प्रकाशचित्रणाचे प्रकार : भाग २

सतीश पाकणीकर
गुरुवार, 3 मे 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर. 

गेल्या लेखात आपण प्रकाशचित्रकलेच्या जाहिरात प्रकाशचित्रण (Advertising Photography), व्यावसायिक व औद्योगिक प्रकाशचित्रण (Commercial & Industrial Photography), वृत्तपत्रप्रकाशचित्रण (Photojournalism), व्यक्तिचित्रण (Portraiture), निसर्गचित्रण (Landscapes) या शाखांची थोडक्‍यात ओळख करून घेतली. या बरोबरच इतरही काही महत्त्वाच्या शाखा आहेत. त्या प्रत्येक शाखेसाठी लागणारी उपकरणे कमी अधिक फरकाने वेगवेगळी आहेत. तसेच त्यासाठी प्रकाशचित्रकाराकडे लागणारे कौशल्य व अभ्यासही वेगवेगळे असतात. 

या शाखांच्या अभ्यासाने आपल्या हे लक्षात येते की "प्रकाशचित्रकला' किती वेगवेगळ्या प्रकाराची रूपे घेऊन आपल्याला रोजच्या जीवनात भेटत असते. हा अभ्यास करताना आपल्या हेही लक्षात यावे की आपला कल यापैकी कोणत्या प्रकारचे प्रकाशचित्रण करण्यात आहे. हे एकदा आपल्या लक्षात आले की मग आपण त्या दिशेने आगेकूच करून योग्य असा कॅमेरा व इतर साहित्य जमवू लागतो. आपल्या संग्रहात एक एक करून आपल्या आवडीच्या "फोटोग्राफी'साठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टीही जमू लागतात. त्यातला आपला रस वाढीला लागून हळूहळू प्रकाशचित्रकलेच्या माध्यमावर आपण पकड घेऊ लागतो.

स्थापत्य व अंतर्गत सजावट प्रकाशचित्रण (Architecture & Interior) 
रहिवासी इमारती, बंगले, फार्म हाउस, ऑफिस इमारती, पुरातन वारसा असलेल्या इमारती, गोदामे, कारखाने, पूल अशा प्रकारच्या ज्या स्थापत्य संरचना असतात त्यांच्या रचनात्मक सौंदर्याच्या प्रकाशचित्रणास आर्किटेक्‍चरल फोटोग्राफी असे म्हणतात. याच्या बरोबरीनेच अशा संरचनांच्या अंतर्गत भागाच्या प्रकाशचित्रणास इंटेरियर फोटोग्राफी असे म्हणतात. खरं तर आर्किटेक्‍चर व इंटेरियर फोटोग्राफी ही इमारतींपेक्षा त्यांच्या डिझाइनबद्दल विचार करायला लावणारी, त्यांची डिझाईन वैशिष्ट्ये दाखवणारी अशी असते. कधी कधी तर पूर्ण इमारत न दाखवता तिचा एखादा भागच त्या इमारतीची सारी वैशिष्ट्ये दाखवून जातो. प्रकाशचित्रकाराची नजर, ज्यामुळे इमारतीची सौंदर्यशीलता अधिक आनंददायक होईल असे घटक शोधून ते प्रकाशचित्राद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते. असे म्हटले जाते की Architecture is frozen music...त्यामुळे असा संगीतमय अनुभव प्रेक्षकाला मिळावा यासाठी स्वतः प्रकाशचित्रकाराला असा अनुभव आधी यायला हवा. त्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न व्हायला हवेत. स्थापत्य व अंतर्गत सजावट प्रकाशचित्रण करताना प्रकाशचित्रकारांपुढे असलेले दोन आव्हानात्मक पैलू म्हणजे : उपलब्ध प्रकाश आणि प्रतिमा विरूपण ( Image distortion). बहुतेकदा इमारतीचा अथवा अंतर्गत सजावटीचा पूर्ण भाग कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्यासाठी वाइड अँगल लेन्स वापरावी लागते. अशावेळी प्रकाशचित्रातील उभ्या अथवा आडव्या दिसणाऱ्या रेषा या विरूपित (Distort) होत जातात. याच्यावर उपाय म्हणजे त्यासाठी लागणारी योग्य अशी टिल्ट-शिफ्ट लेन्स आपल्या कीटमध्ये हवी किंवा परस्पेक्‍टिव्ह दुरुस्त करता येणारा फील्ड कॅमेरा तरी हवा. अर्थात आता डिजिटल फोटोग्राफमध्ये आपण कॉम्प्युटरचा वापर करून बदल करू शकत असल्याने अशा विरूपित रेषा आपण सरळ करू शकतो हा मोठा फायदा आहे. उपलब्ध प्रकाशाचा वापर करण्याचे आव्हान प्रकाशचित्रकार जितक्‍या समर्थपणे पेलेल तितकी त्या स्थापत्य व अंतर्गत सजावट प्रकाशचित्रणाची रंगत वाढत जाते. आज जाहिरातींमुळे अशी शेकडो उत्तमोत्तम प्रकाशचित्रे आपल्याला पाहायला मिळतात.

