लॉकडाऊनमधले दिवस

ज्योती बागल
सोमवार, 20 एप्रिल 2020

चर्चा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा कोणाला फायदा होत आहे, तर कोणाला त्रास! काहींना कामासाठी वेळ कमी पडतोय, तर काहींना इतका वेळ आहे, की दिवस अगदी कंटाळवाणा होतोय. काही मात्र या वेळेचा पुरेपूर उपयोग करताना दिसत आहेत. काहीजण आपलं कुकिंग स्किल वाढवत आहेत, तर काहीजण रायटिंग, पेंटिंग, ड्रॉइंग, डांसिंग अशा काही ना काही गोष्टी करताना, शिकताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अशाच आपल्या मित्रमैत्रिणींनी शेअर केलेल्या त्यांच्या काही खास प्रतिक्रिया...

कुंचला, रंगांशी होतेय पुन्हा मैत्री
सध्या कोरोनामुळं संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. भरपूर लोकांची कंटाळा आला म्हणून किरकिरदेखील सुरू आहे. मी मात्र हा काळ स्वतःला द्यायचं ठरवलंय. मी पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये पर्चेस ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. त्यामुळं स्वतःला वेळ देण्याचा प्रश्न उद्भवतचं नव्हता. मला शाळेत असल्यापासून पुस्तकं वाचायची, चित्रं काढायची भयंकर आवड. परंतु, कामाच्या व्यापात या गोष्टी कुठं हरवून गेल्या होत्या. पूर्वी वेळ होता, पण पैसे नव्हते नंतर पैसे तर आले पण वेळ मिळेना. कपाटातली पुस्तकं आणि कप्प्यात ठेवलेले रंग, ब्रश माझ्याकडं केविलवाण्या नजरेनं पाहतात असं वाटायचं. तशीच परिस्थिती मोबाईलमधल्या गाण्यांची सुद्धा! इच्छा असूनही वेळेअभावी काही करता येता नव्हतं. पण आता माझ्याकडं जर भरपूर वेळ आहे, तर वाया कशाला जाऊ द्यायचा? म्हणून मी आता पुन्हा कुंचला हातात धरलाय, रंगांशी पुन्हा मैत्री केलीय. ते संयम आणि प्रमाण शिकवतायत. कपाटातल्या त्या पुस्तकांशी गप्पा मारतोय, तेव्हा खूप काही समजावून सांगतायतं ती मला, आवडती गाणी ऐकतोय, जी माझ्या भावनांशी एकरूप होतात. 'रामायण', 'चाणक्य' बघतोय! हे सगळं तर करतोच आहे, पण स्वतःला भरपूर वेळ देऊन या लॉकडाऊनमध्ये मी माझ्यातल्या मला शोधतोय.
- राहुल पार्लेकर, पर्चेस ऑफिसर, भोर

लॉकडाऊनमुळं बदलली दिनचर्या
मी एका न्यूज ॲपमध्ये सब-एडिटर म्हणून काम करते. पण लॉकडाऊनमुळं सध्या आमचंही काम घरूनच सुरू आहे. पण यातूनही जो काही थोडा वेळ मिळतो, त्या वेळात मी यु-ट्युब, नेटफ्लिक्स, ॲमॅझॉन प्राईमवर व्हिडिओज, वेब सिरीज, जुन्या सिरीयल्स बघते. ड्रॉइंग करते. काम घरातूनच करायचं आल्यामुळं रोजची दिनचर्या नक्कीच बदललेली आहे. रात्री झोपायला उशीर होतो, त्यामुळं सकाळ उशिरा होतेय. खूप कंटाळा आल्यावर मात्र मी घरच्यांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून गप्पा मारते.
- अकन्या. व्ही. एस., सब-एडिटर, हैद्राबाद

