बोचऱ्या थंडीच्या लाटांचे भाकीत   

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

चर्चा         

यंदाचा हिवाळा नेहमीच्या हिवाळ्यापेक्षा जास्त बोचरा असेल आणि या काळात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये थंडीच्या लाटाही येण्याची शक्यता असल्याचे भाकीत भारतीय हवामान खात्याने वर्तविले आहे. कोरोनाचा या कालखंडांत जास्त फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे सामान्य माणसाच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे यात शंका नाही. 

येऊ घातलेल्या तीव्र बोचऱ्या थंडीची चाहूल उत्तर भारतात, विशेषतः दिल्लीत १ डिसेंबर पासून एकदम कमी झालेल्या तापमानामुळे लागलीच आहे. दिल्लीत सामान्य तापमानात पाच अंश सेल्सिअसने घट होऊन तिथले तापमान ११.५ अंश सेल्सिअस इतके झाले होते. या वर्षी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यातच गेल्या ५८ वर्षांतील न्यूनतम म्हणजे १७.२ अंश से. तापमानाची नोंद झाली होती.   

या वर्षी थंडीच्या तीव्र लाटेत जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा असा विस्तीर्ण प्रदेश बाधित होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

या अतितीव्र बोचऱ्या थंडीच्या लाटेचे मुख्य कारण, म्हणजे ऑगस्ट २०२० पासून प्रशांत महासागरावर अस्तित्वात असलेल्या दुर्बळ ला निना (La Nina) या समुद्र प्रवाहाशी निगडित असल्याचे मतही हवामान खात्याने दिले आहे. प्रशांत महासागरातील एल निनो (El Nino) आणि ला निना या दोन्ही प्रवाहांच्या निर्मितीचा भारतातील हिवाळ्यावर आणि थंडीच्या लाटा निर्माण होण्यावर मोठा परिणाम नेहमीच होत असल्याचे लक्षात आले आहे. ‘ला निना’ची परिस्थिती थंडीच्या लाटा तयार होण्यासाठी अनुकूल तर एल निनोची परिस्थिती प्रतिकूल असते. ला निना असताना प्रशांत महासागरातील पाणी थंड असते, तर एल निनोच्या परिस्थितीत उबदार असते. भारतात एल निनोमुळे मॉन्सून दुर्बल होतो, तर ला निना असताना तो अधिक प्रबळ असतो असेही निरीक्षण आहे. या वर्षी बंगालच्या उपसागरातील चक्रवातांची (Cyclones) वाढलेली संख्या हासुद्धा ला निना प्रवाहांच्या अस्तित्वाचाच परिणाम आहे.  
एल निनो आणि ला निना हे प्रशांत महासागरांत अनियमितपणे तयार होणारे समुद्र प्रवाह आहेत. एल निनोमुळे समुद्र पृष्ठावरील तापमान बदल विषुववृत्तापासून उत्तरेला व दक्षिणेला साडेसात अंश अक्षांश प्रदेशात आढळतात. नेहमीपेक्षा तापमान तीन अंश सेल्सिअसने वाढते. कमी भाराच्या पूर्वेकडील सरकण्यामुळे, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, आफ्रिका व भारतात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्‍भवते. भारतात मोसमी पाऊस पुढे जातो किंवा खूप कमी पडतो. सामान्यपणे एल निनो नंतर ‘ला निना’ची परिस्थिती निर्माण होते. ला निना हा प्रवाह एल निनोच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाचा असून, त्यामुळे प्रशांत महासागरात विषुववृत्तीय प्रदेशात तापमानात एकदम घट होते. हा प्रवाह जेव्हा निर्माण होतो तेव्हा व्यापारी वारे अधिक वेगवान होतात. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सागरजलाचे तापमान कमी होते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात तापमानात वाढ होते. इथे सागर पृष्ठावरील वायुभार कमी होतो आणि मुसळधार अतिवृष्टी होते. आग्नेय आशियात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि पूर्व प्रशांतमध्ये पेरू देशातील वाळवंट जास्तच कोरडे होते.

दरवर्षी थंडीच्या दिवसांत उत्तर भारताचा फार मोठा भाग या लाटेच्या प्रभावाखाली येतो असे दिसून येते. असे असले तरी त्यातील तीव्रतेत होणारे बदल आणि बदलते सातत्य यांचा संबंध जागतिक हवामान बदलाशी असावा असेही काही शास्त्रज्ञांना वाटत आहे.

थंडीच्या लाटेच्या या संकटाकडे आपण तसे कधीही गांभीर्याने पाहत नाही. या लाटेचे भाकीत करणे किंवा त्याची पूर्व सूचना देणे याकडे आपण किती दुर्लक्ष करतो याची कल्पना या काळात होणाऱ्या हानीकडे बघून कोणालाही करता येईल. खरे म्हणजे या नैसर्गिक घटनेत विशिष्ट आकृतिबंध आढळतात. ते अभ्यासून त्याचे पूर्वानुमान करता येते. अर्थात हे पूर्वानुमान थोडे फार मागे पुढे होण्याची शक्यता नेहमीच असते. पण संकटाच्या तीव्रतेची कल्पना यामुळे नक्कीच येऊ शकते.

ऑक्टोबर ते एप्रिल या कालखंडात भारतात थंडीची लाट येण्यासारखी परिस्थिती तयार होत असली, तरी नोव्हेंबर ते मार्च या काळातच त्याची शक्यता सर्वाधिक असते. या काळात, उत्तर भारतात वातावरणाच्या खालच्या थरात थंड व कोरडे वारे वाहतात. अनेक वेळा हे वारे खूपच थंड होतात आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे एकामागून एक असे ठराविक काळ वाहतात. यावेळी नेहमीच्या सरासरी तापमानापेक्षा रात्रीचे तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. यामुळे वारे अधिकच बोचरे होतात. यालाच थंडीची लाट किंवा शीत लहर असे म्हटले जाते.