फॅशन प्रकाशचित्रण (Fashion Photography) 
दूरदर्शनवर बऱ्याच वेळा सध्याच्या आधुनिक कपड्यांच्या प्रदर्शनासाठी झालेले फॅशन शो आपण पाहतो. रोजच्या वर्तमानपत्रातदेखील कपडे आणि अन्य फॅशनेबल वस्तू प्रदर्शित होताना त्यांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध होत असतात. गुळगुळीत आर्ट पेपरवरील उत्तम छपाई असलेली एखाद्या उभरत्या मॉडेलची मनमोहक छबी आपला दिवसभर पाठलाग करत राहते. असे एखादे प्रकाशचित्र आपण अनुभवतो त्याला फॅशन प्रकाशचित्रण असे म्हणतात. फोटोग्राफीची ही शैली समर्पित आहे नवनवीन फॅशन पोशाख आणि त्या बरोबरीनेच त्यांच्या ॲक्‍सेसरीजचे नमुने सर्वांगसुंदर करून दाखवण्यासाठी. फॅशन फोटोग्राफर आपल्या कल्पनाशक्तीद्वारे सौंदर्य आणि शैली दाखवण्यासाठी चमकदार प्रकाशचित्रे निर्माण करतात आणि मासिके, फॅशन डिझायनर्स, स्टोअर्स आणि जाहिरातदारांना प्रकाशचित्रे विकतात. ग्लॅमरस मॉडेल्स आणि लक्‍झरी वस्तू, अशा दोन्हीची फोटोग्राफी करायची असल्याने उत्तमातला उत्तम कॅमेरा व इतर उपकरणे हाताशी असणे आवश्‍यक असते. यात सर्वांत मोठी अडचण ही त्या प्रतिमा तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची किंमत ही आहे. पण सुरवातीला कमी व स्वस्त उपकरणांसह प्रारंभ करून आपली कमाई जशी वाढवत जाऊ तशी महागडी उपकरणे आपण खरेदी करू शकतो. मात्र फॅशन फोटोग्राफरकडे असामान्य कल्पनाशक्ती, नावीन्याची आस, सळसळता उत्साह व येणाऱ्या कोणत्याही लहान मोठ्या मॉडेलशी सहजपणाने संभाषण करण्याची कला हवीच हवी.

