फराळाचा राजा लाडू 

निशा गणपुले-लिमये
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळीच्या फराळात एकवेळ दुसरा एखादा पदार्थ नसला तरी चालेल, पण लाडवाशिवाय फराळ होऊच शकत नाही. त्यामुळेच लाडवाला फराळाचा राजा म्हटल तर वावग ठरणार नाही.

लाडू प्रकार 
प्रकार १ ः मुखविलास लाडू 
साहित्य ः ५०० ग्रॅम हरभऱ्याची डाळ, ५०० ग्रॅम साखर, अर्धा लिटर दूध, २०० ग्रॅम खवा, २०० ग्रॅम तूप, १५-२० वेलदोडे, ५० ग्रॅम बेदाणे. 
कृती ः दूध उकळवून गार करावे. नंतर त्यात हरभऱ्याची स्वच्छ धुतलेली डाळ भिजत घालावी. डाळ ३ ते ४ तास भिजू द्यावी. नंतर ही डाळ वाटून घ्यायची आहे. 
वाटलेली डाळ तुपावर भाजून घ्यावी. ही डाळ मंदाग्नीवरच भाजायची असून, थोडा जास्त वेळ लागेल. नंतर साखरेचा एकतारी पाक करावा. त्यात खवा घालून जरा उकळू द्यावे. नंतर त्यात परतलेली डाळ, वेलची पूड व बेदाणे घालून जरा ढवळावे. नंतर खाली उतरवून मिश्रण मधून-मधून हलवावे. मिश्रण घट्ट झाले, की लाडू वळावेत. हे लाडू चविष्ट आणि सुरेख लागतात. 

प्रकार २ ः डिंकाचे लाडू 
साहित्य ः पाव किलो मध्यम कुटलेला डिंक, पाव किलो साखर, पाव किलो गोटा (सुके) खोबरे, पाव किलो खारीक, पाव किलो साजूक तूप, अर्धा किलो गूळ, १ लहान जायफळ. 
कृती ः खसखस भाजून कुटून घ्यावी. खोबरे किसून भाजावे व कुस्करून घ्यावे. खारीक फोडून बिया काढून अडकित्त्याने बारीक तुकडे करावेत व थोड्या तुपात तळून घ्यावेत. नंतर खलबत्त्यात जरा कुटून बारीक करावेत. जायफळाची पूड करून घ्यावी. तूप गरम करायला मंद आचेवर ठेवावे. त्यात पोहे तळायचे बारीक जाळीचे गाळणे ठेवून थोडा-थोडा डिंक टाकून तळून घ्यावा. आता तळताना आच मध्यम ठेवावी. 
गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घालून पाक करायला ठेवावा. दोन तारी पाक झाला, की त्यात वरील सर्व वस्तू घालून मिश्रण सारखे करावे व लगेचच लाडू वळावेत. डिंक वाटीने चुरडून घ्यावा. 
जर पाक करून लाडू करायचे नसतील तर गूळ किसून घ्यावा. सर्व मिश्रण गरम आहे तोच कालवावे. त्यात थोडे पातळ तूप ओतावे व लाडू वळावेत. 

प्रकार ३ ः अळिवाचे लाडू 
साहित्य ः १०० ग्रॅम अळीव (हळीव), २ मोठ्या नारळांचा पांढराशुभ्र चव, १ किलो गूळ (आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा, १ टीस्पून जायफळ पूड, १ डाव साजूक तूप, हवी असल्यास वेलदोडे पूड. 
कृती ः अळीव चांगले चाळून व निवडून नारळाच्या पाण्यात सकाळीच भिजत टाकावेत. २-३ तासांत अळीव दाणे चांगले फुलतील. 
गूळ अगदी बारीक चिरून घ्यावा. नंतर गूळ, नारळचव, जायफळ पूड, वेलची पूड आणि अळीव सर्वकाही एकत्र करून चांगले कालवावे. जाड बुडाच्या पातेल्याला तळाला डावभर साजूक तूप लावून त्यात वरील मिश्रण घालून मंद आचेवर पातेले ठेवून  
मधून-मधून मिश्रण ढवळावे. अळीव चांगले शिजले व मिश्रण ढवळण्यास जड लागू लागले म्हणजे एकदम तयार झाले आहे आणि अळीव चांगले थंड झाले की लाडू वळावेत. 

