चटपटीत खमंग शेव

राजश्री बिनायकिया
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळीच्या पदार्थांमधील शेव हा पदार्थ करण्यासाठी सोपा, खायला रुचकर, झटपट होणारा आणि झटपट संपणाराही चटकदार पदार्थ. ही कुरकुरीत शेव सर्वांनाच आवडते. चिवडा, पोहे, उपमा, मिसळ यांसारख्या पदार्थांवर शेव पेरून खाल्ल्यामुळे त्या पदार्थांची चव आणखीनच वाढते. अशा 
या खमंग शेवेचे विविध नावीन्यपूर्ण प्रकार..

साधी शेव
साहित्य - दोन वाट्या हरभरा डाळीचे पीठ, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ, हिंग चवीप्रमाणे, २ टीस्पून ओव्याची बारीक पूड, मोहनासाठी १ टेबलस्पून तेल, तळणीसाठी तेल.
कृती - ओव्याची पूड मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण मिक्स करावे. ओवा पुडीमध्ये पाणी घालून ते पाणी पिठात घालावे. आवश्यक तेवढे पाणी घ्यावे. पीठ कणकेसारखे भिजवावे व शेव पात्रात घालून शेव पाडावी. तापल्या तेलात तळावी. शेव टाकताना गॅस बारीक करावा व शेव टाकल्यावर आच मध्यम करून शेव तळावी. शेव छान कुरकुरीत होते.      
    
पालक शेव
साहित्य - तीन वाट्या स्वच्छ धुऊन चिरलेला पालक, १ टीस्पून जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, ५ ते ६ वाट्या हरभरा डाळीचे पीठ, १ टेबलस्पून मोहनकरिता तेल, तळणीसाठी तेल.
कृती - चिरलेला पालक वाफवून घ्यावा. नंतर पालक व हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून पेस्ट करून घ्यावी. त्या पालक पेस्टमध्ये जिरे पूड, मीठ, मोहन घालून सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यात मावेल तेवढे पीठ घालून मिश्रण घट्ट मळावे. गरम तेलात शेव पात्रातून शेव पाडून तळून घ्यावी.

बिकानेर शेव
साहित्य - अर्धा किलो हरभरा डाळ, अर्धा किलो मटकी डाळ - दोन्ही एकत्र दळून आणणे. २ टीस्पून मिरपूड, २ टीस्पून लवंग पूड, पाव टीस्पून सोडा, चवीनुसार मीठ, तिखट पूड, अर्धी वाटी गरम तेलाचे मोहन, तळणीसाठी तेल. 
कृती - मिरपूड व लवंग पूड अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी. दोन्ही पिठे एकत्र करावी. त्यामध्ये मीठ, तिखट, तेलाचे मोहन, सोडा घालावा. नंतर लवंग मिरपुडीचे पाणी गाळून घेऊन त्यामध्ये पीठ भिजवावे. मध्यम ताटलीने शेव पाडून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावी.

लसूण शेव
साहित्य - चार वाट्या डाळीचे पीठ, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १५ ते २० लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, २ टीस्पून ओव्याची बारीक पूड, १ टेबलस्पून तेल, तळणीसाठी तेल.
कृती - लसूण व मिरची मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावी. त्यामध्ये पाणी घालावे, नंतर ते पाणी गाळून घ्यावे. ओवासुद्धा पाण्यात घालून गाळून घ्यावा. पिठामध्ये मीठ, हिंग, गरम तेल, लसूण-ओव्याचे पाणी घालून पीठ कणकेसारखे भिजवावे. हवे असल्यास पाणी वापरावे. शेव पात्रात पीठ घालून गरम तेलात शेव तळावी.

चटपटीत ग्रीन शेव
साहित्य - एक वाटी भिजवलेले हिरवे चणे, सव्वा ते दीड वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, २ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, तळणीसाठी तेल.
कृती - हिरवे चणे व पाव वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. एका कढईत बारीक केलेले मिश्रण परतून मिश्रण घट्ट करून घ्यावे. मग हे पीठ थंड करून त्यामध्ये बेसन पीठ, हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, मीठ, ओवा पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हवे असल्यास पाण्याचा हात लावून मिश्रण मळून घ्यावे. हे पीठ शेव साच्यामध्ये भरून शेव तेलात पाडून तळून घ्यावी.
टीप - आवडत असल्यास थोडी पुदिना व कोथिंबीर पेस्टही वापरू शकता.

गाठी शेव
साहित्य - अडीचशे ग्रॅम फरसाण पीठ (बाजारात मिळते), अर्धा टीस्पून ओव्याची पूड (जाडसर),
३ टेबलस्पून तेलाचे कडकडीत मोहन, अर्धा टीस्पून पापडखार पूड,  
चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती - थोड्या पाण्यामध्ये पापडखार विरघळवून घ्यावा. नंतर सर्व पदार्थ एकत्र करून पीठ भिजवावे. शेव करण्यासाठी बाजारात एक झारा विकत मिळतो. तो कढईवर ठेवून त्यावर पीठ घालून शेव पाडावी व तळून घ्यावी, किंवा सोऱ्यामध्ये जाड शेवेची ताटली लावून त्यातून गाठी शेव करता येईल. फक्त सोऱ्यामध्ये केलेली गाठी शेव जाडीला कमी असते.
          
