एनएफटीः डिजिटल अर्थक्रांती

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 12 एप्रिल 2021

चर्चा

बिटकॉइनपाठोपाठ आलेल्या ‘एनएफटी’नं (नॉन फंगीबल टोकन) डिजिटल अर्थव्यवहारांत नव्या बदलांचं सूतोवाच केलंय. डिजिटली युनिकनेस असलेल्या प्रत्येक व्हर्च्युअल ऑब्जेक्टची किंमत वाजवून वसूल करण्याकडे जगभरातील गर्भश्रीमंतांचा कल दिसून येतो. हे सगळे व्यवहार क्रिप्टोकरन्सीत होत असल्याने त्यांचा भाव देखील चांगलाच वधारला आहे. ‘एनएफटी’मुळं भविष्यात अनेक आर्थिक व्यवहारांचं स्वरूप बदलेल. आता याची कोठे सुरुवात झालीय.

ह्युमनॉईड रोबो सोफियानं काढलेल्या डिजिटल ‘आर्टवर्क’चा ६ लाख ८८  हजार ८८८ डॉलर एवढ्या विक्रमी किमतीला लिलाव झालाय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक केव्हिन रोझ यांचा ‘बाय धिस कॉलम ऑन दि ब्लॉकचेन’ या शीर्षकाचा लेख तब्बल ५ लाख ६३ हजार डॉलरला विकला गेला. त्याही आधी ट्विटरचे सहसंस्थापक आणि प्रमुख जॅक डोर्से यांनी ट्विटरवरून पाठविण्यात आलेला पहिला मेसेज तब्बल २.९ दशलक्ष डॉलरला विकला होता. यासाठी ऑनलाइन बोली लावण्यात आल्यानंतर डोर्से यांनी बाजी मारत विक्रमी किंमत मिळविली होती. आता या लिलावामध्ये नवीन काय? असा प्रश्‍न कुणालाही पडू शकतो. पण निष्कर्ष काढण्याआधी थोडं थांबा! हा सगळा व्यवहार झालाय ‘एनएफटी’च्या माध्यमातून अर्थात ‘नॉन फंगीबल टोकन’द्वारे. डिजिटल विश्वाचं चलन मानल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीनं प्रचलित अर्थव्यवहाराच्या चौकटी मोडीत काढल्या आहेत. आता ‘एनएफटी’ हे त्याच्या पुढचं पाऊल. व्हर्च्युअल जगामध्ये ‘एनएफटी’ हे डिजिटल ऑब्जेक्ट असतं. यामध्ये चित्र, संगीत, छायाचित्र, व्हिडिओ कशाचाही समावेश असू शकतो. त्याच्या अधिकृतपणाच्या दर्जाला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रमाणपत्राचा आधार मिळतो. हे सगळं काही संगणकाच्या महाकाय जाळ्यांतून तयार होत असल्यानं यासंबंधीच्या नियमांचं उल्लंघन  जवळपास अशक्य समजलं जातं. कॉम्प्युटर फाईलसारखी कोणत्याही व्हर्च्युअल वस्तूची या नेटवर्कच्या माध्यमातून देवाणघेवाण केली जाऊ शकते किंवा तिची खरेदी- विक्री होऊ शकते.

नव्या क्रांतीच्या दिशेने
एखादा कलाकार जेव्हा कलाकृतीला जन्म देतो तेव्हा ती एकमेवाद्वितीय असते. पण याच कलाकृतीचं रूपांतर मात्र जेव्हा व्हर्च्युअल ऑब्जेक्टमध्ये होते तेव्हा मात्र तिच्या कितीही कॉपीज (नक्कल) तयार करता येतात. पुढे हीच कलाकृती ‘एनएफटी’द्वारे लिलावासाठी येते तेव्हा मात्र तिचं रूपांतर हे एका डिजिटल टोकनमध्ये होतं. यातून निर्माण होणाऱ्या डिजिटल सर्टिफिकेटची खरेदी अथवा विक्री होऊ शकते. तसंही क्रिप्टोकरन्सीचे सगळे व्यवहार हे ब्लॉकचेनवरच नोंदले जातात. या व्यवहारांची खातेवही देखील जगभरातील संगणकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अपडेट होत असल्याने त्यात नियमांच्या उल्लंघनाची शक्यता कमीच असते. त्यामुळे पारदर्शकतेच्या बाबतीत या व्यवहारांना तोड नाही.