प्रकार ४ ः रव्याचे बिनपाकाचे खवा-रवा मोहक लाडू 
साहित्य ः १ भांडे अगदी बारीक रवा, दीड भांडे पिठीसाखर, २ वाट्या नारळचव, १५० ग्रॅम खवा, ७-८ वेलदोड्यांची पूड, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी डालडा वा कोणतेही वनस्पती तूप, १ मोठा चमचा दूध. 
कृती ः प्रथम पातेल्यात रवा तुपावर चांगला खरपूस तांबूस भाजून घ्यावा. नंतर गॅस बंद करून त्या रव्यावर दुधाचा हबका मारावा. नंतर नारळचव नुसताच भाजून घ्यावा. बाजूला ठेवावा. खवा हाताने चुरून मंदाग्नीवर परतून घ्यावा. 
आता भाजलेला रवा, पिठीसाखर, खवा व खोबरे एकत्र मिसळून त्यात वेलची पूड घालून कालवावे. त्यावर पातळ केलेले कोमट तूप घालून मिश्रण चांगले एकजीव कालवावे आणि ते गरम आहे तोवरच लाडू वळावेत. 

प्रकार ५ ः गूळ-शेंगदाणे लाडू (हे लाडू उपवासालाही चालतात) 
साहित्य ः पाव किलो शेंगदाणे, पाव किलो बारीक चिरलेला गूळ, ५-६ वेलचींची पूड. 
साहित्य ः प्रथम शेंगदाणे थोडेसे पाणी लावून छान खमंग भाजून घ्यावेत. नंतर कोमट असतानाच त्यांची साले अर्धवटच काढावीत. कारण सालातच सगळे सत्त्व असते. आता मिक्‍सरच्या भांड्यात थोडे दाणे व थोडा गूळ व ३-४ वेलची दाणे घालून रवाळ दळावे. असे २-३ घाणे दळून घ्यावेत. दाणे गुळाबरोबर दळल्याने गूळ व्यवस्थित मिसळतो व भांडे पण चिकट होत नाही आणि रवाळ दळल्याने लाडू खाताना तोंडात चिकटत नाही. बरोबर वेलची दाणे पण दळले जाऊन मस्त वास येतो. सर्व दाणे दळून झाल्यावर या मिश्रणाचे सुंदर गोल-गोल लाडू वळावेत. थंडीत आपण गुडदाणी पौष्टिक म्हणून खातोच. खूप छान लागतात हे दाण्याचे लाडू. 

प्रकार ६ ः बेसन लाडू 
साहित्य ः २ मोठी वाट्या चणाडाळीचे रवाळ पीठ, २ ते अडीच वाटी बुरा साखर (बाजारात मिळते वा तशीच गुळी साखर पण मिळते.) अर्धी वाटी खरबुजाच्या बिया. दीड वाटी साजूक तूप, २ मोठे चमचे दूध व अर्धा टीस्पून वेलदोडे पूड. 
टीप ः बेसन लाडूला साखर थोडी जास्तच घातली की लाडू सुरेख लागतात. 
कृती ः २ ते अडीच वाट्या बुरा साखरेत अर्धी वाटी पाणी घालून मंद आचेवर पाक करावा. तो अगदी पक्का झाला की त्याची परत साखर दिसू लागते. मग ही साखर मिक्‍सरमध्ये दळावी व चाळून घ्यावी. 
प्रथम एका पातेल्यात २ मोठे चमचे तूप घालून ते वितळले की त्यात थोडे-थोडे रवाळ बेसन घालून हलवावे. आच मंदच ठेवावी. थोडे परतले की परत २-३ चमचे तूप घालून परतावे. तूप थोडे-थोडे घातले की बेसन त्यात चांगले सामावते. आता २ चमचे तूप वगळून सगळे तूप घालून बेसन मस्तपैकी तांबूस होईतो परतावे, भाजावे. मग त्यात थोडे-थोडे दूध घालून बेसन भाजत राहावे. याने पीठ खूप फुलते व खमंग वास पण छान येतो. २-३ वेळा भाजून बंद करावे. खरबूज बिया तुपावर भाजून घ्याव्यात. त्या तडतडायला लागल्यावर लगेच काढून एका बाऊलमध्ये ठेवाव्यात. बेसन मधून-मधून ढवळावे म्हणजे पातेल्याच्या बाजूला चिकटत नाही. मग ते एका थाळ्यात वा परातीत काढून घ्यावे. त्यात साखर घालून कालवावी. मिश्रण मिक्‍सरच्या भांड्यातून फिरवून घेतले की दोन्ही एकजीव होईल. आता त्यात वेलची पूड व खरबुजाच्या भाजलेल्या बिया घालून हातानेच चांगले कालवून व वगळलेले तूप घालून मिश्रण एकजीव करावे. लाडू सुरेख व सुंदर वळावेत. 
टीप ः बेसन भाजून झाले की त्यात १ लहान चमचा हळद लगेचच घालावी. छान रंग येतो. तसेच बेसन तांबूस भाजले की लाडू पण खमंग लागतो. पिवळ्या रंगाचा बेसन लाडू चवीला कच्चा लागतो. 

