‘विविध भूमिकांमधून मी घडले’

पूजा सामंत
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

साठ ते ऐंशीच्या दशकांत सिनेमांमध्ये आपल्या नृत्यातील अदाकारीने आठवणीत राहिलेल्या अभिनेत्री जयश्री टी या खरे तर मराठी. तळपदे हे त्यांचे मूळ आडनाव. त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी बोलताना कुठेही ‘फिल्मी’पणा किंवा गर्व जाणवत नाही... 
 

तुम्ही अभिनयाकडे कशा वळलात?
जयश्री टी ः मी आणि माझी बहीण मीना आम्ही दोघींनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच कथ्थक शिकायला सुरुवात केली. माझे आई-वडील दोघेही मराठी रंगभूमीवरचे कलावंत असल्याने अभिनयाचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले असावे. आम्ही समृद्ध बालपण अनुभवले. मला डॉक्टर व्हायचे होते, पण अभिनयाच्या संधी एकापाठोपाठ आल्या आणि अनपेक्षितपणे मी अभिनयात कायमची आले. एकदा स्टेजवर नाचताना पाहूनच ध्यानीमनी नसताना ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपट मिळाला आणि माझे नाव झाले, कारण नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. नव्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या, पण आम्हाला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. सिनेमाची कथा उत्तम आहे का, दिग्दर्शक, बॅनर, आपली भूमिका याविषयी काहीही कल्पना नसे. मला डान्स करताना पाहूनच प्रख्यात कथ्थक गुरू गोपीकृष्ण यांनी मला बोलावून म्हटले, ‘तुझे नृत्यातील कसब उत्कृष्ट आहे. तुला इच्छा असल्यास मी तुला कथ्थकचे धडे देण्यास तयार आहे.’ त्यांचे स्तुतिपर दोन शब्द मला खूप प्रोत्साहन आणि जबाबदारीची जाणीव देऊन गेले. बालकलाकार म्हणून संगीत ‘सम्राट तानसेन’, ‘जमीन के तारे’, ‘प्यार की प्यास’ हे चित्रपट मी शाळेत शिकत असताना केले.

दिग्दर्शक अमित बोस त्यांच्या ‘अभिलाषा’ या चित्रपटामधील एका डान्स सिक्वेन्ससाठी डान्सर युवती शोधत होते. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा नंदाजी मुख्य अभिनेत्री असलेल्या ‘अभिलाषा’ या सिनेमात डान्सर म्हणून झाला आणि व्यक्तिगत जीवनात नंदाजी यांचे बंधू जयप्रकाश यांच्याशी मी विवाहबद्ध झाले.

माझा डान्स सिनेमाच्या शेवटी शेवटी पिक्चराईज केल्याने माझे नाव चित्रपटाच्या क्रेडिटलाईन्समध्ये येणार नाही, असे निर्मात्याने म्हटल्याने माझ्यासारख्या नवोदित डान्सरचा उत्साह कोमेजला! 

तुमच्यावर कधी अन्याय झालाय का?
जयश्री टी ः हो अनेकदा! माझी कारकीर्द जोमात सुरू झाली खरी, पण ‘परफॉर्मन्स ओरिएंटेड’ भूमिका फार वाटेला येत नव्हत्या. अभिनय, डान्स, तोंडाला मेकअप फासणे, डान्ससाठी फिल्मी पण फॅन्सी पोशाख घालणे हे आवडू लागले होते. त्यातूनही मार्गदर्शन करायला मेंटॉर, गॉडफादर यातले कुणी नव्हते. डान्ससाठी मला बोलावले जाई आणि माझ्यातर्फे वडील होकार देत असत. डान्समध्ये माझा वकूब चर्चिला जाऊ लागला. पण लवकरच माझ्या कानांवर येऊ लागले, की माझ्या काळातील काही नामी डान्सर अभिनेत्री मी असलेल्या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर डान्स करण्यास नकार देऊ लागल्या होत्या. त्यांना माझ्यामुळे असुरक्षित वाटू लागले होते. त्या काळचे काही प्रख्यात खलनायक अभिनेते त्यांच्या काही परिचित महिला कलाकारांची शिफारस करू लागले. पण याही परिस्थितीत मी जे चित्रपट मिळत होते ते केले. कारकिर्दीच्या एका वळणावर माझ्या नावाचा आग्रह निर्माते-वितरक करू लागले, तेव्हा मात्र मला कामे मिळू लागली. ज्यांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांच्याविषयी मी कधीही आकस ठेवला नाही.

कुठल्या गोष्टीची खंत वाटते का?
जयश्री टी ः एक खंत मात्र आजही आहे. निर्माता दिग्दर्शक मोहन सैगल यांनी त्यांच्या नव्या ‘सावन भादो’ (१९७०) सिनेमासाठी मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी मला साईन केले आणि सेकंड लीड भूमिकेसाठी भानुरेखा गणेशन या दाक्षिणात्य युवतीची (ज्येष्ठ अभिनेत्री रेखा) निवड केली. पण नियतीच्या न्यायालयात रेखाचे पारडे जड होते. गावरान युवतीच्या व्यक्तिरेखेत रेखा शोभेल आणि शहरी युवतीच्या भूमिकेत मी चपखल बसेन असा कौल त्यांच्या मनाने दिला. अगदी शेवटच्या क्षणी बदल झाले. रेखा लीड ॲक्ट्रेस आणि मी सेकंड लीड ठरले. सावन भादो सिनेमाला घवघवीत यश मिळाले. या चित्रपटातील सगळी गाणी सगळ्यांच्या ओठी आली.  
रेखाला या सिनेमाने स्टारडमकडे नेले. माझ्या नशिबी हा सुखद योग नव्हता! 

