झटपट कोशिंबिरी, चटण्या

मृदुला कुलकर्णी, इचलकरंजी
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आपल्याला दररोजच्या जेवणात तोंडी लावायला लोणचे, पापड, चटणी, कोशिंबीर हवेच असते; पण केवळ वेळ लागतो म्हणून काहीजण ते करायचे टाळतात. म्हणूनच फक्त पाच-दहा मिनिटांत पटापट तयार होणाऱ्या काही चटण्या-कोशिंबिरींच्या रेसिपीज...

काकडीची कोशिंबीर 
साहित्य : एक काकडी (पांढरी), अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर, दीड चमचा दाण्याचे कूट, दीड चमचा दही (दह्याऐवजी १ लिंबू वापरू शकता), अर्धा चमचा फोडणीसाठी जिरे, १ चमचा गोडे तेल. 
कृती : सर्वप्रथम काकडीचे साल काढून घ्यावे. त्यानंतर ती किसून घ्यावी. किसलेल्या काकडीमध्ये चवीनुसार मीठ, साखर, दाण्याचे कूट, दही घालावे. ते एकजीव 
करून घ्यावे. त्यानंतर फोडणी देण्यासाठी गॅसवर छोट्या कढईत एक चमचा तेल घालावे. गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे घालून गॅस बंद करावा. फोडणी कोशिंबिरीमध्ये घालून सगळे मिश्रण एकजीव करावे. कोशिंबीर तयार! 
(टीप ः फोडणी न देताही कोशिंबीर चविष्ट 
लागते.)

टोमॅटोची कोशिंबीर 
साहित्य : दोन टोमॅटो, दीड चमचा दही, १ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, दीड चमचा दाण्याचे कूट. 
कृती : दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार दही, साखर, मीठ आणि दाण्याचे कूट घालावे. सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. झाली कोशिंबीर तयार! कोशिंबिरीला सर नको असेल, तर फार आधीपासून साखर-मीठ घालून कालवू नये, पाणी सुटते.

कांदा-टोमॅटोची कोशिंबीर 
साहित्य : एक कांदा, १ टोमॅटो, अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर, दीड चमचा दाण्याचे कूट. 
कृती : सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, दाण्याचे कूट घालावे. झटपट कोशिंबीर तयार! ही कोशिंबीर दही घालूनही करता येते. 

तिळाची चटणी 
साहित्य : एक वाटी पांढरे तीळ, दीड चमचा तिखट, १ चमचा मीठ. 
कृती : प्रथम पांढरे तीळ मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यावेत. तीळ थंड झाल्यावर मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत. त्यानंतर त्यातच तिखट आणि मीठ घालावे. हे सगळे मिश्रण मिक्‍सरमधून एकजीव करून घ्यावे. मस्त खमंग, खुसखुशीत चटणी तयार! ही चटणी कोरडी असल्याने खूप दिवस टिकते. 

खोबऱ्याची चटणी 
साहित्य : एक वाटी ओले/सुके खोबरे, १ चमचा जिरे, १ चमचा मीठ, अर्धा तुकडा आले, अर्धे लिंबू किंवा २ चमचे दही, २ मिरच्या, ४-५ कोथिंबिरीच्या काड्या, २ चमचे फुटाण्याची डाळ. 
कृती : ओले/सुके खोबरे, जिरे, मीठ, आले, कोथिंबीर, मिरचीचे तुकडे हे सगळे जिन्नस मिक्‍सरमध्ये घालावेत. त्यानंतर फुटाण्याची डाळ घालावी. आपल्या आवडीनुसार लिंबू किंवा दही घालावे. हे सगळे मिश्रण मिक्‍सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावे. ते सरसरीत होण्यासाठी किंचित पाणी घालावे. जर आपल्याला आवडत असेल तर चटणीला जिरे आणि कढीपत्त्याची फोडणीदेखील देऊ शकता. फोडणीमध्ये किंचित हिंगदेखील घालावे. चविष्ट चटणी तयार!

दोडक्‍याच्या सालींची चटणी 
साहित्य : पाच-सहा दोडक्‍यांच्या साली, २ चमचे तेल, १ चमचा जिरे, ३ चमचे पांढरे तीळ, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ. 
कृती : सर्वप्रथम सगळ्या साली स्वच्छ धुऊन पाणी काढून घ्यावे. सगळे पाणी निघेपर्यंत एकीकडे तव्यावर थोडे तेल आणि जिऱ्याची फोडणी तयार करावी. त्यातच दोडक्‍याच्या साली घालाव्यात आणि खरपूस भाजून घ्यावे. त्यातच तीळ घालावेत. हे सगळे मिश्रण छान तांबूस होईपर्यंत भाजावे. गॅस बंद करावा. त्या तव्यातल्या मिश्रणातच चवीनुसार तिखट, मीठ, हळद घालून एकजीव करून घ्यावे. आपल्याला आवडत असेल तर आपण मिक्‍सरमध्ये बारीक करू शकता. अशी ही झटपट होणारी चटणी खूप पौष्टिक असते.

मुळ्याची कोशिंबीर 
साहित्य : अर्धी वाटी किसलेला मुळा, १ लिंबू किंवा दीड चमचा दही, १ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा फोडणीसाठी हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा गोडेतेल, १ चमचा जिरे. 
कृती : सर्वप्रथम अर्धी वाटी मुळा किसून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर घालावे. या कोशिंबिरीमध्ये तुम्ही आवडीनुसार दही किंवा लिंबू घालू शकता. आता फोडणीसाठी गॅसवर छोटी कढई ठेवावी. त्यामध्ये गोडे तेल घालावे. ते गरम झाले की त्यामध्ये जिरे घालावे. गॅस बंद करून फोडणीमध्ये हळद आणि हिंग घालावे. सगळे मिश्रण एकजीव करावे. छान चविष्ट कोशिंबीर पानात वाढावी. 

शेंगदाण्याची चटणी 
साहित्य : एक वाटी शेंगदाणे, दीड चमचा तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे. 
कृती : एक वाटी शेंगदाणे प्रथम मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, तिखट, जिरे घालावे. हे सगळे पदार्थ मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत. एकजीव झाले की एका बोलमध्ये काढून घ्यावे. ही चटणी दही घालून खूप चविष्ट लागते.

कच्च्या कोबीची कोशिंबीर 
साहित्य : अर्धी वाटी बारीक चिरलेला कच्चा कोबी, अर्धे लिंबू, 
१ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ. 
कृती :सर्वप्रथम अर्धी वाटी कच्चा कोबी बारीक चिरून 
घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घालावे. 
सगळे मिश्रण एकजीव करावे. लिंबाऐवजी दह्याचा वापर करू शकता.

लसणाची चटणी 
साहित्य : दहा-बारा लसूण पाकळ्या, २ चमचे तिखट, १ चमचा मीठ, दीड चमचा जिरे. 
कृती : प्रथम सगळ्या लसूण पाकळ्यांची साले काढून घ्यावीत. त्या पाकळ्या मिक्‍सरमध्ये घालाव्यात. त्यातच मीठ, तिखट, जिरे घालावे. हे सगळे जिन्नस मिक्‍सरमधून फिरवून वाटून घ्यावेत. बारीक, एकजीव होईपर्यंत फिरवावे. झटपट लसणाची चटणी तयार!   

संबंधित बातम्या