लग्न पाहावे करून

निवेदिता सावंत-मोहिते
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
 

"नाऱ्याच्या लग्नासाठी आमची सुटी मंजूर झाली आहे. आपण जयपूरला जाऊ शकतो." घरात शिरता शिरता माझ्या नवऱ्याने जाहीर केले आणि एकच कल्ला केला. माझ्या लेकीने लगेच त्याच्या सुरात सूर मिसळला आणि दोघेही लॅपटॉपसमोर जाऊन बसले. वेगवेगळ्या एअर लाइन्सचे तिकिटांचे दर बघण्याचे काम तातडीने सुरू झाले. 
"फायनली" नाऱ्या लग्न करतो आहे. तेही डेस्टिनेशन वेडिंग! आणि महत्त्वाचे म्हणजे... "
"बाबा, एक मिनिट थांब. तू आधी हे लक्षात घे की काकाचे लग्न हे डेस्टिनेशन वेडिंग नाही."  
"पण का?" बाबाने प्रश्न विचारला. 
 आपले ज्ञानदा हे नाव सार्थक करत ती म्हणाली, "अरे बाबा, नरेंद्र काका हा मुळात जयपूरचाच आहे. शिवाय त्याची होणारी बायकोसुद्धा तिथलीच. त्यामुळे त्यांचे लग्न जर जयपूरमध्ये होत असेल तर ते डेस्टिनेशन वेडिंग ठरत नाही. विचार आईला." तिने लगेच माझी साक्ष काढली. 
"टेक्निकली बरोबर बोलते आहे ती. वधू आणि वराच्या राहत्या ठिकाणापासून दूर, नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या सान्निध्यात पार पडणारा काही दिवसांचा सोहळा म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग."
मी नवऱ्याच्या ज्ञानात भर घातली. त्याने लेकीपुढे हात जोडले. पुन्हा आपले तिकिटासाठीचे शोधकार्य सुरू केले.

माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले. गेल्या काही वर्षांत 'डेस्टिनेशन वेडिंग' ही संकल्पना आपल्याकडे चांगलीच रुजली आहे. पूर्वीच्या काळी मुलामुलींनी आपली लग्ने जमवण्याची पद्धत नव्हती. मोठी माणसे लग्न ठरवत असत. नवरीच्या किंवा नवऱ्याच्या अंगणात मांडव घालून लग्न होत. हळूहळू गावे शहराच्या पोटात सामावली. जिथे अंगणच राहिले नाही तिथे मांडवाची काय कथा! या काळात मंगल कार्यालयांची चलती झाली. अर्थात असे लग्न म्हणजे सकाळी लवकर कार्यालयात जाऊन लग्नाचे विधी, त्यानंतर लग्न, मग रिसेप्शन असा हा एका संपूर्ण दिवसाचा सोहळा झाला. मात्र, कालांतराने या सोहळ्यात तोच तोच एकसुरीपणा आला आणि तरुणाईला वेगळा पर्याय हवासा वाटू लागला. हा पर्याय होता 'डेस्टिनेशन वेडिंग'चा.

काय असते डेस्टिनेशन वेडिंग? 
आजच्या धावपळीच्या आयुष्यात किमान लग्नाच्या निमित्ताने चार निवांत क्षण हाती लागावेत म्हणून डेस्टिनेशन वेडिंग हे राहत्या ठिकाणापासून दूर आणि रोजच्या दगदगीपासून वेगळे असते. अर्थात हे अंतर किती असावे याचा काहीही नियम नाही. ते कुठेही असू शकते. एखाद्या रिसॉटमध्ये, गार्डनमध्ये, डोंगरमाथ्यावर, समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या तळाशी, आकाशात हॉट एअर बलूनमध्ये, अगदी कुठेही. 

कारणे आणि उद्देश 
आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींबरोबर केवळ निवांतपणा हे डेस्टिनेशन वेडिंगमागचे एकमेव कारण नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमाप्रमाणे यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे हेतू आणि कारणे असू शकतात. त्यातले काही पुढे देत आहे...