खाद्यपदार्थ प्रकाशचित्रण (Food Photography) 
काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठी पंचतारांकित हॉटेल वगळता जवळ जवळ सर्व उपाहारगृहांतून भिंतीवर लटकावलेले पदार्थांचे मेन्यू कार्ड दिसत असे. कधी हाताने लिहिलेले तर कधी साईन बोर्डच्या रूपात. ग्राहक तो फलक वाचून त्याच्या आवडीचा पदार्थ मागवत असे. पदार्थाचे रंग-रूप तो पदार्थ टेबलावर आल्यावरच पाहायला मिळे. प्रकाशचित्रणाच्या जोरदार प्रगतीमुळे मेन्यू कार्डमध्ये प्रकाशचित्रांच्या माध्यमातून पदार्थ दिसू लागले. आणि खाद्यपदार्थ फोटोग्राफी या अजून एक फोटोग्राफी शैलीचा उदय झाला. खाद्यपदार्थांचे दृश्‍यरूप आकर्षक बनविण्यासाठी ही शैली मुबलक प्रमाणात वापरली जाऊ लागली. म्हणूनच "फूड फोटोग्राफी' ही व्यावसायिक फोटोग्राफीतील एक स्पेशलायझेशन म्हणून पुढे आली. फूड फोटोग्राफीमुळे उत्पादनांचा वापर जाहिराती, मासिके, पॅकेजिंग, मेन्यूज किंवा कूकबुकमध्ये केला जातो. "प्रोफेशनल फूड फोटोग्राफी' ही एक सहयोगी कला आहे. यात कला दिग्दर्शक, प्रकाश चित्रकार,अन्नप्रेमी कलाकार, फूडचा रचनाकार (स्टाइलिस्ट) यांच्या एकत्रित प्रयत्नातून चमचमीत पदार्थांची देखणी प्रकाशचित्रे प्रेक्षकांना बघावयास मिळतात. आज जाहिरातीमध्ये "फूड फोटोग्राफी' वापराचे प्रमाण प्रचंड आहे. जाहिरात केलेल्या खाद्यपदार्थांच्या, विशेषतः फास्ट फूडच्या आकर्षक जाहिराती तर कधीकधी अतिशयोक्त ठरू पाहतात. डेलिया स्मिथ या मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकार म्हणतात "Food is for eating, and good food is to be enjoyed... I think food is, actually, very beautiful in itself.' असे असूनही समोर असलेले एखाद्या खाद्यपदार्थाचे प्रकाशचित्र पाहताना प्रेक्षकाला त्याच्या वासाचा भास होऊ लागला व त्याला तो पदार्थ पटकन उचलून तोंडात टाकावा असे वाटले तरच त्या प्रकाशचित्रांचे ते यश ठरते.

क्रीडा प्रकाशचित्रण (Sports Photography) 
एडवर्ड जेम्स मयब्रिज या ब्रिटिश प्रकाशचित्रकाराने १९८० च्या दरम्यान प्रथमतः घोड्याच्या दौडीचे प्रकाशचित्रण केले. अतिशय कमी स्पीड असलेल्या (स्लो स्पीड फिल्म) फिल्मवर त्याने ही प्रकाशचित्रे टिपली त्यावेळी जगास प्रथमच कळले की घोडा प्रचंड वेगात धावताना काही क्षण त्याचे चारही पाय हवेत उचललेले असतात. मयब्रिजच्या या प्रयोगाने स्पोर्टस फोटोग्राफीचा पाया घातला गेला. आज जगाच्या कानाकोपऱ्यातल्या एखाद्या छोट्या गावातील कोणत्याही छोट्या क्रीडा सामन्यात आपल्याला कॅमेऱ्यावर मोठं-मोठ्या लेन्सेस लावलेले स्पोर्टस फोटोग्राफी करणारे प्रकाशचित्रकार दिसतात. प्रकाशचित्रणाची ही शाखा आजमावणाऱ्या फोटोग्राफर्सची संख्या वाढतीच आहे. ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमधील सर्व खेळ तसेच घोड्यांच्या शर्यती, कार शर्यती, टेनिस सामने, क्रिकेट सामने, सायकल व मोटारसायकल शर्यती अशा विविध प्रकारच्या खेळांचे प्रकाशचित्रण ही एक जबाबदारीची व प्रकाशचित्रकाराचा कस बघणारी गोष्ट असते. प्रकाशचित्रकाराला केवळ फोटोग्राफीचे संपूर्ण ज्ञान असून भागत नाही तर त्या त्या क्रीडा प्रकाराची खोलवर माहिती असणे आवश्‍यक ठरते. तरच त्या निर्णायक क्षणाची रोमांचक अशी प्रकाशचित्रे तो टिपू शकतो. सर्व सोयींनी युक्त कॅमेरा, मजबूत ट्रायपॉड व जास्त नाभीय अंतर असलेल्या विविध (टेली फोटो ) लेन्सेस हे त्याचे साहित्य असते तर वेगवेगळ्या दिशांनी येणारा उपलब्ध प्रकाश समर्थपणे वापरण्याची क्षमता ही त्याची जमेची बाजू ठरते. जमेच्या बाजू लक्षात घेऊनही आदर्श क्रीडा प्रकाशचित्र टिपणे ही एक कसरतच असते. त्यासाठी हवा संयम, प्रयत्न आणि प्रयत्न.

