सूप, सांबर आणि कढण

मीना काळे
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या नातेवाइकांना खाऊ घालण्यासाठी सांबर, कढी, कढण आणि सुपाचे हे काही वेगळे प्रकार...
 
गोळ्याचे सांबर
साहित्य : पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी चणा डाळ, १ वाटी खवलेला नारळ, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या, अर्धा चमचा जिरे, १ चमचा चिंचेचा कोळ, १ चमचा गूळ, मीठ, अर्धा चमचा गोडा मसाला, लाल तिखट, ८-१० कढीपत्त्याची पाने आणि तेल.
कृती : दोन्ही डाळी धुऊन २ तास भिजवाव्यात. नंतर पाणी निथळून त्यात मीठ, पाव चमचा जिरे आणि १ मिरची घालून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. या वाटणाचे छोटे गोळे करून तेलात तळून घ्यावेत. 
नारळ, कोथिंबीर, जिरे, १ मिरची थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. चमचाभर तेलाची फोडणी करून त्यात हे वाटण घालावे. त्यात २ वाट्या गरम पाणी घालून उरलेले साहित्य आणि तळलेले गोळे घालावेत. ५ मिनिटे उकळू द्यावे. तयार सांबर परोठ्याबरोबर खायला छान लागते. 
 
कढी पकोडे
साहित्य : एक वाटी आंबट दही, १ वाटी मेथीची किंवा पालकाची चिरलेली पाने, तिखट, मीठ, हिंग, डाळीचे पीठ, तेल, जिरे, जिरे पूड. 
कृती : मेथी किंवा पालकाच्या चिरलेल्या पानांमध्ये चवीप्रमाणे तिखट व मीठ घालावे. त्यात अर्धी वाटी डाळीचे पीठ घालावे आणि या मिश्रणाची तेलात तळून भजी करून घ्यावीत. 
दही घुसळून त्यात मीठ, जिरे पूड, १ चमचा डाळीचे पीठ आणि ३ वाट्या पाणी घालावे. तेलात हिंग, जिरे, तिखटाची फोडणी करून ती या ताकात घालावी. हे मिश्रण उकळून कढी करून घ्यावी. 
डिशमध्ये सर्व्ह करताना भजी घालून त्यावर कढी घालावी. भाताबरोबर छान लागते.
 
कुळथाचे कढण
साहित्य : एक वाटी कुळीथ, १ वाटी आंबट ताक, १ मिरची, तेल, हिंग, मीठ, मोहरी, कढीपत्ता.
कृती : एक वाटी कुळीथ धुऊन ७-८ तास पाण्यात भिजत ठेवावेत. नंतर पाण्यातून काढून फडक्यात २४ तास बांधून ठेवावेत. मोड आलेले कुळीथ ५-६ वाट्या पाणी घालून कुकरमध्ये चांगले शिजवून घ्यावेत. 
दुसऱ्या पातेलीत कुळथावरील पाणी काढून घ्यावे. त्यात १ चिरलेली हिरवी मिरची, मीठ, साखर कोथिंबीर घालावी. तेलामध्ये हिंग, जिरे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी कढणात घालावी. हे कढण उकळावे. नंतर त्यात आंबट ताक घालून सूपसारखे पिण्यास द्यावे. 
टिप - हे खूप पौष्टिक असून वातशामक आहे. थंडीत जरूर प्यावे. राहिलेल्या कुळथाची उसळ करावी. 
 
कैरीचे सार
साहित्य : एक वाटी उकडलेल्या कैरीचा गर, गूळ, मीठ, १ मिरची, खवलेला नारळ, तेल, हिंग, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर. 
कृती : मिक्सरमध्ये कैरीचा गर व नारळ बारीक वाटून घ्यावा. त्यात ६ वाट्या पाणी, मीठ, गूळ घालावा. मिरची आणि कोथिंबीर चिरून घालावी. तेलात हिंग, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी द्यावी आणि उकळावे. आंबट गोड चवीचे सार छान चविष्ट लागते.
 
