नवयुगाचा मंत्र : डिजिटल मार्केटिंग

व्यंकटेश कल्याणकर
बुधवार, 6 मे 2020

चर्चा
 

संपूर्ण मानवी अस्तित्वावर कोरोनाचे महाभयानक संकट आलेले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या काळात निवारा आणि अन्नाशिवाय इंटरनेट ही एक महत्त्वाची गरज झाली आहे. रंजनासाठी तसेच परस्परांशी कनेक्ट राहण्यासाठी इंटरनेट जणू काही संजिवनीच ठरत आहे. लॉकडाऊननंतर मानवी जीवन कसे असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याबाबत अनेक तर्क लावण्यात येत आहेत. एक मात्र खरे की माणसे माणसांमध्ये अंतर ठेवतील त्यामुळे शक्य तेवढ्या मानवरहित व्यवहारांना प्राधान्य दिले जाईल. पर्यायाने शक्य त्या सर्व व्यवसायांचे इंटरनेट विश्वावर अस्तित्व निर्माण होईल आणि डिजिटल मार्केटिंगला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होईल. या पार्श्वभूमीवर डिजिटल मार्केटिंगबद्दल छोटे-मोठे व्यावसायिक-उद्योजक आणि सामान्य नागरिकांनी माहिती करून घेणे काळाची गरज आहे.

जाहिरात हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा असतो. तुमचे उत्पादन किंवा सेवा किंवा व्यवसाय कितीही उत्कृष्ट-दर्जेदार असला, तरीही त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी जाहिरातीची नितांत गरज असते. मागील काही वर्षांपूर्वीपर्यंत पारंपरिक म्हणजेच मुद्रित माध्यमाद्वारे (नियतकालिके) किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे (दूरदर्शन वाहिन्या-रेडिओ) जाहिरात केली जात होती. त्याचा मोठा परिणामही दिसून येत होता. मात्र, साधारण मागील पाच वर्षांपासून भारतासारख्या विकसनशील देशात डिजिटल माध्यमांची वाढलेली व्याप्ती, स्मार्ट फोनचा वाढता वापर आणि सोशल मीडियासारख्या साधनांवर सर्वसामान्यांचे जडलेले प्रेम यामुळे जाहिरातीच्या माध्यमात डिजिटल मार्केटिंगला महत्त्व प्राप्त झाले. या सर्वांना मूळ कारण ठरले ते स्वस्तात मिळत असलेले स्मार्ट फोन्स आणि त्यामध्ये वापरण्यासाठी मिळणारे स्वस्तातील डेटा पॅक अर्थात इंटरनेट.
साधारण २०१९ च्या अखेरीस, २०२० मध्ये भारतातील इंटरनेट युजर्स तब्बल ५६ कोटींपर्यंत पोचतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. म्हणजेच सरासरी भारतातील तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आणि इंटरनेट असणार आहे. सध्या तरी केवळ इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून डेटा पॅक खरेदी करण्याशिवाय इंटरनेट वापरण्यासाठी इतर कोणताही खर्च येत नाही. मात्र, तरीही यूट्युब, गुगल, फेसबुक, ट्विटर यांसारख्या वेगवेगळ्या आणि उपयुक्त सेवा देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि अलीकडच्या काळात स्थानिक समूहांकडूनही मोठ्या प्रमाणात संकेतस्थळे, ॲप्सची निर्मिती करण्यात येत आहे. या सर्वांची उत्पन्नाची अनेक साधने आहेत. मात्र, त्यातील सर्वांत प्रमुख साधन म्हणजे जाहिरात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
इंटरनेट आणि ऑनलाइन आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञानाधारित उपकरणांवर (डिव्हाइसेस जसे की डेस्कटॉप संगणक, स्मार्ट फोन आणि इतर) विपणन किंवा जाहिरात करण्याचा प्रकार म्हणजे डिजिटल मार्केटिंग. एखाद्या उत्पादन, सेवा किंवा व्यवसायाची प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमासारख्या पारंपरिक माध्यमात जर जाहिरात दिली, तर ती जाहिरात संबंधित माध्यमाच्या सर्व वाचक किंवा प्रेक्षकांपर्यंत पोचते. त्यामध्ये संमिश्र वाचक किंवा प्रेक्षक असतात. म्हणजेच वेगवेगळ्या वयोगटाची, विविध प्रदेशातील, वैविध्यपूर्ण अभिरुची असलेले वाचक किंवा प्रेक्षक असतात. यात सर्वांत मोठा लाभ म्हणजे एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणातील जनसमूहांपर्यंत संबंधित जाहिरात पोचते. त्यातून त्या उत्पादन, सेवा किंवा व्यवसायाची चर्चा (ब्रँड अवेअरनेस) घडून येण्याची शक्यता निर्माण होते. ही जाहिरात पाहणाऱ्यांपैकी किती टक्के प्रत्यक्ष वाचक, प्रेक्षक प्रत्यक्ष जाहिरात पाहतात किंवा प्रत्यक्ष खरेदीपर्यंत पोचतात याची अचूक आकडेवारी मिळत नाही. मात्र, डिजिटल मार्केटिंगद्वारे तुमच्या उत्पादन, सेवा किंवा व्यवसायाची जाहिरात तुम्हाला हव्या त्या किंवा खरेदीमध्ये परावर्तित होऊ करतील अशा व्यक्तींपर्यंत पोचवता येते. 

