प्रकाशचित्रणाचे प्रकार : भाग ३

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 18 मे 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

प्रकाशचित्रकलेच्या काही महत्वाच्या प्रकारांचे अवलोकन आज आपण करणार आहोत. विविधतेने परिपूर्ण अशा या कलेच्या वेगवेगळ्या प्रकारात लागणारे कॅमेरे व इतर साहित्य यात बदल असतोच, पण त्यासाठी लागणारी कौशल्येही बदलत असतात हे आपण पाहिले. असे असले तरीही या कलेचे प्राथमिक तांत्रिक ज्ञान करून घेतल्यावर मगच आपल्या आवडीची शाखा निवडण्याचे भान ठेवणे अगत्याचे आहे.

लग्नसमारंभ-कार्य प्रकाशचित्रण (Wedding -Function Photography) 
कोणत्याही समारंभाचा अविभाज्य असा घटक कोणता असे आज विचारले तर "फोटोग्राफर' हे उत्तर यायला फारसा वेळ लागणार नाही. त्यातही जर का तो समारंभ म्हणजे एखादा विवाह असेल तर त्यात आजकाल फोटोग्राफर्सची पूर्ण टीमच काम करताना तुम्हाला आढळेल. टीममधील काही जण ज्यांचा विवाह आहे त्यांची प्रकाशचित्रे टिपत असतील, काही जण आलेल्या पाहुण्यांची तर काही जण ‘कॅंडिड’ छायाचित्रे टिपण्याच्या गडबडीत दिसतील. डिजिटल फोटोग्राफीच्या वरदानाने आज लग्न-समारंभात अक्षरशः हजारोंच्या संख्येने फोटो टिपले जातात. पूर्वी एक कॅमेरा व फ्लॅशगन एवढे साहित्य पुरेसे असे. पण आज मोठाले स्टुडिओ फ्लॅश, सॉफ्टबॉक्‍सेस, ब्युटीडिश, एलईडी लाईट्‌स यांचा वापर करून विवाहाचे ‘सुवर्ण क्षण’ कॅमेराबद्ध होत असतात. या प्रकारच्या फोटोग्राफीतही पारंपरिक, पत्रकारितेच्या अंगाने जाणारी, फॅशनस्टाईलची व स्टुडिओमध्ये टिपता येणारी प्रकाशचित्रे असे भाग दिसून येतात. प्रकार कोणताही असला तरीही त्याचा महत्त्वाचा गाभा म्हणजे त्या समारंभाच्यावेळचे क्षण. या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये जो संपूर्ण भर हवा तो म्हणजे समारंभस्थानी दिवसभर जे मंगलमय व आनंददायी वातावरण आहे ते जसेच्या तसे कॅमेराबद्ध करणे. जेणेकरून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या त्या क्षणांना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून पुन्हा अनुभवता यावे. आज समारंभातील अशा चित्रचौकटी नवनवीन प्रकारच्या अल्बममधून आपल्या समोर येतात त्यावेळी त्यांचे मनसोक्त कौतुक न झाले तरच नवल. हा एक वेळेचा "इव्हेंट' असल्याने फोटोग्राफरला कोणत्याही अनपेक्षित घटनेला यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. कोणत्याही समारंभाचे प्रकाशचित्रण हे थकवून टाकणारे असतेच पण नेहमीच काही ना काही शिकवणारेही असते. उत्पन्नाची उत्तम खात्री असल्याने आज या शाखेत येऊ पाहणाऱ्या प्रकाशचित्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे.

कलात्मक प्रकाशचित्रण (Fine Art Photography)
या प्रकारच्या प्रकाशचित्रणाला काही खास किंवा सर्वमान्य अशी व्याख्या सांगता येणार नाही. कॅमेऱ्याच्या मागे उभ्या असलेल्या सर्जनशील व्यक्तीच्या दृष्टीनुसार तयार होणारी व ज्यामध्ये विषयाचा यथार्थपणा पकडणे हा अंतिम उद्देश नसून त्या विषयाकडे नावीन्यपूर्ण दृष्टीने पाहण्याची नवी संधी निर्माण करणारी प्रकाशचित्रे असे या प्रकारचे वर्णन करता येईल. कलात्मक प्रकाशचित्रण म्हणजे कॅमेऱ्याने टिपलेली कोणतीही प्रतिमा ज्याचा उद्देश्‍य फक्त सौंदर्यनिर्मिती हा असतो अशा प्रकारेही या प्रकाराचे वर्णन करता येईल. प्रकाशचित्रकलेच्या शोधानंतर अनेक फोटोग्राफर कलाकार हे दर्शविण्यासाठी उत्सुक होते, की हे नवीन माध्यम चित्रकला आणि पेंटिंग या कलांप्रमाणेच व तितकेच कलात्मक असू शकते. आजही अनेक प्रकाशचित्रकार त्यांच्या कलेद्वारे हे वेळोवेळी सिद्ध करीत असतातच. अगदी साध्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानेही उत्तम आशयाची कलात्मक प्रकाशचित्रे टिपता येऊ शकतात. मात्र तुमची शोधक नजर सतत तसा चित्र-विषय शोधणारी हवी. अनेक नामवंत कलाकार, चित्रकार व लेखकांच्या प्रतिक्रियांमुळेही प्रकाशचित्रणाच्या या प्रकाराला ‘आर्ट’ ही मान्यता मिळण्यास हातभार लागला आहे. प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो म्हणतो ‘फोटोग्राफी गवसली आहे. आता मी स्वतःला मारू शकतो. माझ्याकडे आता शिकण्यासाठी काहीच नाही.’ 
तर जॉन स्टेन्बेक हा लेखक म्हणतो ‘कॅमेरा हे फक्त एक यांत्रिक उपकरण आहे असे नाही. लेखणीप्रमाणेच, ठरवले तर तो वापरणाऱ्या मनुष्याच्या मनाला आणि हृदयाला अभिव्यक्त करू शकतो.’ थोडक्‍यात काय तर उत्कृष्ट कलात्मक प्रकाशचित्रे ही विषयाच्या यथार्थतेच्या पलीकडे जाऊन सौंदर्यपूर्ण आशय मांडणारी हवीत.

