुंतून पडलो, त्या भावेशला साधी आपली आठवणसुद्धा येत नाही. इतक्या दिवसात भावेशनं चुकूनसुद्धा कशी आहेस, असं विचारू नये? इतकं तोडलं त्यानं आपल्याला? आणि आपण! अजून त्याला मनातून नाही पुसून टाकू शकलो. मन खंतावत राही. पण त्यावेळी हे सुचत नसे की आपणसुद्धा त्याला एकदाही फोन केला नाही, की नोकरी नसताना कसं मॅनेज करतोस? कुठे जेवतोस? घरातला ब्रेड, अंडी, ज्यूस, मिल्क, चहा पत्ती आणतोस ना वेळेवर? इनफॅक्ट त्यानं मिशेलकडे असताना मेसेज केला होता, त्या मेसेजला आपण साधी पोचसुद्धा दिली नाही. कमलाच्या लग्नात त्यानं पैसे पाठवले, त्यातून बा, बापू, कमला आणि विहान या प्रत्येकासाठी आपण गिफ्ट घेतलं खरं, पण आपण त्याबद्दल त्याला एका शब्दानं कळवलं मात्र नाही.

एक खरं, मीसुद्धा हळूहळू पण नक्की ‘भावेश’ ही फाईल कायमसाठी डिलीट करून डस्टबीनमध्ये ढकलली होती यात शंका नव्हती. 

विचार करता करता कधी तरी डोळा लागे. 

वसंत ऋतू झाडांना नवा साज चढवून हसवून सुखवून पसार झाला. मग पुन्हा पानगळीचे दिवस आले. सपाटून बर्फ पडायचा काळ सुरू झाला आणि पुन्हा ख्रिसमससुद्धा आला. या खेपी मी मिशेलच्या घरी गेले नि तिला प्रत्यक्ष भेटून ‘हॅपी ख्रिसमस’ विश केलं.

अमेरिकाभर निवडणुकीचे पडघम वाजत होते, त्याच्या जोडीला जगभर थैमान घालत पसरलेला कोरोना अमेरिकेलाही छळत होता. पण कसं असतं ना, जोपर्यंत साथीत कुठल्यातरी दूरच्या भागात.. दूरच्या काऊंटीत.. लोक मृत्युमुखी पडतायत तोपर्यंत मृत्यूची दाहकता व्यक्तीचं मन उद्‍ध्वस्त करत नाही.

रोज बातम्या येत होत्या, चीनमध्ये.. इटलीत अनेक माणसं दगावत आहेत. अमेरिकेतदेखील फैलाव व्हायला लागलाय. काळजी घ्या. फार वाईट आहे हा संसर्गजन्य रोग. रोज त्याच्या वाढत्या थैमानाच्या  बातम्या सांगितल्या जात होत्या. मला आई-बाबा आणि बा-बापूंची काळजी वाटे. 

ट्रम्प अंकल बिनधास्त प्रचाराच्या भाषणांना लोकांना बोलवत होते नि लोक गर्दी करून जात होते. काहीजण संसर्ग घेऊन परत घरी जात होते, परिस्थिती फारच बिकट होत चाललेली. इथं सरकारनं जरी लोकांना पैशाची मदत केली तरी कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

..आणि एक दिवस मिसेस मार्था आजारी असल्याचं त्यांनी ऑफिसला कळवलं. त्या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या होत्या. उत्तम हॉस्पिटल, सर्व सुविधा, योग्य औषधोपचार आणि तरी चार दिवसांत आली ती थेट त्या गेल्याची बातमी. हा जबर धक्का होता. त्या गेल्या नि त्या पाठोपाठ त्यांची नव्वदीला टेकलेली ओल्डएज होममध्ये राहणारी आईपण कोरोनामुळे गेली.

ते ऐकलं नि मी रडले. मला आई-बाबांची खूप काळजी वाटायला लागलेली. म्हातारी माणसं, उद्या ती दोघं कोरोनाच्या विळख्यात...? भीतीनं मला रात्र रात्र झोप लागेनाशी झाली.