फाफडा
साहित्य - दोन वाट्या बेसन, २ वाट्या पांढरी उडीद डाळ, अर्धा टीस्पून पापडखार, मीठ, तेल, वरून भुरभुरण्यासाठी लाल तिखट पूड, शिंदेलोण पूड.
कृती - उडीद डाळ बारीक दळून घ्यावी. एक वाटी पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये मीठ व पापडखार  घालावा व चमच्याने ढवळून विरघळून घ्यावे. दोन्ही पिठे एकत्र चाळावीत. मीठ व पापडखाराचे एकत्र केलेले पाणी घालून पीठ घट्ट मळावे. नंतर पीठ चांगले कुटून घ्यावे. त्यानंतर त्याचे गोळे करून घ्यावेत. एक एक गोळा घेऊन पोळपाटावर पातळ लाटून घ्यावा. सुरीने त्याचे लांबट व मध्यम रुंद तुकडे करून घ्यावे. तेल तापत ठेवावे. कडकडीत तेलाची आच मध्यम करून हे तुकडे त्यामध्ये तळावेत. टिशू पेपरवर निथळण्यास ठेवावे. नंतर त्यावर मिरची पूड व शिंदेलोण पूड भुरभुरावी.

कांदा शेव
साहित्य - दोन वाट्या डाळीचे पीठ, १ वाटी कांदा किसून त्याचे फक्त पाणी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, पाव वाटी गरम तेलाचे मोहन, हिंग पूड, तळण्यासाठी तेल.
कृती - डाळीच्या पिठामध्ये तिखट, मीठ, हळद, हिंग पूड घालावे. तेलाचे मोहन घालावे. कांद्याचे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. नंतर शेव सोऱ्यामधून शेव काढून गरम तेलात तळून घ्यावी.

ब्रेडची शेव
साहित्य - दोन वाटी ब्रेडचा चुरा, २ वाट्या पातळ पोह्यांचा चुरा, बारीक केलेली मिरपूड, १ टीस्पून ओवा पूड, १ टीस्पून लवंग पूड, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती - ब्रेडच्या कडा काढून घेऊन त्याचा मिक्सरमध्ये चुरा करावा. तसेच पोह्याचाही चुरा करून घ्यावा. नंतर पोहे आणि ब्रेडचा चुरा एकत्र करावा. त्यामध्ये मीठ, मिरे पूड, ओवा पूड, लवंग पूड मिक्स करावी. कोमट पाण्याने पीठ भिजवावे. शेवपात्रामधून मध्यम ताटलीने गरम तेलात शेव घालावी व तळून घ्यावी.

टोमॅटोची शेव
साहित्य - चार वाट्या डाळीचे पीठ, २ टीस्पून मिरची पूड, १ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन  (इच्छेनुसार), ३ टोमॅटो, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती - टोमॅटो स्वच्छ धुऊन, चिरून शिजवून घ्यावेत. नंतर गाळून त्याचा रस करून घ्यावा, म्हणजेच टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यावी. पिठामध्ये मिरची, मीठ, हिंग व तेलाचे मोहन घालावे. सर्व मिश्रण एकत्र करावे व टोमॅटोच्या रसाने पीठ भिजवावे. गरज लागली तरच पाणी वापरावे. पीठ सोऱ्यामध्ये घालून गरम तेलात शेव पाडून तळून घ्यावी.

शेव खमंग व कुरकुरीत होण्यासाठी टिप्स -

  1. पीठ ताजे असावे.
  2. पीठ बारीक चाळणीने चाळलेले असावे.
  3. शेवेमध्ये घालायचे मसाले बारीक चाळणीने चाळून घालावेत. पीठही दोनदा चाळावे, म्हणजे शेव हलकी होते.
  4. शेवेचे पीठ जास्त घट्ट असू नये कारण शेव करण्यास त्रास होतो. शेवेचे पीठ जास्त पातळही असू नये, कारण पिठाच्या गुठळ्या पडतात. म्हणून पीठ व्यवस्थित भिजवावे.
  5. शेव तापलेल्या तेलात व भरपूर तेलात तळावी.
  6. शेव पिवळ्या हलक्या केशरी रंगाची खुसखुशीत असावी.
  7. शेव तेलामध्ये टाकल्यावर गॅस मध्यम करावा, नंतर शेव तळावी. शेव कुरकुरीत होते.
  8. शेव करताना पीठ जास्त वेळ भिजवू नये.

संबंधित बातम्या