डिजिटल मार्केटिंगचा उद्देश
डिजिटल मार्केटिंगचे अनेक उद्देश असू शकतात. त्यामध्ये आपल्या उत्पादन, सेवा, व्यवसायाबद्दल जनजागृती (ब्रँड अवेअरनेस), अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोचून (टारगेट ऑडियन्स) त्यांना खरेदीसाठी प्रवृत्त करणे, अपेक्षित खरेदी इच्छुक ग्राहकांची माहिती संकलित करणे (लीड जनरेशन), स्थानिक पातळीवर व्यवसायवृद्धी करणे यासह अनेक उद्देश असतात. मात्र, या सर्वांचा अंतिम उद्देश हा प्रत्यक्ष ग्राहकांना खरेदीमध्ये परावर्तित करण्यासाठी प्रवृत्त करणे हाच असतो.

डिजिटलची मार्केटिंगची व्यासपीठे
डिजिटल मार्केटिंगसाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. त्यामध्ये गुगल (सर्च इंजिनमध्ये जाहिरात दिसण्यासाठी),  यूट्युब (व्हिडिओमध्ये जाहिरातीसाठी), फेसबुक (फेसबुक युजरपर्यंत पोचण्यासाठी), ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमांचा समावेश आहे. आपल्या सर्व इंटरनेट ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण काय सर्च करतो, कोणत्या संकेतस्थळाला भेटी देतो वगैरे माहिती तसेच आपल्या सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटींवर संबंधित कंपन्यांकडून सातत्याने अत्यंत बारकाईने यांत्रिक पद्धतीने लक्ष ठेवले जाते. त्यावरून प्रत्येक युजरच्या वर्तणुकीचा (बिहेविअर) अंदाज काढला जातो. अगदी आपण सोशल मीडियावर केलेली पोस्टदेखील आपल्या वर्तनात भर टाकत असते. आपल्याला कोणत्याही माध्यमातून ज्या काही जाहिराती दिसतात त्या जाहिरातीच्या अपेक्षित ग्राहकांमध्ये आपण समाविष्ट असतो. अशी माहिती संबंधित कंपन्यांनी वापरावी का, यावर अनेकदा चर्चा, वादविवाद घडतात. मात्र, ज्यावेळी आपण एखाद्या संकेतस्थळाला लॉगइन करतो किंवा एखादे ॲप वापरतो त्यावेळीच संबंधित कंपन्या ‘आमची माहिती वापरण्यास हरकत नाही’ अशा आशयाचे आपण स्वत: प्रकटन (डिक्लेरेशन) देत असतो.
आपल्याला ज्यावेळी जाहिरात करायची असते त्यावेळी संबंधित कंपन्यांकडून आपल्याला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या युजरच्या माहितीचा अप्रत्यक्ष अंशत: अधिकार मिळत असतो. म्हणजे तुम्ही फेसबुकवरून जर फक्त पुण्यात जाहिरात दाखविण्याचा पर्याय निवडला तर ती जाहिरात जास्तीत जास्त किती व्यक्तींपर्यंत पोचू शकेल, याचा आकडा आपल्याला बघायला मिळतो.

बहुमाध्यमांचा वापर
डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला कल्पक मजकूर (क्रिएटिव्ह कंटेट), छायाचित्रे (फोटोग्राफ्स), हलती चित्रे (जीआयएफ इमेजेस), चलछायाचित्रे (व्हिडिओ), ध्वनीफितीका (ऑडिओ), ग्राफिक्स इत्यादी प्रकारच्या बहुमाध्यमांचा प्रभावी वापर करता येतो. यातून आपले उत्पादन, सेवा किंवा व्यवसायाबद्दल अधिक विस्तृतपणे ग्राहकांच्या समोर कल्पनाचित्रे उभी करता येतात. त्याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. पर्यायाने ग्राहक आकर्षित होतो आणि खरेदीपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे एखाद्या फ्लॅटची जाहिरात असेल तर त्या फ्लॅटच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यापासून पुढे संपूर्ण फ्लॅटचे अंतरंग व्हिडिओ, थ्रीडी व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षित ग्राहकांना दाखविता येतात.