सूक्ष्म प्रकाशचित्रण (Macro Photography) 
आपल्याला रोजच्या जीवनात जी दृश्‍य दिसतात ती "कॅमेरा" नावाच्या जादुई यंत्राने आपण अंकित करू शकतो, ‘फ्रिज’ करू शकतो. पण कधी कधी अशी एखादी गोष्ट आपल्याला कॅमेऱ्याच्या नजरेतून बारकाईने पाहिल्यावरच आढळते. आपण नकळत त्या दृश्‍याने चकित होऊन ते चित्रित करतो. कॅमेऱ्याने आपल्याला त्याच्या नजरेतून ते दृश्‍य पाहण्यास प्रोत्साहित केलेले असते. मॅक्रो फोटोग्राफी हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अतिशय छोट्या वस्तू, किडे व छोटी फुले चित्रित करण्यासाठी जे प्रकाशचित्रण केले जाते त्याला मॅक्रो फोटोग्राफी असे म्हणता येईल. दररोजच दिसणाऱ्या वस्तू अथवा दृष्य मॅक्रो फोटोग्राफीने विलक्षण वेगळी दिसू लागतात. मायक्रो शब्दाचा अर्थ ‘सूक्ष्म’ असा आहे, तर मॅक्रो शब्दाचा अर्थ ‘मोठा’. तर मग प्रकाशचित्रणात हे दोन्ही कसे वापरले जातात? जर आपल्याला एखाद्या सूक्ष्म गोष्टीचा फोटो मोठ्या आकारात टिपायचा आहे तर त्या गोष्टीच्या अगदी जवळ जाऊन तो चित्रित करावा लागतो. म्हणजेच आपला ‘दृश्‍य-कोन’ त्यावेळी बदलावा लागतो. चित्रविषय मायक्रो व त्यासाठी दृश्‍य-कोन मॅक्रो अशी ती स्थिती असते. (टेलि लेन्सने दुरून टिपलेला एखादा फोटो आणि मॅक्रो लेन्सने विषयाच्या अगदी जवळ जाऊन टिपलेला फोटो यात तपशिलात खूपच तफावत येते कारण तेथे दृश्‍य-कोन वेगवेगळे असतात.) जवळपास सर्व आधुनिक, प्रगत कॉम्पॅक्‍ट कॅमेऱ्यात आपल्याला चित्रविषयाच्या एक इंचापर्यंत कॅमेरा नेऊन फोकसिंग करता येऊ शकते. त्यामुळे अशा कॅमेऱ्याने आपल्याला मॅक्रो फोटोग्राफी करता येते. डीएसएलआर कॅमेऱ्यात मॅक्रो क्षमता कॅमेऱ्यावर नाही तर लेन्सवर अवलंबून असते. मॅक्रो लेन्स तिच्या क्षमतेच्या विषयाच्या जवळ जाऊ शकतात. अशा लेन्सवर मॅक्रो लेन्सचे किमान फोकसिंग अंतर आणि तांत्रिक निर्देशांकामध्ये मॅक्रोचे गुणोत्तर १:१ असे दर्शविलेले असते. थोडक्‍यात उत्तम प्रतीची मॅक्रो लेन्स ही उत्तम प्रतीच्या मॅक्रो प्रतिमा घेण्यास आवश्‍यक सामग्री ठरते. 
म्हणूनच कॅमेऱ्याच्या नजरेतून प्रतिमा पाहून एखाद्या गोष्टीस एक्‍सप्लोर करण्याचा अनोखा, मजेदार मार्ग म्हणजे सूक्ष्म प्रकाशचित्रण किंवा मॅक्रो फोटोग्राफी.

(क्रमश:)

फोटो फीचर

संबंधित बातम्या