खमंग चकली

मंजिरी कपडेकर, कोल्हापूर
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

हल्ली चकली एरवीही मिळत असली, तरी दिवाळीमध्ये चकलीशिवाय फराळाचे ताट अपूर्णच! म्हणूनच चकलीच्या पारंपरिक आणि काही नवीन पाककृती...

भाजणीची चकली
साहित्य - एक किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी मूग डाळ, १ वाटी पोहे, १ वाटी धने, अर्धी वाटी जिरे, ४ टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, १ टीस्पून जाडसर वाटलेला ओवा, पाव वाटी तेल, दीड टीस्पून जाडसर वाटलेली धने-जिरे पूड, २ टीस्पून तीळ.
कृती - तांदूळ धुऊन कॉटनच्या कापडावर सावलीत पसरवून ठेवावेत. थोडे ओलसर असतानाच भाजायला घ्यावेत. जास्त भाजू नये. तांदूळ पांढरट दिसायला लागले की थांबावे. सर्व डाळी, पोहे, धने, जिरे भाजून घ्यावे आणि एकत्र करून दळून आणावे.
चकली करण्यासाठी वरील पीठ चार वाटी घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात दोन वाटी पाणी तापवावे. त्यात चार टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, एक टीस्पून जाडसर वाटलेला ओवा, पाव वाटी तेल, दीड टीस्पून जाडसर वाटलेली धने-जिरे पूड, दोन टीस्पून तीळ घालावेत. पाण्याला उखळी आल्यावर तयार भाजणी घालावी. छान एकजीव करून घ्यावे. झाकून वाफ येऊ द्यावी. अर्ध्या तासाने  पीठ चांगले मळून घ्यावे. चकलीच्या साच्यात घालून चकल्या कराव्यात व तळून घ्याव्यात. चकल्या पूर्ण गार झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
टिप - चकली तळताना पहिल्यांदा मोठा गॅस ठेवावा व नंतर मंद गॅसवर तळाव्यात.

पालक चकली
साहित्य - चार वाट्या तयार चकली भाजणी, १ वाटी कच्च्या पालकाची पेस्ट, २ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, दीड टीस्पून लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, पाव वाटी तीळ, पाव वाटी तेल, १ टीस्पून जाडसर वाटलेली भाजलेली जिरे पूड, पाहिजे असल्यास पाव टीस्पून खाण्याचा हिरवा रंग. 
कृती - जाड बुडाच्या भांड्यात दीड वाटी पाणी घ्यावे. त्यातच पालकाची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे पूड, तेल, तीळ, रंग, मीठ घालावे. उकळी आल्यावर भाजणी घालावी. छान मिक्स करून घ्यावे. झाकून एक वाफ येऊ द्यावी. गॅस बंद करून अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर काढून पाण्याच्या हाताने मळून घ्यावे. चकलीच्या साच्यात घालून चकल्या कराव्यात व तळाव्यात.
टिप - पालकाची पेस्ट असल्यामुळे भाजणी थोडी जास्त लागू शकते, अंदाज घेऊन घालावी. पालकाची पेस्ट कच्चीच घ्यावी, म्हणजे रंग छान राहील.

मोहरी घातलेली चकली
साहित्य - चार वाट्या चकली भाजणी, पाव वाटी मोहरी, तीळ पाव वाटी, १ टीस्पून भाजून जाडसर वाटलेली जिरे पूड, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून ओवा, पाव वाटी तेल. 
कृती - जाड बुडाच्या भांड्यात पाणी तापवावे. त्यात भाजणी सोडून सर्व साहित्य घालावे. उकळी आल्यावर भाजणी घालावी. मिश्रण एकजीव करावे व झाकून ठेवावे. गॅस बंद करून अर्धा तास ठेवावे. नंतर काढून मळून घ्यावे व चकल्या करून तळाव्यात.
टिप - चकल्या तळल्यानंतर वर मोहरी येते, ती खूप छान दिसते. शिवाय खमंग पण लागते. यात तिखट नसल्यामुळे रंग वेगळा छान येतो.

