टेस्ला बॉट

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

चर्चा   

ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्ला तंत्रज्ञानाचा व्यापार करतेय. अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या एलॉन मस्क या धाडसी उद्योजकानं आता ‘टेस्ला बॉट’ या ह्युमनॉईड रोबोच्या माध्यमातून अर्थकारणाचे सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. श्रमाची पारंपरिक व्याख्या मोडीत काढणारं हे तंत्रज्ञान आव्हानांबरोबरच मोठ्या संधीदेखील घेऊन येतंय.

कोरोनाकाळात जागतिक उद्योगचक्राची चाकं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे फिरू लागली आहेत. वैश्‍विक अर्थकारणावर एकहाती वर्चस्व गाजविणाऱ्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मानवी श्रमापेक्षाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारे होणाऱ्या कामांना महत्त्व दिल्याचं दिसतं. तंत्रज्ञान विकासाचा अफाट वेग लक्षात घेतला तर येत्या काही वर्षांमध्ये अर्थकारणाचे संदर्भ आमूलाग्र बदलू शकतात यात तिळमात्र शंका नाही. स्पेस रेसमध्ये उतरलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेक्नोक्रॅट उद्योजक एलॉन मस्क यांनी आता रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काहीतरी नवं करण्याचा विडा उचलला आहे. ‘ह्युमनॉईड रोबो’च्या माध्यमातून टेस्ला एक पाऊल पुढं टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘टेस्ला बॉट’ हे या यंत्रमानवाचं नाव. टेस्लाच्या ‘एआय’ दिनी मस्क यांनी या रोबोच्या निर्मितीची घोषणा केली. 

अत्यंत जोखमीची तसेच वारंवार करावी लागणारी रटाळ कामं या रोबोवर सोपवून माणसाला निर्धास्त होता येईल. त्यामुळं भविष्यात अंगमेहनतीची कामं करायची की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असेल. (मस्क यांच्या भाषेत तो पूर्णपणे तुमचा चॉईस असेल.) कोणत्याही उद्योगाच्या उभारणीसाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या गोष्टी आवश्‍यक असतात. यातील श्रम या घटकाचे स्वरूप नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आंतर्बाह्य बदलून जाईल. तसंही आपली लाडकी ‘टेस्ला’ ही कार ‘रोबो ऑन व्हिल्स’ असल्याचं मस्क मोठ्या गर्वानं सांगतात. हे सेमी ऑटोनॉमस वाहन असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘माणसानं माणसासाठी तयार केलेल्या जगात’ रोबोटिक्स तंत्रज्ञानाला एखाद्या आज्ञाधारक नोकराप्रमाणं राबवून घेण्याचा त्यांचा इरादा दिसतो. 

रोबो टॅक्सी वेटिंगवर
खरंतर पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सीच्या निर्मितीचं मस्क यांचं स्वप्न फार जुनं आहे. साधारणपणे २०२०च्या अखेरपर्यंत दहा रोबो टॅक्सी बाजारात आणण्याची घोषणा त्यांनी केली होती. सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरला नियामक यंत्रणांकडून अद्याप परवानगी न मिळाल्यानं हे घोडं अर्ध्यावरच थांबलं. आता ‘टेस्ला बॉट’ हे त्यापुढचं पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भविष्यात निर्मिती क्षेत्रातील जोखमीची आणि खाणकामासारखी अतिश्रमाची कामं टेस्लाचा रोबो करेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण याचा आणखी एक मोठा धोकादेखील संभवतो तो म्हणजे मानवी श्रमांचं मूल्य कमी होणं. ही बाब पूर्णपणे भांडवलशाहीच्या पथ्यावर पडणारी आहे. अर्थात ‘एआय’च्या जन्मापासून अनेक विचारवंत ही भीती व्यक्त करताना दिसतात. आयटी क्षेत्रातील काही संशोधकांना मात्र ही भीतीदेखील अनाठायी वाटते. अर्थकारण आणि व्यवहाराचा नवा आयाम म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मस्क यांचं हे रोबोटिक्स तंत्रज्ञान पुढील काही दशकांत जगभर धुमाकूळ घालेल यात शंकाच नाही पण त्यामुळं लोकांच्या रोजगारांवर गदा येता कामा नये एवढीच माफक अपेक्षा.

तांत्रिक सज्जता आणि सोयी
साधारणपणे पाच फूट आठ इंच उंचीचा ‘टेस्ला बॉट’ २०.४ किलोचे ओझे सहज वाहून नेऊ शकतो. त्याचं स्वतःचं वजन ५६ किलो आहे आणि तो ६८ किलोग्रॅम ओझे उचलू शकतो. आठ किलोमीटर प्रतितास या वेगानं काम करत असल्यानं त्याला वेगानं कामं आटोपणं सहज शक्य आहे. या रोबोत ४० इलेक्ट्रोमेकॅनिकल ॲक्चुएटर्स असल्यानं त्याला सफाईदारपणे हालचाल करता येते. टेस्ला कारच्या निर्मितीसाठी ज्या टूल्सचा वापर करण्यात आला आहे त्या सगळ्यांचा या रोबोत समावेश आहे. न्यूरल नेट प्लॅनिंग, एफएसडी हार्डवेअर, डोजो ट्रेनिंग आणि ऑटोपायलट कॅमेरे ही सगळी आयुधं या यंत्रमानवाकडे असतील. पुढील वर्षी हा यंत्रमानव जगासमोर येईल.

