पौष्टिक रस्सम, सार व सूप

अनुषा मुदगल
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भाताबरोबर वरून घ्यायला रस्सम, कढी; तर कधी नुसतेच प्यायला म्हणून सार, सूप असे पदार्थ आरोग्यासाठीही पौष्टिक असतात आणि चविष्टही लागतात. अशाच काही विविधांगी पातळ पदार्थांच्या रेसिपीज...

साउथ इंडियन रस्सम
साहित्य : बारीक चिरलेले २ मोठे टोमॅटो, पाव वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी तुरीची डाळ (साधारण १०० ग्रॅम), ५-६ लसणाच्या पाकळ्या, २ टेबलस्पून खोबरेल तेल, १ टीस्पून बारीक मोहरी, १ टीस्पून हिंग, ८ ते १० कढीपत्त्याच्या पाकळ्या, ४ टेबलस्पून रस्सम पावडर, चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे कोथिंबीर (चार लोकांसाठी).
रस्सम पावडर साहित्य : एक टेबलस्पून तूर डाळ, १ टेबलस्पून चणा डाळ, २ टीस्पून काळे मिरे, अर्धा टीस्पून मेथीदाणे, पाव कप धणे, १ टीस्पून जिरे, १० ते १५ ब्याडगी मिरची, १० ते १५ कढीपत्त्याची पाने, अर्धा टीस्पून हिंग. हे सर्व साहित्य एक एक करून मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावे आणि मिक्सरमध्ये फिरवून पावडर करून घ्यावी.
कृती : तुरीची डाळ भरपूर पाणी घालून कुकरला छान शिजवून घ्यावी. ब्लेंडर फिरवून किंवा रवीने छान घुसळून डाळ एकजीव करून घ्यावी. रस्सम सारासारखा पातळ असतो. त्यामुळे अर्धी वाटी शिजवलेल्या तुरीच्या डाळीला चार ते पाच वाट्या पाणी घालून छान पातळ करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेचा कोळ, मीठ आणि रस्सम पावडर घालून गॅसवर उकळायला ठेवावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा आणि खोबऱ्याचे तेल, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. फोडणीतच लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. कोथिंबीर घालून गरम गरम रस्सम सर्व्ह करावे.

नाचणीचे सूप (आंबील)
साहित्य : सहा टेबलस्पून नाचणीचे पीठ, २ वाट्या पातळ ताक, २ वाट्या पाणी, २ टेबलस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, चवीप्रमाणे मीठ.
कृती : नाचणीचे पीठ एक टेबलस्पून तुपावर मंद आचेवर सुवास येईपर्यंत भाजून घ्यावे. एका पॅनमध्ये भाजलेले नाचणीचे पीठ, दोन वाट्या ताक आणि पाणी व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. त्यात मीठ घालून त्याला एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास सूप कन्सिस्टन्सीसाठी आणखी थोडे पाणी घालावे. तूप, जिरे आणि हिंगाची फोडणी द्यावी आणि गरम गरम सर्व्ह करावे.

सिंधी कढी
साहित्य : चार टोमॅटो, ४ टेबलस्पून बेसनाचे पीठ, ५ ते ६ वाट्या पाणी, १ टेबलस्पून आले-लसणाची पेस्ट, ७ ते ८ भेंड्या, ८ ते १० गवारीच्या शेंगा, १ उकडलेला मोठा बटाटा, अर्धी वाटी गाजराचे उभे काप, ७ ते ८ शेवग्याच्या शेंगांच्या गंडोऱ्या, १ टीस्पून हळद, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून गरम मसाला, २ टीस्पून तिखट, १ टीस्पून हिंग, २ टेबलस्पून तेल, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर (चार लोकांसाठी).
कृती : टोमॅटोचे मोठे काप करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. बेसनाचे पीठ एका कढईत कोरडे भाजून बाजूला काढून ठेवावे. भेंडीचे उभे काप आणि गवारीच्या शेंगा किंचित तेल घालून एका कढईत मोठ्या आचेवर परतून घ्याव्यात. गाजर आणि उकडलेल्या बटाट्याचे काप तेलामध्ये तळून घ्यावेत. मिठाच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा पाच मिनिटे उकळून घ्याव्यात. आता एका पॅनमध्ये टोमॅटोची पेस्ट, भाजलेले बेसन आणि पाच ते सहा वाट्या पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता त्यामध्ये अनुक्रमे परतलेल्या भेंडीचे काप, गवारीच्या शेंगा, तळलेले गाजर आणि बटाट्याचे काप, उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, हळद, तिखट, गरम मसाला, आले-लसणाची पेस्ट, मीठ हे सर्व घालून मंद आचेवर उकळत ठेवावे. उकळी आल्यानंतरदेखील पाच ते दहा मिनिटे चांगले शिजू द्यावे. वरून तेल, मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्यावी. कोथिंबीर घालून गरम गरम भाताबरोबर सिंधी कढी सर्व्ह करावी.