अविस्मरणीय, वैशिट्यपूर्ण, विवाहकेंद्री समारंभ : लग्नाला आलेले सगळेच पाहुणे हे आपल्या घरापासून आणि दिनक्रमापासून लांब आले असल्याने संपूर्ण लक्ष लग्नावर आणि वधू वरांवर केंद्रित करू शकतात. संपूर्ण विवाह सोहळ्याचा आनंद उपभोगू शकतात. चार दिवसांचा हा सोहळा अत्यंत अविस्मरणीय आणि आगळावेगळा ठरू शकतो. असे लग्न म्हणजे आठवणींच्या एखाद्या पेटाऱ्यासारखे ठरू शकते.    

नवनवीन स्थळांना भेट : डेस्टिनेशन वेडिंगच्या निमित्ताने तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना पार पाडत असता. त्या ठिकाणाशी भावनात्मक दृष्ट्या जोडले जात असता. त्या ठिकाणाच्या आसपास असणारी प्रेक्षणीय स्थळे ही आकर्षणाचा विषय असतात.  

सामाजिक प्रतिष्ठा : निव्वळ आनंद हा आज कोणत्याही समारंभाचा उद्देश राहिलेला नाही. त्यातल्या त्यात विवाहसोहळ्याला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग हा स्वाभाविकपणे तुमची सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याचा विषय ठरू शकतो.   
कमी श्रम-जास्त आनंद : पूर्वीच्या काळी एखादे लग्न उभे राहत असेल, तर अख्खे गाव त्या लग्नात राबत असे. मुलीचे लग्न असेल तर पाठवणीच्या वेळी सबंध गावाचे डोळे पाणावत. याउलट मुलाचे लग्न असेल तर गावातील प्रत्येक घर नवीन सुनेच्या स्वागतासाठी सज्ज होई. आज जागतिकीकरणाच्या या काळात ती परिस्थिती राहिलेली नाही. लग्नात राबणाऱ्या पैपाहुण्यांची जागा आता वेडिंग प्लॅनर कंपन्यांनी घेतली आहे. डेस्टिनेशन वेडिंग या प्रकारात तुम्हाला फक्त पैसे खर्च करायचे असतात. जितका तुमच्या बँक अकाउंटचा आकार असतो तितक्या जबाबदाऱ्या तुम्हाला इतरांवर टाकता येतात. अगदी तिकिटे बुक करण्यापासून ते लग्नाची सगळी तयारी करण्यापर्यंत काम करणाऱ्या कित्येक प्रोफेशनल कंपन्या बाजारात आहेत. त्या तुमच्या लग्नातील एकूण एक गोष्ट करू शकतात.  

अगदी जवळचे आणि निवडक निमंत्रित : डेस्टिनेशन वेडिंगच्या बाबतीत प्रवासाचे किंवा पाहुण्यांच्या संख्येचे बंधन येत असल्यामुळे तुमच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या आपोआपच मर्यादित होऊ लागते. 

डेकोरेशनचा मर्यादित खर्च
डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही आधीच अगदी रमणीय स्थळ निवडले असल्यामुळे तुम्हाला त्या स्थळाला अधिक सुंदर करण्यासाठीचा बराचसा खर्च टाळता येतो. उदाहरणार्थ एखाद्या राजमहालात लग्न असेल तर तुम्हाला भिंती, दरवाजे किंवा मंडप यांच्या सजावटीसाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. 

डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पना आपल्याकडे रुजवली ती बॉलिवूडपटांनी. डेस्टिनेशन वेडिंगला अत्यंत रोमँटिक, स्वप्निल आणि रमणीय असे स्वरूप देण्यात बॉलिवूड चित्रपटांचा मोठा वाटा नाकारता येणार नाही. आता आता मराठी पडद्यावरही या संकल्पनेचे स्वागत होऊ लागले आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रमाण मराठी शब्द अजून अस्तित्वात आलेला नाही. मी मात्र या संकल्पनेला मराठीत 'रम्यस्थळ विवाह' असे म्हणते.

