फलंदाजीचा लख्ख सूर्यप्रकाश

सुनंदन लेले
सोमवार, 15 मार्च 2021

वेध 

महान क्रिकेटर सर विव्हियन रिचर्ड्‌स सुनील गावसकरांचे कौतुक करताना नेहमी म्हणतात, ‘क्रिकेटमध्ये एकच लख्ख सूर्यप्रकाश आहे तो म्हणजे सुनील गावसकर...आमचा लाडका सनी.’ रिचर्ड्‌स यांचे म्हणणे किती योग्य आहे हे सुनील गावसकरांना भेटल्यावर प्रत्येकवेळी जाणवते.

सहा आणि सात मार्चचे दिवस भारतीय क्रिकेटने फार वेगळ्या अर्थाने आनंदात साजरे केले. सहा तारखेला भारतीय संघ नव्या भव्य मैदानावर इंग्लंडला हरवून वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अव्वल क्रमांकाने दाखल होत असताना लिटील् मास्टर सुनील गावसकरांच्या कसोटी पदार्पणचा सुवर्णमहोत्सव साजरा होत होता. बीसीसीआयने औचित्य साधत ह्या प्रसंगी गावसकरांना खास टोपी भेट देऊन त्यांची सन्मान केला. सर विव्हियन रिर्चड्‌स यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळ्यांनी गावसकरांची स्तुती करत आपले प्रेम व्यक्त केले. नेहमी आनंदात, परंतु शांत असणारे गावसकर जगभरातून व्यक्त होणाऱ्या प्रेमाने भारावून गेले होते. ‘‘सुनंदन, माझ्या आई-वडिलांनी, पत्नीने, कुटुंबाने, बीसीसीआयने, माझ्या संघातील सर्व सहकाऱ्यांनी, माझ्या विरुद्ध खेळलेल्या खेळाडूंनी, आजी माजी खेळाडूंनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तमाम चाहत्यांनी वर्षानुवर्षं दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. नम्रपणे सांगतो की त्यांच्या प्रेम आणि शुभेच्छांमुळेच मी आज इथे आहे. त्यांचं हे ऋण इतकं मोलाचं आहे, की त्यातून मला कधीच मुक्त व्हायचं नाहीये,’’ नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भेटल्यावर सुनील गावसकर क्षणभर भावुक होत म्हणाले. 

साठ ते सत्तरच्या दशकात कॉलेज क्रिकेटला महत्त्व होते. युनिव्हर्सिटी क्रिकेट स्पर्धेत मोठ्या धावांच्या खेळीची माळ लावल्यावर सुनील गावसकरांना १९६८-६९च्या रणजी मोसमाकरता निवडले गेले. कर्नाटक समोरच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर, ‘मामां’नी घुसवलेला ‘भाचा’, अशी कडवट टीका सुनील गावसकरांवर झाली; कारण त्यावेळी त्यांचे मामा माधव मंत्री मुंबई रणजी निवड समितीत होते. पण दुसऱ्याच सामन्यात राजस्थान विरुद्ध शतक केल्यावर टीकाकार जरा गप्प बसले. त्याच मोसमात अजून दोन चांगली शतके ठोकल्यावर राष्ट्रीय निवड समितीने गुणवत्ता हेरून सुनील गावसकरांना वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात दाखल करून घेतले.

