सेलिब्रिटींची पसंती

इरावती बारसोडे / ज्योती बागल
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
 

सध्या विविध क्षेत्रांत, समारंभांत नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. या ट्रेंड्समधून लग्न सोहळ्यासारखा समारंभ तरी कसा सुटेल. या समारंभाला चार चाँद लागतायेत ते प्री-वेडिंग फोटोशूट आणि डेस्टिनेशन वेडिंगमुळे. सेलिब्रिटींची तर यात चढाओढ पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूड, हॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डेस्टिनेशन वेडिंगची गोष्ट... कोणी? कुठे? आणि कशी बांधली लगीनगाठ!   

प्रियांका चोप्रा - निक जोनास 
बॉलिवूड आणि आता हॉलिवूडची लाडकी अभिनेत्री ‘पीसी’ अर्थात प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक, संगीतकार निक जोनास याच्याशी मागील वर्षी लग्न केले. प्रियांका आणि निकने जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये १ व २ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. दोघांचे कुटुंब आणि परंपरेचा आदर राखण्यासाठी त्यांनी हिंदू आणि ख्रिश्‍चन अशा दोन्ही पद्धतींनी विवाह केला. 
हिंदू पद्धतीच्या लग्नामध्ये साहजिकच भरगच्च कार्यक्रम होता. संगीत, मेंदी अशा विविध पारंपरिक कार्यक्रमांची निकच्या कुटुंबानेही मजा लुटली. प्रियांकाच्या बहिणींनी (यामध्ये अभिनेत्री परिणिती चोप्राही होती) निकचे ‘जुते’ पळवले होते आणि त्या बदल्यात त्यांना डायमंड इयररिंग्ज मिळाल्या. ख्रिश्‍चन पद्धतीच्या लग्नासाठी दोघांनीही राल्फ लोरेन बँडचे कपडे परिधान केले होते. निकचे तीनही भाऊ ग्रुम्समेन म्हणून उपस्थित होते आणि त्याच्या वडिलांनीच त्यांचे लग्न लावले. लग्नासाठी तब्बल १८ फुटांचा वेडिंग केक तयार करण्यात आला होता. निक आणि प्रियांकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली ओळख झाली, तर त्यांची पहिली भेट ऑस्कर पुरस्कारांच्या पार्टीमध्ये झाली. २०१७ मध्ये ‘मेट गाला’ला त्यांनी एकत्र हजेरी लावली, पण मे २०१८ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. प्रियांकाच्या ३६ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर निकने प्रपोज केले आणि प्रियांका लगेचच हो म्हणाली. 

दीपिका पदुकोण - रणवीर सिंग 
 दीपिका आणि रणवीर हे दोघेही सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. दीपिकाने तर काही हॉलिवूड चित्रपटदेखील केले आहेत. दीपिका-रणवीर या जोडीने बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला अशा हिट चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांची पहिली भेट झाल्याचे बोलले जाते. हॉट अॅंड ब्युटीफुल जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'दीप-वीर' यांनी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी डेस्टिनेशन वेडिंग केले. त्यांनी लग्नासाठी जगातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण निवडले, ते म्हणजे इटलीतील 'लेक कोमो'. या परिसरातील 'व्हिला डेल बाल्बिएनो' या आलिशान व्हिलामध्ये त्यांचे लग्न झाले. एखाद्या ग्रॅंड इव्हेंटप्रमाणेच हा सोहळा होता. दीपिकाच्या आवडत्या लिलीच्या फुलांनी लग्न मंडपाची सजावट केली होती. हा विवाह सोहळा पारंपरिक कोकणी व सिंधी पद्धतीत मोठ्या थाटामाटात झाला. या विवाह सोहळ्यात वधू-वरासह त्यांचे डिझायनर ड्रेसेस, त्यांचा मेकअप आणि लग्नाचे ठिकाण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. दीपिकाने लाल रंगाची साडी नेसली होती, तर रणवीरने ऑफव्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. लेक कोमो हा अतिशय नयनरम्य़ परिसर असून डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. या लग्नसोहळ्याबद्दल कमालीची गुप्तता राखल्याने चित्रपट सृष्टीतील कलाकारही या लग्नात दिसले नाहीत.

