वसाहतवादी काव्य...

डॉ. धीरज कुलकर्णी
बुधवार, 6 मे 2020

ललित
 

'विजेची  वेल' हे  अनंत काणेकरांचे खूप जुने  पुस्तक आहे. त्यातला एक लेख चाळत असता माझ्यासमोर एक वाक्‌प्रचार आला, 'व्हाइट मॅन्स  बर्डन' (White man’s burden).  हे काय विशेष म्हणून मी सहज शोध घेतला,  तर वेगळीच माहिती हाताशी आली. ...तर  'व्हाइट मॅन्स  बर्डन' ही  रुडयार्ड किपलिंगने १८९९ मध्ये लिहिलेली कविता. हो, तोच आपला रुडयार्ड, 'द जंगल बुक' चा लेखक! फिलीपाईन्स बेटांवर ताबा मिळवण्यासाठी जे युद्ध अमेरिकेने केले, त्याला पाठिंबा  म्हणून ही कविता त्याने लिहिली होती, त्यांचे  मनोधैर्य उंचावण्यासाठी. पण खरे तर असे  म्हणतात,  की राणी व्हिक्टोरियाच्या राज्याचा हिरकमहोत्सव  साजरा करण्यासाठी म्हणून त्याने ही कविता लिहिली होती.  पण नंतर त्या कार्यक्रमासाठी त्याचीच रीसेशनल (Recessional)  ही कविता घेतली. 

अमेरिकन  आणि युरोपियन साम्राज्यवादाचे  अंग या कवितेला लाभलेले आहे. गोरे लोक हे संपूर्ण जगाचा, विशेष करून मागास जगाचा उद्धार करण्यासाठी जन्मले आहेत. जगभरात अशा लोकांचा उद्धार करणे, त्यांना औद्योगिक प्रगतीशी परिचित करणे, त्यांच्यापर्यंत सर्व सुखसुविधा  पोचवणे.  थोडक्यात त्यांचे अज्ञान सर्व प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हे काम किती कष्टप्रद आहे बरे. ओझेच एक प्रकारचे ते! हेच ते 'व्हाइट मॅन्स  बर्डन!' 

ही कविता सरळसरळ अमेरिकन वसाहतवादाला प्रोत्साहन देणारी आहे. राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव हा आपल्या क्षेत्राबाहेर वाढवणे हे  अमेरिकन वसाहतवाद किंवा साम्राज्यवादाचे खरे स्वरूप आहे. जसा राज्यकर्ता बदलेल तसा तो या धोरणांमध्ये सैनिकी किंवा धार्मिक गोष्टींची भरसुद्धा घालू शकतो. ही परंपरा तशी अनेक शतकांपूर्वीची आहे. फक्त काळानुसार त्यात बदल झालेले दिसतात. 

पहिले आणि दुसरे  महायुद्ध, खनिज तेलांच्या साठ्यासाठी झालेली मारामारी, कोरिया, व्हिएतनाम, इतकेच काय, अगदी आता पावेतो तालिबानशी झालेली टक्कर इथपर्यंत या वसाहतवादाचे धागेदोरे आहेत. किपलिंगच्या 'व्हाइट मॅन्स  बर्डन' या कवितेकडे दोन अंगांनी पाहता येते. रेनेसान्सच्या काळात जी सर्वांगीण प्रगती युरोपीय देशांची झाली, तिचा वापर करून, सर्व जगाचे  राज्य आपल्या कब्जात घ्यायचे. त्याचबरोबर युद्धात झालेली जीवितहानी, आर्थिक, सांस्कृतिक नुकसान यामुळे सद्सद्‌विवेकबुद्धीला लागलेली टोचणी घालवण्यासाठी या कवितेचा मुखवट्याप्रमाणे वापर करण्यात आला. 