कारण प्रत्येक कलाकाराला मुख्य नायिका होण्याची सुवर्णसंधी आयुष्यात वारंवार मिळत नाही. माझ्या जीवनातली ही संधी अशी निसटली आणि पुढे मुख्य नायिका होण्याची संधी मला मिळाली नाही. नायिका होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. असो! पण सहनायिका म्हणा अथवा डान्सर म्हणा, चरित्र नायिका म्हणा, मी घडलेच. माझे नाव, माझे नृत्य, माझ्या भूमिका तरीही गाजल्या, हे ही नसे थोडके!

तुम्ही वेगवेगळ्या भाषांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
जयश्री टी ः वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका मला करायला मिळाव्यात, हा पूर्वनियोजित संकेत असावा. साहाय्यक कलाकार म्हणून ६०० हिंदी चित्रपट आणि २०० प्रादेशिक चित्रपट करायला मिळणे ही सुवर्ण संधी होती, असे मी मानते. फक्त नायिकेच्या भूमिका केल्या असत्या, तर कदाचित त्या १०० झाल्या असत्या. तामीळ, तेलगू, मल्याळी, कन्नड, आसामी, गढवाली, गुजराती, भोजपुरी, इंग्रजी अशा सगळ्या भाषांमधून अक्षरशः उत्तम व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत गेली. जणू मी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक झाले.

‘खिलौना’, ‘कहानी किस्मत की’, ‘जुगनू’, ‘ज्वार भाटा’, ‘शर्मिली’ या सगळ्याच चित्रपटांमधील माझ्या भूमिका आजही आठवणीत आहेत. आज असे वाटते, फक्त नायिकेच्या साच्यात अडकले असते तर कॉमेडी, खलनायिका, शहरी, खेडवळ, डान्सर अशा बहुविध भूमिका कशा साकार केल्या असत्या? जे घडते ते चांगल्यासाठीच! मराठी चित्रपट ‘बायांनो नवरे सांभाळा’ आणि ‘ह्योच नवरा पाहिजे’ यात मला मध्यवर्ती नायिकेची भूमिका मिळाली होती.

तुम्ही आणि तुमची बहीण मीना तळपदे एकाचवेळी अभिनय क्षेत्रात होतात. 
जयश्री टी ः मीनाने नेहमीच सोबर-संयत भूमिका केल्या. मीनामध्ये पोटेन्शिअल नक्कीच होते, पण बऱ्याचदा ती बहिणीच्या भूमिकांमध्ये अडकली. अनेक चित्रपटांमध्ये मीनाच्या भूमिका खूप गाजल्या.

प्रसिद्ध नृत्यांगना हेलन यांनीही तुमच्या नृत्यकौशल्याची प्रशंसा केली होती ना?
जयश्री टी ः हो.. माझ्यासाठी तो भारावून टाकणारा क्षण होता. एका पत्रकार परिषदेमध्ये प्रख्यात नृत्यांगना हेलन यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला, ‘हेलनजी, तुमच्या मते तुमच्या तोलामोलाची डान्सर कोण असेल?’ यावर हेलन यांनी म्हटले, ‘जयश्री टीला पर्याय नाही!’ हेलन यांचे हे गौरवोद्‍गार माझ्यासाठी लाखमोलाचे आहेत!

तळपदे हे मराठमोळे नाव असताना जयश्री टी असे नाव ऑन स्क्रीन ठेवण्याचे कारण काय?
जयश्री टी ः मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले, त्या वेळी जयश्री शांताराम (व्ही शांताराम यांची मुलगी, अभिनेत्री), जयश्री गडकर या जयश्री नामक अभिनेत्री आधीपासूनच प्रसिद्ध होत्या. माझे तळपदे आडनाव हिंदी इंडस्ट्रीमध्ये उच्चारण्यासाठी कठीण होऊ लागले. आडनाव वेडेवाकडे उच्चारले जाण्यापेक्षा जयश्री टी असे सुटसुटीत करून टाकले. जयप्रकाश कर्नाटकी यांच्याशी लग्न झाल्यानंतरही माझे आडनाव मी बदलले नाही. १९८९ मध्ये माझे लग्न झाले. आमचा प्रेम विवाह नाही बरं का! आम्ही दोघे या क्षेत्रातील, पण एका मित्राने आम्हा दोघांच्या संमतीने आमचा विवाह ठरवला. त्यांच्याकडून नंदाताईंनी होकार दिला आणि माझ्याकडून माझ्या आईवडिलांनी! जयप्रकाश यांच्या सहकार्यामुळे वैयक्तिक आयुष्य, मातृत्व आणि अभिनय हा तिहेरी गोफ साधता आला. १९९१ मध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला. मग मी करिअरमधून ब्रेक घेतला आणि पूर्ण वेळ मातृत्वासाठी दिला. त्यानंतर काही वर्षांतच जयप्रकाश यांनी टीव्ही मालिकांची निर्मिती सुरू केली. ‘अर्धांगिनी’, ‘अपराजिता’, ‘आहुती’ या शोजमध्ये माझे परफॉर्मन्सेस होते. टीव्हीमध्ये अभिनय ही माझ्यासाठी दुसरी, तरीही आनंददायी इनिंग होती. व्यक्तिगत आयुष्य आणि करिअर याचा समतोल आयुष्यात साधता आला याचा अपार आनंद आहे!   

संबंधित बातम्या