वेळ नसण्याच्या तक्रारीला सुटी मिळाली! 
‘वेळच मिळत नाही’ या तक्रारीला लॉकडाऊननं सुटी दिली आहे, त्यामुळं मी वाचन, लिखाण व नवनवीन पाककृती शिकण्याचा छंद जोपासत आहे. शिवाय हे दिवस बातम्या बघण्यात जात आहेत. सुरुवातीला कंटाळवाणा वाटणाऱ्या या काळाची जागा आता मात्र रखडलेल्या कामांनी घेतली आहे. जसं की, घराची साफसफाई करणं, शिवणकाम करणं, कपाट व्यवस्थित ठेवणं इत्यादी. पण ही हातातली कामं झाली, की कुटुंबाबरोबर सापशिडी आणि ल्युडो गेम खेळते तेव्हा बालपणीच्या अनेक आठवणी जाग्या होतात आणि गप्पाही रंगतात.
 - रश्मी गायकवाड लगड, कंटेंट रायटर, लोणावळा

सगळं लवकर ठीक व्हावं हीच प्रार्थना
लॉकडाऊनमुळं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. या वेळात ऑफिसचं काम तर सुरू आहेच, पण घरातही मदत करावी लागते. त्यामुळं खूपच काम केल्याचा फील येतोय. मला कुकिंगची आवड असल्यामुळं ऑफिसच्या कामाची वेळ संपली, की मी माझ्या आवडत्या डिशेश करते. जसे की ढोकळा, झेब्रा पॅटर्न चोको केक, कोल्ड कॉफी आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेली डालगोना कॉफी, हे सगळं घरी करण्याची मजा घेतेय. सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्येही पार्टीसिपेट करतेय, त्यामुळं चांगला टाईमपास होतो. रोज रात्री फ्रेंड्सबरोबर लुडो खेळणं सुरू असतं, तेही सोशल डिस्टन्स पाळून बरं! शिवाय घरच्याबरोबर कॅरम, रमी खेळणं म्हणजे मज्जाच असते. थोडंफार ड्रॉइंगही करते. फक्त एक खंत वाटते, की मी कॉलेज स्टुडंट असते तर किती बरं झालं असतं, म्हणजे सुटीही मिळाली असती आणि कसलं टेन्शनही नसतं... हा झाला गमतीचा भाग पण एकूणच बाहेरची परिस्थिती बघून भीतीही वाटते, म्हणून मनोमन सगळं लवकर ठीक होण्याची मी रोज प्रार्थना करते.
- सायली एकबोटे, सॉफ्टवेअर डेव्हलपर

स्वत:साठी थोडा वेळ देते
जेव्हा मला लॉकडाऊन सुरू होणार असल्याचं समजलं, तेव्हा खरं तर माझं मन द्विद्धा मनःस्थितीत होते. एका बाजूला नियमित गोष्टींना मुकणार याची चिंता, तर दुसऱ्या बाजुला ऑफिसला मिळालेल्या सुटीचा आनंद. सुटी म्हणजे वर्क फ्रॉम होम आहेच. पण यातही मी मला स्वत:साठी थोडा तरी वेळ राखून ठेवण्याचं ठरवलं आहे. मी या दिवसांत पुन्हा रोजनिशी लिहायला सुरुवात केली आहे. मला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो, पण या दिवसांत मी मला जे जे पदार्थ आवडतात, ते पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतेय. तसंच सस्पेन्स आणि थ्रील असणाऱ्या वेब सिरीज, सिनेमे बघतेय. कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. रोजच्या व्यापातून गप्पा मारणं होत नव्हतं, तर आता आम्ही रोज वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. एकत्र टीव्ही बघतो. त्यामुळं घरात एक सकारात्मक, आनंदी वातावरण असतं. असंच राहून आपण कोरोनासारख्या महामारीतून नक्कीच सुखरूप बाहेर पडू. 
- स्वाती सरदार, समुपदेशक, मुंबई

