प्रकाशचित्रणाचे प्रकार : भाग ४

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 15 जून 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

रस्त्यावरील प्रकाशचित्रण (Street Photography) 
प्रकाशचित्रणाचा हा प्रकार म्हणजे मूलभूतपणे रस्त्यावर सार्वजनिक परिस्थितीत केलेली फोटोग्राफी. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात या प्रकारच्या प्रकाशचित्रणास एक वेगळेच महत्त्व व लोकप्रियता प्राप्त झाली आहे. मतमतांतरे आणि दृष्टिकोन भिन्न असतील, परंतु मुळात स्ट्रीट फोटोग्राफी ही वास्तविक जीवनाचे एक चित्रण आहे. ज्यामध्ये दृश्‍य सौंदर्यशास्त्रांच्या आधारे जनजीवनाची चहल-पहल परिणामकारकतेने चित्रित करून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावता येतो. तत्काळ भावनिक किंवा दृष्य प्रतिसादास उद्युक्त करणारी दृश्‍ये, विशेषतः: विनोदाद्वारे किंवा विचित्र, अवास्तव घडामोडींसह रस्त्यावर दिसणारी दृश्‍ये प्रकाशचित्रकाराला खुणावत असतात. अशा प्रकाशचित्रांची मालिका त्याने सादर केली तर एका विलक्षण जगाचे दर्शन प्रेक्षकांना घडू शकते. 

स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे काही अहवाल नाही. रस्त्यावरील चित्रण करणाऱ्या प्रकाशचित्रकारासाठी विशिष्ट विषयावर दस्तऐवज करण्याची आवश्‍यकता नसते. त्याची मुख्य चिंता ही सर्वसाधारण जनजीवन असते. त्यासाठी अंतिम स्वरूपातील दृष्य घटकांची निवड त्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. विशिष्ट प्रकारचे साहित्य नाही, एकही प्रॉप किंवा वेगळी प्रकाशयोजना नाही, तयारी करण्यास वेळ नाही आणि आदर्श पूर्वकल्पना नाहीत अशी ही प्रक्रिया आहे. बऱ्याच प्रकाशचित्रकारांसाठी तर स्ट्रीट फोटोग्राफी हा एक 'झेन' अनुभवच असतो.

हवाई प्रकाशचित्रण (Aeriel Photography)  
प्रकाशचित्रणाच्या शोधानंतर काही वर्षानंतर म्हणजे १८५८ या वर्षी लगेचच मानवाने हवाई चित्रणाचा पाया घातला. आज फोटोग्राफीच्या तंत्राबरोबरच हवाई उड्डाणाचे तंत्रही अतिप्रगत अशा अवस्थेमध्ये पोहोचले असल्याने आपल्याला डोळ्यांस सुखकारक अशा लाखो प्रतिमा पाहायला मिळतात. त्यावेळी असणारे या प्रकारच्या प्रकाशचित्रणाचे ‘ग्लॅमर’ आज तसूभरही कमी झालेले नाही. उलट ते वाढतेच आहे. पण काही भूभागावर असे चित्रण करण्यास सरकारी परवानग्यांचे सव्यापसव्य करावे लागते. 

हवाई प्रकाशचित्रण म्हणजे एखाद्या विमानातून किंवा इतर उडणाऱ्या वाहनातून प्रकाशचित्रण. हवाई प्रकाशचित्रणासाठी विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहित हवाई वाहने (ड्रोन), फुगे, रॉकेट्‌स, पतंग, पॅराशूट वापरली जातात. ड्रोनसारख्या यंत्रावर कॅमेरे बसवून जमिनीवरून त्याच्यावर दूरस्थपणेही नियंत्रण करून फोटोग्राफी करता येते. 

हवाई फोटोग्राफीसाठी प्रकाशचित्रकारास प्रकाशचित्रणाचे बेसिक तंत्र माहिती असणेही पुरेसे असते. सर्वसामान्यपणे हवाई प्रकाशचित्रण हे दिवसाच्या उत्तम प्रकाशात केले जाते. जमिनीची प्रकाशचित्रे घेताना कॅमेरा व जमीन यांच्यात हजारो फुटांचे अंतर असते. त्यामुळे कॅमेऱ्याचे लेन्स ही नेहमी "इन्फिनिटी' अंतरावर फोकस केली जाते. मोठ्या भूभागाचे प्रकाशचित्र घेताना वाईड अँगल लेन्स वापरले जाते, ज्यात डेप्थ ऑफ फील्ड जास्त मिळते तसेच अंतर जास्त असल्याने डेप्थ ऑफ फील्डही जास्तच मिळणार, म्हणजे राहता राहिले शटरस्पीडचे सेटिंग. तर विमानाच्या स्पंदनापेक्षा जास्त वेगाचा शटरस्पीड कॅमेऱ्यावर ठेवला की कॅमेरा हलण्याची शक्‍यताही नाहीशी होते. अशा प्रकारे सेटिंग करून हवाई प्रकाशचित्रण उत्तमरीत्या करू शकते. फक्त तुम्हाला एक विमान व हवाई प्रकाशचित्रणाची परवानगी उपलब्ध हवी.