वन्यजीव प्रकाशचित्रण (Wild Life Photography)
कित्येक ऑफिसेसमध्ये भिंतींवर लावलेली अथवा टेबलावर ठेवलेली प्राणी अथवा पक्षी यांची प्रकाशचित्रे असलेली उत्तम दर्जाची कॅलेंडर्स आपण नेहमी पाहतो. ते वन्यजीवन प्रकाशचित्रण त्या प्रकाशचित्रकाराने त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात जाऊन केलेले असते. अशा प्रकारच्या प्रकाशचित्रणाला वन्यजीव प्रकाशचित्रण असे म्हणतात. 

फोटोग्राफी कौशल्याबरोबरच वन्यजीव प्रकाशचित्रकारांना त्या त्या क्षेत्राची इथ्यंभूत माहिती व तेथे वावरण्याचे कौशल्य अंगी असणे आवश्‍यक असते. वन्यजीवनाबद्दल फक्त आस्था असून उपयोग नाही तर त्याचा सखोल अभ्यास असणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, काही प्राणी संपर्क साधायला अवघड असतात आणि त्यांच्या कृतींचे अंदाज लावण्यात जराही चूक होऊन चालत नाही. त्यासाठी त्या पशूंचे वर्तन जाणून घेणे आवश्‍यक असते. कधी कधी काही प्रजातीचे प्रकाशचित्र घेताना पालापाचोळ्यात लपून / स्वतःला झाकून घेऊन तासन्‌तास बसून राहणे नशिबी येते. त्यावेळी संयमाची नितांत गरज असते. मूलभूत साधने वापरून वन्यजीव प्रकाशचित्रे घेता येतात पण बऱ्याच प्रकारच्या वन्यजीवनाच्या यशस्वी फोटोग्राफीसाठी विशेष उपकरणांची आवश्‍यकता असते, जसे की कीटकांसाठी मॅक्रो लेन्स, जंगली प्राण्यांसाठी जास्त नाभीय अंतराच्या टेली फोटो लेन्स, समुद्री जीवनासाठी लांब फोकल लांबीचे लेन्स आणि पाण्याखाली वापरता येणारे जलावरोधक कॅमेरे. तथापि, एक उत्तम वन्यजीव प्रकाशचित्र टिपण्यास योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकाशात व योग्य उपकरणांसह असणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबरच पशू वर्तनाची चांगली समज असणे म्हणजे तुम्ही बाजी मारली असे समजायला काहीच हरकत नाही. हेन्री कार्तीय ब्रेसां या प्रकाशचित्रकाराने असे म्हणून ठेवले आहे की,

To photograph is to hold one's breath, when all faculties converge to capture fleeting reality. It's at that precise moment that mastering an image becomes a great physical and intellectual joy. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या