भाताचे प्रकार 

मंगला गांधी, सोलापूर 
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021


फूड पॉइंट

यंदा दिव्यांच्या सणानिमित्त वरण भात-आमटी भात करण्याऐवजी  भाताचे अनोखे प्रकार जरूर करून पहा...

१) हिरा-मोती पुलाव 
साहित्यः २ वाट्या बासमती तांदूळ, १ टीस्पून हिरवे मूग, १ टीस्पून हरभरा, १० केशर काड्या, ७ ते ८ लवंगा, ७ ते ८ मिरी, पाव वाटी दूध, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी पुदिना, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी वाटी हापूस आंब्याचे तुकडे, १ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ. 
कृतीः तूप घालून त्यात लवंग व मिरी घाला. नंतर तांदूळ धुवून घाला. थोडे परतल्यावर सव्वादोन वाट्या गरम पाणी घाला व भात शिजवून घ्या. हा भात मोकळा होतो. एका भांड्यात केशर कुटून घाला व दुधात उकळून घ्या. रंग व स्वाद छान येईल. पुदिन्यात पाणी घालून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्या. पातळ पेस्ट तयार करा. हरभरे व मूग आदल्या दिवशीच भिजत घाला. नंतर कुकरमधून वाफवून घ्या. आता पसरट भांड्यात प्रथम भाताचा थर द्या. त्यावर थोडे हरभरे, मूग व पुदिन्याचे पाणी, केशरी दूध, १ टीस्पून डाळिंबाचे दाणे, आंब्याचे तुकडे घाला. यानंतर पुन्हा भाताचा थर व वरील साहित्य (हरभरे, मूग, पुदिन्याचे पाणी, केशरी दूध) घाला. कुकरमध्ये शिटी न लावता गरम करून सर्व्ह करावा. -- वरून कोथिंबीर पसरावी. हा हिरा-मोती पुलाव हिरवा-पांढरा-डाळिंबी रंगाचा, आंब्यामुळे पिवळ्या रंगाचा पाहून बघताच क्षणी खाण्याची इच्छा होते. 
टीपः आंब्याऐवजी पपई, लाल भोपळासुद्धा चालेल. -- कारण १२ महिने आंबे मिळत नाहीत. 

२) तोंडली भात 
साहित्यः १० ते १२ तोंडली उभी चिरून, २ वाट्या बासमती तांदूळ धुवून, २ चमचे लिंबाचा रस, ४ मिरच्या, ४ चमचे गोडा मसाला, २ चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद. 
कृतीः तोंडल्याचे लांब पातळ काप करा. तांदूळ धुवून निथळून घ्या. त्याला लिंबाचा रस लावा. आता नेहमीपेक्षा जास्त तेल फोडणीकरता ठेवा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घाला. त्यात तोंडल्याच्या फोडी व हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून घाला. थोडेसे परता. आता तांदूळ घालून पुन्हा परता. त्यात गोडा मसाला घाला. ४ वाट्या गरम पाणी घाला. मीठ व साखर घालून छान हलवा. झाकण ठेवून -- मंद आचेवर भात शिजवा. शिजल्यावर २ चमचे साजूक तूप घाला. ओले खोबरे (नारळाचा चव) घाला. कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा. 
टीपः अशाच पद्धतीने तोंडल्याऐवजी दोडका, वांगी किंवा बटाटे घालून भात बनवू शकता. 

३) काश्‍मिरी पुलाव 
साहित्यः १ वाटी बासमती तांदूळ, अर्धी वाटी खवा, १ टेबलस्पून ड्रायफ्रूट, काजू,  
बेदाणे, चवीनुसार मीठ, वाटण - पुदिना, आंब्याचे तुकडे, २ मिरच्यांचे तुकडे, अर्धी वाटी कांदा, १ टीस्पून गरम मसाला, १ टेबलस्पून धने-जिरे पावडर, १ टीस्पून किचन किंग मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ. 
कृतीः प्रथम तांदूळ धुवून घ्या. २ वाट्या पाणी घालून भात अर्धवट शिजवून घ्या. पुदिना + मिरची + कांदा + धने + जिरे पावडर मिक्‍सरमधून काढा. हे वाटण घाला. हळद, मीठ, गरम मसाला, किंग मसाला, खवा, ड्रायफ्रूट, आंब्याचे तुकडे घाला. छान हलक्‍या हातांनी कालवा आणि झाकण झाकून एक दणकून वाफ आणा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. मसाला व खव्यामुळे चव अप्रतिम लागते. 