डेव्हिड - व्हिक्टोरिया बेकहॅम 
माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया (तेव्हाची ॲडम्स) यांच्या लग्नाला दोन दशकांचा काळ लोटला आहे, परंतु त्या काळातही या जोडीने डेस्टिनेशन वेडिंग केले होते. २० वर्षांपूर्वी त्यांनी लग्नासाठी तब्बल पाच लाख युरोंच्या आसपास खर्च केला होता. त्यामुळे अर्थातच लग्न सोहळाही शानदार होता. डेव्हिड आणि व्हिक्टोरियाने ४ जुलै १९९९ रोजी लग्नगाठ बांधली. आयर्लंडमधील ल्युट्रेलस्टाऊन कॅसल येथे थाटामाटात लग्न पार पडले. ल्युट्रेलस्टाऊन कॅसल आयर्लंडची राजधानी डब्लिनच्या बाहेर क्लोनसिला येथे आहे. सुमारे ५६० एकरांवर हा किल्ला पसरलेला आहे. राणी व्हिक्टोरिया इथे राहिली होती. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व तर होतेच, पण डेव्हिड आणि व्हिक्टोरियाच्या लग्नानंतर किल्ला आणखी प्रकाशझोतात आला. लग्नाला डेव्हिडचा संपूर्ण फुटबॉल संघ, व्हिक्टोरियाच्या ‘स्पाइस गर्ल्स’ या म्युझिक ग्रुपमधील मैत्रिणी उपस्थित होत्याच. पण, लग्नाला इतर नेमके कोण कोण सेलिब्रिटीज उपस्थित होते, याची यादी कधीच जाहीर झाली नाही. आता सेलिब्रिटीज इन्स्टाग्राम, ट्विटरवर फोटो टाकून स्वतःच्या लग्नाबद्दल घोषणा करतात. पण २० वर्षांपूर्वी हा प्रकार अस्तित्वातच नसल्यामुळे या दोघांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा सोशल मीडिया असता, तर हे सेलिब्रिटी कपल #davidvictoria या हॅशटॅगने किंवा आणखी काही नावाने अनेक दिवस ट्रेंडिंग राहिले असते हे नक्की! 

अनुष्का शर्मा - विराट कोहली
 डेस्टिनेशन वेडिंग करणारी बॉलिवूडमधील आणखी एक क्युट जोडी म्हणजे विराट-अनुष्क़ा. विराट कोहली उत्कृष्ट फलंदाज असून सध्या तो भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आहे, तर अनुष्का बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. एका जाहिरातीनिमित्त एकत्र आलेले विराट-अनुष्का नंतर मात्र एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी प्रेमाने 'विरुष्का' हे नवीन नाव दिले. या जोडीनेदेखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी इटलीलाच पसंती दिली. इटलीतील 'टस्कनी' येथील 'बोर्गो फिनोचेटीओ' या आलिशान रिसॉर्टमध्ये ११ डिसेंबर २०१७ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनुष्काने फिकट गुलाबी रंगाचा भरजरी घागरा घातला होता, तर विराटने त्याच रंगाची शेरवानी घातली होती. आकर्षक फुलांच्या सुंदर सजावटीने लग्न मंडप सजला होता.

किट हॅरिंग्टन - रोझ लेझली 
किट हॅरिंग्टन आणि रोझ लेझली हे अतिप्रसिद्ध ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेमधील सहकलाकार. यांच्या प्रेमकथेची सुरुवात या मालिकेपासूनच झाली. छोट्या पडद्यावर त्यांनी जॉन स्नो आणि यिग्रिट या व्यक्तिरेखा केल्या. जॉन स्नो आणि यिग्रिट मालिकेमध्ये जसे प्रेमात पडले, तसेच खऱ्या आयुष्यात किट आणि रोझही प्रेमात पडले. २०१२ मध्ये या मालिकेच्या निमित्ताने ते पहिल्यांदा भेटले. त्यानंतरच्या काळात स्कॉटलंडमध्ये या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले गेले. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी लग्न करणार असल्याचे जाहीर केले. स्कॉटलंडमधील ॲबरडीनशायर येथील एका चर्चमध्ये २३ जून २०१८ रोजी लग्न पार पडले. लग्नानंतर जवळच असलेल्या वॉर्डहिल कॅसलमध्ये रिसेप्शन होते. चर्चमधून बाहेर पडल्यानंतर दोघांवरही फुलांच्या कन्फेटीचा (समारंभ प्रसंगी रंगीत कागद किंवा फुलांचा वर्षाव केला जातो, त्याला कन्फेटी म्हणतात) वर्षाव करण्यात आला. हे लग्न म्हणजे गेम ऑफ थ्रोन्सच्या कलाकारांचे रियुनियनच ठरले, कारण पीटर डिंक्लेज, एमिलिया क्लार्क, मेसी विल्यम्स, सोफी टर्नर यांच्यासह सगळ्यांनीच लग्नाला हजेरी लावली होती.