तंत्रज्ञानाचा व्यापार

टेस्लानं त्यांच्या सगळ्या यंत्रणांना वेग देण्यासाठी ‘डोजो’ या संगणकाचा आधार घेतला असून तोच कंपनीच्या स्वयंचलित चालकप्रणालीचा सर्वांत मोठा मार्गदर्शक मानला जातो. कंपनीनं यासाठी वेगळी चीपदेखील विकसित केली आहे. जगातील सर्वांत वेगवान प्रशिक्षण संगणक तयार करण्याचा ‘टेस्ला’चा इरादा होता. ‘डोजो’ हे याच संकल्पाला आलेलं फळ आहे. प्रस्थापित उद्योगांचं सगळं चित्रच या संगणकाच्या येण्यामुळं बदलेल असं जाणकारांना वाटतं. खरंतर टेस्लाच्या आगमनामुळं वाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलेल. ही कंपनी विकसित करत असलेलं तंत्रज्ञान वाहन क्षेत्रातील अन्य कंपन्यांनाही खुणावतं आहे. खुद्द टेस्लानं तशी तयारी दर्शविल्यानं सगळ्या कंपन्यांच्या नजरा याकडे लागल्या आहेत. गाड्यांसाठीची फूल सेल्फ ड्रायव्हिंग (एफएसडी) प्रणाली विकसित करणं खूप आव्हानात्मक मानलं जातं. ही प्रणाली अन्य कंपन्यांना विकून त्यातून नफा कमावण्याचा मस्क यांचा इरादा आहे. या प्रणालीमुळे इतर कंपन्यांनाही खूप मोठा आर्थिक लाभ होईल, त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासावर फारसा खर्च करावा लागणार नाही. टेस्लाच्या या प्रणालीची किंमत किती असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडं काही संशोधक मात्र ही प्रणाली तांत्रिक कसोट्यांवर फारशी यशस्वी ठरली नसल्याचं सांगतात. या प्रणालीच्या माध्यमातून वाहनाचं दिशादर्शन होऊ शकतं. ती ट्रॅफिक लाइट आणि अन्य चिन्हांचा अर्थ लावू शकते. तसं विश्‍लेषणही करू शकते. एका मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा हाताळता येऊ शकेल पण ती पूर्णपणे स्वयंचलित आहे असं मात्र म्हणता येणार नाही, असं काही तज्ज्ञांचं म्हणणे आहे. 

ऑटोमोबाइलचे ‘स्टीव्ह जॉब्स’
जगाचं ऑटोमोबाइल सेल्फ ड्रायव्हिंगच्या दिशेनं नेण्याचा टेस्लाचा विचार आहे. सध्या अमेरिकेमध्ये अनेक वाहनांत ‘एफएसडी’चा वापर होतो पण त्याचं पॅकेज हे दहा हजार डॉलर एवढं आहे. दरमहा यासाठी १९९ डॉलर मोजावे लागतात. जगभरातील सर्वच कंपन्या हे तंत्रज्ञान वापरतील असंही नाही, पण या नव्या तंत्रज्ञानाला ‘ॲपल’ सारखं ग्लॅमर मात्र नक्की मिळेल. हे प्रयोग यशस्वी झाले तर मस्क हे ऑटो क्षेत्राचे ‘स्टीव्ह जॉब्स’ होऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ कवेत घ्यायला निघालेल्या टेस्लानं अमेरिकेतील त्याचं चार्जिंग नेटवर्कही अन्य कंपन्यांना उपलब्ध करून देण्याचं नियोजन आखलं आहे. ज्या संशोधनात फायदा दिसतो तिथं मस्क आवर्जून पैसा लावतात, जितका गुंतविला त्याच्या तिप्पट ते वसूलही करतात.  मागील काही दिवसांत मस्क यांची सोशल मीडियातील प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरताना दिसते. विशेषतः त्यांना ट्विटरवर मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. ‘टेस्ला बॉट’च्या घोषणेनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आला होता. काहींनी थेट मस्क यांनाच रोबो केलं तर काहींनी कारची कंपनी तंत्रज्ञानाचा व्यवसाय करते आहे हे आकलनाच्या पलीकडचं असल्याचं नमूद केलं. अर्थात यात आश्‍चर्य वाटण्यासारखं काहीही नाही कारण नव्या ‘एआय’चं टूल तुमच्या हाताशी असेल तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. ‘टेस्ला बॉट’चं आगमन नवउद्योजकांना हाच संदेश देऊ पाहतंय.

संबंधित बातम्या