त्या काळात मी इझलिनला घराजवळ असलेल्या कॅथलिक चर्चमध्ये जाऊ लागले. चर्चचं आवार खूप मोठं उंच उंच झाडांनी सजलेलं. चर्चच्या मुख्य दाराजवळ जरा आडोशाला एक पाळणा ठेवलेला दिसे. पाळणा छान रंगीबेरंगी स्ट्रीमर्सनी आणि फुग्यांनी सजवलेला होता आणि त्या पाळण्याला लांब दोरी होती, अगदी भारतात असते तशी दोरी! पाळण्यात एक छोटी बाहुली ठेवलेली असे, पाळणा इतका मोठा होता की त्या बाहुलीशेजारी खरंखुरं बाळ सहज पहुडावं.

चर्चमध्ये नियमितपणे मेणबत्यांचा शांत प्रकाश पसरलेला असे आणि ऑर्गनवर वाजवले जाणारे संगीताचे अतिशय कोमल सूर मनाला शांतीचा अनुभव देत. मी मग अनेकदा चर्चमध्ये गेले की डोळे मिटून नुसती बसून राही. या प्रत्येकवेळी फादर माझ्याजवळ येत डोक्यावरून हात फिरवत आणि म्हणत..‘‘गॉड इज देअर! ही इज काईंड..’’ आणि हसून डायसवर सरमन देण्यासाठी जात.

त्या वातावरणात मी मनापासून प्रार्थना करू लागले..‘‘वरच्या अपार शक्तित्रयात्मका.. माझ्या प्रिय माणसांना वाचव.. त्यांना सुरक्षित ठेव..!’’

एक दिवस अंधार पडत असताना चर्चमध्ये गेले. मन बेचैन झालेलं. ऑर्गनवर वाजवले जाणारे संगीताचे सूर मी डोळे मिटून मनात रुजवत बसलेली असताना माझ्या शेजारी कुणीतरी येऊन बसलेलं मला जाणवलं, पण मी डोळे उघडून कोण बसलंय ते पाहिलं नाही. नेहमीप्रमाणे फादर आले नि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अगदी नेहमीप्रमाणे त्यांनी म्हटलं.. ‘‘गॉड इज देअर!.. ही इज काईंड..’’ आणि ते नेहमीसारखेच सरमन देण्यासाठी डायसच्या दिशेनं निघून गेले. मी डोळे उघडून बघते तो मला माझ्या शेजारी भावेश बसलेला दिसला, तशी मी जवळ जवळ ओरडलेच.. ‘‘तूऽऽऽ!’’ 

डिलीट मारून टाकलेली अत्यंत त्रासदायक मजकुराची फाईल जर आपोआप रिस्टोअर झाली तर धक्का बसणारच ना! 

त्यानं नुसतं माझ्याकडे पाहिलं नि म्हणाला, ‘‘हो मीच! काही ऑबजेक्शन? चालेल ना इथं बसलो तर?’’ आजही त्याचा आवाज तसाच तिरसटल्यासारखा.

मी मुकाट्यानं त्याच्या शेजारून उठले नि सरळ बाहेर पडून घरी आले. माझा मूडच गेला होता. इतक्या दिवसांनी भेटूनसुद्धा बोलणं हे असं? 

असं होतं तरी माझ्या नजरेनं काय टिपलं होतं, तर किती वाळलाय हा? इथं कशाला आला असेल? नोकरीच्या शोधात? न्यू यॉर्कला लागली असेल का नोकरी आणि आता जर्सी सिटी भलती महाग झाल्यानं आला इथं राहायला? मनानं निर्वाळा दिला असंच असेल. त्याचं मनसुद्धा हळवं झालं असणार.. बा आणि बापूंच्या काळजीनं, म्हणून चर्च..!

मन अस्वस्थ झालं. असं मनाचं स्वास्थ्य हरवलं की मी वेगळं काही करू पाही. हल्ली मला नवाच चाळा लागला होता. अशावेळी सरळ यूट्युबवर जायचं नि गाणी ऐकत बसायचं.. सुफी संगीत किंवा एखादी गझल.. मनाला दिलासा देणारं काहीही. मी यूट्युब उघडलं, तिथं कुणीतरी गात होतं..

मातीके पुतलेऽऽ तुझे कितना घुमान हैऽऽ

तेरी औकात क्याऽऽ खोजले भैय्याऽऽ

तेरी औकात क्याऽऽऽ

तू कितनी बातोंसे अंजान हैऽऽऽ

मला फार उदास वाटायला लागलं, तसं मी ते बंद करून टाकलं. डोक्याखाली एक.. दोन पायात एक.. हाताखाली एक अशा उशा घेऊन मी झोपायचा प्रयत्न करू लागले. जसजसा प्रयत्न गहिरा करू लागले तसतसं मन म्हणायला लागलं.. कुत्रीला कुठलं खानदान? ती खरोखर पिल्लांना सोडून पळाली की तुमची नजर चुकवून बाहेर गेली नि कार खाली येऊन अचानक मेली.. तुला काय माहीत? कसं बोलत होतीस तू? जशी कंपल्सरी वांझपण भोगणारी बाई कुणा लेकुरवाळीचं मूल सांभाळताना करवदावी तसं..!