जॉर्ज - अमल क्लूनी 
जॉर्ज आणि अमल क्लूनी हे हॉलिवूडमधील नावाजलेले जोडपे आहे. जॉर्ज क्लूनी हॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आहे. तर, अमल (तेव्हाची अलामुद्दीन) मानव अधिकार वकील आहे. या दोघांची पहिली भेट २०१३ मध्ये झाली आणि वर्षभरात त्यांनी लग्नही केले. जॉर्ज आणि अमल यांनी २९ सप्टेंबर २०१४ रोजी इटलीमधील व्हेनिस येथे लग्नगाठ बांधली. ‘ग्रँड’ म्हणता येईल, असेच हे डेस्टिनेशन वेडिंग होते. लग्नानिमित्त चार-पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमान कॅनल ग्रँड हॉटेल येथे सुमारे १०० नातेवाईक आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. लिली, छोटे गुलाब, पांढरी फुले आणि चमचमणाऱ्या मेणबत्त्यांनी विवाहस्थळ सजविण्यात आले होते. जॉर्ज क्लूनीने अरमानी या प्रसिद्ध बँडचे टक्स घातले होते आणि अमलने ऑस्कर द ला रेंटाचा खूपच सुंदर व्हाईट वेडिंग ड्रेस परिधान केला होता. ‘पीपल’ नियतकालिकाने ऑक्टोबरच्या अंकाच्या कव्हरवर त्यांच्या लग्नातील खास फोटो छापले होते. या दोघांनी २०१७ मध्ये एला आणि अलेक्झांडर या जुळ्या मुलांना जन्म दिला. 

प्रार्थना बेहरे - अभिषेक जावकर
प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर या जोडीने दोन वर्षांपूर्वी डेस्टिनेशन वेडिंग केले. पण त्यांनी कोणत्याही परदेशी ठिकाणाला पसंती न देता गोव्यात समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या एका आलिशान हॉटेलमध्ये अगदी मराठमोळ्या पद्धतीने १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न केले. प्रार्थना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे, तर अभिषेक निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. विशेष बाब म्हणजे यांचे लग्न अरेंज मॅरेज असून एका मॅरेज ब्यूरोच्या माध्यमातून त्यांची ओळख झाल्याचे बोलले जाते. लग्नात प्रार्थनाने पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यावर आकाशी रंगाची जरीच्या बुट्ट्या असलेला शेला घेतला होता, तर अभिषेकने ऑफ व्हाईट रंगाचा धोती कुर्ता घातला होता. मेंदी, संगीत, हळद आणि लग्न असा एकूणच तीन दिवसांचा कार्यक्रम होता. मनोरंजन विश्वातील ज़्यांच्या ज्यांच्या बरोबर प्रार्थनाने काम केले आहे अशा अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

नुसरत जहाँ - निखिल जैन
नुसरत जहाँ प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार आहे, तर निखिल जैन हा व्यवसायाने उद्योगपती आहेत. लग्नानंतर नुसरतला सोशल मीडियावर सुंदर खासदार असा किताब मिळाला आहे. नुसरत आणि निखिल यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका दुर्गापूजेच्या उत्सवात झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि यांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. या जोडीनेदेखील हटके पद्धतीने लग्न करण्याचे ठरवत डेस्टिनेशन वेडिंगसाठी थेट टर्की गाठले. काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खासगी विवाहसोहळा पार पडला. हिंदू आणि वेस्टर्न अशा दोन्ही पद्धतींनी हे लग्न झाले. यावेळी नुसरतने लाल रंगाची लेहंगा चोळी घातली होती, तर निखिलने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.
 

संबंधित बातम्या