शेवेचे प्रकार

मंजिरी कपडेकर,कोल्हापूर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

शेव ही तशी पदार्थांवर वरून घालून खाण्याची गोष्ट. पण शेव नसेल, तर काही पदार्थांना चव येत नाही. दिवाळीच्या फराळचेही तसेच... शेवेशिवाय फराळांना मजा नाही!

गुजराती गाठीयॉँ 
साहित्य : एक कप बेसन, १ चमचा मिरे, अर्धा चमचा जिरे, मीठ चवीनुसार, पाव कप तेल, तळण्यासाठी तेल. 
कृती : जिरे जाडसर वाटून घ्यावे. मिरे जाडसर वाटून घ्यावे बेसन पिठात घालावे. त्यातच तेल, मीठ घालून चांगले एकजीव करावे. पीठ मळून घ्यावे व पंधरा मिनिटे थांबावे. नंतर हाताला तेल लावून जाडसर मळून घ्यावे किंवा पोळपाटावर शेंगोळ्याप्रमाणे वळून तेलात तळून घ्यावे. मंद आचेवर तळावे.  ही शेव चवीला वेगळीच लागते.  शेवेची रसभाजी करण्यासाठी ही शेव खूप छान लागते.

जाड तिखट शेव 
साहित्य : दोन वाट्या साधे बेसन, अर्धा कप हिरा बेसन, पाव कप तांदूळ पीठ अर्धा कप तेल, प्रत्येकी १ चमचा ओवा, जिरे यांची जाडसर पावडर, ३ चमचे जवारी मिरची पावडर, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी. 
कृती : सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात अर्धा कप तेल घालून छान एकजीव करून घ्यावे. पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे. सोऱ्यात जाड आकाराच्या शेवेची ताटली घालावी. त्यात पीठ घालून शेव तेलात पाडून तळून घ्यावी.

पालक शेव 
साहित्य : दीड कप साधे बेसन, १ कप हिरा बेसन, १ कप बारीक चिरलेला पालक, ७ ते ८ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, दीड चमचा भाजलेले जिरे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, पाव चमचा खाण्याचा हिरवा रंग, अर्धा कप तेल. 
कृती : पालक, लसूण, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. एक कप पाणी घालून परत चांगले बारीक वाटून घ्यावे. जिऱ्याची जाडसर पावडर करावी. दोन्ही बेसन एकत्र करावे. त्यात मीठ, जिरे पावडर, तेल घालावे. चांगले एकजीव करावे. पालकाचे पाणी पिठात घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे. पंधरा ते वीस मिनिटे थांबावे नंतर सोऱ्यात पीठ घालून शेव करून तळून घ्यावी. 
     पालक आणि लसूण यांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते. 
     ही शेव थोडी जाड केल्यास तीपण छान होते, त्यासाठी सोऱ्याची ताटली थोडी मोठी वापरावी.

शेजवान शेव 
साहित्य : एक कप साधे बेसन, १ कप हिरा बेसन, मीठ चवीनुसार, पाव कप तेल. 
सॉससाठी ः दोन चमचे सुक्‍या लाल मिरच्या शिजवून त्याची पेस्ट, २ चमचे आले-लसूण पेस्ट, पाव चमचा खाण्याचा लाल रंग, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धा चमचा मिरी पावडर, पाव वाटी तेल, १ चमचा चिली सॉस, मीठ चवीनुसार, पाव चमचा साखर. 
कृती : सॉस करण्यासाठी कढईत तेल तापवावे. त्यात आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट घालून छान परतून घ्यावे. त्यातच मिरी पावडर, टोमॅटो सॉस, चिली सॉस, मीठ, साखर, खाण्याचा लाल रंग घालावा. पाव वाटी पाणी घालून उकळून घ्यावे. हा सॉस गार करून घ्यावा. नंतर मिक्‍सरमध्ये फिरवून वाटून घ्यावे. शेव करण्यासाठी हिरा बेसन, साधे बेसन, मीठ, तेल घालावे. वाटलेला शेजवान सॉस घालून चांगले एकजीव करून घ्यावे. जास्त लाल रंग हवा असल्यास पिठात थोडा खाण्याचा लाल रंग घालावा. पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे. अर्धा तास ठेवावे. हवी तशी जाड बारीक शेव करून तेलात तळून घ्यावी.