लॉकडाऊन एक संधी 
आज देशभरातच नाही, तर जगभरात कोरोनासारखं संकट आ वासून उभं आहे. भारतातही कोरोना चांगलाच पसरला असून यावर असलेला एकमेव उपाय म्हणजे लॉकडाऊन. मी लॉकडाऊनच्या काळात माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. मी लॉकडाऊनकडं एक संधी म्हणून पाहतेय आणि त्या संधीचा पुरेपुर उपयोग करून घेतेय. ही संधी मला रोजच्या मुंबईतील धावपळीच्या दिनचर्येत सहसा मिळत नाही. या दिवसांत मी माझे छंद जोपासते आहे. मला लिहायला आवडतं. मी कवितादेखील करते. सद्या मी माझी कवितांची डायरी अपडेट करत आहे, लघुतम कथा लिहीत आहे. कुटुंबातील व्यक्तींबरोबर जुने कॉमेडी सिनेमे पाहत आहे, मनसोक्त मजा, मस्ती सुरू असते. आयुष्यात घडणाऱ्या सर्वच गोष्टी वाईट नसतात, त्यामुळं या गोष्टीकडंही सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. सगळं लवकरच ठीक होईल. 
- स्वाती ठोकळे, समुपदेशक, मुंबई

घरात राहून स्वत:चीच मदत
 लॉकडाऊनच्या दिवसांचा फायदा करून घेत मी माझ्या दोन्ही मुलांना खूप काही शिकवलं आहे. सध्या आपल्यावर ओढवलेल्या संकटातही माझं कुटुंब सकारात्मक विचार करून मिळालेला वेळ आम्ही एकत्रित घालवत आहोत. मुलांना रमवण्यासाठी पेपरचे वेगवेगळे क्राफ्ट तयार करणं, रोज मराठीच्या आणि इंग्रजीच्या पुस्तकाची दोन पानं वाचणं, ड्रॉइंग करणं असं त्यांना आवडेल ते करून घेते. शिवाय मुलं त्यांच्या पप्पाबरोबर माझ्यासाठीही काही तरी खास डिश तयार करतात, हे बघून छान वाटतं. याशिवाय मुलांच्या आवडीच्या गाण्यांवर डान्स करणं, घरातच सापशिडी, कॅरम खेळणं सुरू असतं. त्यामुळं आम्ही तरी नक्कीच सेफ आहोत आणि घरात राहून स्वतःचीच मदत करत आहोत! 
- हेमलता पाटील, गृहिणी, सांगवी

चिंतन, मनन आणि स्वत:शी संवाद
कोरोना या वैश्विक आपत्तीने आज सारं जग हादरलं आहे. इतिहासामधलं हे पहिलं युद्ध असेल, जे प्रत्येक भारतीय आज घरात बसून लढत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मी माझ्या गावी आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मला स्वत:चाच खूप राग यायचा. कारण नोकरी संभाळून सामाज प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना स्वत:ला कधीच वेळ देऊ शकलो नाही. मात्र या लॉकडाऊन काळात मी पूर्ण वेळ स्वत:ला देत आहे. व्यस्त जीवनात ज्या-ज्या गोष्टी इच्छा असूनसुद्धा मी करू शकत नव्हतो. त्या गोष्टींसाठी मी आता वेळ देत आहे. व्यायाम हे माझ्या आयुष्यातील न सुटणारं व्यसन आहे. आता व्यायामासाठीही बराच वेळ मिळत असल्याने मी त्याचा फायदा करून घेत आहे. दिवसभरात आवडती कादंबरी, पुस्तकं वाचतो. काही वेळ सोशल मिडीयावर घालवतो. अनेक जिवाभावाच्या माणसांशी फोनवरून संवाद साधतो. सायंकाळचा वेळ निवांत आणि एकांतात चिंतन, मनन करण्यात, स्वत:शी संवाद करण्यात घालवतो. कारण हीच संधी आहे स्वत:ला शोधण्याची आणि काही तरी नवीन शिकण्याची.
- रामनाथ उगले, प्राध्यापक, बीड

संबंधित बातम्या