डेस्टिनेशन कसे ठरवाल?
 तुमच्या बजेटवर तुमचे डेस्टिनेशन ठरत असते. डेस्टिनेशन ठरवत असताना सर्वांत महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट ऋतू. तुमचे लग्न ज्या ऋतूत होणार आहे त्या ऋतूत कोणत्या ठिकाणी जाणे योग्य असते हे प्रकर्षाने विचारात घ्यावे लागते. उदाहरणार्थ भर पावसाच्या दिवसांत तुम्हाला समुद्रकिनारी डेस्टिनेशन वेडिंग ठरवता येणार नाही. भर थंडीच्या दिवसांत तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाता येईलही. मात्र, आपल्या लग्नाचे सर्व फोटो गरम किंवा लोकरीचे कपडे घालून काढायची तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे ऋतू हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. याखेरीज दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रवास खर्च. जास्तीत जास्त किती पैसे तुम्ही प्रवासासाठी खर्च करू शकता यावरही तुमची डेस्टिनेशनची निवड अवलंबून असते. 

भारताबाहेर डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेतच. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतातली काही ठिकाणे ही या दृष्टीने चांगलीच नावारूपाला आली आहेत. 
 गोवा, केरळ, अंदमान- निकोबार, लवासा, दिल्ली, दीव-दमण, पुष्कर, अँबी व्हॅली, अलिबाग, जयपूर, उदयपूर, जोधपूर, हैदराबाद, बंगळुरू, खजुराहो, अजिंठा-वेरूळ, मदुराई, अमृतसर, खंडाळा-लोणावळा, महाबळेशवर, इगतपुरी, कोलकाता, नाशिक, ऋषिकेश, सिमला, आग्रा, गंगाघाट, जैसलमेर, मसुरी, उटी, सिमला, कूर्ग अशी न संपणारी एक यादी करता येईल. 
 तुमची आवड, बजेट आणि ऋतू हे सगळे लक्षात घेऊन तुम्हाला तुमचे ड्रीम डेस्टिनेशन निवडता येते.

कोणाची मदत घ्याल? 
 आज इव्हेंट मॅनेजमेंट ही जगातली अत्यंत मोठी इंडस्ट्री आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी अनेक लहान मोठ्या कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. मेमोरेबल इंडियन वेडिंग, अंकित भार्गव, वेडनिक्षा, ३ प्रोडक्शन वेडिंग्स, श्लोका इव्हेंट्स, हॉरिजॉन वेडिंग अशा अनेक लहान मोठ्या कंपन्या या क्षेत्रात यशस्वी काम करताना दिसतात. 
तुमच्याकडे 'यंदा कर्तव्य आहे' का? तुम्हाला तुमचे लग्न अत्यंत विशेष, संस्मरणीय करायचे आहे का? एखाद्या परीकथेत शोभावा असा विवाहसोहळा तुम्हाला हवा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम आयुष्यभर आठवणीत राहावा असा हवा आहे का? मग चला तर शोध घ्या तुमच्या ड्रीम डेस्टिनेशनचा आणि डेस्टिनेशन वेडिंगच्या तयारीला लागा. तोपर्यंत आम्हीही सहपरिवार नरेंद्रच्या लग्नाला जाऊन येतोच तुमच्या मदतीला.

या कंपन्या नक्की काय करतात?
तर तुमच्या स्वप्नातील विवाह सोहळा उभा करण्यासाठी तुम्हाला मदत पुरवतात. या कंपन्या अनेक पातळींवर अत्यंत सुसूत्र पद्धतीने काम करत असतात. 
डेस्टिनेशन वेडिंग समारंभातील काही महत्त्वाची कामे :

 • डेस्टिनेशन व त्याचे बजेट ठरवणे व त्यासंबधातील बुकिंग करणे 
 • प्रवास खर्च ठरवणे व त्यासंदर्भातील बुकिंग करणे, पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे प्लॅनिंग करणे 
 • संपूर्ण समारंभ आखणे व पूर्ण करणे 
 • वर व वधू यांची विशेष बडदास्त ठेवणे, कपडे, दागिने, मेकअप, आवडीनिवडी यांची व्यवस्था करणे. 
 • पाहुणे मंडळींची सोय करणे. 
 • सजावटीची व्यवस्था बघणे. 
 • लग्नाची पत्रिका किंवा तत्सम अन्य गोष्टींची छपाई करणे. 
 • मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणे. 
 • फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी 
 • ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था 
 • तांत्रिक गोष्टींची व्यवस्था 

आणि अशा बऱ्याच गोष्टी या कंपन्या सांभाळत असतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल.

संबंधित बातम्या