जाहिरात खर्च (ॲड बजेट)
डिजिटल मार्केटिंग करताना जाहिरात खर्च विचारात घेणे खूप गरजेचे असते. नव्याने डिजिटल जाहिरात करणाऱ्या व्यक्तींना कमीत कमी खर्च करून प्रयोग करून पाहणे आवश्यक आहे. तुम्ही कोणते माध्यम वापरता त्यावर तुमचे बजेट ठरवावे लागते. त्यामध्ये फेसबुक ॲड्स, ट्विटर ॲड्स, गुगल ॲड्स इत्यादी अनेक माध्यमांचा समावेश होतो.

तुम्हाला जर फेसबुकवर जाहिरात करायची असेल तर अपेक्षित परिणाम साधण्यासाठी दररोज कमीत कमी ७७ रुपयांपासून (भारतातील नियमाप्रमाणे करासह रु. ९०) तुम्हाला सुरुवात करता येते. मात्र, ही जाहिरात किमान चार दिवस केली तरच अपेक्षित परिणाम दिसून येतो. म्हणजेच फेसबुकद्वारे भारतात जाहिरात करायची असल्यास सर्वसाधारणपणे ३६० रुपये खर्च येतो. हे पैसे थेट तुमच्या बॅंक खात्यातून फेसबुकच्या खात्यात जमा करावे लागतात. यामध्ये जाहिरातीसाठी क्रिएटिव्ह कंटेंट लिहिणे, ग्राफिक्स तयार करणे, अपेक्षित ग्राहकवर्ग निवडणे, जाहिरातीच्या परिणामांवर लक्ष ठेवणे, ग्राहकांशी संवाद प्रस्थापित करणे इत्यादी बाबींसह या सर्वांसाठी सल्ला आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश नाही. त्यामुळे तो खर्च फेसबुकला जाहिरात खर्चापोटी दिलेल्या खर्चापेक्षा काहीपट अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक छोट्या-मोठ्य संस्था अशा सेवा देतात.
गुगल ॲड्स आणि ट्विटरसह अन्य माध्यमांसाठी भारतातातून जाहिरात केली, तर फेसबुकप्रमाणेच कमीत कमी खर्चात जाहिरात करता येते. मात्र, त्यासाठी प्रत्येक कंपन्यांचे काही स्वतंत्र नियम आहेत. जसे की जाहिरात किमान आठ दिवस करायला हवी किंवा महिनाभर करायला हवी वगैरे.

डिजिटल जाहिरातीचा परिणाम
डिजिटल जाहिरातीचा परिणाम पाहणे हा एक सर्वांत अद्‌भुत प्रकार आहे. असे परिणाम पारंपरिक माध्यमातील जाहिरातींमधून बघायला मिळत नाहीत, त्यामुळे यात अधिक रंजकता निर्माण होते. तुमची जाहिरात किती जणांपर्यंत पोचली, त्यामध्ये पुरुष किती, महिला किती, त्यांचा वयोगट-शहर वगैरे सर्व माहिती तुम्हाला पाहता येते. फेसबुकद्वारे केलेल्या एका जाहिरातीचा परिणाम सोबतच्या चित्रात जोडला आहे. तो पाहून तुम्हाला सूक्ष्म बारकावे आणि त्यातील रंजकता लक्षात येईल.
डिजिटल मार्केटिंग करताना हे लक्षात ठेवावे...
ज्यावेळी तुम्ही डिजिटल जाहिरात करता, त्यावेळी तुमचा अपेक्षित ग्राहकवर्ग डिजिटल फ्रेंडली असतो. म्हणजेच तुमच्या उत्पादन, सेवा, व्यवसायाबद्दल त्याला सगळे काही एका क्लिकवर मिळणे अपेक्षित असते. म्हणजेच समजा तुम्ही फ्लॅटची जाहिरात करत असाल तर त्याला फ्लॅटचे लोकेशन, त्याचे थ्रीडी फोटोग्राफ्स, व्हिडिओज, संपूर्ण तांत्रिक माहिती, आवश्यक ती कायदेशीर कागदपत्रे, सविस्तर किंमत असे सगळे काही बसल्याजागी हवे असते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही जाहिरात पाहणाऱ्या व्यक्ती देत असतात. त्यातून अनेकदा नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही टोकाच्या चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रियेला विनम्र भाषेत वेळीच प्रतिसाद दिल्यास संबंधित जाहिरातीमधील पारदर्शकता वाढण्याची शक्यता असते.
अशाप्रकारे डिजिटल जाहिरात हा नव्या युगातील व्यवसाय वृद्धीचा मंत्र ठरत चालला आहे. चला, याचा आपण लाभ करून घेऊयात. 

