अर्ध्यावरती डाव मोडला...

गोपाळ कुलकर्णी 
सोमवार, 18 जुलै 2022

मस्क यांच्या सोनेरी पिंजऱ्यातून अखेर ट्विटरची चिमणी भुर्रकन उडून गेली. ती जाणारच होती कारण मस्क यांच्यातील भांडवलशहा चिमण्यांकडून सोन्याची अंडी देण्याची अपेक्षा बाळगून होता. या निमित्तानं एक मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उद्योगपतीच्या खिशात जाण्यापासून बचावल्याने जगभरातील नेटीझन्सनी कदाचित सुटकेचा निःश्वास टाकला असेल. आता भविष्यातील कायदेशीर संघर्षामध्ये मस्क जिंकतात की ट्विटर, याचे उत्तर येणारा काळच देईल.

ता.२५ एप्रिल २०२२. हा दिवस सोशल मीडियाच्या  वॉलवर एक नवा अध्याय लिहिणारा ठरला. टेस्लाचे सीईओ आणि अचाट स्वप्ने पाहणारे जागतिक कीर्तीचे धनकुबेर एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या चिमण्या स्वतःच्या पिंजऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. मस्क यांनी यासाठी ४४ अब्ज डॉलरची भरभक्कम रक्कम द्यायची तयारी दर्शविली होती. ट्विटरच्या व्यवस्थापनानेही आढेवेढे घेत का होईना त्याला मान्यता दिली. खरंतर या व्यवहारासाठी त्यांनी ४६.५ अब्ज डॉलरची बेगमी केली होती. ट्विटरचा हा टेकओव्हर अनेक नव्या चर्चांना जन्म देणारा ठरला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींना ट्विटरचं एवढं खासगीकरण खटकलं. त्याला कारणही तसंच होतं. मस्क यांनी तशी जादुई स्वप्नपेरणी करणाऱ्या ट्विटचे थवे याआधीच प्लॅटफॉर्मवर उतरविले होते. टेस्लासारखं काहीतरी जगावेगळं त्यांना ट्विटरच्या बाबतीत घडवून आणायचं होतं. यात त्यांच्यातील उद्योजकापेक्षाही टेक्नोक्रॅट प्रभावी ठरला, असंच म्हणावं लागेल. अन् खरी फसगत येथेच झाली. मस्क यांचा हा सगळा व्यवहार नेमका का फसला? ट्विटरला ‘हॅंडल’ करणं हे खरंच मस्क यांच्या आवाक्याबाहेर होतं का? का शेवटी त्यांच्यातील अट्टल भांडवलशहानं त्यांना हा व्यवहार करण्यापासून परावृत्त केलं? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

मस्क हे कमालीचे महत्त्वाकांक्षी भांडवलदार आहेत, एखादी गोष्ट करायची म्हटली तर ती तातडीने घडवून आणतील पण तीच मोडायची झाली तर काही क्षणांत तिचं होत्याचं नव्हतं करतील. आज मी पेट्यांनी पैसा ओततोय, उद्या मला लगेचच जेसीबी लावून परतावा घेता आला पाहिजे, अशी त्यांची भूमिका असते. मुळातच जागतिक लोकव्यवहार हा ज्याचा पाया असतो अशा प्लॅटफॉर्मच्या बाबतीत प्रयोगशाळांतील गणितीय ठोकताळे लागू होऊ शकत नाहीत. हे मस्क यांच्या लक्षात यायला बराच वेळ जावा लागला. ट्विटरच्याबाबतीतदेखील नेमकं तेच झालं.

वादाची सुरुवात

या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती मस्क यांनी ट्विटरमध्ये आपलेही नऊ टक्के एवढे समभाग असल्याचे जाहीर केल्यापासून. यानंतर कंपनीनेच स्वतःहून त्यांच्यासाठी संचालक मंडळाची दारे उघडली होती. अर्थात सुरुवातीला मस्क यांनीच तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. समाजमाध्यमांच्या विश्वातील ‘जादुई  चिमणी’ स्वतःच्या पिंजऱ्यात कोंडण्यासाठी  त्यांनी अधिग्रहणाचं जाळं टाकलं. यासाठी ते प्रत्येकी एका शेअरसाठी ५४.२० डॉलर मोजायला तयार झाले होते. एक एप्रिलची क्लोजिंग प्राइस लक्षात घेता, त्यावर ३८ टक्क्यांचा घसघशीत प्रीमिअम देण्याची ऑफर त्यांनी ट्विटरसमोर ठेवताच कंपनीचे व्यवस्थापन पुरते हादरले. या टेकओव्हरच्या जाळ्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी ट्विटरकडून ‘पॉयझन पील’ रणनीतीचा आधार घेण्यात आला, कारण मस्क यांनी टाकलेल्या जाळ्यातील दाणे खाण्यासाठी आपल्या चिमण्या जाऊ नयेत यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. ट्विटरचे व्यवस्थापन आपल्यासमोर झुकत नाही, हे लक्षात येताच मस्क यांनीच ४६.५ अब्ज डॉलरची बोली लावली. शेवटी कंपनीच्या व्यवस्थापनालाही हा मोह आवरला नाही आणि त्यांनी याला होकार दर्शविला. मग या व्यवहारासाठी आणखी रक्कम उभारण्यासाठी मस्क यांनी टेस्लाचे आठ अब्ज डॉलर किमतीचे समभाग विकून टाकले. एवढे करूनदेखील पैसे कमीच पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र मस्क यांनी बाह्य गुंतवणूकदारांकडून आणखी रक्कम उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्याकडून ७.१४ अब्ज डॉलर एवढा निधी दाखविण्यात आला.

