मित्र जीवाणू

सुकेशा सातवळेकर
सोमवार, 12 सप्टेंबर 2022

सूर्यप्रकाशात पिकलेली फळं आणि भाज्या खूप जास्त पोषक आणि स्वास्थ्यदायी असतात. त्यांच्यामध्ये, पोटाचं आरोग्य बिघडवणाऱ्या म्हणजेच उपद्रवी जीवाणूंचं प्रमाण कमी असतं.

सन २०१९मध्ये स्कॉट पीटरसन यांनी हळद, आलं आणि काळं मिरे यांवर संशोधन केलं; ते ‘मेडिसिन’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं. या अभ्यासानुसार, या मसाल्याच्या पदार्थांमुळे आतड्यांत विविध प्रकारचे असंख्य मित्र जीवाणू तयार होतात. ‘बायोमेडिसिन ॲण्ड फार्माकोथेरपी’ जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातही हे सिद्ध झालंय, की हर्ब किंवा वनौषधींच्या रोजच्या वापरामुळे आतड्यांत नियमितपणे मित्र जीवाणूंची निर्मिती होते. 

आपल्या पारंपरिक आहारातील स्थानिक पाककृती शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय उपयोगी आहेत. अँटीऑक्सिडंट, फायबर आणि प्रोबायोटिकयुक्त आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट फ्लोरा वृद्धिंगत करणाऱ्या आहेत. मोड आणणे, आंबवणे, माल्टिंग करणे अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियांमुळे हे गुणधर्म वाढीस लागतात. अशा पारंपरिक स्थानिक पदार्थांची काही उदाहरणं बघूयात.

    ओडिशाचा पारंपरिक पदार्थ इंडुरी पिठा - उडदाची डाळ आणि उकडा तांदूळ भिजवून वाटून घेऊन, ते पीठ आंबवलं जातं. मग त्यात ओल्या नारळाचा चव, गूळ आणि दही घातलं जातं. हे पीठ हळदीच्या पानांमध्ये घालून वाफवलं जातं.

  •     आंबली - दक्षिण भारतात आंबवून केले जाणारे इडली, डोसा असे पदार्थ आपल्याला माहीत आहेत. पण आंबली हा पदार्थ थोडा वेगळा आहे. नाचणीचं पीठ पाण्यात कालवून शिजवलं जातं आणि नंतर आंबवून सर्व्ह केलं जातं. इंडुरी पिठा आणि आंबली या दोन्ही पदार्थांमध्ये आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे मित्र जीवाणूंचं प्रमाण भरपूर वाढतं.
  •     सोयाबीन आंबवून तयार केला जाणारा मणिपूरचा पारंपरिक पदार्थ हवाइजरसुद्धा गट फ्लोरा वाढवणारा आहे. हवाइजरमध्ये आंबवण्याच्या प्रक्रियेला मदत करण्यासाठी बांबूच्या टोपल्या आणि केळी किंवा अंजिराच्या पानांचा वापर केला जातो. 

    आपल्या इथेही भात आंबवून त्यापासून आंबोळ्या केल्या जातात. ताकात कालवलेलं बेसन आंबवून ढोकळा केला जातो. 

  • या सर्व पदार्थांच्या मदतीनं उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढवता येतं. पोटाचं आरोग्य सुधारतं आणि त्याबरोबरच सर्वांगीण आरोग्यही जपता येतं. 
  • निरोगी स्वास्थ्य मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्राचीन काळापासून आयुर्वेदिक पथ्यापथ्य सांगितलं जायचं. पथ्यकारक असे काही पारंपरिक पेयपदार्थ आता बघूया.
  •     रसाला - दह्यामध्ये हिरवी मिरची, थोडी साखर, थोडा मध आणि तूप घालून एक मिनिटभर घुसळलं जातं. नंतर किंचित कापूर पूड घालून हे पेय तयार केलं जातं. तयार करायला अतिशय सोपं असं प्रोबायोटिक पेय आहे हे! 
  •     कांजी - कांजी हे पारंपरिक पंजाबी पेय आहे. बीट आणि गाजर बारीक चिरून घेतलं जातं. काळ्या आणि लाल मोहरीमध्ये पाणी घालून वाटून घेतात. भाजी, वाटलेली मोहरी, मीठ आणि पाणी एकत्र करून काचेच्या बरणीत भरून, ही बरणी तीन ते सात दिवस उन्हात ठेवली जाते. हे पेय आंबवून तयार झाल्यावर गाळून सर्व्ह केलं जातं. हे पेय म्हणजे अतिशय उपयुक्त असं गट फ्लोराचं स्वास्थ्य सुधारणारं प्रोबायोटिक आहे. आपण या कांजीला, भारतीय कोम्बुचा म्हणू शकतो! (कोम्बुचा हे पाश्चात्त्य प्रोबायोटिक आहे.)

