पुन्हा घडवूया रेनेसाँ...

डॉ. गुरुदास नूलकर
सोमवार, 4 एप्रिल 2022

चर्चा   

कोविड महासाथीतून बाहेर पडल्यावर आपण जुन्या सवयी न बदलता निसर्गाचा अशाश्वत उपभोग घेत राहणार, का आपणही एक ‘रेनेसाँ’ घडविणार? पुढच्या पिढ्यांसाठी हा प्रश्न कळीचा असेल.

आज जगभरातून कोविड महासाथीचे रौद्र रूप सौम्य होत चालले आहे. या संकटाने आपल्याला अनेक धडे दिले. सशक्त निसर्ग आणि मानवी आरोग्य यांच्यातल्या नात्याची प्रचिती आली. रोग प्रतिकार शक्तीसाठी अन्नातून मिळणाऱ्या पोषणाचे महत्त्व पटले. शहरातून स्वच्छ हवा अनुभवता आली. धकाधकीच्या जीवनात मोकळा वेळ मिळाला आणि अनेकांनी नवीन छंद जोपासले. थोडक्यात काय तर कोरोना विषाणूमुळे मानवी जीवन किती अशाश्वत आहे याची जाणीव झाली आणि जीवनशैलीत बदल अनिवार्य झाले.

निसर्गाने आपल्याला असा धडा या आधीही दिला होता. इ.स. १३४७ ते १३५२ दरम्यान युरोपमध्ये प्लेगचा ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रादुर्भाव झाला. याला ‘ब्लॅक डेथ’ म्हटले जाते. ही इतिहासातील सर्वात विनाशकारी महासाथ होती. प्लेगच्या आधीचा काळ युरोपियन इतिहासात ‘डार्क एज’ म्हणून ओळखला जातो. या काळात वैचारिक स्वातंत्र्य, साहित्य, कला अशा गोष्टींवर धर्मगुरूंकडून निर्बंध लादले गेले होते. समाजात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक प्रथा प्रचलित होत्या. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यात अनेक शतके क्रुसेड्स युद्ध सुरू होते. मंगोल आणि बार्बेरियन आक्रमणे चालू होती. अशा परिस्थितीतच प्लेगची साथ अली. व्यापार बंद पडला, बेरोजगारी वाढली आणि समाजव्यवस्था बिघडत गेली. ही महासाथ मानवी इतिहासातील शोकांतिका होती, पण यामुळे युरोपमध्ये सामाजिक कायापालट होण्यास सुरुवात झाली.

प्लेगमध्ये गरीब जनता सर्वाधिक बळी पडली आणि सरंजामशाहीला खीळ बसली. त्यामुळे सामाजिक वर्गीकरण गौण होत गेले आणि धर्मगुरूंचे वर्चस्व कमी झाले. तेव्हाही लोकं सुरक्षेसाठी घरी बसून होती आणि यातूनच अभूतपूर्व वैचारिक आणि सामाजिक बदल सुरू झाले. इटलीचा श्रीमंत व्यापारी लॉरेंझो दी मेडीची याने मायकेल अँजेलो , राफेल, लियोनार्दो दा व्हिंची या सारख्या चित्रकारांना राजाश्रय दिला. शास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, संगीत, स्थापत्यशास्त्र अशा गोष्टींचा धनवंतांकडून पुरस्कार झाला. भव्यदिव्य इमारती बांधल्या गेल्या आणि सामाजिक ठिकाणांचे सुशोभीकरण झाले. प्लेगच्या महासाथीने युरोपला ‘डार्क एज’ मधून ‘रेनेसाँ’कडे नेले. रेनेसाँ म्हणजे पुनरुद्धार किंवा सामाजिक कायाकल्प. मानवी इतिहासात अशी अनेक संकटे येऊन गेली. त्यांतून बाहेर पडताना मानवाने आपल्या पूर्वीच्या सवयी, चुकीच्या प्रथा आणि अवैचारिक उपभोगाचा त्याग करून अधिक योग्य मार्ग पत्करल्याचे दिसते. 

