अनिश्चिततेच्या भयाचे सावट 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

चर्चा       

पालघर जिल्ह्यातील डहाणू तळासरी परिसरात भूकंपाची मालिका यावर्षीही चालू असून १० सप्टेंबर २०२० पर्यंत या परिसराला सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे २ ते ५ हादरे बसले. २.२, २.६, २.६, २.८ आणि ३.५ रिश्टर स्केलचे सौम्य स्वरूपाच्या एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रावर करण्यात आली आहे. यातील एका भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणूजवळील समुद्रात १० किलोमीटर खोल भूगर्भात झाल्याची नोंद झाल्याने हे भूकंप चिंता वाढविणारे ठरले आहेत. कारण मागच्या काही वर्षांपासून या भागांत जाणवत असलेल्या भूकंपाच्या मालिकेतील एकाचाही केंद्रबिंदू समुद्रतळावर असल्याची नोंद नाही. 

भूकंपाचे हादरे डहाणू, बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, जांबुगाव, धुंदलवाडी, दापचरीसह तळासरी, वडवली, कवाडे, उधवा आणि जवळपासच्या इतर काही गावांत मुख्यतः जाणवले. भूगर्भातून भूकंपनाचे आवाज होऊन जमिनीला हादरे बसत असल्याचे अनेकांना जाणवले. भूकंपाने दापचरी परिसरातील घराच्या छताचे पत्रे पडले. 

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाची मालिका सुरू आहे. मध्यंतरी भूकंपाचे सत्र संथ झाले होते. २०२० च्या जुलै महिन्यापासून एक-दोन दिवसाआड भूकंपाचे हादरे या भागांत पुन्हा बसू लागले आहेत. यात भूकंपाची क्षमता सर्वाधिक 3 रिश्टर स्केल ते ४ रिश्टर स्केलपर्यंत वाढलेली आढळून आली आहे. अभ्यास करणाऱ्या भूकंप तज्ज्ञांकडून असे सांगण्यात येत होते, की भूगर्भातील पाण्याच्या हालचालीमुळे या परिसरात भूकंपाचे हादरे बसत आहेत आणि हळूहळू भूकंपाचे हे सत्रही थांबेल. मात्र  भूकंपाची मालिका दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. 

या वर्षीच्या एका भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणूजवळच्या समुद्रात झाल्याच्या नोंदीमुळे भूकंपाचे हे संकट भविष्यात त्सुनामीचा धोका निर्माण करू शकते. त्या अनुषंगाने या भागाचा सविस्तर भूशास्त्रीय अभ्यास तातडीने होणे गरजेचे आहे. त्सुनामीची लाट निर्माण होणे  ही आपल्या आवाक्याबाहेरची नैसर्गिक आपत्ती असली तरी त्या संकटाचा सामना करता येण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन योजना आखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

पालघर जिल्ह्यातील जवळपास ४० गावे ११ नोव्हेंबर २०१८ पासून १ फेब्रुवारीला २०१९ पर्यंत कमी तीव्रतेच्या एकूण ३० भूकंपांनी हादरून गेली होती. कमी तीव्रतेचे ६ धक्के एकामागून एक बसल्याचीही त्यावेळी नोंद करण्यात आली होती. या सगळ्याच भूकंपांची तीव्रता २ ते ४ रिश्‍टर होती आणि सगळ्यांत मोठ्या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर मोजली गेली. अनेक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या व धुंडाळवाडी गावात घरे पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. 

या कमी तीव्रतेच्या सतत होणाऱ्या भूकंपांचे उत्पत्तिस्थान आणि कारण कळावे म्हणून राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्र (NCS) आणि राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था (NGRI) यांनी डहाणू, धुंडाळवाडी, डोंगरीपाडा आणि तळासरी येथे ५ भूकंपमापन यंत्रे स्थापित केली.  एखाद्या भूऔष्णिक (Geothermal) क्षेत्रांत अनेकदा कमी तीव्रतेची भूकंपने (Tremors) किंवा भूकंप अनेक दिवस सलगपणे  जाणवतात. या काळांत एकही मोठा भूकंपाचा धक्का कधीही जाणवत नाही. याला भूकंप - समूह (Earthquake Swarm) असे म्हटले जाते. पालघर जिल्ह्यांत आत्तापर्यंत भूकंपनांची जी आकडेवारी मिळाली आहे त्यावरून हा कंपन समूहाचाच प्रकार असावा असे दिसून येते. जुलै - ऑगस्ट २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या लोम्बोक बेटावर असे धक्के सतत तीन आठवडे बसले होते आणि त्यांत झालेल्या पडझडीत ५०० लोक मृत्युमुखी पडले होते. 