मुरकू
साहित्य - एक किलो तांदूळ, दीड वाटी उडीद डाळ, पाव वाटी जिरे, एक टीस्पून जाडसर मिरी पूड, अर्धा टीस्पून ओवा. 
कृती - तांदूळ धुऊन सावलीत वाळवावेत. ओलसर असतानाच भाजावेत. त्यात उडीद डाळ, जिरे भाजून घालावे. हे सर्व एकत्र दळून आणावे. मुरकू करण्यासाठी वरील पीठ चार वाट्या घ्यावे. त्यात पाव वाटी गरम तेल घालावे. चवीनुसार मीठ, जाडसर वाटलेला ओवा अर्धा टीस्पून, जाडसर मिरी पूड एक टीस्पून घालावी आणि एकजीव करावे. गरम पाण्यामध्ये हे पीठ मळावे व पंधरा-वीस मिनिटे ठेवावे. नंतर जाड चकलीच्या साच्यात पीठ भरून तुकडे पाडून तळावे.
टिप - या चकलीचे तुकडेच असतात. पीठ तयार करून ठेवल्यास जेव्हा पाहिजे तेव्हा चकल्या करता येतात.

शेजवान चकली
साहित्य - तीन वाट्या चकली भाजणी, २ टीस्पून सुक्या लाल मिरचीची  
पेस्ट, १ टीस्पून लसूण पेस्ट, २ टेबलस्पून टोमॅटो सॉस, २ टेबलस्पून चिली सॉस, १ टीस्पून मिरी पावडर, पाव टीस्पून खाण्याचा ऑरेंज रेड कलर, मीठ चवीनुसार, पाव वाटी गरम तेल.
कृती- चकलीच्या भाजणीत वरील सर्व साहित्य घालावे. त्यातच गरम तेल घालावे. छान एकजीव करावे. गरम पाणी घालून मळावे व दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर परत पीठ मळून घ्यावे आणि चकल्या कराव्यात. गरम तेलात तळाव्यात. याचा रंग छान दिसतो.

ब्रेडची चकली
साहित्य - चार ब्रेडच्या स्लाइस, २ वाटी तांदळाचे पीठ, दीड टीस्पून भाजून वाटलेली जिरे पूड, मीठ चवीनुसार, २ टीस्पून लाल मिरची पावडर, १ टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून ओवा, २ टीस्पून गरम तेल.
कृती - ब्रेडच्या स्लाइस पाण्यात भिजवून मॅश करून घ्याव्यात. तांदळाच्या पिठात इतर सर्व साहित्य, गरम तेल आणि ब्रेड घालावा व सगळे छान एकजीव करून घ्यावे. लागेल तसे गरम पाणी घालून पीठ मळावे. या पिठाच्या चकल्या करून तळाव्यात. छान खुसखुशीत चकल्या तयार होतात.

नाचणीची चकली
साहित्य - दीड वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ, २ टीस्पून तीळ, १ टीस्पून ओवा, २ टीस्पून लाल मिरची पावडर, १ टीस्पून भाजलेली जिरे पूड, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृती - जाड बुडाच्या भांड्यात एक वाटी पाणी तापवावे. त्यात तीळ, ओवा, जिरे पूड, मीठ, मिरची पावडर, तेल घालावे. उकळी आल्यावर नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ घालावे. छान एकजीव करावे. गॅस बंद करून पीठ पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पीठ मळून चकल्या कराव्यात व तेलात तळाव्यात.
टिप - चॉकलेटी रंगाच्या चकल्या छान दिसतात, शिवाय पौष्टिकपण होतात.

ज्वारीच्या पिठाची खमंग चकली
साहित्य - तीन वाट्या ज्वारीचे पीठ, १ वाटी तांदळाचे पीठ, १ टीस्पून लसूण पेस्ट, दीड टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून हिंग, १ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून ओवा, पाव वाटी लोणी.
कृती - अडीच वाटी पाणी तापवावे. त्यात पिठे सोडून सर्व साहित्य घालावे. उकळी आल्यावर त्यात पीठ घालावे. सर्व जिन्नस एकजीव करावेत. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवावे. पंधरा मिनिटांनी परत पीठ मळून घ्यावे व मग चकल्या कराव्यात. छान खमंग चकल्या तयार होतात.

संबंधित बातम्या