माईक विंकलमन ऊर्फ ‘बीपल्स’ने काढलेल्या एका कलाकृतीचा ‘एनएफटी’च्या माध्यमातून तब्बल ६९ दशलक्ष डॉलरला लिलाव झाला होता. ‘बीपल्स’च्या त्या चित्राची कितीजणांनी कॉपी केली असेल याची गणती नाही पण त्या मूळ कलाकृतीचे कॉपीराइट मात्र त्याच्याकडेच राहिले. हे सगळे घडलंय ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळं. ‘एनएफटी’च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते ती म्हणजे डिजिटल टोकन होय. कारण जे काही व्यवहार होतात त्यामध्ये या टोकनचीच देवाणघेवाण होत असते. आज जगभरातील हौशी धनाढ्य मंडळी या टोकनच्या खरेदीसाठी आसुसलेली आहेत. भविष्यामध्ये याच हॅकप्रुफ टोकन्सच्या माध्यमातून खासगी आणि सार्वजनिक डेटा साठवून ठेवता येईल. आर्थिक पातळीवर देवाणघेवाण आणि मालमत्तांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांचे स्वरूप देखील त्यामुळे बदलेल. ज्या स्मार्ट काँट्रॅक्टच्या माध्यमातून हे सगळं काही होईल, त्यात तिऱ्हाइताची गरजच असणार नाही. येथे न्यायालयाची जागा कॉम्प्युटर प्रोग्रॅम घेईल, असे भाकीतही अनेकांनी वर्तवलंय. 
लक्ष्मीपुत्रांमुळे वधारले भाव
कोरोनाच्या काळात जगातील आघाडीच्या धनकुबेरांनी स्वतःच्या झोळ्या डिजिटल करन्सीनं काठोकाठ भरून घेतल्या आहेत. ‘टेस्ला’चे एलॉन मस्क हे केवळ त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल. सध्या एका बिटकॉइनचा ४२ लाख रुपयांवर पोचलेला विक्रमी दर हा या सगळ्या लक्ष्मीपुत्रांचीच कृपा. तसं पाहता या डिजिटल चलनाचं वय हे अवघं बारा ते तेरा वर्षांचं. हे चलन जेव्हा संगणकावर अवतरलं तेव्हाच पारंपरिक चलन व्यवस्थेला पर्याय निर्माण झाल्याचा सूर अर्थअभ्यासकांनी आळवला होता. या करन्सीच्या आगमनामुळं एक वेगळं अर्थविश्‍व तयार होईल असंही बोललं जात होतं. तसं ते तयार झालं पण तेही काही मूठभर नवश्रीमंतांसाठी. याला कारण ठरलंय कोरोनाचं संकट. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये हे डिजिटल व्यवहार तब्बल चारशे टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग ही क्षेत्रे वेगाने विकसित होत गेली. याचा फायदा तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी उचलला नसता तरच नवल.

तज्ज्ञांची दोन मते
डिजिटल चलन आणि या टोकन्सबाबत देखील अर्थतज्ज्ञांमध्ये दोन प्रवाह आहेत. काहींना हा सगळा फुगवटा वाटतो. काही बड्या मंडळींना पैशांसाठी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू विकायच्या असतात त्यामुळे हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे ‘बीपल्स’चं म्हणणं आहे. सध्या ‘एनएफटी’ची जी चलती दिसत आहे ती देखील फार काळ टिकणारी नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. जी गोष्ट प्रत्यक्ष आपल्या हातामध्येच नाही तिच्यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणे अनेकांना हास्यास्पद वाटतं. पण काही मोजकी मंडळी ही गुंतवणूक करताहेत हे वास्तव आहे. ते जगभरातील श्रीमंतांनी काही काळासाठी तरी स्वीकारलंय.

‘एनएफटी’बाबत देखील तेच
आज एनएफटीबाबत जी अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. कधीकाळी तीच स्थिती डिजिटल करन्सीबाबत देखील होती. २००८च्या जागतिक मंदीची तीव्रता कमी होत असताना २००९ मध्ये बिटकॉइनचा जन्म झाला. या निमित्ताने देशोदेशीच्या आर्थिक नियमन संस्थांना वेगळा पर्याय निर्माण होईल, असे बोललं जात होतं. कदाचित पहिल्या बिटकॉइनाला जन्म देणाऱ्या आणि आतापर्यंत गुप्तच राहिलेल्या सातोशी नाकामोटो यांचंही  हेच स्वप्न असावं. आता मात्र जगभरातील श्रीमंत मंडळींनी ते पार धुळीला मिळवलंय. जगातील बड्या अर्थव्यवस्थांना वाटत असलेला डिजिटल करन्सीचा धोका लपून राहिलेला नाही. त्यामुळेच अनेक देशांनी स्वतःच्या चलनाची ताकद कायम ठेवण्यासाठी डिजिटल चलनावर बंदी घातली आहे. भारतासारखा देश देखील त्याला अपवाद नाही.  यामध्ये प्रत्येक देशाचा कल हा तोलूनमापून जोखीम स्वीकारण्याकडे दिसतो. अर्थात विविध देशांच्या नियमन व्यवस्था आणि सार्वभौम असं डिजिटल चलन यांच्यातील संघर्ष एवढ्यात थांबणारा नाही. याला कारण आहे ते  या चलनामागं उभं असलेलं ब्लॉकचेन तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान अपडेट होण्याचा वेगही मोठा असल्याने नियमन यंत्रणांची त्यामुळे दमछाक होणार एवढे मात्र नक्की.
 

संबंधित बातम्या