...आणि घुंगरू स्तब्ध झाले!

पूजा सामंत
सोमवार, 13 जुलै 2020

बॉलिवूडच्या नावाजलेल्या नृत्यदिर्ग्दशक सरोज खान आज आपल्यात नाहीत! एक उत्साही-चैतन्यमयी आणि नृत्यातील एक प्रख्यात व्यक्तिमत्त्व चंदेरी दुनियेला सोडून गेले...

बॉलिवूडच्या नावाजलेल्या नृत्यदिर्ग्दशक सरोज खान आज आपल्यात नाहीत! एक उत्साही-चैतन्यमयी आणि नृत्यातील एक प्रख्यात व्यक्तिमत्त्व चंदेरी दुनियेला सोडून गेले...

सरोज खान यांचे खरे नाव निर्मला नागपाल. १९४८ मध्ये पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. नृत्याची कला त्यांच्या रक्तातच होती. भिंतीवर पडलेली आपली सावली पाहून त्या नृत्यासाठी प्रेरित होत. प्रत्यक्ष जीवनात अनेक चढ-उतार, हालअपेष्टा-उपेक्षा यांचा सामना केला. लहान असताना त्यांनी काही सिनेमांत बालकलाकार म्हणून कामही केले. पण नंतर मात्र त्यांच्यातील नृत्याचे कौशल्य पाहून त्या काळातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सोहनलाल यांनी सरोज खान यांना ग्रुप डान्सरची संधी दिली! 

त्या काळात चाळिशीत असलेले सोहनलाल यांनी सरोजमध्ये असलेले नृत्यातील पदलालित्य ओळखले आणि त्यांना आपले साहाय्यक नृत्यदिग्दर्शक केले. सरोज खान यांचे वय तेव्हा जेमतेम १३ होते. सरोज खानशी सोहनलाल यांनी विवाहही केला. त्या वेळी ते ४३ वर्षांचे विवाहित आणि पिताही होते! सरोज खान यांना पुढे तीन अपत्ये झाली. त्या काळात बॉलिवूडमध्ये फक्त पुरुष नृत्यदिग्दर्शक असत. पत्नी झालेल्या आपल्या साहाय्यक नृत्यदिग्दर्शिकेने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात काम करावे, यासाठी सोहनलाल यांची मानसिक तयारी नव्हती. संसाराचा गाडा, अहंकार यांच्यापासून सावरताना त्यांनी कसरत केली, पण शेवटी त्या सोहनलाल यांच्यापासून विभक्त झाल्या. पुढे त्यांनी सरदार रोशनलाल खान या व्यापाऱ्याशी लग्न केले. सरोज यांचे वडील त्यांना त्या लहान असताना निर्मला न म्हणता सरोज अशी हाक मारत. खान यांच्याशी दुसरा विवाह केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सरोज खान या नव्या नावाने घडवली. त्या काळी बॉलिवूडमध्ये त्या एकमेव महिला नृत्यदिग्दर्शक होत्या. पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःची वहिवाट निर्माण करण्यासाठी सरोज खान यांना बराच संघर्ष करावा लागला. माधुरी दीक्षित, श्रीदेवी, जुही चावला, अनिल कपूर, प्रीती झिंटा अशा अनेक टॉपच्या कलाकारांना त्यांनी डान्समध्ये तरबेज केले. अनेकांच्या स्टारडममध्ये सरोज खान यांचा सिंहाचा वाटा आहे.

