लज्जतदार भाज्या 

अनघा देसाई
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळीच्या दिवसांत रोज-रोजच्या भाज्या खायला कंटाळा येतो. म्हणूनच नेहमीच्या पण वेगळ्या पद्धतीने केलेल्या या काही लज्जतदार भाज्या...

दम आलू 
साहित्य : पाचशे ग्रॅम छोटे बटाटे, ४ मोठे चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, २ हिरव्या वेलची, १ इंच दालचिनी, ३ सुक्या लाल मिरच्या, २ तमालपत्र, एक चिमूट हिंग, २ इंच बारीक कापलेले आले, १ चमचा मिरची पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा हळदपूड, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, २ टोमॅटो (साल काढून बारीक चिरलेले).
कृती : बटाटे उकडून सोलून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे, वेलची, दालचिनी, सुक्या मिरच्या, तमालपत्र, हिंग आणि आले घालून २ मिनिटे परतावे. नंतर मिरची पूड, जिरे पूड, हळद पूड, मीठ व साखर घालून एखादे मिनिट परतावे. नंतर टोमॅटो आणि बटाटे घालून चांगले मिसळावे. झाकण घालून २-४ मिनिटे शिजवून गरमागरम वाढावे. 

मखमली भाजी 
साहित्य : सव्वाशे ग्रॅम बटाटे, १२५ ग्रॅम गाजर, १ कप ओले वाटाणे, १२५ ग्रॅम कांदे, एका लहान फ्लॉवरचे तुरे, १ कप दही, तूप (आवश्यकतेप्रमाणे), १ चमचा शहाजिरे, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर सजावटीसाठी.
कुटण्याचा मसाला : एक कप कोथिंबीर, ५-६ हिरव्या मिरच्या, १० लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ मोठा चमचा चारोळी, १ मोठा चमचा खसखस, १/८ जायफळ, १-२ तुकडे जायपत्री, पाव कप किसलेले सुके खोबरे. 
कृती : बटाटे वाफवून सोलून घ्यावेत. गाजर तुकडे करून उकळत्या पाण्यात १ मिनिट वाफवून घ्यावे. वाटाणे उकडावेत आणि कांदे तुपात परतून घ्यावेत. फ्लॉवरचे तुरे ३ मिनिटे उकळत्या पाण्यात शिजवावे आणि लगेच निथळून घ्यावे. कुटण्याचा मसाला एकत्र कुटून घ्यावा. १-२ मोठे चमचे तूप गरम करून शहाजिरे तडतडवावे. त्यात कुटलेला मसाला खमंग वास येईपर्यंत परतावा. त्यानंतर दही आणि मीठ घालून तूप सुटेपर्यंत परतावे. अर्धा चमचा हळद पूड घालून ३० सेकंद परतावे. त्यात परतलेला कांदा, तयार केलेल्या इतर भाज्या घालून चांगले परतून, अर्धा कप भाज्या उकळलेले पाणी घालावे. सर्व एकत्र करून ४-५ मिनिटे शिजवावे. वरून कोथिंबीर भुरभुरून गरमच वाढावे. 

लज्जतदार भाजी 
साहित्य : एक कप ताजे हिरवे वाटाणे, ३ मोठे चमचे पिस्ते, २ कांदे, १५० ग्रॅम कॉलिफ्लॉवर, १५० ग्रॅम ब्रोकोली, मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा हळद पूड, अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे दही, ३ मोठे चमचे बेसन, तेल (आवश्यकतेप्रमाणे), १० पाकळ्या लसूण, १ इंच आले, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर, १ चमचा जिरे, पाव चमचा हिंग, १ मध्यम टोमॅटो.
कृती : कांद्याचे ४ तुकडे करून पाकळ्या सोडवून घ्याव्यात. कॉलिफ्लॉवरचे तुरे उकळत्या पाण्यात ३ मिनिटे शिजवून घ्यावेत. ब्रोकोलीचे तुरे उकळत्या पाण्यात १ मिनिट शिजवून घ्यावेत. दोन्ही लगेच थंड पाण्यात घालून निथळून घ्यावे. कांद्याच्या पाकळ्या, कॉलिफ्लॉवर, ब्रोकोली यांना मीठ, हळद, मिरची पूड, गरम मसाला आणि दही लावून अर्धा तास मुरत ठेवावे. अर्ध्या तासाने त्यावर सुके बेसन पसरून, सुटे सुटे, तेलात पद्धतशीर तळून घ्यावे.
आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र वाटावे. पिस्ते अर्धा तास गरम पाण्यात भिजवून सोलावेत. सोललेले पिस्ते मिक्सरमध्ये बारीक करावेत. आवश्यकतेप्रमाणे पाणी वापरावे. त्यातच पाऊण कप वाटाणे घालून बारीक वाटून घ्यावे.  
पॅनमध्ये २ मोठे चमचे तेल गरम करून जिरे आणि हिंगाची फोडणी करावी. त्यात वाटलेले आले, लसूण इत्यादींची गोळी परतावी. त्यातच किसलेला टोमॅटो घालून परतावे. खमंग वास आल्यानंतर मीठ व हिरवा वाटाणा- पिस्ते पेस्ट घालून ५ मिनिटे सतत ढवळून शिजवावे. त्यात पाव चमचा हळदही घालावी.
ग्रेव्हीपुरते पाणी घालून उकळावे. आवडत असल्यास अर्धा चमचा साखर घालावी. ग्रेव्ही चांगली  उकळल्यानंतर उरलेले वाटाणे, तळलेले फ्लॉवर, ब्रोकोली, कांद्याच्या पाकळ्या घालाव्यात. एक उकळी आल्यानंतर उतरवून पुदिन्याच्या पानांनी सजवून वाढावे. बरोबर लिंबाची फोड द्यावी. 