भारतात गुजरात राज्यातील सौराष्ट्रात आणि महाराष्ट्रात कोयना परिसरांत असे धक्के बसत असतात. द्वीपकल्पीय भारतात  (Peninsular India) कमी तीव्रतेच्या अशा भूकंपाच्या घटना घडण्याची वृत्ती दिसून येते. पालघर जिल्ह्याचा भूप्रदेश भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत आहे. इथल्या किनाऱ्यापासून सह्याद्रीच्या रांगांपर्यंतच्या सगळ्या प्रदेशांत अनेक भ्रंशरेषा (lineament)  आणि कमकुवत भूपृष्ठ भाग आहे. या भागाच्या उपग्रह प्रतिमांवरून त्यांचा मागोवा घेता येतो. साटिवली, गणेशपुरी, वज्रेश्वरीसारखी गरम पाण्याची कुंडे याच परिसरात आहेत. त्यावरून अंतरंगांतील उष्णतेची आणि अस्वस्थपणाची कल्पना येऊ शकते. इथल्या बऱ्याचशा नद्या आणि उपनद्या कमकुवत भंग प्रदेशांना अनुसरून एकमेकांना समांतर वाहताना दिसतात. नदीपात्रांतील खडकांच्या वर खाली झालेल्या रचना, फुटून भुगा झालेले खडक, उष्ण पाण्याचे झरे यासारख्या गोष्टी हा प्रदेश पूर्वीपासूनच कमकुवत आणि भूकंपप्रवण असल्याचे निर्देश देतो. 

पालघर जिल्ह्यात ज्या ठिकाणी धक्के जाणवले, त्या ठिकाणांच्या ५ ते १० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात भूकंपाची केंद्रे असावीत असा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळेही वर सांगितलेल्या समूह (Swarm) सिद्धांताला पुष्टी मिळते. असे असले तरीही नेमके अनुमान काढण्यासाठी अजूनही मोठ्या सांख्यिकीची (Database) गरज आहे. सध्या जाणवणाऱ्या धक्क्यांची संख्या आणि तीव्रता यापुढे कमी होईल किंवा कदाचित वाढेलही अशा दोन्ही शक्यता शास्त्रज्ञांनी गृहीत धरल्या आहेत. कारण यात मोठी अनिश्चितता नेहमीच असते. मात्र भूकंप - समूहाचा अर्थ भविष्यात मोठे धक्के बसण्याची शक्यता कमी असा सर्वसाधारणपणे घेतला जातो. या संकल्पनेनुसार, भूगर्भात, भूकंपीय ऊर्जा (Seismic energy) साठून नंतर ती थोड्या थोड्या कालांतराने, विविध ठिकाणांहून बाहेर पडते व त्यामुळे कमी तीव्रतेचे धक्के बसतात. काही वेळा ही ऊर्जा बाहेर पडताना  
भूगर्भातून आवाजही येतात. हे सगळे जरी खरे असले तरी पालघर जिल्ह्यातील धक्क्यांना, त्याचे केंद्र जवळच्या समुद्रतळावर सापडल्यामुळे, निदान आता तरी कमी महत्त्व देऊन भागणार नाही. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे समूह - भूकंप घटनेनंतर मोठे संहारक भूकंप झाले आहेत! 

पालघर जिल्ह्यातील धक्के हे केवळ भूकंपनामुळेच (Tremors) आहेत, पावसाळ्यानंतर भूपृष्ठांतून झिरपलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली ती कंपन क्रिया आहे (Hydro seismicity) की अंतरंगातील लाव्हा (Magma) रसाच्या क्रियेचा तो परिणाम आहे हे वैज्ञानिकांना अजूनही नक्की सांगता येत नाही. इथल्या भूकंपांची तीव्रता कमी असली तरी त्यांची संख्या मोठी आहे. सामान्यपणे भूकंप हे दोन भू-तबकांच्या (Tectonic plates) सीमावर्ती भागांत  होतात. अशा भूकंपांना आंतरतबकीय भूकंप म्हटले जाते. हे भूकंप नेहमीच संहारक असतात. भू-तबकाच्या मध्यवर्ती किंवा आतल्या भागातही भूकंप होतात ज्यांना तबकांतर्गत भूकंप म्हणतात. तबकांतील भ्रंश, भेगा, विभंग यावरून प्रदेशाची भूकंपप्रवणता ठरते. अशा भूकंपाची तीव्रता कधी ६ रिश्टरपेक्षा जास्त नसते. पालघर जिल्ह्याचा परिसर अशा प्रदेशात मोडतो. 

महाराष्ट्राच्या पठारावर आणि कोकणात भूकंपांची शक्यता तशी फार कमी. पण लातूर, कोयना येथील तीव्र भूकंपांचा आणि पालघर, डहाणू, खेर्डी यासारख्या कमी तीव्रतेच्या भूकंपांचा अनुभव मात्र हेच सांगतो की इतक्या ठामपणे आपण या आपत्तीबद्दल काही सांगू शकत नाही. यातली अनिश्चितता हाच काळजीचा विषय आहे आणि म्हणून या संकटाशी दोन हात करण्यासाठी सदैव तयार राहणे एवढेच आपल्या हातात आहे. 

संबंधित बातम्या