त्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या अनेक कथा आहेत. त्यातील एक दंतकथा मजेदार आहे. झाले असे की वेस्ट इंडिजमध्ये उतरल्यावर बाकीचे भारतीय खेळाडू इमिग्रेशनचा सोपस्कार पूर्ण करून पुढे गेले आणि नेमके सुनील गावसकरांना काही कारणाने थोडा वेळ लागला. जेव्हा ते इमिग्रेशन काउंटरला पोहोचले तेव्हा तिथल्या ताडमाड उंच आणि क्रिकेटवेड्या ऑफिसरने त्यांना विचारले की तुम्ही संघाचे मॅनेजर आहात का? गावसकरांनी नकारार्थी उत्तर दिले. मग त्याने विचारले की मग कोण आहात... तर गावसकरांनी खेळाडू असल्याचे सांगितल्यावर त्या ऑफिसरने खास कॅरेबियन शैलीत ‘स्टंपाच्या उंचीचा आहेस तू म्हणजे विकेट कीपर असणार’, असे म्हणले. गावसकरांनी परत नकारार्थी उत्तर दिल्यावर ऑफिसर म्हणाला म्हणजे तू फिरकी गोलंदाज असणार दुसरे काय...परत गावसकरांनी नाही नाही म्हणत मान हलवली आणि आपण सलामीचे फलंदाज असल्याचे सांगितल्यावर तो ऑफिसर काउंटर सोडून म्हणे पुढे आला आणि ‘बापरे! कल्पना आहे का तुला आमच्या संघातील वेगवान गोलंदाजांची... काळजी घे मित्रा,’ असे म्हणत त्या ऑफिसरने गावसकरांना धोक्याची सूचना दिली. त्या मालिकेत गावसकरांनी नुसते पदार्पण केले नाही तर तब्बल ७७४ धावा करून क्रिकेटविश्व दणाणून सोडले. त्या दंतकथेचा शेवट असा आहे की, दौरा संपवून भारतीय संघ परत जायच्या विमानात बसायला विमानतळावर आला तेव्हा ड्यूटी नसूनही तो ऑफिसर म्हणे गावसकरांना भेटून माफी मागू लागला आणि त्याने तोंडभरून स्तुती केलीच वर शुभेच्छाही दिल्या.

त्या दौऱ्यानंतर सुनील गावसकर भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनले. आपल्या कारकिर्दीत सुनील गावसकर शंभर झेल पकडणारे पहिले भारतीय खेळाडू बनले. सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम त्यांनी पार केला. दहा हजार धावांचा पल्ला गाठणारे ते पहिले फलंदाज ठरले. ज्या वेस्ट इंडियन गोलंदाजांसमोर जगातील तमाम फलंदाजांची त्रेधा उडायची तिथे गावसकरांनी वेस्ट इंडिज समोर तब्बल २७४९ धावा काढल्या आणि यात तेरा शतके आहेत. सर्वात कमाल गोष्ट म्हणजे या सर्व धावा सुनील गावसकरांनी हेल्मेट न घालता केल्या आहेत. भारतीय संघाने १९८३मध्ये पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न साकारले तेव्हा गावसकर संघाचा मुख्य भाग होते आणि १९८५ साली ऑस्ट्रेलियात जागतिक स्पर्धा जिंकताना कप्तान होते.

सुनील गावसकरांनी ३४ शतके आणि दहा हजार धावांचा टप्पा पार केला असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ते वर्ष होते १९८७. त्याच वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही रामराम ठोकला. ‘का निवृत्त झालात असे लोक विचारतात तो पर्यंत रामराम ठोकण्यात अर्थ असतो. तो का नाही निवृत्त होत, असे विचारू लागतात तेव्हा नसतो,’ गावसकरांनी उत्तम खेळत असताना निवृत्ती जाहीर केल्यावर सांगितले होते.

सुनील गावसकरांची शैलीदार फलंदाजी पाहणे हा तर एक अपूर्व सोहळा असायचाच; पण त्यांना फलंदाजीकरता मैदानात उतरताना पाहणे हा देखील एक सोहळाच असायचा इतकी त्यांची चाल रुबाबदार असायची.

क्रिकेट खेळणे थांबवल्यावरही खेळाशी नाते घट्ट जोडून ठेवण्यात गावसकर यशस्वी झाले आहेत. १९८८पासून ते आजपर्यंत त्यांनी नुसती कॉमेंटरी केली नाहीये तर विविध जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. आयसीसीच्या मुख्य क्रिकेट समितीचे ते अध्यक्ष होते. आयपीएल चालू होत असताना पहिल्या गव्हर्निंग कौन्सिलचे ते सदस्य होते. जे माजी खेळाडू आर्थिक अडचणीत आहेत त्यांना महिन्याला किमान रक्कम कोणाकडे हात न पसरता मिळावी म्हणून गावसकरांनी फाउंडेशन चालवले आहे.