४) टोमॅटो पुलाव 
साहित्यः २ वाट्या तांदूळ, २ वाट्या टोमॅटोची प्युरी, २ वाट्या पाणी, अर्धी वाटी कांदा तळून, काजू + बेदाणे प्रत्येकी ५ ते ६. 
मसाल्याकरिताः धने, जिरे, शहाजिरे, दालचिनी, लवंग, वेलदोडे, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून लाल रंग (ऐच्छिक), २ टीस्पून साजूक तूप. 
कृतीः तांदूळ धुवून त्यात २ वाट्या पाणी, २ वाट्या टोमॅटोची प्युरी व चवीपुरते मीठ व साखर घालून शिजवा. पाणी आटत आल्यावर कच्चाच मसाला कुटून घाला. (धने, जिरे, शहाजिरे, दालचिनी, लवंग, वेलदोडे). झाकण झाकून वाफ येऊ द्या. आता तळलेला कांदा, काजू व बेदाणे घालून सर्व्ह करा. आंबट-गोड भाताची चव छान लागते. 

५) बिसी बेळ्ळे हुळी अन्न
साहित्यःः २ वाट्या तांदूळ, १ वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, १० ते १२ काजू, फोडणीसाठी मोहरी, हळद, हिंग, तेल, कढीपत्ता ७ ते ८ पाने, स्वादानुसार मीठ, मसाल्यासाठी १ टेबलस्पून हरभराडाळ, १ टेबलस्पून उडीदडाळ, अर्धी टीस्पून मेथ्या, १० ते १२ मध्यम आकाराच्या सुक्‍या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून धने, १ वाटी ओल्या नारळाचा चव, साजूक तूप व कोथिंबीर. 
कृतीः तांदूळ व तुरीची डाळ कुकरमध्ये वेगवेगळ्या भांड्यात शिजवून घ्या. मसाल्यासाठी घेतलेले साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे परतून घ्या व नंतर एकत्र करून मिक्‍सरमधून वाटा. हे वाटण शिजलेल्या डाळीत मिसळा, तसेच मीठ व चिंचेचा कोळ घाला. आता डाळ घोटून -- घ्या. काजू तुपात तळून भातात मिसळा. तेलाची फोडणी करून (मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता) त्यात घोटलेली डाळ टाका. जरुरीनुसार पाणी घाला व भात घाला. मंद आचेवर वाफ येऊ द्या. गरम भातावर साजूक तूप, कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 
टीपः यात गाजर, फरसबी, मटार, बटाटे, वांगी या भाज्यासुद्धा घालू शकता. 

६) इन्स्टंट पुलाव 
साहित्यः २ वाट्या बासमती तांदूळ, पाव वाटी तूप, ४ ते ५ लवंगा, ५ ते ६ मिरी, ४ ते ५ वेलदोडे, मसाला - २ ते ३ तमालपत्राची पाने, २ ते ३ दालचिनीचे तुकडे, २ ते ३ लाल सुक्‍या मिरच्या, १० ते १५ काजू व बेदाणे. 
कृतीः तांदूळ धुवून निथळत ठेवा. तूप तापवून त्यात वरील सर्व मसाला परतून घ्या. काजू व बेदाणे परतून घ्या. त्यात तांदूळ घालून परता आणि हे थंड करण्यास ठेवा. थंड झाल्यावर त्यात मीठ घाला व हवाबंद डब्यात (--सारख्या) डब्यात भरून ठेवा. पुलाव करताना १ वाटी मिश्रणास दीड ते पावणेदोन वाटी उकळलेले पाणी घाला व पुलाव शिजवा. 

७) नारळी भात 
साहित्यः १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, अर्धा टीस्पून जायफळ पूड, ४ लवंगा, तूप, चवीनुसार थोडे मीठ. 
कृतीः १ चमचा तुपात ४ लवंगा घाला. नंतर तांदूळ धुवून घाला व थोडे पुन्हा परता. २ वाट्या गरम पाणी घाला. पाणी आटल्यावर गूळ व खोबरे, किंचित -- मीठ, जायफळ पूड घाला. आता झाकण झाकून वाफ आणा. वरून साजूक तूप दोन टेबलस्पून घाला. भातावर वरून तूप घातले की चमक येते व चवीलाही जास्त छान लागतो. 
टीपः गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता. 