मुरक्कूः प्रकार एक 
साहित्य : एक किलो तांदूळ, पाव किलो उडीद डाळ, चवीनुसार मीठ, २ चमचे मिरे पावडर, तेल.
कृती : तांदूळ धुऊन सावलीत वाळवावेत. उडदाची डाळ हलकेच भाजून घ्यावी. तांदूळपण हलकेच भाजून घ्यावेत. दोन्ही एकत्र करून दळून आणावे. त्यातील चार वाट्या पीठ घ्यावे. त्यात मीठ, मिरी पावडर, तेल घालावे. पीठ मळून घ्यावे. जरा जास्त जाड शेवेच्या साच्याने शेव पाडून किंवा प्लेन चकली (काटे नसलेली) प्लेट वापरून शेव करून तळून घ्यावी.

लसूण शेव 
सर्व कृती प्लेन शेवेप्रमाणेच करावी. पाण्यात दहा- बारा लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचे पाणी घालावे. पाणी गाळून घ्यावे. याच पाण्यात शेवेचे पीठ भिजवावे. अर्धा तास ठेवावे. सोऱ्यात घालून शेव तेलात सोडून तळून घ्यावी.

पेरी-पेरी मसाला शेव 
साहित्य व कृती : प्लेन शेवेसारखीच आहे. पिठात एक चमचा पेरी-पेरी मसाला घालावा नंतर शेव तयार झाल्यावर वरूनसुद्धा पेरी-पेरी मसाला भुरभुरावा. दिवाळीच्या फराळात शेव असतेच, कारण शेव हा पदार्थ घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. शिवाय शेव चिवड्यात घालूनसुद्धा खाता येते. दिवाळीच्या व्यतिरिक्त एरवीसुद्धा मधल्या वेळेत खाता येते. प्रवासात न्यायला चांगली असते. याच पारंपरिक शेवेचे अनेक वेगवेगळ्या चवीचे प्रकार करता येतात.

टोमॅटो - चीज शेव 
साहित्य : एक कप तांदळाचे पीठ, १ कप बेसन, १ चमचा प्रोसेस चीज, १ कप टोमॅटोची प्युरी, अर्धा कप तेल, मीठ चवीनुसार, चीज पावडर आवडीनुसार, अर्धा चमचा मिरी पावडर. 
कृती : तेल, टोमॅटो प्युरी, किसलेले चीज, मीठ, मिरी पावडर एकत्र करून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावी. परातीत तांदळाचे पीठ, बेसन एकत्र करावे. त्यात वरील मिश्रण ओतावे. पीठ मळून घ्यावे. (जसे लागेल तसे पीठ कमी जास्त करावे) नंतर शेव करून तळून घ्यावी. शेव सर्व्ह करताना वरून चीज पावडर घालावी. आवडीनुसार चिली फ्लेक्स घालू शकता.

मुरक्कू ः प्रकार दोन 
साहित्य : तीन वाट्या तांदळाचे पीठ, १ वाटी बेसन, २ चमचे मिरे पावडर, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल, १ चमचा तिखट, तीळ. 
कृती : तांदळाचे पीठ, बेसन, मीठ, तिखट, मिरे पावडर, तीळ एकत्र करावे. त्यात तेल गरम करून घालावे. छान एकजीव करावे. गरम पाण्यात पीठ मळावे व अर्धा तास ठेवावे. नंतर पीठ चांगले मळून घ्यावे. सोऱ्यातून जाड शेव करावी व तळावी. मुरक्कू हा आंध्र प्रदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.

प्लेन शेव 
साहित्य : एक वाटी बेसन, १ वाटी हिरा बेसन, अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून जिरे, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी. 
कृती : ओवा आणि जिऱ्याची जाडसर पावडर करून घ्यावी. दोन्ही बेसन, तेल, मीठ, जिरे, ओव्याची पावडर एकत्र करावी. पाणी घालून पीठ सैलसर मळून घ्यावे. अर्धा तास ठेवावे नंतर सोऱ्यात पीठ घालून शेव तेलातच सोडून तळून घ्यावी. 

पुदिना शेव (पाणीपुरी शेव) 
साहित्य : एक कप बेसन, १ कप हिरा बेसन, मीठ चवीनुसार, १ कप पुदिना, ४ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, अर्धी वाटी तेल, पुदिना पावडर, चाट मसाला आवडीनुसार. 
कृती : पुदिना, हिरव्या मिरच्या, जिरे एकत्र वाटून घ्यावे. पाणी घालून बारीक वाटावे. दोन्ही बेसन, तेल, मीठ एकत्र करावे. त्यातच पुदिन्याचे पाणी घालावे. लागल्यास आणखी पाणी घालून पीठ मळून घ्यावे. अर्धा तास ठेवावे. शेव करून तळून घ्यावे. वरून चाट मसाला व पुदिना पावडर घालावी. ही वेगळ्या चवीची शेव छान लागते. 

संबंधित बातम्या