वऱ्हाड निघालं...

इरावती बारसोडे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
 

स्वतःच्या घरापासून-गावापासून लांब जाऊन लग्न करायचे म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग! याचा ट्रेंड इतका वाढतो आहे, की विवाहेच्छु मंडळी नुसती दुसऱ्या गावात नाही, तर राज्याबाहेर आणि जमलेच तर परदेशात जाऊनही लग्न करीत आहेत. 

महाराष्ट्रातील डेस्टिनेशन्स

कोकण : महाराष्ट्राच्या कोकणकिनाऱ्यांचे सौंदर्य वेगळे काय सांगावे. पुण्यामुंबईहून कोकणात जाणे सोपे असल्याने या ठिकाणाला डेस्टिनेशन वेडिंगसाठी खास पसंती आहे. अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगर अशा अनेक ठिकाणी लग्न केली जातात. आता या भागात अनेक हॉटेल्स झाल्यामुळे लग्नकार्य निर्विघ्न पार पडते. शिवाय अनेक नयनरम्य समुद्रकिनारे असल्यामुळे ‘बीच वेडिंग’ही करता येते. कोकणात पाऊस भरपूर पडत असल्याने जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने टाळावेत. तर, उन्हाळ्यात हवा अतिशय आर्द्र असते त्यामुळे लग्नसराईची मजा येत नाही. थोडक्यात काय, तर कोकणात डेस्टिनेशन वेडिंग करायचे असेल तर थंडीच्या सीझनमध्येच करावे. 

नाशिक : वाईनयार्डमध्ये लॅव्हिश लग्न करायचे असेल, तर त्यासाठी ग्रीस किंवा आणखी कुठल्या परदेशात जायची गरज नाही. आपल्या नाशिकमध्ये वायनरी आहेत की! वायनरीच्या जवळच रिसॉर्ट, वायनरीच्या मधोमध स्टेज, हजारो पाहुणे मावतील एवढी मोकळी जागा... अशा मस्त वातावरणात लग्न करायचे असेल, तर नाशिकच गाठायला हवे! शक्यतो पावसाळ्याचे महिने टाळून लग्नाचे नियोजन करावे.

महाबळेश्‍वर, पाचगणी : महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर, पाचगणीदेखील वेडिंग डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे. सहज पोचता येण्यासारख्या या दोन्ही ठिकाणी अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये लग्न करण्यासाठी यासारखा उत्तम पर्याय नाही.

भारतातील डेस्टिनेशन्स
राजस्थान : डेस्टिनेशन वेडिंगसाठी पारंपरिक आणि ‘रॉयल’ राजस्थानला सर्वाधिक पसंती मिळते आहे, ती तिथल्या राजवाडे आणि हवेल्यांमुळे. उदयपूर, जोधपूर, जयपूर, पुष्कर, जैसलमेर यांसारख्या शहरांमध्ये अनेक राजवाडे, हवेल्या आणि रॉयल हॉटेल्स आहेत. त्यामुळेच रॉयल थीम वेडिंग करण्यासाठी राजस्थानसारखा उत्तम पर्याय नाही. प्री-वेडिंग फोटोशूटसाठीही कित्येक सुंदर वास्तू इथे आहेत. राजा-राणीसारखे लग्न करायचे असेल, तर राजस्थानलाच करायला हवे!

केरळ : दक्षिणेकडे केरळमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात पाण्याकाठी खूप सुंदर लग्न सोहळा होऊ शकतो. केरळ अजून जरा वेडिंग डेस्टिनेशन म्हणून नवीन आहे. परंतु, मांडवापाठीमागे नारळ, सुपारीची झाडे आणि शांत, निळे-हिरवे जलप्रवाह आणि त्यावर तरंगणाऱ्या हाऊसबोट्स... अशा वातावरणात साताजन्माच्या गाठी बांधणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. केरळमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सहसा सप्टेंबर ते मार्च या काळातच लग्नाचे नियोजन करावे. 

