डेस्टिनेशन... पर्यटन

ज्योती बागल
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
धार्मिक, सांस्कृतिक ठिकाणांना भेट देणे, निसर्गरम्य ठिकाणे हौसेने पाहणे ही साधारणतः पर्यटनाची कारणे आहेत; पण हल्ली एक नवा ट्रेंड रुजू पाहतोय तो म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा! यातून सुंदरशा नवनवीन ठिकाणांचा शोध लागून पर्यटन क्षेत्राला चालना मिळते आहे...

तन आणि मन प्रसन्न ठेवायचे असेल तर आठवड्यात, महिन्यात किंवा वर्षभरात किमान एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला हवे, किंवा नयनरम्य ठिकाणी भेट द्यायलाच हवी. पण नोकरीमुळे, घरातील व्यापामुळे सर्वांना हे शक्य होतेच असे नाही. नोव्हेंबर-डिसेंबर हे थंडीचे दिवस, त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे वातावरण आल्हाददायक असते. पण याकाळात ना नोकरीला सुटी असते, ना मुलांच्या शाळांना सुटी असते, पण याच काळात लग्नसराई मात्र ऐन भरात आलेली असते. अशावेळी एखादे निमित्त सापडण्याचा अवकाश की आपण फिरायला अगदी बॅगा भरून तयार असतो. सध्या तरुणांमध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग'चे भलतेच फॅड पाहायला मिळते आहे. म्हणजे काय तर एका ठराविक ठिकाणी जाऊन लग्न करायचे. 

अलीकडे वाढलेला हा ट्रेंड फक्त सेलिब्रिटींपुरता किंवा उच्चवर्गापर्यंतच मर्यादित न राहता मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्नेदेखील अशा पद्धतीने होऊ लागली आहेत. याचा सर्वांत जास्त फायदा जर कोणाला होत असेल, तर तो पर्यटन क्षेत्राला! कारण डेस्टिनेशन वेडिंग म्हटल्यावर दूरच्या ठिकाणाला, सुंदर आणि नेहमीच्या ठिकाणापेक्षा जरा हटके ठिकाणाला पसंती दिली जाते. जेव्हा अशा ठिकाणी एखादे हटके लग्न होते, तेव्हा त्या ठिकाणची प्रसिद्धी तर वाढतेच शिवाय लोकांमध्ये त्या ठिकाणाविषयी कुतूहल निर्माण होते, आपण पण ते ठिकाण जाऊन पाहायला हवे असे वाटते.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडतील अशी ठिकाणे पाहिली तर महाराष्ट्रातील लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग अशी ठिकाणे डोळ्यासमोर येतात. भारतातली राजस्थान, गोवा, केरळ तर परदेशातील इटली, थायलंड, दुबई ही ठिकाणे दिसतात.

डेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला कशी चालना मिळते हे बघायचे झाले तर एखाद्या लग्नाला जाताना किंवा येताना त्या मार्गावर असणाऱ्या प्रसिद्ध ठिकाणांना आपण आवर्जून भेट देतो. बऱ्याचदा थोडीशी वाट वाकडी करून जावे लागले तरी जातो. कारण खास पर्यटनासाठी तिथे येणे एवढे सहज शक्य नसते... आणि डेस्टिनेशन वेडिंग हे एखाद्या खास ठिकाणीच ठरवलेले असते. अशावेळी वेळात वेळ काढून आजूबाजूची ठिकाणे फिरण्याचा, बघण्याचा मोह झाला नाही तर नवलच. शिवाय किमान त्याठिकाणी येण्याजाण्याचा खर्च तरी यानिमित्त वाचतो किंवा आपण असेही म्हणू शकतो की एका खर्चात दोन गोष्टी पूर्ण केल्या. कारण लग्नाला जाण्यासाठी तसेही आपले पैसे खर्च होणारच असतात.

उदाहरण म्हणून बघायचे झाले, तर डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थानमधील एखादे शहर निवडले, तर त्या शहराच्या आजूबाजूला किंवा त्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या ठिकाणांना आपण आवर्जून भेट देऊच शकतो. राजस्थानमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये जय महाल पॅलेस, रामबाग पॅलेस, सिटी पॅलेस, तसेच रणथंबोर नॅशनल पार्क, हवा महाल, जल महाल, लेक पिचोला, जैसलमेर फोर्ट, उमेद भवन पॅलेस, जसवंत थाडा, चित्तोरगड फोर्ट, अल्बर्ट हॉल म्य़ुझियम, पुष्कर लेक, बिर्ला मंदिर, करणी माता टेंपल, डेझर्ट नॅशनल पार्क अशी बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहे.