पाण्याखालील प्रकाशचित्रण (Underwater Photography)
आपल्या या पृथ्वीचा साधारण ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे हे आपण जाणतो. उरलेल्या २९ टक्के भागावरून केलेल्या प्रकाशचित्रणाविषयी आपण बरेच जाणून घेतले. आता थोडे पाण्याखाली! 

जमिनीवरील जीवनामध्ये जितकी विविधता आहे कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच विविधरंगी अशी सुंदर ती दुसरी दुनिया असे आपण पाण्याखालच्या दुनियेचे वर्णन करू शकतो. अशा दुनियेचे प्रकाशचित्रण म्हणजे पाण्याखालील प्रकाशचित्रण. स्कुबा डायव्हिंग करून, स्नोर्केलिंग करताना, पाण्याखाली पोहताना अथवा पाण्याखाली चालणाऱ्या वाहनातून आपण हे प्रकाशचित्रण करू शकतो. अतिरोमांचक आणि दुर्मिळ अशी फोटोग्राफिक संधी म्हणजे हे प्रकाशचित्रण. हे चित्रण यशस्वी करण्यासाठी काही विशेष उपकरणे आणि तंत्रे वापरली जातात. जलावरोधी आवरण असलेले कॅमेरे व दूरपर्यंत प्रकाशझोत देऊ शकतील अशा जलावरोधी फ्लॅशगन्स या दोन्हीची प्रामुख्याने आवश्‍यकता असते. रंगीबेरंगी मासे, समुद्री सस्तन प्राणी, कोरल्स हे सर्वसामान्य विषय आहेतच , परंतु बरेच प्रकाशचित्रकार बुडालेल्या जहाजांचा शोध, जलमग्न गुहेतील जीवन , पाण्याच्या पृष्ठभागाखालील भूदृश्‍ये , समुद्री जल, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि सहकाऱ्यांची पोट्रेट अशा विविध प्रकारची फोटोग्राफी करण्याचे ध्येय घेऊन पाण्याखाली उतरताना दिसतात. जास्त करून स्कूबा डायव्हिंग करताना पाण्याखालील फोटोग्राफी केली जात असल्याने, हे डाइव्हर-प्रकाशचित्रकार फोटोग्राफीच्या उत्तम तंत्राबरोबरच स्कूबा डायव्हिंगच्या तंत्रातही तितकेच कुशल असावे लागतात. ज्यामुळे डायव्हिंग व फोटोग्राफी या दोन्ही क्रिया सुरक्षितपणे पार पडता येतात. चांगल्या स्कूबा तंत्रामुळे प्रतिमांची गुणवत्ता सुधारते, कारण असे डाइव्हर्स समुद्री जीवनात ढवळाढवळ होणार नाही, पर्यावरणास नुकसान पोहोचणार नाही याची चांगली काळजी घेतात व तेथील जीवसृष्टी घाबरून जाण्याची शक्‍यता कमी होत जाते. ज्यायोगे नैसर्गिक प्रकाशचित्रे मिळणे सोपे होते. 

प्रकाशचित्रणाच्या या महत्वाच्या शाखांबरोबरीनेच इतरही काही प्रकार अस्तित्वात आहेत. आपली आवड व त्यासाठी आपण काढू शकणारी सवड यांची सांगड घालणे इतकेच महत्त्वाचे आहे.

प्रकाशचित्रणाच्या या महत्त्वाच्या शाखांच्या बरोबरीनेच इतरही काही प्रकार अस्तित्वात आहेत. रात्रीचे प्रकाशचित्रण ( Night Photography ), नवजात शिशूंचे प्रकाशचित्रण ( Newborn Photography), कौटुंबिक प्रकाशचित्रण (Family Photography), इन्फ्रारेड प्रकाशचित्रण (Infrared Photography), कृष्ण-धवल प्रकाशचित्रण (Black & White Photography), वैद्यकीय प्रकाशचित्रण (Medical Photography), खगोलशास्त्रीय प्रकाशचित्रण (Astro Photography), टाइम लॅप्स प्रकाशचित्रण (Time lapse Photography), जीवनशैली प्रकाशचित्रण (Lifestyle Photography) यासारख्या शाखाही एखाद्याला आकर्षून घेऊ शकतात. पण त्यासाठी आपली आवड व आपण काढू शकणारी सवड यांची सांगड घालणे हे फार महत्त्वाचे आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या