युफेमिझम (Euphemism) म्हणून 'व्हाइट मॅन्स  बर्डन' हा वाक्प्रचार चांगल्या आणि उपहासगर्भ  अशा दोन्ही अर्थांनी  वापरण्यास सुरुवात झाली. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी गोऱ्या लोकांनी, विशेषतः अमेरिका व इंग्लंडमधील वसाहतवादाची थट्टा करण्यासाठी 'व्हाइट मॅन्स  बर्डन' रूढ झाला.  

धर्मप्रसार, संस्कृती प्रसार, आर्थिक लूटमार अनेक कारणांसाठीही आक्रमणे झाली. या आक्रमणांमध्ये पराभूतांचे अनेक अंगांनी नुकसान झाले. त्यांची एकजिनसी सांस्कृतिक जीवनशैली हरपली. आहार संस्कृतीचा नाश झाला. सुखसोयी मिळाल्याने लोक पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण करू लागले, त्यामुळे एतद्देशीय मूल्यतत्त्वे  भराभर विस्मृतीत गेली. जुन्या कोणत्याही परंपरांविषयीचे  दस्तऐवजीकरण  नसल्याने, शंभरेक वर्षांच्या कालावधीत एक संपूर्ण संस्कृती नष्ट झाली आणि उदयास  आला 'ग्लोबल सिटिझन' (Global Citizen) नावाचा कोणताही चेहरा नसलेला एक माणूस... आणि हे जगभर झाले. युद्धातून, विद्वेषातून, जुनी हस्तलिखिते  नष्ट करणे, इमारती नष्ट करणे या प्रकारांमुळे जसे सांस्कृतिक धक्के बसत गेले, तसेच अत्याधुनिक सुखसोयी आयत्या मिळाल्याने, पराभूतांना दुसऱ्या अंगाने धन्यही वाटू लागले. म्हणजे एका बाजूने, साहेब आला, टोपीकर आला, धर्म बुडाला, लोक चहा पिऊ लागले, पाव-बिस्किटे  खाऊ लागले, बायका जोडे घालून छत्र्या घेऊन रस्त्यावर फिरू लागल्या. असे म्हणून ओरडणारे लोक, दुसऱ्या बाजूने प्रत्यक्ष देवानेच साहेबाला धाडला, आता काय, पोस्ट आहे, रेल्वे आहे, पोलिस आहे, अशी धन्यताही मानू लागले. या सर्व सोयी साहेबाने इथल्या लोकांच्या सुखासाठी नाही,  तर त्याच्या सोयीसाठी केल्या होत्या हे आपण विसरलो. 

'व्हाइट मॅन्स  बर्डन' या कवितेबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष थिएडोर रुझवेल्ट आपल्या एका मित्राला म्हणाले, 'कविता म्हणून ही अगदीच सामान्य आहे, त्यातला केवळ साम्राज्यवादाचा विचार उपयुक्त वाटतो.' अर्थातच या कवितेची टरसुद्धा भरपूर उडवली गेली. 

अमेरिकन आणि इंग्रज साम्राज्यवादाला विरोध असणारे कवी आणि लेखक यांच्या हाती या कवितेमुळे चांगलेच हत्यार मिळाले. असा पहिला विरोध करणारा भिडू होता, अमेरिकेचाच सिद्धहस्त लेखक मार्क ट्वेन. म्हणजे हा अमेरिकेला घरचाच आहेर झाला म्हणायचा!  तर त्याने एक निबंध लिहिला. 'To the person sitting in the darkness.’ बायबलमधल्या एका वचनाचा संदर्भ घेऊन त्याने  हे नाव दिले होते. ज्ञानप्राप्ती झालेले (Enlightened) हे काळोखात बसलेल्यांना  प्रकाश दाखवीत आहेत, असा निबंधाचा उपहासात्मक अर्थ. मार्क ट्वेन हा वसाहतवादाचा कट्टर विरोधक होता आणि हा निबंध त्याच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक समजला जातो. ट्वेनने कोणतीही दयामाया न दाखवता वसाहतवादावर घणाघाती हल्ला चढवला आहे. 