डेस्टिनेशनसाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील एखादे ठिकाण निवडले असता तिथेदेखील बघण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आणि विशेष म्हणजे बिचेस आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे. हे शहर छोटे असले तरी तिथे बघण्यासाठी बागा बीच, मीरामार बीच, मोबोर बीच, वागातोर बीच, बेटलबटीम बीच, बोंडला वाइल्डलाइफ सेंच्युरी, अर्वलेम झरा, अगौंडा किल्ला आणि गोव्यात असणारे अनेक चर्च आणि मंदिरे ही डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे डेस्टिनेशन ठरू शकतात. त्यामुळे लग्नाचे ठिकाण यातले कोणतेही एक असेल तर आजूबाजूची किमान तीनचार ठिकाणे तरी आपण बघूच.       

तसे पाहायला गेले तर पर्यटनाच्या अनेक नव्या शाखा उदयाला आल्या आहेत. जसे की सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, अवकाश पर्यटन, धार्मिक पर्यटन अशा अनेक आहेत. यामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला जास्त फायदा होऊ शकतो. कारण पर्यटनाला जातानादेखील कोणत्या ठिकाणाला प्राथमिकता द्यायची हे ठरलेले असते. त्यात आपली संस्कृती आणि आपले दैवत यांना नेहमी प्राधान्यक्रम दिला जातो. त्यामुळे आजूबाजूला असणारी मंदिरे, साधू संतांचे मठ, राजा महाराजांचे गडकिल्ले, चर्च, मशीद अशा ठिकाणांना ओझरती का होईना भेट दिली जाते.   

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांचीही खासियत असते. त्या पदार्थांची चव आवर्जून चाखली जाते. शिवाय नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठीदेखील पार्सल घेतले जातात. तसेच काही गोष्टी या त्या ठिकाणची ओळख असतात. अशा वस्तू प्रवासातील आठवण म्हणून आपण स्वतःसाठी खरेदी करतो, आपल्या स्नेहींना भेट देण्यासाठी घेतो. त्यामुळे पर्यटनाबरोबरच फूड इंडस्ट्रीज, हॉटेल्स आणि तेथील लोकल मार्केटलासुद्धा त्याचा फायदा होतो.

शहरांच्या भोवताली जर अशी वेडिंग डेस्टिनेशन्स नावारूपाला आली, तर सर्वसामान्य कुटुंबांनादेखील हा सोहळा साजरा करता येईल. अर्थात लग्न ही सर्वांच्या आयुष्यातील खासगी बाब आहे. पण ती तेवढीच खास आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ती सोहळा किंवा एखादा इव्हेंट म्हणून साजरी करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात... आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा एकाच विभागापुरता मर्यादित न राहता, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, फूड इंडस्ट्रीज अशा अनेक क्षेत्रांना होऊ शकतो. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही फायदा होऊ शकतो. शिवाय हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रांत रोजगारही उपलब्ध होऊन शहरी ग्रामीण अर्थकारणाला बळकटी मिळण्यास मदत होऊ शकते.

यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते की डेस्टिनेशन वेडिंगमुळे पर्यटनाला चालना मिळण्यास नक्कीच मदत होत आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड असाच वाढत राहिला तर आणखी फायदा होऊ शकतो.