कोविड महासाथीतून बाहेर पडल्यावर आपण जुन्या सवयी न बदलता निसर्गाचा अशाश्वत उपभोग घेत राहणार, का आपणही एक ‘रेनेसाँ’ घडविणार? पुढच्या पिढ्यांसाठी हा प्रश्न कळीचा असेल. 

आजचे डार्क एज  

मानवी जीवनात नव्याने येणारे विषाणू हे निसर्गाचे बिघडलेले स्वास्थ्य दर्शवितात. कमकुवत परिसंस्थेत प्राण्यांना खाद्य मिळेनासे होते, त्यांचा अधिवास नष्ट होतो आणि नैसर्गिक अन्नसाखळी कोलमडत जाते. यामुळे प्राणिमात्रेतून बाहेर पडून सूक्ष्मजीवांचा शिरकाव मानवात होतो आणि नवनवीन आजार पसरतात. निसर्ग ऱ्हासाचे मूळ अर्थचक्रात असते. बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची मागणी वाढली की नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढतो. त्यामुळे खनिज उत्खनन आणि प्रदूषण वाढत जाते आणि निसर्गात आमूलाग्र बदल होतो. 

अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धीवर जोर असतो. अर्थव्यवस्था सतत वाढत राहावी यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असतात. आर्थिक वृद्धीतूनच समाज समृद्ध होईल, असा त्यामागचा विचार. याचे मापन जीडीपी, म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नामधून होते. जीडीपी वाढीसाठी बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची मागणी सतत वाढायला हवी. याला ‘कंझम्प्शन ड्रिव्हन ग्रोथ’ म्हणजे ‘उपभोगातून आर्थिक वृद्धी’ असे म्हणतात. त्यामुळे ग्राहकांवर नवनवीन वस्तूंचा मारा होत असतो. प्रत्येक उत्पादनात नैसर्गिक संसाधनांचा वापर होतो - इंधन, खनिज, धातू, पाणी, लाकूड, जमीन वापरूनच उत्पादन शक्य होते आणि ते करताना प्रदूषण होते. आर्थिक वृद्धीच्या रेट्यात निसर्गातील मर्यादित संसाधनांचा साठा घटत जाणार आणि अक्षय (रिन्युएबल) संसाधने प्रदूषित होत राहणार हे अधोरेखित असते. प्रदूषणाचा सर्वाधिक घातक प्रकार म्हणजेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन. म्हणून, हवामान बदल ही ‘उपभोगातून आर्थिक वृद्धी’ या प्रारूपाचीच निष्पत्ती आहे. चक्रीवादळ आणि त्सुनामीसारखी नैसर्गिक संकटे, घटती जैवविविधता, समुद्रांचे आम्लीकरण, वितळणाऱ्या हिमनद्या अशा गोष्टीतून हवामान बदलाचे परिणाम जाणवत आहेत. पण आरामदायी जीवनशैलीत याची जाणीव होत नाही. याची झळ पोचते ती गोरगरीब, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरी, विस्थापित आदिवासी आणि मानवेतर सजीवांना. बाजारपेठेच्या झगमगाटात त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचतच नाही.