सिमला/मसुरी : थंड हवेच्या ठिकाणी लग्न करायचे असेल, तर हिमाचल प्रदेशमधील सिमला आणि उत्तराखंडातील मसुरी हे पर्याय आहेत. लग्नासाठी डोंगर-दऱ्या, घाटरस्ते, बर्फ असा काहीसा माहोल हवा असेल, तर ऐन थंडीत लग्न करावे लागेल. पण ही पहाडी थंडी आपल्याला झेपायला हवी, तर इथे लग्न करण्यात मजा आहे. एरवी उन्हाळ्यामध्येही इथले वातावरण आल्हाददायकच असते. ‘समर वेडिंग’ इथे करायला हरकत नाही.

गोवा : गोवा जसे पार्टी डेस्टिनेशन आहे, तसेच वेडिंग डेस्टिनेशनसुद्धा आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये जाऊन लग्न करण्यापेक्षा गोव्यात जाऊन लग्न करणे सहज शक्य आहे. सुंदर समुद्रकिनारे, वेगवेगळी चर्च, पोर्तुगीज वास्तू... सगळा माहोलच वेगळा असतो. प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठीही कित्येक पर्याय इथे सहज उपलब्ध होतात. लग्नासाठीच्या पार्ट्यांसाठी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरून सुटणाऱ्या क्रुझ बुक करता येतात. तसेच समुद्रकिनारीच पँडॉल्स उभे करून लग्नाचे विधी करता येतात. आरामदायी लग्नसोहळ्यासाठी थंडीचा सीझनच उत्तम असतो. 

ऋषिकेश/वाराणसी : गंगेकाठी संस्कृती जपणारे आणि पारंपरिक लग्न करायचे असेल, तर ऋषिकेश किंवा वाराणसी गाठावे. ऑक्टोबर ते मार्च हे महिने डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडावेत.  
अंदमान निकोबार : गोव्याच्या गर्दीचा कंटाळा आला असेल आणि नवीन ठिकाण हवे असेल, तर बीचवरच्या लग्नासाठी अंदमान-निकोबार हादेखील एक पर्याय आहे. अंदमानवरील हॅवरलॉक आणि रॉस आयलंड्स हे सर्वात लोकप्रिय डेस्टिनेशन्स आहेत. ऑक्टोबर ते एप्रिल हा टुरिस्ट सीझन असल्यामुळे या काळात इथे गर्दी असते. त्यामुळे या काळात लग्न करायचे असेल, तर आधीपासूनच तयारी करावी लागेल. 

क्रुझ वेडिंग : डेस्टिनेशन वेडिंगमधलाही सध्याचा वाढता ट्रेंड म्हणजे क्रुझ वेडिंग. काही वर्षांपूर्वी क्रुझ हे प्रकरण खूपच खर्चीक असल्यामुळे त्याकडे यापद्धतीने पाहिले जायचे नाही. पण आता क्रुझ वेडिंग डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय होत आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे, पासपोर्ट, व्हिसा, विमानाचे तिकीट या भानगडी नाहीत. मुंबई किंवा गोव्याहून क्रुझमध्ये बसायचे आणि पुन्हा तिथेच परत यायचे. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे लग्न क्रुझमध्ये होऊ शकते. क्रुझची क्षमता दोन ते तीन हजार इतकी असते. लग्नासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे इव्हेंट मॅनेजर, फोटोग्राफर, फॅशन डिझायनर क्रुझवर उपलब्ध असतात. पाहिजे तर अख्खी क्रुझही बुक करता येते. अनेक वेगवेगळी रेस्टॉरंट्स, बँक्वेट्स, लाइव्ह म्युझिक शोज्, राहण्याची उत्तम सोय अशा अशा सुविधांमुळे क्रुझवरील लग्न आगळेवेगळे ठरते.