याच स्पॅनिश-अमेरिका युद्धाने, अमेरिकन वसाहतवादविरोधी संघटनेला जन्म दिला. मार्क ट्वेन या संघटनेचा सभासद होता. पण ही संघटना काही फार काळ चालली नाही. १९२० मध्ये  ती बंद पडली. असे असले तरी वसाहतवादाला विरोध करणाऱ्यांची लेखणी थंडावली नाही असेच इतिहासात दिसून येते. 

 या वादाची भलामण करणाऱ्यांचे म्हणणे होते,  की ही रानटी माणसे स्वतःला नीट सांभाळू शकत नाहीत,  तर देश काय सांभाळणार? म्हणजे कसे  बघा, कोहिनूर हिरा हा भारतात काही नीट राहणार नाही, या लोकांना तो सांभाळताच येणार नाही, तेव्हा हा राणीच्या ताब्यात असलेलाच बरा. पण हुशार लोकहो, ज्या लोकांना ताजमहाल बांधता येतो, हिरा शोधून त्याला पैलू पाडता येतात, त्यांना हिरा सांभाळणे जड असेल का? पण अशा अवघड प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि सामान्यांची दिशाभूल हा साम्राज्यवादाचा पाया आहे. 

किपलिंगच्या या  'जिंगोइझम'ला (Jingoism) प्रत्युत्तर म्हणून ब्रिटिश राजकारणी हेन्री लेबशेर याने 'The brown man’s burden', धर्मोपदेशक एच.  टी.  जॉनसन  याने 'The black man’s burden' आणि अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ  जे. डॅलास बाऊसरने (J. Dallas Bowser) 'Take up black man’s burden' या कविता लिहिल्या. 

चळवळ म्हणून जरी वसाहतवाद विरोधी सूर  कधी एकत्र राहू शकला नाही, तरी  त्यानंतरही कलावंत आपापल्या कलेच्या माध्यमातून आवाज उठवत राहिले. अजूनही इंटरनेटवर पहिल्या जगातील राष्ट्रांनी सुधारणेच्या विकासाच्या नावाखाली आदिम  लोकांवर केलेल्या अत्याचाराच्या  खुणा  दिसत राहतात, मन विषण्ण होते. त्याचवेळी मनात असाही विचार येतो, की का बरे लिहिली असेल किपलिंगने इतकी दुय्यम दर्जाची कविता? 'द जंगल बुक' सारखी सर्वकालीन सर्वश्रेष्ठ साहित्यकृती  निर्माण करणारा महान लेखक, 'गंगादीन’सारखी अप्रतिम मानवतावादी कविता लिहिणारा कवी, पण पुढील काही वर्षांतच अगदी त्या कृतींच्या उलट आशयाचे कसे लिहील? 

भारतावर, इथल्या लोकांवर त्याचे  निरतिशय प्रेम होते. सन्मानाच्या एखाद्या तुकड्यासाठी लाचार होऊन, किपलिंगसारखा लेखक आपली प्रतिभा वसाहतवादाच्या बाजूने लावेल? तेसुध्दा 'व्हाइट मॅन्स  बर्डन' सारखी सामान्य साहित्यकृती निर्माण करायला? मला तरी हा सगळाच प्रकार अनाकलनीय, अचंबित करणारा वाटतो. सारखे  वाटत राहते,  की किपलिंगने ही कविता निश्चित उपहास आणि उपरोध व्यक्त करण्यासाठी लिहिली असणार. पण तसा प्रतिवाद त्याने कधीही केला नाही. या कवितेसाठी तो आजन्म चेष्टेचा, टीकेचा  धनी होऊन राहिला. विरोधासाठी का होईना, साहित्य विश्वाला तो हा वाक्प्रचार बहाल करून गेला. तरीही  किपलिंग, तू श्रेष्ठ लेखक होतास यात वाद नाही! 

संबंधित बातम्या