मिशेल तुला धन्यवाद, तू ओळखतेस मला! एव्हरी फाईट इज फॉर अनस्पोकन.. अनहील्ड डीप वूंड..!

मन घायाळ झालं, मग मनाला म्हटलं, ‘बा मना फार झालं, आता गप्प बैस! मलासुद्धा जगायचंय!’ तेव्हा कुठे शांत झोप लागली. 

सकाळी उठायला उशीर झाला, तरी आज वांधा नव्हता कारण आज रविवार होता. आवरून संडे स्कूलसाठी चर्चमध्ये गेले. फादर नेहमी म्हणत.. ‘येत जा, मदत होईल एशियन लोकांना..!’ आजही मी चर्चच्या मुख्य दारातल्या ठेवलेल्या पाळण्याकडे पाहिलं. तोच नेहमीसारखा सजवलेला मोठ्ठा पाळणा आणि त्यात तेच नेहमीचं बाव्हलं झोपलेलं. पण आज फादर हातात एक छोटं बाळ घेऊन पाळण्याजवळ उभे होते.

मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हातातल्या बाळाकडे पाहिलं. कोवळं, खूप छोटं जेमतेम दहा बारा दिवसांचं लेकरू होतं ते. बाळ अगदी हळू रडत होतं. बहुधा जोरात रडण्याएवढी ताकदसुद्धा नसावी त्याच्या त्या क्षीण झालेल्या चिमुकल्या देहात! मी खाली वाकून बाळाला टिचक्या वाजवून त्याच्याशी बोबडं बोलू लागले. वास्तविक हे अगदी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. या अशा आई-बापानं फेकून दिलेल्या बाळांबद्दल हल्ली मला फार राग यायला लागला होता, विशेषतः त्या कुत्रीच्या पिल्लाच्या प्रकरणानंतर!

मी बाळाच्या हातात माझ्याही नकळत बोट दिलं, तर त्यानं ते घट्ट धरलं आपल्या चिमुकल्या मुठीत! इतक्यात फादर बाळाकडे पाहत म्हणाले, ‘‘बेबी वॉज जस्ट सेव्ह्ड बाय ग्रेस ऑफ गॉड! हिज मदर डाईड ऑफ कोविड १९! फादरचा गळा भरून आल्यानं त्यांना पुढचं बोलवेना. तरीही फादर बोलले, ‘‘येस! वुई कॅन अरेंज नर्स.. फीड हिम इन टाईम.. नॅपी वूड बी चेंज्ड इन टाईम.. बट बेबी नीड्स लॉट्स ऑफ लव्ह टू सर्व्हाइव्ह....’’ 

बाळानं मुठीत धरून ठेवलेलं माझं बोट काही सोडलं नव्हतं. मी म्हणाले, ‘‘आय विल बी देअर फॉर हिम..’’ आणि मी त्यांच्या हातातून बाळ उचलून घेतलं. आता बाळानं माझं बोट सोडलं होतं नि स्वतःची बोटं तोंडात घालून ते ती मोठमोठे आवाज करत चोखत होतं.

माझ्यामागे आता अजून काही मंडळी जमा व्हायला लागली. प्रत्येकाला कुतूहल बाळ कसं दिसतंय ते बघण्याचं, पण बाळाला स्वतःचा चॉईस होता. इतकी माणसं त्याला मुळीच आवडली नव्हती. त्यानं लगेच रडायला सुरुवात केली, पुन्हा तसंच अगदी अशक्त..!