भाज्यांचा विंडालू 
साहित्य : एक मोठा नवलकोल, २ मोठी गाजरे, ३ टोमॅटो, ३ बटाटे, २  
मध्यम कांदे, १० पाकळ्या लसूण, ४-५ लाल सुक्या काश्मिरी मिरच्या, ५ लवंगा, दीड इंच दालचिनी, अर्धा चमचा काळे मिरे, अर्धा चमचा जिरे, २ मोठे चमचे व्हिनेगर, अर्धा चमचा हळद पूड, तेल (आवश्यकतेप्रमाणे), १ चमचा साखर.
कृती : नवलकोल, बटाटे, गाजर यांचे चौकोनी तुकडे करावेत. टोमॅटो मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून लगेच थंड पाण्यात टाकावेत. टोमॅटोची सैल झालेली साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावेत आणि कांदा बारीक चिरावा. 
लाल सुक्या मिरच्यांच्या बिया काढून टाकाव्यात. या मिरच्या, लसूण, लवंग, दालचिनी, काळे मिरे आणि जिरे १ चमचा तेलात परतून व्हिनेगरबरोबर बारीक वाटावे. २ मोठे चमचे तेलात कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा. त्यावर बटाटे, नवलकोलचे तुकडे घालून परतावे. मीठ आणि थोडे पाणी घालून शिजवावे. हे अर्धवट शिजल्यावर गाजराचे तुकडे, वाटलेला मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. सर्व भाज्या शिजल्यानंतर साखर घालून एक उकळी आणावी. हा पदार्थ मुरल्यानंतर अधिक चांगला लागतो. 

पनीर खुबानी 
साहित्य : अडीचशे ग्रॅम चौकोनी तुकडे केलेले पनीर, ३ कांदे बारीक कापलेले, ३ टोमॅटो बारीक कापलेले, १ इंच आले बारीक कापलेले, १ चमचा मिरची पूड, १ चमचा मीठ, १२५ ग्रॅम जर्दाळू बिया काढून बारीक तुकडे केलेले, अर्धा कप पाणी, २ चिमूट केशर, १ मोठा चमचा दूध, ४ मोठे चमचे तूप.
कृती : केशर थोडेसे गरम करून चुरडावे आणि दुधात भिजत घालावे. तूप गरम करून पनीरचे तुकडे तळून घ्यावेत. उरलेल्या तुपात कांदा सोनेरी रंगावर परतावा. त्यात आले, मिरची पूड, मीठ आणि टोमॅटो घालावा. हे २ मिनिटे शिजल्यानंतर जर्दाळू घालून थोडावेळ शिजू द्यावे. ५ मिनिटांनंतर पाणी घालून जर्दाळू नरम होईपर्यंत शिजवावे. जर्दाळू नरम झाल्यावर तळलेले पनीरचे तुकडे घालून ४-५ मिनिटे उकळावे. वाढण्यापूर्वी केशर दूध मिश्रण घालून ढवळावे. 