वस्तू आणि सेवांचे तीन प्रकारात वर्गीकरण होते. ‘नेसेसिटीज’ म्हणजे जीवनावश्यक वस्तू– अन्न, वस्त्र, निवारा व काही मूलभूत सुखसोयी, यांच्याशी निगडित वस्तू. दुसरा वर्ग ‘डिस्क्रिशनरी’ म्हणजे ऐच्छिक वस्तू. या गरजेच्या नसतात; पण ग्राहकांना दैनंदिन जीवनात सोयीच्या किंवा आरामदायी असतात. ऐच्छिक वस्तू विकत घ्यायच्या की नाही हे ग्राहक ठरवतो. तिसरा वर्ग इंटरमिजिएट वस्तू’ – या वस्तू इतर उद्योगधंद्यांचा कच्चा माल असतात. उदाहरणार्थ यंत्रे, सुटे भाग, रसायने किंवा सॉफ्टवेअर. गरजेच्या वस्तू आणि ऐच्छिक वस्तूंमध्ये काटेकोर फरक नाही. ग्राहकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांच्यात बदल होऊ शकतो. गरजेच्या वस्तू ग्राहक आपल्या गरजेपुरत्या विकत घेतात. त्या मिरवायच्या नसतात किंवा उगीचच साठा करायचा नसतो. ऐच्छिक वस्तूंचे मात्र तसे नाही. नको असतानाही अशा वस्तू आपण सहज विकत घेतो. आधुनिक जीवनशैलीत ‘कम्पॅरिझन’ आणि ‘कॉम्पिटीशन’ म्हणजे तुलना आणि स्पर्धा होत असते. आपण आपल्या मित्रमंडळींशी नकळत तुलना करीत असतो आणि दैनंदिन व्यवहार तर स्पर्धेवरच चालतो. ऐच्छिक वस्तू आपल्याकडे असल्याने समाधान मिळते, चारचौघात दाखविता येतात. त्यामुळे कंपन्या अशा वस्तूंच्या जाहिरातीवर मोठा खर्च करतात. गरजेच्या वस्तूंना कितीही आकर्षक केले, तरी त्याची मागणी ठरावीकच असते. त्यामुळे गरजेच्या वस्तूंपेक्षा ऐच्छिक वस्तूंमधून कंपन्यांना जास्त फायदा होतो आणि बाजारपेठेत चैनीच्या वस्तूंची निर्मिती वाढत जाते. 

उंची कपडे, सौंदर्य प्रसाधने, महागडे मोबाईल फोन, टीव्ही, फ्रिज, शोभेच्या वस्तू, मोटारगाड्या अशा वस्तू ऐच्छिक वर्गात मोडतात. त्यांच्या मागणीत सतत वाढ होत राहावी म्हणून दोन युक्त्या वापरल्या जातात. वस्तूचे आयुष्य मर्यादित ठेवायचे, त्यामुळे ग्राहक त्या वस्तू पुन्हा लवकर घेतील, किंवा वस्तूंमध्ये नावीन्य आणत राहायचे – जसे मोबाईल फोन, फॅशनचे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी. आज जगभरात ऐच्छिक वस्तूंचे अतिउत्पादन झाले आहे. शेकडो ब्रॅण्डनी सुपरमार्केटचे रॅक सतत भरलेले असतात. जंगले साफ करून उत्खनन होणाऱ्या प्रत्येक नवीन खाणीतील संसाधने ऐच्छिक वस्तूंच्या उत्पादनात अधिकाधिक वापरली जातात. म्हणजेच वस्तूंचा अविचारी उपभोग घेणारा ग्राहक हा निसर्ग ऱ्हासाला जास्त जबाबदार आहे!  उपभोगावर आधारित अर्थव्यवस्था उपसा-बनवा-वापरा-टाका अशी चालते. निसर्गातून संसाधने उपसा, त्यातून वस्तू बनवा आणि वापरून झाले की टाकून द्या. नैसर्गिक संसाधने आणि प्रदूषण याचा हिशेब अर्थव्यवस्थेत लावला जात नाही त्यामुळे आपल्या उपभोगत पुढल्या पिढ्यांच्या वाट्याची संसाधने वापरली जातात.