अपेक्षित ग्राहक ओळखणे (टारगेट ऑडियन्स सिलेक्शन)
अपेक्षित ग्राहक ओळखणे हा डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामुळे आपल्या जाहिरातीच्या परिणामावर खूप मोठा प्रभाव पडतो. अपेक्षित ग्राहक ओळखताना आपल्या उत्पादनाची उपयुक्तता, त्याचा अपेक्षित ग्राहकवर्ग, त्यांचे लोकेशन, त्यांची मानसिकता या सर्व बाबींचा बारकाईने विचार करावा लागतो. खालील उदाहरणातून त्याबाबत आणखी स्पष्टता येईल.

  • ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलेची जाहिरात पुरुषांना दाखवून उपयोग नाही. त्यामुळे ती डिजिटल जाहिरात केवळ महिलांनाच दाखविता येते.
  • आइस्क्रिम पार्लर, रेस्टॉरंट किंवा छोट्या उपहारगृहाची जाहिरात करताना संबंधित व्यवसायाच्या ठिकाणाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. नाशिकमधील छोट्या उपहारगृहाची जाहिरात पुण्यात दाखवून फारसा उपयोग होत नाही.
  • एखादी विवाहसंस्था केवळ घटस्फोटित महिलांसाठी किंवा घटस्फोटित पुरुषांसाठी किंवा विभक्त व्यक्तींसाठीच काम करत असेल, तर केवळ संबंधित व्यक्तींना जाहिरात दाखविता येते.
  • आलिशान परिसरातील २५ मजली इमारतींमधील फ्लॅट्सची जाहिरात टू जी नेटवर्क वापरणाऱ्या व्यक्तीला दाखवून उपयोग नाही. अशी जाहिरात उच्च उत्पन्न गटाला म्हणजेच सर्वसाधारणपणे ज्यांच्याकडे आयओएस फोन आहे किंवा जे लोक फोर जी नेटवर्क वापरतात त्यांनाच दाखविता येते.
  • मराठी भाषेतील जाहिरात अमराठी माणसांना दाखवून उपयोग नाही. ती मराठी भाषिकांनाच दिसेल असा पर्यायही निवडता येतो.
  • महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी असलेल्या कपड्यांच्या नव्या ब्रँडची जाहिरात साधारणपणे २०-२६ वयोगटातील व्यक्तींनाच दाखविणे शक्य होते. ती जाहिरात इतर वयांच्या व्यक्तींना दाखवून उपयोग होत नाही.

यासारखी असंख्य उदाहरणे आपल्याला पाहता येतील. याशिवाय विशिष्ट शहरात, विशिष्ट परिसरातही आपल्याला आपली जाहिरात दाखविता येते. अपेक्षित ग्राहकवर्ग शोधणे हे तसे आव्हानात्मक काम आहे. हा टप्पा जास्तीत जास्त अचूक आणि खरेदीपर्यंत पोचणाऱ्या व्यक्तींच्या जवळ जाणारा असायला हवा. यासाठी आपण आपल्या पूर्वीच्या ग्राहकांच्या संकलित माहितीचा वापर करू शकतो.

डिजिटल मार्केटिंगचे लाभ

  •      बहुमाध्यमांचा (मल्टिमीडिया) वापर करण्याची संधी.
  •      अपेक्षित ग्राहक (टारगेट ऑडियन्स) ओळखून त्यांच्यापर्यंत पोचता येते.
  •      कमीत कमी जाहिरात खर्च.
  •      परिमाणात मोजता येतील असे परिणाम पाहण्याची सुविधा.

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत (होलसेल) आमच्या बागेतील आंबा पोचविण्यासाठी आम्ही फेसबुक जाहिरातीचा प्रभावी वापर केला. रत्नागिरीतील आंबाबागेतून पुणे-मुंबईला गाडी पाठविताना लागणाऱ्या शहरांमधील केवळ २५-५० वयोगटातील व्यक्तींपर्यंत जाहिरात पोचवली आणि अवघ्या दोन दिवसांत आम्ही जवळपास ४०० डझनहून अधिक आंब्याची विक्री केली.
- महेश पळसुले देसाई, रत्नागिरी (आंबा बागायतदार, व्यापारी)

मागील काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रातील डिजिटल जाहिरातींचे बजेट वाढले आहे. अपेक्षित ग्राहकांपर्यंत जाहिरात पोचून अपेक्षित परिणाम मिळत असल्याने छोट्या-मोठ्या उद्योग-व्ययवसायांचा डिजिटल जाहिरातींकडे कल वाढत चालला आहे. प्रत्येकाने या आधुनिक तंत्रज्ञानाधारित जाहिरातीच्या प्रकाराचा लाभ करून घ्यायला हवा.
- राघवेंद्र जोशी, विपणन तज्ज्ञ, पुणे
 

संबंधित बातम्या