सुनील गावसकरांच्या निवृत्तीनंतर भारतीय फलंदाजीला कोण सावरणार असा प्रश्न उपस्थित होत असताना मुंबईच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा उदय होत होता ही भारतीय क्रिकेटकरता मोठी नशिबाची गोष्ट होती. एकदा मुंबई क्रिकेट संघटनेचे उदयोन्मुख खेळाडूला दिले जाणारे बक्षीस सचिनला दिले गेले नाही. सुनील गावसकरांनी सचिनला, ‘नाउमेद होऊ नकोस कारण अजून एका खेळाडूला असेच ते बक्षीस नाकारले गेले होते आणि त्याने क्रिकेट कारकिर्दीत खराब कामगिरी केली नाही,’ असे पत्राद्वारे सांगून वर सचिनला स्वत:चे खास मॉरंट कंपनीचे पॅड्‌स् भेट म्हणून दिले. सचिन म्हणतो, ‘त्यांचे ते पत्र माझ्याकरता मोठी प्रेरणा होती आणि ते पॅड्‌स् म्हणजे सुनील गावसकरांनी दिलेला आशीर्वाद होता.’ जेव्हा सचिनने सुनील गावसकरांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मोडला आणि तो बाहेर येत होता तेव्हा बांगलादेश मधील ढाका शहरातील शेर-ए-बांगला मैदानावर सीमारेषेवर सुनील गावसकरांनी स्वत: जाऊन सचिनला कौतुकाची शाब्बासकी दिली होती, तो प्रसंग मला आठवतो. ‘मला शंभर आंतरराष्ट्रीय शतकांची भेट तुझ्याकडून हवी आहे,’ असे त्यांनी त्यावेळी सचिनला सांगितले. शंभर आंतरराष्ट्रीय शतके करायची क्षमता सचिनमध्ये आहे हे स्वत: त्याला माहीत नव्हते, पण सुनील गावसकरांना ते स्पष्ट दिसत होते. कर्मधर्म संयोगाने सचिनचे शंभरावे आंतरराष्ट्रीय शतक बांगलादेशमध्येच झाले आणि पुन्हा एकदा सचिनची पाठ थोपटायला सुनील गावसकरच होते.

आजही जेव्हा जेव्हा सुनील गावसकरांना भेटायचा योग येतो तेव्हा खूप आनंद होतो. कॉमेंटरी करतानाही त्यांचे भारतीय क्रिकेटबद्दल असलेले प्रेम आणि देशाबद्दलचा जाज्वल्य अभिमान बोलण्यातून आणि मांडलेल्या विचारातून झळकतो. सर्वात आनंद तेव्हा होतो जेव्हा वेस्ट इंडिजचे नुसतेच माजी खेळाडू नाहीत तर सामान्य जनताही सुनील गावसकरांना मानताना त्यांच्यावर निर्व्याज प्रेम करताना दिसते. क्रिकेटनंतर बॅडमिंटन खेळावर त्यांचे मनापासून प्रेम होते. म्हणूनच कदाचित क्रिकेट खेळणे थांबवल्यावर तंदुरुस्ती टिकावी म्हणून सुनील गावसकर बराच काळ मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायचे. त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांच्या यादीत गुंडाप्पा विश्वनाथ बरोबर प्रकाश पदुकोण यांचेही नाव आहे, याचे हेच कारण असेल. त्या बॅडमिंटन ग्रुपमधील काही सहकारी कायमचेच सोडून गेले म्हणून गेली काही वर्षे त्यांनी बॅडमिंटन खेळणे थांबवले. आता फिटनेस राखायला योग्य आहारावर ते लक्ष देतात, तसेच नियमाने व्यायाम करतात. मराठी गाणी ही सुनील गावसकरांच्या आवडीचा विषय. ‘दहा आवडत्या मराठी गाण्यांची प्ले लिस्ट बनवून मग कानाला हेडफोन लावून ट्रेड मिलवर मी चालू लागतो तेव्हा व्यायाम कसा होऊन जातो समजत नाही,’ गावसकर हसत हसत म्हणतात.

महान क्रिकेटर माजी फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्‌्स सुनील गावसकरांचे कौतुक करताना नेहमी म्हणतात, ‘क्रिकेटमधे एकच लख्ख सूर्यप्रकाश आहे तो म्हणजे सुनील गावसकर...आमचा लाडका सनी.’ सर रिचर्ड्‌स यांचे म्हणणे किती योग्य आहे हे सुनील गावसकरांना भेटल्यावर प्रत्येक वेळी जाणवते.

संबंधित बातम्या