कोरोना व अमेरिकी निवडणुका

डॉ. रश्मी भुरे, मुंबई
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

चर्चा   

अमेरिकेची २०२० ची अध्यक्षीय निवडणूक आता अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. केवळ अमेरिकी नागरिकच नव्हे, तर संपूर्ण जगाची उत्कंठा वाढवणारी अशी ही निवडणूक असते. कारण अमेरिकी निवडणुकीचा प्रभाव हा नेहमीच जगातील इतर देशांवरही होत आलेला आहे. यावेळी ही निवडणूक याआधीच्या निवडणुकांपेक्षा बरीचशी वेगळी आहे, कारण ती सर्वाधिक अनिश्चिततेच्या काळात घेतली जात आहे आणि निवडणुकीचा प्रचारही कोरोना महामारीच्या गडद सावटाखाली केला जात आहे. 

अमेरिकी निवडणुकीची प्रक्रिया ही लांबलचक असते, सुमारे एक वर्ष आधीपासूनच ती सुरू होते. असेही म्हटले जाते की एक निवडणूक पार पाडल्यानंतर लगेचच दुसऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होत असते. व्हाइट हाउससाठीची ही परंपरागत स्पर्धा आयोवा, कॉकस पासून सुरू होते. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये इतर राज्यांमधल्या प्राथमिक निवडणुकीच्या फेऱ्या सुरू होतात, ज्या मेपर्यंत चालतात. 

यावर्षी, मार्च महिन्याच्या आसपास कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे जॉर्जिया, मेरीलँड, लुझियाना यांसारख्या सुमारे १६ राज्यांना त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक फेऱ्या पुढे ढकलायला लागल्या, परिणामी प्राथमिक फेऱ्या जुलैपर्यंत सुरू राहिल्या. 

निवडणुकीतील पुढचा टप्पा असतो, ऑगस्ट महिन्यात होणारी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांच्या अध्यक्षीय उमेदवारांची अधिकृत निवड घोषित करण्यासाठी होणारी राष्ट्रीय अधिवेशने. परंपरेनुसार, ही पक्षीय अधिवेशने म्हणजे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आयोजिलेले आनंद मेळावे असतात. यांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात, निरनिराळे फलक आणि चित्रविचित्र टोप्या मिरवणाऱ्या विशाल जनसमुदायासमोर समारंभपूर्वक लांबलचक भाषणे दिली जातात. पण कोविडच्या वैश्‍विक महामारीमुळे पक्षीय अधिवेशनाचे हे चित्र पूर्णतः बदलून ते आभासी झाले. बहुतांश लोकांनी या बदलाचे स्वागत केले. आभासी अधिवेशनातील छोट्या आणि मुद्देसूद भाषणांचे मतदारांकडून स्वागत झाले. आनंदित झाले. निवडणुकांमध्ये यापुढेही अशा आभासी अधिवेशनांच्या नवीन पद्धतीचा  अवलंब केला जाईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर यातून निवडणूक प्रचारांवर असलेला कॉर्पोरेट जगाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कालावधीत उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या, ७७ वर्षीय जोसेफ/जो बायडेन यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे अधिकृत अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड झाली. माजी डेमोक्रॅटिक अध्यक्ष, बिल क्लिंटन, यांनी बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना अधिवेशनात सांगितले, की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ‘गोंधळ’ घातलेला आहे. जो बायडेन हे याआधी व्हाइट हाउसच्या स्पर्धेत तीन वेळा उतरले आहेत. पहिल्यांदा १९८८ च्या अध्यक्षीय निवडणुकीत, २००८ च्या उपराष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आणि आता ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी. त्यांनी त्यांच्या प्रचारात घोषणा केली आहे, की व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते ‘ओबामाकेअर’चा आवाका अधिक विस्तृत करतील, किमान वेतनवृद्धी करतील, गुन्हेगारी न्यायप्रणालीत सुधारणा आणि अल्पसंख्याकांना आधार देणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक योजना नव्याने आणतील. बायडेन यांच्या मते, हवामान बदल ही जगाला भेडसावणारी गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे अमेरिका हवामान बदलविषयक पॅरिस करारात पुन्हा सामील होईल. परराष्ट्र धोरणाबाबत बायडेन बहुपक्षीय धोरण पुरस्कृत करतात. 

रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांची पुन्हा एकदा पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाली. त्यांनी बायडेन हे तीव्र (टोकाच्या) डाव्या विचारसरणीचे असल्याची टीका केली आणि अमेरिकी जनतेला इशारा दिला, की बायडेन निवडून आले तर ते कर आणि ऊर्जेच्या दरात वाढ करतील, अनधिकृत स्थलांतराला प्रोत्साहन देतील. माइक पेन्स यांच्या म्हणण्यानुसार, की बायडेन हे देशाचे संरक्षण करण्यात खूप कमजोर आहेत आणि ते सत्तेत आले तर नागरिक सुरक्षित राहणार नाहीत. रिपब्लिकन सदस्यांनी, त्यांच्या प्रचारात ट्रम्प प्रशासनाने कोविड महामारीचा कसा यशस्वी मुकाबला केला, यावर भर दिला. यात आश्चर्याची गोष्ट ही होती, की बहुतांश वक्ते कोरोना महामारीचा उल्लेख भूतकाळात करत होते आणि त्यातून हे सूचित करत होते, की ती लवकरच इतिहासजमा होईल. अधिवेशनात अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला; ते मुद्दे म्हणजे, ट्रम्प प्रशासनाने २०१७ चा Tax Cut Law (कर सवलत कायदा) यासारखी केलेली आर्थिक कामगिरी किंवा गेल्या चार वर्षांमध्ये केलेले निरनिराळे व्यापारी व्यवहार आणि ट्रम्प यांनी दिलेले ‘अमेरिकेला पुन्हा महासत्ता करू’ हे वचन. बऱ्याच काळानंतर रिपब्लिकन अधिवेशनात कृष्णवर्णीय मतदारांबद्दल भरभरून बोलले गेले. जॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’सारखी चळवळ, गेल्या काही महिन्यांमध्ये वांशिक न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या शांतिपूर्ण निषेध यात्रांनी ट्रम्प यांना हे जाहीरपणे सांगण्यास भाग पाडले, की कृष्णवर्णीयांच्या जीविताबद्दल त्यांना काळजी वाटत आहे आणि पुन्हा निवडून आल्यानंतर ते त्यांच्यासाठी भरीव कामगिरी करतील. 

ईस्ट आणि वेस्ट कोस्ट राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व आहे, तर दक्षिण आणि मध्य भागात रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. प्रचाराच्या या निर्णायक आठवड्यांमध्ये, पक्ष ‘स्विंग स्टेट्स’वर आपले लक्ष अधिक केंद्रित करतात, कारण ती ‘इलेक्टोरल कॉलेज’चे ५३८ पैकी २७० मते मिळवण्याचे अंकगणित ठरवण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. अॅरिझोना (११ इलेक्टोरल मते), फ्लोरिडा (२९), मिशीगन (१६), नॉर्थ कॅरोलिना (१५), पेनसिल्व्हेनिया (२०) आणि विस्कॉनसिन (१०) ही राज्ये जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी फार मोठे फरक घडवू शकतात. २०१६ च्या निवडणुकांमध्ये, ट्रम्प यांनी फ्लोरिडा, मिशीगन, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉनसिन इथे एक टक्क्यांहून कमी फरकाने निसटता विजय मिळवला होता. स्विंग स्टेट्समध्ये अंदाजे १८ लाख भारतीय-अमेरिकी मतदार आहेत. ट्रम्प आणि बायडेन हे दोघेही त्यांच्या प्रचारात या भारतीय-अमेरिकी मतदारांची मने स्वतःकडे वळवण्यावर भर देत आहेत. बायडेन यांनी भारतीय-अमेरिकी लोकांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्यासाठी जन्माने मूळ भारतीय असलेल्या सेनेटर कमला हॅरिस यांची निवडणुकीत उपाध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली आहे. भारतीय -अमेरिकी हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि उच्चशिक्षित स्थलांतरित म्हणून गणले जातात आणि आता निवडणूक प्रचारात ते महत्त्वाचे देणगीदार म्हणून पुढे येत आहेत. नुकत्याच झालेल्या बहुतांश सर्वेक्षणांमध्ये असे आढळून आले आहे, की भारतीय-अमेरिकी मतदारांचा कल जो बायडेन यांच्याकडे झुकत आहे, कारण ते अनेक वर्षांपासून भारताचे समर्थक आहेत. तसेच त्यांच्या पर्यावरण आणि आरोग्य सुविधांविषयीच्या योजना या मतदारांना पटण्यासारख्या आहेत. याउलट, ट्रम्प यांच्या धोरणांमधील अनिश्चितता त्यांना रिपब्लिकन पक्षापासून दूर ढकलत आहे. 