टोमॅटो चीज सूप
साहित्य : चार लालबुंद टोमॅटो, अर्धा इंच आले, १ चमचा कणीक, १ कप दूध, काळी मिरी पूड, मीठ, साखर, १ चीज क्युब. 
कृती : मंद गॅसवर कणीक परतून घ्यावी. ती गार झाल्यावर त्यात १ कप दूध घालून पेस्ट करावी आणि शिजवून व्हाइट सॉस तयार करावा. टोमॅटो आल्याचा तुकडा घालून उकडून घ्यावेत. टोमॅटोची साले काढून टोमॅटोचा गर आल्याबरोबर मिक्सरमधून वाटून घ्यावा. या गरात ३ वाट्या पाणी, मीठ, साखर व काळी मिरी पूड घालून उकळावे. गॅस बंद करून त्यात व्हाइट सॉस व किसलेले चीज घालावे. टोमॅटो चीज सूप तयार.
 
खाटी डाळ
साहित्य : एक वाटी तुरीच्या डाळीचे वरण, १ मुळ्याचे पातळ काप, पाव वाटी चणा डाळ, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा बारीक चिरलेले आले, कढीपत्ता, मीठ, गूळ, काळा मसाला, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, २ चमचे खवलेला नारळ, तेल.
कृती : मुळ्याचे काप, भिजवलेली चणा डाळ, मेथी दाणे व आले एका भांड्यात घालून शिजवून घ्यावे.  तुरीच्या वरणात हे सर्व घालावे. पाणी  
घालून उरलेले साहित्य घालावे. वरून तेलाची फोडणी घालून उकळावे. वेगळ्या चवीची ही डाळ छान लागते.

ब्रोकोली-गाजर सूप
साहित्य : एक गड्डा ब्रोकोली, १ गाजर, २ पाकळ्या लसूण, पाव वाटी स्वीट कॉर्न दाणे, १ चमचा कणीक, १ चमचा लोणी, मिरी पूड, मीठ, चीज क्युब.
कृती : पातेल्यात लोणी गरम करून त्यात लसूण बारीक करून घालावा. त्यात कणीक घालून परतावे. थंड झाल्यावर त्यात ३ वाट्या पाणी, मीठ आणि मिरी पावडर घालावी. तिन्ही भाज्या उकडून हाताने कुस्करून घ्याव्यात. त्या गरम केलेल्या कणकेच्या पाण्यात घालाव्यात. या मिश्रणाला उकळी आणावी. त्यात चीज किसून घालावे आणि सर्व्ह करावे.
 
कढी गोळे
साहित्य : अर्धी वाटी चणा डाळ, पाव वाटी मूग डाळ, ४ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, २ वाट्या आंबट दही, अर्धा चमचा डाळीचे पीठ, तेल, जिरे, हिंग.
कृती : आले, लसूण, मीठ आणि मिरची यांचे वाटण करावे. दोन्ही डाळी धुऊन ४ तास पाण्यात भिजत घालाव्यात. नंतर पाणी निथळून वाटून घ्याव्यात. त्यात आले-मिरचीचे थोडे वाटण घालून छोटे छोटे गोळे करून ठेवावेत. 
दही घुसळून त्यात ५ वाट्या पाणी, उरलेले मिरचीचे वाटण व डाळीचे पीठ घालावे. ही कढी उकळायला ठेवावी. याला उकळी फुटल्यावर वरील डाळीचे गोळे अलगद सोडावेत. सुरुवातीला ढवळू नये. नाहीतर गोळे फुटतील. गोळे शिजल्यावर हलके होऊन वर तरंगतील. त्यानंतर तेलाची जिरे, हिंग व सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी व कढीवर घालावी. कढी गोळे तयार!

संबंधित बातम्या