मित्रजीवाणूंसाठी उपयुक्त ‘त्रिफळा’

त्रिफळा या आयुर्वेदिक औषधाच्या वापरानं गट फ्लोराचं स्वास्थ्य सुधारतं, असं ‘अल्टरनेटिव्ह ॲण्ड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन’च्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या क्रिस्टीन पिटरसन आणि इतरांच्या संशोधनावरून सिद्ध झालं आहे. अमलकी, बीभितकी आणि हरीतकी अशी तीन फळं वापरून त्रिफळा तयार होतो. त्रिफळा हे औषध योग्य प्रमाणात वापरलं, तर त्याच्यामधील फायटोकेमिकल्स क्वर्सटीन आणि गॅलिक अॅसिडमुळे पोटातील उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला बळ मिळतं. आणि अनारोग्यकारक जीवाणूंची वाढ थोपवली  जाते. शरीरांतर्गत दाहाचं आणि ऑक्सिडेशनमुळे होणाऱ्या ऱ्हासाचं प्रमाण आटोक्यात राहतं. मात्र, त्रिफळाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा, हे लक्षात असू द्या!

प्रादेशिक आहारपद्धती आणि गट फ्लोरा 

जगातील पाश्चात्त्य देश, तसंच इतर विकसित देशांमधील लोकसंख्येमध्ये पोटातील उपकारक जीवाणूंचं प्रमाण कमी आणि उपद्रवी जीवाणूंचं प्रमाण जास्त दिसून येतं, हे संधोशनाअंती सिद्ध झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे तेथील लोकांच्या आहारातील प्रक्रियायुक्त पदार्थ, बेकरीतले पदार्थ आणि तळलेल्या व तेलकट पदार्थांचं अति प्रमाण. तेल, तूप, साखर यांचा खूप जास्त वापर असतो त्यांच्या आहारात. याउलट, आफ्रिकेसारख्या प्रदेशांमध्ये  नैसर्गिक स्वरूपातील म्हणजेच कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ लोकांच्या आहारात प्रामुख्यानं असतात. त्यामुळे त्यांची गट हेल्थ उत्तम असते. आपल्याकडे अनेकदा पाश्चात्त्यांचं अंधानुकरण केलं जातं. पण त्यांच्या खाद्यसंस्कृतीतले काही भाग आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय अयोग्य आहेत, हे कायम लक्षात ठेवायला हवं.

ऋतूनुसार आहार आणि गट फ्लोरा 

भारतात आपण ढोबळमानानं उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीनच ऋतू मानत असलो तरी खरंतर सहा ऋतू आहेत. उत्तरायणातील शिशिर म्हणजेच हिवाळा, वसंत ऋतू आणि ग्रीष्म म्हणजेच उन्हाळा. दक्षिणायनातील वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा, तसंच शरद आणि हेमंत ऋतू. निसर्गचक्राशी जुळवून घेऊन जीवन जगणं आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं. त्या त्या ऋतूत पिकणारे वनस्पतीज पदार्थ; तयार होणाऱ्या भाज्या, फळं या सर्वांमध्ये अधिक प्रमाणात ‘प्राण’ असतो. ऊर्जा असते! साठवलेल्या किंवा बाहेरून मागवलेल्या किंवा रसायनं वापरून पिकवलेल्या भाज्या आणि फळांपेक्षा सूर्यप्रकाशात पिकलेली फळं आणि भाज्या खूप जास्त पोषक आणि स्वास्थ्यदायी असतात. त्यांच्यामध्ये, पोटाचं आरोग्य बिघडवणाऱ्या म्हणजेच उपद्रवी जीवाणूंचं प्रमाण कमी असतं. निसर्गचक्राच्या विरुद्ध वागलं तर शरीरात आतून आणि बाहेरून दुष्परिणाम होतात. त्या त्या ऋतूचा फायदा मिळवण्यासाठी घराबाहेर पडून निसर्गाच्या जेवढं शक्य होईल तेवढं जवळ जाणं, निसर्गसान्निध्यात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या ऋतूतील सूक्ष्मजीवांच्या सान्निध्यात याल. रोगप्रतिकारशक्ती सुधारेल. ताणतणाव कमी होतील. लक्षात ठेवा, तणावामुळे पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तेव्हा, निरामय आरोग्यासाठी आपल्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांचं आरोग्य जपूया. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारूया. स्वास्थ्यदायी चौरस आहार, म्हणजेच चारीठाव जेवण घ्यायचा प्रयत्न करूया, पारंपरिक थाळी आहार घेऊया. षड्‍रसयुक्त, वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करूया. परंपरेनुसार केल्या जाणाऱ्या स्थानिक पाककृती करून बघूयात. ऋतूनुसार मिळणाऱ्या भाज्या आणि फळं आपल्या खाण्यात असायलाच हवीत. थोडक्यात आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती जपूया आणि सर्वांगीण आरोग्य मिळवूया!

(लेखक डाएट कन्सलटंट, डायबेटिक एज्युकेटर आणि न्यूट्रिजिनॉमिक्स काउन्सिलर आहेत.)
 

संबंधित बातम्या