स्पॅम अकाउंटमुळे मिठाचा खडा

हा व्यवहार पुढे जात असतानाच ट्विटरवरील स्पॅम आणि बनावट अकाउंट्सनी त्यात मिठाचा खडा टाकला. ट्विटरवरील हे स्पॅम अकाउंट नेमके किती आहेत? याचा ठावच लागेनासा झाला तेव्हा मात्र मस्क यांनी या खरेदी व्यवहाराला तात्पुरता ब्रेक लावला, पण आपण या व्यवहाराबाबत अद्यापही ठाम आहोत, असेही त्यांनी दुसरीकडे जाहीर केले. मस्क यांची हीच भूमिका कंपनीच्या गुंतवणूकदारांना खटकली आणि त्यांनी मस्क यांना कंपनीच्या संचालक मंडळामध्ये सहभागी होण्यापासून विरोध केला. खरंतर या विरोधामुळे मस्क पुरते दुखावले होते. गुंतवणूकदारांनीच नियमांचा भंग केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर खटला भरला. पुढे याची परिणती हा सगळा व्यवहार मोडण्यातच व्हायची होती. अखेरीस झालेही तसेच, तुम्ही स्पॅम अकाउंटचा डेटा सादर करा, अन्यथा मी चाललो सोडून, अशी उघड धमकी ट्विटरच्या व्यवस्थापनास देऊन मस्क मोकळे झाले. शेवटी आठ जुलै रोजी मस्क यांनी हा सगळा व्यवहार मोडूनही टाकला. यासाठी त्यांनी ट्विटरकडूनच नियमांचा भंग झाल्याचं कारण पुढं केलंय. मस्क यांचं हे कृत्य कंपनीच्याही चांगलचं जिव्हारी लागलं, त्यांनी याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन ऑर्डर

ज्या दिवशी मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीची घोषणा केली त्याच दिवसापासून समाजमाध्यमांत नव्या ‘कॉर्पोरेट इन्फर्मेशन ऑर्डर’ची चर्चा सुरू झाली होती. भविष्यातील युद्धे बॉम्ब आणि बंदुकीच्या साहाय्याने नाही तर डेटाच्या आधारावर लढली जातील, अशी मांडणी होऊ लागली. अर्थात ही चर्चाही पूर्णपणे अनाठायी आहे, असे म्हणता येणार नाही. मस्क यांनी याआधी केलेले प्रयोग हे अचाट असले तरीसुद्धा ते अत्यंत महागडे होते. त्यासाठी एक जबरदस्त आर्थिक आणि पर्यावरणीय किंमत मोजावी लागली. (उदा. खासगी अंतराळ पर्यटन). केवळ थ्रिल म्हणून गर्भश्रीमंतांचे चोचले पुरविण्याचे हे प्रकार बंद व्हायला हवेत, अशा तिखट प्रतिक्रिया जनमानसातून उमटत होत्या. मस्क यांच्यासोबत हातमिळवणी करण्याआधी ट्विटरच्या व्यवस्थापनानं याचा गांभीर्यानं विचार करायला हवा होता. तो झाला नाही हे वास्तव आहे आणि त्याचा व्हायचा तो परिणामही दोन्ही कंपन्यांवर झालेला दिसून येतो. मस्क यांनी खरेदीचा प्रस्ताव समोर ठेवताच तेव्हापासून ते आजतागायत ट्विटरच्या शेअरमध्ये घसरणच झाल्याचा ट्रॅक रेकॉर्ड सांगते.

सोशल मीडियासमोर मोठी आव्हाने

सध्या जगभरात वेगाने समाजमाध्यमांचा विस्तार होत असला तरीसुद्धा त्यांच्यासमोरील आव्हानेही तितक्याच वेगाने वाढत असल्याचे दिसून येईल. अमेरिका आणि काही प्रगत युरोपीय राष्ट्रे सोडली तर या माध्यमांसाठी अन्यत्र फार सकारात्मक वातावरण राहिलं आहे, असंही दिसत नाही. यामुळेच मेटा पर्वामध्ये पाऊल टाकणाऱ्या फेसबुकनेही सावध भूमिका घेतल्याचं दिसून येईल. 

आता मस्क यांचा खरा कस कायदेशीर लढाईमध्ये लागणार आहे. कारण हा करार मोडल्यानं ४२ दशलक्ष डॉलरची भरपाई द्या, अशी आग्रही मागणी ट्विटरकडून केली जाऊ लागली आहे. हा संघर्ष भविष्यात कशी वळणं घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे; कारण ट्विटरच्या आजी माजी प्रमुखांनी मस्क यांच्याविरोधात ‘गो टू वॉर’चा नारा बुलंद केला आहे.

संबंधित बातम्या