८) पालक पुलाव 
साहित्यः २ वाट्या तांदूळ, १ जुडी पालक, अर्धी वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १२ ते १४ लसणाच्या मोठ्या पाकळ्या (१ गड्डा), चवीनुसार मीठ, २ कांदे, फोडणीचे साहित्य. 
कृतीः तांदूळ धुवून ठेवा. १ जुडी (मध्यम आकाराची) पालक छान निवडून धुवून बारीक चिरून घ्या. अर्धी वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, लसूण हे मिक्‍सरमधून वाटून बारीक पेस्ट करा. कुकरमध्ये नेहमीपेक्षा जास्त तेल घाला. फोडणीसाठी त्यात कांदा घाला व परता. त्यात मिक्‍सरमधून वाटलेली पेस्ट घाला आणि परता. आता धुतलेला तांदूळ घालून परता. ५ वाट्या पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. कुकरला झाकण लावून नेहमीप्रमाणे भात शिजवा आणि कढीबरोबर किंवा मठ्ठ्याबरोबर सर्व्ह करा. पालकामुळे भाताला हिरवा कलर येतो त्यामुळे हळद घालू नका. लसणामुळे चवही छान लागते. नेहमीपेक्षा हटके पुलाव तयार. 

९) काश्‍मिरी जर्दा (भात) 
साहित्यः २ वाट्या बासमती तांदूळ, अर्धी वाटी साजूक तूप, ३ वाट्या साखर, ७ ते ८ लवंगा, ८ ते १० वेलदोडे, पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम, पाव वाटी पिस्त्याचे काप, अर्धी वाटी जर्दाळूचे तुकडे, ३ कप दूध, पाव टीस्पून केशर, अर्धी वाटी साय. 
कृतीः तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात अर्धा तास भिजवा. भांड्यात पाव वाटी तूप टाकून काजू, बदाम, पिस्त्याचे काप तळून घ्या. उरलेल्या तुपात लवंग, वेलचीचे दाणे घालून तांदूळ परता. ४ वाट्या पाणी घालून भात शिजवा. दूध-साखर एकत्र करून उकळायला ठेवा. त्यात केशर कुटून घाला. आता जाड बुडाच्या पातेल्यात तळाशी थोडे तूप घाला. थोडा भात घाला. त्यावर दूध घाला व बदाम, पिस्त्याचे काप घाला. जर्दाळूचे तुकडे घाला व पुन्हा भाताचा थर. वरून दूध, जर्दाळूचे तुकडे, बदाम, पिस्त्याचे काप घाला व संपवा. शेवटी दुधाची साय व उरलेले पाव वाटी तूप घालून घट्ट झाकण लावा आणि ते पातेले तव्यावर ठेवून मंद आचेवर शिजवा. जर्दाभात तयार. 

१०) व्हेजिटेबल पुलाव 
साहित्यः १ वाटी तांदूळ, १ टेबलस्पून हिरवे मटार, १ टेबलस्पून बटाट्याचे काप, १ टेबलस्पून गाजराचे तुकडे, १ टेबलस्पून फरसबी, १ कांदा मध्यम आकाराचा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद, मसाला - १ चमचा पुलाव मसाला, ३ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा. 
कृतीः प्रथम तांदूळ धुवून घ्या. मटार, बटाटे, गाजराचे तुकडे, फरसबी बाहेर शिजवून घ्या. अर्धवट म्हणजे कच्चेपणा जाईल इतपतच शिजवा. पातेल्यात तेल घाला. मोहरी, जिरे, लवंग, दालचिनी घाला. कांदा घाला. त्यात धुतलेले तांदूळ घाला. परता. २ वाट्या पाणी घालून भात शिजवून घ्या. थोडे पाणी असतानाच अर्धवट उकडलेल्या भाज्या - मटार, बटाटे, गाजराचे तुकडे, फरसबी घाला. टोमॅटो बारीक फोडी करून घाला. चवीनुसार मीठ व १ चमचा पुलाव मसाला घाला. छान हलक्‍या हातांनी मिक्‍स करा व झाकण झाकून छान वाफ आणा. जरूर वाटल्यास थोडे पाणीही घालू शकता. हा पुलाव सर्व भाज्या असल्यामुळे चवदार लागतो. वरून कोथिंबिरीची गरज नाही. 

संबंधित बातम्या