एखाद्या डेस्टिनेशनची ओळख निर्माण होण्यासाठी तिथे काही लोक गेले पाहिजेत. दिवसेंदिवस आपण प्रवास तर जास्त करायलाच लागलो आहोत, त्यामुळे नवीन नवीन डेस्टिनेशनच्या शोधात आपण असतो. पण कुठल्याही ठिकाणाची डेव्हलपमेंट व्हायला आधी काही लोकांनी तिथे जायची गरज असते... आणि जेव्हा एखादे डेस्टिनेशन वेडिंग तिथे जाते, त्यात आपल्याकडचे लग्न असल्याने मोठ्या संख्येने लोक येतात. तेव्हा आपोआपच त्या डेस्टिनेशनचा विकास होतोच. कारण तिथल्या सर्व्हिसेस वाढतात. लोकांच्या आवडीप्रमाणे ते डेस्टिनेशन मोल्ड व्हायला लागते.
डेस्टिनेशन वेडिंगच्या वाढत्या ट्रेंडचा पर्यटन क्षेत्राला, एखाद्या ठिकाणाच्या एकूण विकासाला  नक्कीच फायदा होते. पर्यटकांच्या गरजेनुसार तिथल्या सोयीसुविधांमध्ये वाढ होते. यामध्ये हॉटेल्स, रूम्स, खाद्यपदार्थ या सगळ्यांचा समावेश असतो. एखाद्या ठिकाणी जेव्हा एकदोन लोक पर्यटनासाठी जातात, तेव्हा त्या ठिकाणाची तशी चर्चा होत नाही, पण जेव्हा त्याठिकाणी एखादे लग्न होते तेव्हा नक्कीच हा चर्चेचा विषय होतो. आपल्याकडे लग्न म्हटल्यावर किमान १००-१५० लोक आरामात असतात. एवढ्या लोकांची तिकिटे, येणेजाणे यातून एअरलाइन्स, ट्रेन यांचादेखील बिझनेस होतो. ज्या ठिकाणी सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंग केले आहे, त्या ठिकाणांची प्रसिद्धी तर झालीच; शिवाय आपल्या लोकांमध्येही याविषयी आवड निर्माण झाली आहे. आपल्याकडचे लोक परदेशात आणि भारतातही, विशेष करून बिचेसमुळे गोवा आणि पॅलेसेसमुळे राजस्थानला प्राधान्य देत आहेत. एनआरआय लोकांचाही राजस्थानकडे ओढा दिसतो. परदेशात म्हटले तर थायलंडला वगैरे पसंती आहे, कारण तिथे पोचणे सोपे आहे. परदेशात होणाऱ्या डेस्टिनेशन वेडिंगमुळे एक फायदा असा होतो, की परदेशातील लोकांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. म्हणजे भारतदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा संदेशच या अशा लग्नांमधून इतर राष्ट्रांना दिला जात आहे. कारण आपल्याकडचे लग्न हा एक दिवसाचा कार्यक्रम नसतो. मेंदी, संगीत, हळद असे सगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे तो एक ग्रॅंड इव्हेंटच होतो.   
- सुनीला पाटील, वीणा वर्ल्ड

डेस्टिनेशन वेडिंग्समुळे मोठ्या संख्येने लोक त्याठिकाणी प्रवास करतात. तिथले साईटसीइंग अनुभवतात, तिथल्या स्थानिक वस्तू खरेदी करतात. अनेकजण लग्नाच्या अलीकडे आणि नंतर आजूबाजूच्या डेस्टिनेशन्सनादेखील भेट देतात. यामुळे त्या त्या ठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळते किंवा त्यात वाढ होते. यामुळे डेस्टिनेशन वेडिंग्स ही नक्कीच पर्यटनाच्या फेवरमध्ये काम करतात.
- विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स

डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारा एक ग्रुप मोठा असतो. त्यामुळे अरेंजमेंट्सही मोठ्या कराव्या लागतात. त्यात डेकोरेशन, वेडिंग कॉश्च्युम, डिनर असे दोन्हीकडेच्या पार्टीजचे एकूण प्लॅनिंग करावे लागते. इथे तुम्ही बॅंड, बाजा, बारात चित्रपटाचे उदाहरण घेऊ शकता. अगदी त्याप्रमाणे वेडिंग प्लॅनरबरोबर आम्हाला असोसिएट करावे लागते. डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपल्याकडे तसे बघायला गेले तर राजस्थानला प्राधान्य दिले जाते. कारण तिकडे उत्तम प्रकारचे पॅलेसेस आहेत. तसेच तिकडचे कल्चरही खूप छान आहे, म्हणून लोकांचा कल तिकडे जास्त दिसतो. जैसलमेर, जयपूर, जोधपूर याठिकाणचे पेहराव लोकांना खूप आवडतात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारा हा ग्रुप आवर्जून या गोष्टी बघतो. त्यामुळे नक्कीच पर्यटनाला त्याचा फायदा होताना दिसतो.
- अमोल तांबे, गुरुनाथ ट्रॅव्हल्स

संबंधित बातम्या