आधुनिक जीवनशैलीत ‘रेनेसॉँ’ 

सजीवसृष्टि आणि नैसर्गिक परिसंस्था सक्षम ठेवणे आपल्या हातात आहे. त्यातून पर्यावरणीय सेवा कार्यक्षम होतील आणि पृथ्वीची जीवसृष्टी पोसण्याची क्षमता टिकून राहील. यासाठी फक्त ‘झाडे लावा झाडे जगवा’ची घोषणा देऊन पुरणार नाही तर प्रत्येकाने सजग ग्राहकाची भूमिका घेऊन विवेकी उपभोग करायला हवा. सुखसोईयुक्त जीवनशैलीचा निसर्गावर मोठा भार पडतो. आपल्या गरजा कमी करून ऐच्छिक वस्तूंचा उपभोग संयमी ठेवला, आणि प्रत्येक वस्तू जीवनचक्र पूर्ण होईपर्यंत वापरली, तरच बाजार-मागणी कमी होईल आणि निसर्ग टिकून राहील. विवेकी उपभोगाच्या मार्गात सरकारी हस्तक्षेप होण्याची वाट पाहावी लगत नाही. बाजारपेठेत ग्राहकांमुळेच मागणी निर्माण होते. पर्यावरणास घातक वस्तूंची मागणी कमीत कमी ठेवून पर्यावरणपूरक वस्तूंना प्रोत्साहन देणे, या बदलालाच ‘आधुनिक रेनेसाँ’ म्हणता येईल. सगळ्यांना सगळे शक्य नसते; पण छोटी सुरुवात केली तर पुढला मार्ग सोपा होत जातो. या विचारसरणीचे अनेक सुजाण नागरिक आज आहेत. त्यांना पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याची इच्छा आहे पण बाजारपेठेत अपुरी माहिती असल्यामुळे शक्य होत नाही. प्रत्येक उत्पादनावर त्याचा कार्बन पदचिन्ह (कार्बन फूटप्रिंट) आणि जलपदचिन्ह (वॉटर फूटप्रिंट) छापणे सरकारने बंधनकारक केले तर ग्राहकांना योग्य पर्याय निवडणे सोपे जाईल. 

निसर्गात प्रदूषण पचविण्याची ताकद आणि संसाधने विपुल असली तरी सीमित आहेत. पण उपभोगी जीवनशैलीत नैसर्गिक मर्यादा धूसर होत गेल्या आहेत. आर्थिक वृद्धी मर्यादित ठेवणे काही सरकारला शक्य नाही, त्यामुळे ग्राहकांनी जागृत होणे हा एकाच मार्ग आहे. असे करूनच संसाधनांचा शाश्वत उपभोग करून येणाऱ्या पिढ्यांसाठी सक्षम निसर्ग जपणे शक्य होईल. आज तांत्रिक प्रगती झपाट्याने चालू असली तरी याचा मुख्य वापर अर्थव्यवस्थेत होतो. पण तंत्रज्ञानाचा पर्यावरण पूरक वापरही होऊ शकतो. याच्या साह्याने आपल्या आचरणात बदल करू शकतो, प्रदूषण कमी होऊ शकते, नैसर्गिक परिसंस्था संवर्धन करता येतात. शाश्वत जीवनशैलीत अशाच तंत्रज्ञानाचा विकास होणे आवश्यक आहे. तरुण पिढीत अमाप कल्पकता आहे. त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले तर अशा तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक ‘स्टार्टअप’ पुढे येतील. पण तंत्रज्ञानाच्या मर्यादाही आहेत. आपला उपभोग कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक मानसिकता हवी. इथे तंत्रज्ञान फार मदत करू शकणार नाही, त्याला इच्छाशक्तीच हवी. 

ज्या प्रजाती वातावरणाशी आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतील त्यांचे भविष्य काही प्रमाणात तरी सुरक्षित राहू शकेल असे उत्क्रांतीच्या अभ्यासातून दिसते. हवामान बदलाचा शिल्पकार मानव आहे, आपणच आपल्या उपभोगात आणि आर्थिक आचरणात बदल करून यातून मुक्त होणे, हा एकच मार्ग आहे.

 

संबंधित बातम्या