प्रकार ७ ः मेथीचे पौष्टिक लाडू 
साहित्य ः १ वाटी मेथीचे स्वच्छ निवडलेले दाणे, १ वाटी गोटा खोबरे किस, १५ ते १७ बदाम, २०-२५ काजू, १ वाटी मखाणे, अर्धी वाटी जवस, २ मोठे चमचे खसखस, अर्धी वाटी डिंक, १ मोठा चमचा ओवा, अर्धी वाटी अळीव (हळीव), १ लहान जायफळ, ५-६ वेलदोडे पूड, २ वाट्या साजूक तूप (अर्धी वाटी जास्त साजूक तूप जवळ ठेवावे.) २ वाट्या गूळ बारीक चिरून घ्यावा, २ वाट्या चांगल्या गव्हाची कणीक किंवा २-३ पिठे एकत्र घ्यावीत उदा. नाचणी, ज्वारी, मका, सोयाबीन वगैरे (ऐच्छिक). 
कृती ः प्रथम मेथीदाणे थोडे कोरडेच भाजून घ्यावेत. मग मिक्‍सरमध्ये त्याची पूड (पीठ) करावे. आता १ वाटी साजूक तूप चांगले गरमागरम करून त्यात हे तयार मेथीपीठ १५-१६ तास भिजत घालावे. डब्याचे झाकण लावावे. मग काजू, बदाम, मखाणे/मकाणे थोड्या-थोड्या तुपात वेगवेगळे परतावेत. खसखस कोरडीच भाजून कूट करावे. खोबरे किस भाजून तांबूस झाले की हातानेच त्याचा चूर करावा. डिंक थोड्या तुपात तळून तो वाटीने क्रश करावा. जवस, ओवा कोरडेच भाजावे. तसेच अळीव (हळीव) पण कोरडेच भाजावे. आता कणीक वा इतर २-३ पिठे जास्त साजूक तुपात खमंग, मंद आचेवर भाजावीत. काजू, बदाम, मखाणे, जवस यांचा मिक्‍सरमधून कूट करावा. पण खूप वेळ जोरात फिरवता म्हणजेच तेल निघेल असे न फिरवता कूट कोरडाच करावा. हे सगळे घटकपदार्थ अशा रीतीने जवळ ठेवावेत. एका पातेल्यात २ वाट्या चिरलेला गूळ व १ मोठा चमचा साजूक तूप घालून त्यात गूळ नुसताच विरघळवून घ्यावा. पाक करू नये. मग एका परातीत वा थाळ्यात भाजलेली कणीक घेऊन तुपात भिजत ठेवलेले मेथीचे पीठ आणि बाकी सगळे घटकपदार्थ त्यात मिसळावेत. आता जायफळ पूड (किसून घ्यावे), वेलची पूड पण घालावी. सगळे मिश्रण चांगले कालवावे किंवा एकदाच हळूवारपणे मिक्‍सरमध्ये फिरवून त्यात विरघळलेला गूळ घालून पुन्हा कालवावे आणि परातीतच थोडे-थोडे मिश्रण बाजूला घेऊन झक्कपैकी लाडू वळावेत. हा एक लाडू कपभर दुधाबरोबरच खावा. त्यावर पाणी पिऊ नये. शरीराच्या सगळ्या तक्रारींवर खूप गुणकारी असे हे मेथी लाडू आहेत. 
टीप ः १) गुळाऐवजी हल्ली बाजारात गूळ पावडर मिळते ती चालेल. 
२) मेथी पीठ तुपात भिजवल्याने लाडू कडवट लागत नाही. 