माँ की दाल/काली दाल
साहित्य : दोनशे ग्रॅम काळे उडीद, ८ ते १० पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, १ इंच किसलेले आले, २ हिरव्या मिरच्यांचे उभे काप, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, २ मोठे चमचे साजूक तूप, १ मोठा चमचा तेल, १ टीस्पून हळद, २ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर (चार लोकांसाठी).
कृती : काळे उडीद आठ तास भिजत घालावेत. दुप्पट 
पाणी घालून प्रेशर कुकरला मंद आचेवर पाच ते सहा शिट्या आणाव्यात. एका फ्राय पॅनमध्ये तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण, किसलेले आले, कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावे. या मिश्रणात शिजवलेले काळे उडीद घालावेत. गरजेप्रमाणे पाणी घालून सारखे करून घ्यावे. त्यात मीठ, हिरव्या मिरचीचे काप, हळद, तिखट, गरम मसाला घालून एक उकळी आणावी. आता एका छोट्या कढईत तुपाची फोडणी करावी, जिरे आणि हिंग टाकावे. वरून चरचरीत फोडणी द्यावी. कोथिंबीर घालून माँ की दाल, रोटी किंवा घी राईसबरोबर सर्व्ह करावी.

पित्तनाशक अमसुलाचे सार
साहित्य : नऊ ते दहा अमसूल पाकळ्या (अर्धा तास पाण्यात भिजवलेल्या), ६ वाट्या पाणी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, फोडणीसाठी १ चमचा तूप (चार लोकांसाठी).
कृती : पातेल्यात तूप, जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करावी. फोडणीत भिजवलेल्या अमसूल पाकळ्या घालाव्यात. पाच ते सहा वाट्या पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी. साधारण दहा ते पंधरा मिनिटे वरील मिश्रण छान उकळावे. कोथिंबीर भुरभुरून अमसुलाचे सार सर्व्ह करावे. खिचडीबरोबर, भाताबरोबर आणि नुसते प्यायलाही हे सार अतिशय सुंदर लागते.

हिरव्या मुगाचे कढण
साहित्य : एक वाटी भिजवलेले हिरवे मूग (मोड आलेले नको), ५ ते ६ वाट्या पाणी, १ टीस्पून जिरे, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, १ टीस्पून हिंग, कढीपत्ता, फोडणीसाठी १ चमचा तूप, ३ ते ४ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर (चार लोकांसाठी).
कृती : एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी भिजवलेले हिरवे मूग, पाच ते सहा वाट्या पाणी घालून उकळत ठेवावे. साधारण १५ ते २० मिनिटे छान उकळल्यानंतर मूग शिजतात आणि मुगाचे संपूर्ण सत्त्व त्या पाण्यामध्ये उतरते. हे पाणी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असते. मुगाच्या कढणाला आता अनुक्रमे तूप, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या याची फोडणी घालावी. मीठ घालून एकजीव करावे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

भाज्यांचे पौष्टिक सूप
साहित्य : दोन टोमॅटो मोठे काप केलेले, एका कांद्याचे काप, प्रत्येकी अर्धी वाटी चिरलेला लाल भोपळा, दुधी भोपळा, बीट आणि गाजर, १ इंच दालचिनी, ५ ते ६ मिरे, ३ ते ४ लवंगा, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, सर्व्ह करण्यासाठी अमूल बटर, २ ते ३ वाट्या पाणी.
कृती : साहित्यात दिलेल्या सगळ्या भाज्या, तसेच दालचिनी, मिरे, लवंगा, दोन वाट्या पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या काढून शिजवून घ्याव्यात. कुकर गार झाल्यानंतर सगळ्या भाज्या मिक्सरच्या ब्लेंडरला वाटून घ्याव्यात. वाटलेले मिश्रण एका मोठ्या गाळणीने किंवा चाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे आणखी पाणी घालून, मीठ आणि साखर घालून उकळी आणावी. सर्व्ह करताना अमूल बटर घालावे.

कटाची आमटी (खानदेशी पद्धतीने)
साहित्य : दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचा कट, 
३ ते ४ वाट्या पाणी, १ इंच आले, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, १ मोठा कांदा बारीक उभा चिरून, पाव वाटी सुके खोबरे, १ टीस्पून हळद, २ टेबलस्पून घरगुती गोडा मसाला किंवा काळा मसाला, फोडणीसाठी तेल, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर (चार लोकांसाठी).
कृती : कढईमध्ये अनुक्रमे कांदा, लसूण, आले, 
सुके खोबरे हे सगळे कोरडे काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. भाजलेले सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटताना फार पाणी घालू नये. आता एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल, जिरे, हिंग 
घालावे. त्यात वरील वाटलेला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यात हरभऱ्याच्या डाळीचा कट घालावा. तीन ते चार वाट्या पाणी घालावे. हळद, काळा मसाला आणि मीठ घालून एक उकळी आणावी. कोथिंबीर घालून पुरणाच्या पोळीबरोबर किंवा गरम भाताबरोबर कटाची आमटी सर्व्ह करावी.

रिफ्रेशिंग कोल्ड कुकुंबर सूप
साहित्य : चार मध्यम आकाराच्या काकड्या, १ वाटी नारळाचे दूध, २ लिंबांचा रस, एका लिंबाची किसलेली साल, १० ते १५ पुदिन्याची पाने, चवीप्रमाणे काळे मीठ आणि मिरपूड.
कृती : काकडी सोलून तिचे दोन भाग करून सर्व बिया चमच्याने काढून घ्याव्यात. आता काकडीचे मोठे मोठे काप करावेत. मिक्सरच्या ब्लेंडर जारमध्ये काकडीचे काप, नारळाचे दूध, लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल, आठ ते दहा पुदिन्याची पाने, काळे मीठ घालून व्यवस्थित फिरवून घ्यावे. वरील मिश्रण न गाळता काचेच्या ग्लासमध्ये सर्व्हिंगसाठी ओतून घ्यावे. वरून मिरपूड तसेच पुदिन्याची पाने घालून एक तास फ्रिजमध्ये थंड करत ठेवावे आणि चिल्ड सूप सर्व्ह करावे.   

संबंधित बातम्या