सरोज खान बॉलिवूडमध्ये गेली ५० वर्षे सक्रिय होत्या. अनेक गाजलेले चित्रपट, अनेक मोठे पुरस्कार सोहळे आणि वैयक्तिक नृत्याचे धडे देणाऱ्या सरोज खान यांचे एकूणच भारतीय सिनेमांच्या नृत्यात फार मोठे योगदान आहे. ‘लार्जर दॅन लाइफ’ ठरलेल्या डान्सेसमध्ये सरोज खान यांनी ‘जान’ ओतली. नृत्यांना ‘ग्रेस’ दिली. त्यांच्यासाठी नृत्य म्हणजे शारीरिक कवायत नव्हती. चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सना त्या खूप महत्त्व देत. म्हणूनच त्यांच्या नृत्यांमध्ये नायिका अतिशय बोलक्या आणि सुंदर दिसत. बॉलिवूडमध्ये मास्टरजी या लाडक्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सरोज खान यांच्याकडे असलेली नैपुण्यता त्यांना इतरांपासून वेगळी ठरवते! अभिनेत्रींना पडद्यावर नाचवताना त्या नायिकेला मादक, पण तरीही अश्लीलतेपासून दूर ठेवत. ‘धक धक करने लगा’ (बेटा), ‘एक दोन तीन’ (तेजाब), ‘हमको आजकल है इंतेजार’ (सैलाब), ‘चोली के पीछे’ (खलनायक), ‘तम्मा तम्मा लोगे’ (थानेदार) अशी अनेक नृत्ये डोळ्यांसमोर येतील. सरोज खान यांनी पडद्यावर आपल्या कलाकारांना नाचवताना ‘हूक’ पोज दिली आणि मग कालांतराने बॉलिवूडमध्ये तो ट्रेंड झाला! माधुरी दीक्षित सरोज खानची लाडकी शिष्या. तेजाबमधील एक दोन तीन.. या डान्सची रिहर्सल सरोज खान यांनी तिच्याकडून १५ दिवस करून घेतली. रिहर्सल संध्याकाळी संपली की सरोज खान घरी जात, पण माधुरी मात्र झपाटल्यासारखी मास्टरजींनी दाखवलेल्या स्टेप्स पर्फेक्शनसाठी पुढे दोन-तीन तास करत राही. डान्सवर अशी भक्ती, श्रद्धा आणि आस्था असणारी माधुरी सरोज खानची लाडकी आणि गळ्यातील ताईत झाली! तेजाबपासून माधुरी-सरोज खान यांचा सुरू झालेला प्रवास थेट माधुरीच्या दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘कलंक’ सिनेमापर्यंत कायम राहिला! श्रीदेवीच्या ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘लम्हे’ अशा बहुतेक सिनेमांना सरोज खान यांचे नृत्यदिग्दर्शन होते. सरोज खान यांनी १९८० ते २०१० अशी ३० वर्षे अनेक कलाकारांना स्टारडम मिळवून दिले. निर्मात्यांना त्यांची डेट आधी घ्यावी लागे इतक्या त्या बिझी होत्या. 

कलाकारांमधील अचूक गुण आणि दोष ओळखण्यात त्या वाकबगार होत्या. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील ‘मेहंदी लगा के रखना’ या डान्सच्यावेळी काजोल उत्कृष्ट अभिनेत्री असली, तरी तिने कधी डान्स शिकलेला नाही, तिला नृत्याचे अंग नाही हे सरोज खान यांच्या ध्यानात आले. नाचता न येणाऱ्या काजोलचा हा दोष झाकला जावा म्हणून त्यांनी काजोलला सीटिंग पोजेस दिल्या आणि इतरांना भांगडा डान्स करताना दाखवले. फार लहानशा जागेत या प्रसिद्ध गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची आणि काजोलला बसवून ठेवून हे गीत सुपर हिट करण्याची किमया सरोज खान या सुपर वूमनने साधली होती! या कारणांसाठीदेखील सरोज खान यांना सलाम केला पाहिजे. 

अनेकांना स्टारडम मिळवून दिलेल्या सरोज खान यांच्याकडे हल्ली सिनेमे नव्हते. काही विद्यार्थ्यांना त्या डान्स शिकवत असत. आपल्या कफनचे पैसेदेखील देण्याची आर्थिक जबाबदारी आपल्या लेकीवर पडू नये म्हणून तेही पैसे त्यांनी लेकीकडे दिले होते. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्म फेअर पुरस्कार मिळवणाऱ्या सरोज खान यांची कमतरता कायम जाणवत राहील!

संबंधित बातम्या