खतखते 
साहित्य : दोन मोठे चमचे तूर डाळ, ७-८ तिरफळ, २५० ग्रॅम लाल भोपळा, २५० ग्रॅम सुरण, १ रताळे (ऐच्छिक), १ कच्चे केळे (ऐच्छिक), १ बटाटा, १ शेवग्याची शेंग, १५-२० फरसबीच्या शेंगा, १ गाजर, पाव कप ओले खोबरे, १ चमचा धने, अर्धा चमचा काळे मिरे, २ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा राई, चिमूटभर हिंग, २ चमचे मिरची पूड, अर्धा चमचा हळद पूड, चिंचेचा कोळ आवडीप्रमाणे, गूळ चवीप्रमाणे, मीठ. 
कृती : तूर डाळ अर्धा कप पाण्यात २ तास भिजत घालावी. तिरफळ पाव कप पाण्यात २ तास भिजत घालावे. नंतर तिरफळ भिजवलेल्या पाण्यासकट मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यावे. अर्धा भोपळा साल काढून बारीक चिरावा. उरलेल्या भोपळ्याचे मोठे तुकडे करावेत. फरसबीचे दोन तुकडे करावेत. बाकी सर्व भाज्या सोलून मोठे तुकडे करावे. ओले खोबरे, धने आणि काळे मिरे भरड वाटावे.
तेल गरम करून राई, हिंगाची फोडणी करावी. त्यात भिजवलेली तूर डाळ घालून अर्धा मिनिट परतावे. हळद, मिरची पूड घालून, परतून गरम पाणी घालून उकळी आणावी. नंतर सर्व भाज्या त्यांच्या शिजण्याच्या क्रमाने घालाव्यात. पाणी भाज्या बुडतील इतपत असावे. 
सर्व भाज्या शिजल्यानंतर चिंचेचा कोळ, मीठ आणि गूळ घालावा. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर खोबऱ्याचे वाटण मिसळून एक उकळी आणावी. शेवटी तिरफळाचे पाणी घालून उकळून भाजी उतरवावी.
 
चटकदार भोपळा 
साहित्य : पाचशे ग्रॅम भोपळा, २ बटाटे, २ चमचे वाटलेली हिरवी मिरची, १ इंच आले वाटलेले, २ चमचे धने पूड, १ चमचा जिरे पूड, १ टोमॅटो प्युरी केलेला, २ मोठे चमचे चिंचेचा कोळ, पाव चमचा हळद, साखर, कोथिंबीर सजावटीसाठी.  
फोडणीसाठी : एक मोठा चमचा तूप, पाव चमचा हिंग, १-२ लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी.
कृती : बटाटे, भोपळा सालासकट चिरून फोडी कराव्यात. तूप गरम करून जिरे, मेथी, बडीशेप, लाल सुक्या मिरच्या आणि हिंग घालावे. ही फोडणी थोडावेळ परतून त्यात आले, वाटलेली मिरची आणि हळद परतावी. हळदीचा कच्चेपणा गेल्यानंतर बटाटे, भोपळ्याच्या फोडी परतून, पाणी घालून नरम शिजवावे. बटाटे, भोपळा शिजल्यावर टोमॅटो प्युरी, चिंचेचा कोळ, धने पूड, जिरे पूड, मीठ, साखर घालून उकळी आणावी. वरून भरपूर कोथिंबीर घालून भाजी पुरीबरोबर वाढावी.

लगन सारा इश्टयू 
साहित्य : एक गाजर बारीक तुकडे करून, १ मध्यम रताळे बारीक तुकडे करून, अर्धा कप सुरणाचे बारीक तुकडे, १ मध्यम बटाटा सोलून बारीक तुकडे केलेला, अर्धा कप भेंडी काप करून तळलेली, अर्धा कप फरसबीच्या शेंगाचे वाफवलेले मोठे तुकडे, अर्धा कप उकडलेला ताजा हिरवा वाटाणा, २ मोठे चमचे व्हिनेगर, २ मोठे चमचे मनुका, साखर चवीप्रमाणे, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, २ मोठे टोमॅटो साले काढून बारीक चिरलेले, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा बारीक चिरलेले आले, १ चमचा हळद पूड, दीड चमचा मिरची पूड, पाव कप बारीक चिरलेला खजूर, पाव चमचा जायफळ पूड, पाव चमचा वेलची पूड, १ चमचा काळे मिरे पूड, १ चमचा शहाजिरे, मीठ, तूप/तेल आवश्यकतेप्रमाणे.  
कृती : मनुका, साखर आणि व्हिनेगर एकत्र करावे. गाजर, बटाटे, सुरण आणि रताळे यांना चवीपुरते मीठ लावून तळून घ्यावे. फरसबीच्या शेंगाचे तुकडेपण तळून घ्यावेत. २ मोठे चमचे तूप गरम करून त्यात कांदा हलक्या तपकिरी रंगावर परतून घ्यावा. त्यात शहाजिरे, कापलेले आले, हळद पूड, मिरची पूड, काळे मिरे पूड, जायफळ वेलची पूड, खजूर आणि मीठ घालावे. त्यातच एक अधिक चमचा तूप घालून टोमॅटो आणि कोथिंबीर ५ मिनिटे परतावे. त्यानंतर सर्व भाज्या, भिजवलेल्या मनुका व्हिनेगरसकट घालून सर्व मसाला सगळीकडे पसरेल असे ढवळावे. भाजी ओलसर राहण्यापुरते पाणी घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवावे. पुरी किंवा फुलक्याबरोबर वाढावे.

संबंधित बातम्या