प्रकार ८ ः खव्याचे लाडू 
साहित्य ः २ लहान वाट्या बारीक रवा, १ वाटी खवा, २ वाट्या साखर, अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड, १ लहान वाटी नारळचव, पाव वाटी घरी केलेले पनीर, २ मोठे चमचे सर्व मिळून काजू तुकडे, बदाम+पिस्ते काप हे सर्व मेवा तुकडे व काप थोड्या साजूक तुपात परतावेत. छान चव लागते. १ लहान चमचा केशर पूड, अर्धी वाटी साजूक तूप, २ मोठे चमचे गुळाची पावडर. 
साहित्य ः प्रथम खवा थोडासा भाजून घ्यावा. त्याच पातेल्यात ३ मोठे चमचे साजूक तूप घालून रवा तांबूस, खमंग भाजून घ्यावा. नारळचव पण भाजून घ्यावा. पनीर मिक्‍सरमध्ये थोडे फिरवून मोकळे करून घ्यावे. आता पातेल्यात साखर व ती भिजेल इतकेच पाणी घालून पाक करायला घ्यावा. पाक चांगला चिकट झाला पाहिजे. आता या पाकात भाजलेला रवा घालून ढवळून घ्यावा. त्यात मिक्‍सरमधून फिरवलेला खवा घालावा. पनीर घालावे, तसेच नारळचव, वेलची पूड, केशर पूड व गूळ पावडर घालून सर्व मिश्रण १०-१५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे. मग सर्व मिश्रण चांगले कालवून घ्यावे. मुटका करून पाहावा. छान झाला की एका थाळीत सुकामेवा पसरावा. मिश्रणाचे लाडू वळून या मेव्यावर घोळावेत. हे लाडू खूपच मस्त लागतात. 
टीप ः गूळ पावडरीने लाडूला एक वेगळीच सुरेख चव येते. लाडू रुचकर होतात. 

प्रकार ९ ः नाचणीचे लाडू 
नाचणी म्हणजेच रागी. नाचणी पिठाचा शिरा, खीर, धिरडे वगैरे पदार्थ छान होतात व ते खूपच पौष्टिक असतात. याच पिठात थोडे (जवस) आळशीचे पीठ मिसळले तर लाजवाब पदार्थ असतो. 
साहित्य ः १ वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी सोयाबीन, अर्धी वाटी जवस पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, दीड वाटी सर्व मिळून गूळ पावडर व पिठीसाखर, १ टीस्पून पिठीसाखर, आपल्याला आवडेल तो सुकामेवा तुकडे उदा. खजूर, खारीक, बिया प्रकार ः भोपळा, खरबूज वगैरे, पाऊण वाटी साजूक तूप, जरूर वाटल्यास आणखी घ्यावी. 
कृती ः ही वरील सर्व पिठे मंद आचेवर कोरडीच भाजून घ्यावीत. आता एका बाउल वा तसराळ्यात पिठे व इतर सर्व साहित्य एकत्र घेऊन मिश्रण चांगले कालवावे. आता तूप थोडे-थोडे पण खूप गरम करून थोड्या-थोड्या मिश्रणावर घालून तेवढे-तेवढेच लाडू वळावेत. गरमागरम तूप घातल्याने सुकामेवा पण भाजला जातो आणि लाडू पण चांगल्या रीतीने वळता येतात. लाडू एकदम छान होतात. 

प्रकार १० ः राजगिरा पिठाचे खमंग लाडू (उपवासाला पण चालतात) 
साहित्य ः २०० ग्रॅम राजगिरा पीठ, २०० ग्रॅम गूळ पावडर, ३ मोठे चमचे भाजलेल्या दाण्यांचे सालींसह बारीक कूट, मगज (खरबूज बिया व सूर्यफूल बिया, दीड वाटी साजूक तूप, अर्धी वाटी राजगिरा लाह्या). 
कृती ः प्रथम एका पातेल्यात वा कढईत अर्धी वाटी साजूक तूप घालून त्यात बिया थोड्या परतून घ्याव्यात. मग त्याच तुपात राजगिरा पीठ मंदाग्नीवर खमंग भाजावे. पीठ कोमट झाले की त्यात गूळ पावडर व मगज (बिया) घालाव्यात. मिश्रण चांगले कालवावे. आता उरलेले १ वाटी तूप गरम करून या मिश्रणावर ओतून - घालून लाडू वळावेत आणि एका थाळीत वा परातीत राजगिरा लाह्या पसरवून त्यात वळलेले तयार लाडू खूप घोळावेत. लाडूंवरील हा लाह्यांचा विरळ कोट खूप छान दिसतो आणि राजगिरा लाडू पण झक्कास लागतो. 
टीप ः लाह्यांमुळे लाडू खूपच आकर्षक होतो जणू काही लुकलुकत्या चांदण्याच. हा लाडू सगळ्यांनाच खूप आवडेल

संबंधित बातम्या