इतक्यात चर्चच्या मुख्य दारातून भावेश आत आला. त्यानं मी माझ्या छातीजवळ धरलेलं बाळ पाहिलं तशी तो अति रडवेल्या आवाजात म्हणाला, ‘‘एकदा नक्की ठरव तुला कशाला बाळ हवंय ते. कदाचित, बाय दी ग्रेस ऑफ गॉड, इन फ्युचर, तू तुझं स्वतःचं मूल जन्माला घालशील. मग जर लोकांना असं सांगणार असलीस, की हे बाळ लाडकं राहिलं नसलं म्हणून काय झालं? हे आता सांभाळायचं कारण ते ‘लकी चार्म’ आहे आमचं, तर हे बाळ तू आत्ताच परत कर... किंवा असंही घडेल, तू स्वतः जन्म दिलेल्या गोऱ्यापान बाळाला कौतुकानं पाहायला येणारे तुझे म्हणवणारे आप्तस्वकीय म्हणतील तुला.. ‘हा कशाला व्याप केलात? जरा थांबला असतात तर हे असलं काळंबेंद्र पोर नसतं गळ्यात पडलं!’ तर अशा लोकांना ‘हे बाळ माझंच आहे’ असं जर तू ठणकावून सांगू शकणार नसशील तर... तर तू हे बाळ आत्ताच फादरकडे देऊन टाक!!

बाळ ऐकत असतं सगळं, त्याला त्रास होतो. त्याला समजत असतं, ‘आपण अनवाँटेड आहोत या जगात!’ ते मग भांडत राहतं सगळ्यांशी छोट्या मोठ्या कारणांवरून. त्याला वाटत राहतं, कुणाला तरी खूप मारावं. कशाला जन्म झाला हा असा? बाळ मोठं झालं तरी हे संपत नाही, उलट वाढत जातं सगळंच..

त्याला प्रुव्ह करायचंय, ते चांगलं काम करू शकतं. मुके प्राणी त्याला त्याचे जवळचे वाटत राहतात..’’

भावेश काय काय बोलत सुटला! मी त्याच्याकडे पाहत राहिले, सहा फूट उंच, तगडा माझा नवरा एखाद्या लहान मुलासारखा फुटून फुटून रडत होता आणि बाळाकडे पाहून पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत होता. 

मी बाळाला माझ्या जवळच्या शालीत गुंडाळलं नि त्याला घेऊन आत अॅटिक रूमकडे चालायला लागले, तर सहा फूट उंच वाढलेला दणकट बांध्याच्या माझ्या नवऱ्यानं काकुळतीनं विचारलं, ‘‘परत करतेस त्याला?’’ त्याचा आवाज थरथरत होता. 

मी म्हटलं, ‘‘एवढंसुद्धा समजत नाही? बाळाला भूक लागलीय, त्याला दूध पाजायला हवंय. तिथं उघड्यावर कसं द्यायचं? नुसत्या मारामाऱ्या आणि आरडाओरडा याशिवाय पुरुषांना येतंच काय!’’ 

मी ॲटिक रूममध्ये जाऊन तिथल्या एका खुर्चीवर मांडी घालून बसले नि बाळाला त्याच्या डोक्याखाली हात घालून जवळ घेतलं. एवढ्यात नर्स आली नि माझ्या हातात दुधाची बाटली देऊन गेली. मी बाटलीतून बाळाला दूध पाजायला सुरुवात केली. मग त्याला उभं धरून त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याची ढेकर काढली. आता बाळ माझ्या खांद्यावर शांत झोपलं होतं.

नवरा बायकोच्या नात्यात री-ॲडजस्ट... री-स्टार्ट होण्याची शक्यता फक्त आऊटडेटेड फाईल डिलीट करायला जमल्या तरच! बाळाला खरं घराचं सुख मिळायचं, तर हे घडायला हवं. पण मग तीव्रतेनं वाटलं, लव्ह कॅन बी ब्लाईंड बट रिलेशनशिप कान्ट अफोर्ड टू बी ब्लाईंड!! 

मला काय जमेल सांगता येत नव्हतं. मी बाळाला खांद्यावर घेतलं नि चर्चबाहेर पडून चालायला लागले. जानेवारी सरत आला होता. खरंतर हे पावसाचे दिवस नव्हते. खूप थंडी असायला हवी होती पण नव्हती. अनपेक्षित पाऊसच पडायला लागला होता.

मागून हॉर्न वाजवत कुणी येत होतं म्हणून मी कडेला थांबले तर भावेश गाडी घेऊन येत होता. त्यानं जवळ आल्यावर दार उघडून धरलं. आता मला ठरवायचं होतं, त्याच्या गाडीत बसायचं की चालत राहायचं एकटीनं. 

पाऊस आपला पडतच होता...!

                                                                           (समाप्त)

संबंधित बातम्या