बऱ्याच वेळा असेही दिसते की भारतातील शीत लहर म्हणजे, ७६ अंश पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेकडील भागात निर्माण होणाऱ्या शीत लहरीचा फैलाव किंवा विस्तार असतो. काही वेळा शीत लहरीचा काही भाग पश्चिमेकडील फैलावापासून तुटून पूर्वेकडे प्रवास करू लागतो. अशा तुटलेल्या भागामुळे भारताच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेचा प्रभाव अनेक दिवस जाणवत राहतो. सौराष्ट्र व मध्य प्रदेश येथे अनेकदा स्वतंत्रपणे शीत लहरी तयार होतात. त्या लगेचच क्षीणही होतात. राजस्थानमध्ये तयार झालेल्या लहरी मात्र विस्तारून पूर्वेकडे व दक्षिणेकडे पसरतात.

शीत लहरींची तीव्रता एकाएकी कमी होणे किंवा वाढणे, तिचा भौगोलिक विस्तार वाढणे किंवा आक्रसणे या घटना या वर्षी प्रकर्षाने जाणवतील. अशा घटनेत थंड हवेचे पुंजके तयार होऊन ते विखुरतात आणि तापमानात एकदम घट होते. वायव्य भारतात जेव्हा जेव्हा कमी भाराचे तीव्र प्रदेश निर्माण होतात तेव्हा तेव्हा सहा सात दिवसांच्या अंतराने वायव्येकडून गंगेच्या खोऱ्याकडे थंडीच्या लाटा येऊ लागतात. 

शीत लहरींची संख्या आसामच्या दिशेने व दक्षिणेकडे कमी होत जाते. कोकण, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, अंदमान आणि लक्षद्वीप येथे थंडीच्या लाटेचा प्रभाव अगदीच नगण्य असतो. हिमाचल, पंजाब, मध्य व उत्तर प्रदेशाचा मोठा भाग हा भारतात थंडीची लाट निर्माण होण्याचा गाभा प्रदेश आहे. या भागात शीत लहरींच्या कालखंडात उणे चार ते उणे सोळा अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान आढळून येते.

फेब्रुवारी महिना भारतात शीत लहरींना साधारणपणे जास्त अनुकूल असतो. असे असले तरी भारतात शीत लहरींमध्ये विशिष्ट कालसातत्य दिसत नाही. गेल्या काही वर्षांत तर हे सातत्य अगदीच बेभरवशी झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये विविध प्रदेशात ज्या शीत लहरी अनुभवास येतात, त्या पाच लाख चौरस किमीपेक्षा जास्त भूभाग व्यापतात असे आता दिसून आले आहे.

महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवतो. या काळात तापमानात ८ ते १२ अंश सेल्सिअसने घट होते. नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेकदा उत्तरेकडून आलेल्या शीत लहरी घुसतात. मात्र त्या पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारताचा फार मोठा भूभाग थंडीच्या तीव्र लाटेमुळे गारठून गेला आहे. उणे चार ते उणे सोळा अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान आणि त्याबरोबर येणारे वारे व दाट धुके यामुळे भारतातील, विशेषतः उत्तर भारतातील, जनजीवन  कोलमडून गेले आहे. महाराष्ट्रात फक्त सकाळच्याच वेळी दिसणारा दाट धुक्याचा थर उत्तर भारतात त्याहीपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या लाटेचा परिणाम महाराष्ट्रासह दक्षिणेकडच्या काही राज्यात याहीपेक्षा जास्त जाणवण्याची शक्यता नजीकच्या महिन्यात आहे. 

थंडीच्या लाटेचे हे संकट वहाने आणि गिरण्या यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे अधिकच तीव्र होत असल्याचे दिसून येते. या प्रदूषकांचे दाट थर जमिनीलगत तयार झाल्यामुळे सूर्यऊर्जेच्या प्रमाणात घट  होऊन थंडीत वाढ होते आहे. यामुळे दिल्लीत तापमान चार अंशापर्यंत, नागपूरमध्ये पाच अंशापर्यंत तर अति उत्तरेला शून्याखाली तापमान नोंदविले जाते.  

भारतीय हवामान खात्याने तयार केलेल्या हवादर्शक नकाशांचा अभ्यास, हे थंडीच्या लाटेच्या प्रवासाचे भाकीत करण्यासाठी वापरता येईल असे उत्तम व सोपे तंत्र आहे. सामान्य तपमानापासून रोजच्या कमीत कमी तापमानात झालेले बदल अभ्यासून हे करणे शक्य होते. थंडीपासून माणसांचे, इतर प्राण्यांचे, वनस्पतींचे आणि शेतीचे संरक्षण करणे फार गरजेचे असते. याकरिता थंडीच्या लाटेचे पूर्वानुमान करण्याला प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे.

थंडीच्या लाटेच्या आकृतिबंधात गेल्या काही वर्षांत आढळणारे बदल, हवामानात जागतिक पातळीवर होत असलेल्या बदलाचे निर्देशक असावेत असे अनेक शास्त्रज्ञांना आज खात्रीने वाटत आहे!

न्यूनतम तापमानाच्या सरासरी प्रवृत्तीत सध्या आढळणाऱ्या चढ उतारामुळे थंडीच्या लाटेचे पूर्वानुमान किंवा भाकीत करणे थोडे कठीण नक्कीच होते आहे. पण तरीही असे भाकीत करण्याला प्राधान्य देणे गरजेचे  झाले आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामान आणि विशेषतः तापमान बदलाचे हे चढ उतार खरोखरच निर्देशक आहेत का याचाही मागोवा घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या