परदेशातील डेस्टिनेशन्स
इटली : पास्ता आणि पिझ्झासारख्या इटालियन फूडसाठी प्रसिद्ध असलेले इटली आता वेडिंग डेस्टिनेशन म्हणूनही नावारूपाला आले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीचीही इटलीला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून पसंती मिळाली आहे. अमाल्फी कोस्ट, टस्कनी, सिसिली, लेक कोमो, लेक गार्डा, सार्डिनिया यांसारखी अनेक निसर्गरम्य ठिकाणे, शेक्सपिअरची प्रसिद्ध रोमिओ-ज्युलिएट प्रेमकहाणी जिथे घडली ते व्हेरोना, कालव्यांचे शहर असलेले देखणे व्हेनिस... अशी कित्येक वेडिंग डेस्टिनेशन्स इटलीमध्ये आहेत. पण इटलीमध्ये लग्न करण्याआधी व्हिसा मिळतोय ना, याची खात्री केलेली बरी. व्हिसा मिळण्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. 

पॅरिस : पॅरिस हे जगातले सर्वांत रोमँटिक शहर मानले जाते, त्यामुळे अर्थातच हे वेडिंग डेस्टिनेशनही आहे. अनेक नयनरम्य वास्तू, सुरेख गार्डन्स आणि अर्थात प्रसिद्ध आयफेल टॉवर... यांच्या साक्षीने अनेकजण लग्नगाठ बांधतात. पॅरिसमधील लग्न नक्कीच खर्चीक होईल, पण तितकाच विलोभनीय सोहळाही होईल. दिवसा किंवा रात्रीही पॅरिस ‘परफेक्ट रोमँटिक’ वेडिंग डेस्टिनेशन आहे.  

श्रीलंका : श्रीलंकेला लाभलेले सुंदर समुद्रकिनारे आणि इतर निसर्गसौंदर्यामुळे भारतामध्ये श्रीलंका वेडिंग डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय होत आहे. तसेच श्रीलंकेला लग्न करणे परवडण्यासारखे आहे. तेथील चलन, फ्लाइट्स, राहण्याची ठिकाणे सगळेच बजेटमध्ये बसते. इथे लग्नाच्या थीमसाठी हॉट एअर बलून, जंगल थीम, बीच थीम असे अनेक पर्यायही आहेत. तसेच खासगी बेटे, चहाचे मळे आणि अगदी जुनी चर्च वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उपलब्ध असतात.

बाली : इंडोनेशियातील बालीचे वर्णन ‘पॅरेडाइज’ असे केले जाते, कारण बाली आहेच खूप सुंदर. वेडिंग डेस्टिनेशन म्हणून इथे भरपूर हॉटेल्स आणि रिसॉर्ट तर आहेतच; पण समुद्रकिनारे, डोंगर आणि जंगलेही आहेत, जिथे थीम वेडिंग करता येते. फक्त पावसाळा सोडला, तर इतर सर्व महिने बालीमध्ये लग्नासाठी छान वातावरण असते.

थायलंड : थायलंडमध्ये लग्न करण्यासाठी बँकॉक, फुकेत, क्राबी, फी फी आयलंड्स असे अनेक पर्याय आहेत. थायलंडदेखील निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. इथे लग्नासाठी समुद्रकिनारे तर आहेत, पण त्याशिवाय जंगल लॉज, बॉटॅनिक गार्डन्स किंवा खासगी व्हिलाही बुक करता येतो. डिसेंबर ते मे या कालावधीत इथे अजिबात पाऊस नसतो, पण हवा खूप आर्द्र असते. 

व्हिसा ऑन अरायव्हल डेस्टिनेशन्स 
परदेशी लग्न करताना अनेक वेळा व्हिसा मिळणे ही मोठी समस्या ठरू शकते. व्हिसा मिळणे न मिळणे आपल्या हातात नसते. व्हिसा मिळाला नाही म्हणून जवळचा एखादा नातेवाईक लग्नाला उपस्थित राहू शकत नाही. असे घडू नये यासाठी ज्या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजेच त्या देशात पोचल्यानंतर व्हिसा मिळतो, अशा देशांमध्ये लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशन्स म्हणजे, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस, फुकेत, क्राबी यांसारखी ठिकाणे. ही ठिकाणे तुलनेने स्वस्त असतात आणि इथे जास्त पाहुण्यांना घेऊन जाणे शक्य होते. कागदपत्रांचा जास्त घोळ नसतो. त्यामुळे ठरलेल्या वेळात सगळ्यांनाच लग्न एंजॉय करता येते.

संबंधित बातम्या