आत्ता तरी, जो बायडेन हे ‘स्विंग स्टेट्स’मध्ये आघाडीवर आहेत. पण यातून त्यांच्या विजयाची खात्री देता येणार नाही. कारण हिलरी क्लिंटन यांचीदेखील मागील निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती होती, तरीही त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये आवश्यक तितकी मते मिळवण्यात असमर्थ ठरल्या. 

प्रचारधुमाळीत आता रंगत आणली आहे, ती निवडणुकीआधीच्या अध्यक्षीय चर्चेने! अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात अध्यक्षीय चर्चेच्या तीन फैरी झडणार आहेत. तसे पाहिले तर हे निव्वळ प्रदर्शनीय व नाट्यमय  कार्यक्रम असतात आणि निवडणुकीच्या निकालात त्यांच्यामुळे फारसा फरक पडत नाही. पण प्रचाराला वेग नक्की येतो. पहिली चर्चा २९ सप्टेंबर रोजी क्लिव्हलँड येथे झाली. यादरम्यान दोन्ही उमेदवार निरनिराळ्या मुद्यांवर बोलताना एकमेकांना धड बोलूही देत नव्हते आणि एकमेकांचा अपमान करत होते. या गोंधळ असलेल्या चर्चेवर पूर्ण अमेरिका आणि जगभरातून टीकेचे पडसाद उमटले. अध्यक्षीय चर्चा आयोजित करणाऱ्या समितीने तर घोषणा केली, की लवकरच ते ३ नोव्हेंबरपूर्वी होणाऱ्या उर्वरित दोन चर्चा आणि एक उपाध्यक्षीय चर्चांमध्ये ‘विषयांवर व्यवस्थित (गांभीर्यपूर्वक) चर्चा करण्यासाठी’ काही नवीन उपाययोजना जाहीर करणार आहेत. यापुढील चर्चा १५ आणि २२ ऑक्टोबरला होणार आहेत. 

प्रचाराच्या या रणधुमाळीला आता एक नवीन वळण मिळाले आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलनिया ट्रम्प हे दोघेही कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षांच्या फ्लोरिडा, जॉर्जिया, मिनिसोटा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि वर्जिनिया येथील प्रमुख प्रचार कार्यक्रम आणि सभा सध्या तरी रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील अध्यक्षीय चर्चाही अनिश्चिततेच्या धुक्यात सापडली आहे. व्हाइट हाउस हा संसर्ग कितपत दूरवर पसरला आहे याचा शोध घेत आहे. ट्रम्प यांचे सल्लागार होप हिक्स आणि प्रचार व्यवस्थापक बिल स्टेपिन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. जर व्हाइट हाउसमधील अन्य सदस्यांनाही ही लागण झाली असेल, तर कोविड १९ चे राजकीय पडसाद दूरगामी असतील. ट्रम्प यांनी केलेला मास्क विरोधी प्रचार आणि त्यांनी जो बायडेन यांची अध्यक्षीय चर्चेदरम्यान मास्क लावण्यावरून केलेली थट्टा त्यांच्या विरोधात जाऊ शकते. 

यावेळच्या अमेरिकी निवडणुका सर्वात अनिश्चित काळात होत आहेत. कोविड महामारीच्या पडछायेने अमेरिकी निवडणुकीची समीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत. रिपब्लिकन्स या आशेवर आहेत, की ट्रम्प त्यांच्या प्रचाराचा शेवटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडण्यासाठी लवकरच परत येतील आणि तसे झाले तर चित्र पूर्ण बदलू शकेल. अमेरिकी लोक मात्र या एकाच आशेवर आहेत, की यापुढे ३ नोव्हेंबरपर्यंत तरी कोणतेही मोठे विघ्न न येता निवडणुका सुरळीतपणे पार पडतील.     

संबंधित बातम्या