कुरकुरीत खमंग चिवडा

Supriya Khanis
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

दिवाळीच्या फराळात सर्वांचा लाडका, आवडता असा कुरकुरीत, झणझणीत तिखट असणारा पदार्थ म्हणजे चिवडा. या चिवड्याने फराळातील आपले स्थान अबाधित ठेवले असले, तरी एरवीही करण्यात येतो; मग तो साधा, उपवासाचा किंवा पथ्यकारक असो. अशाच काही खमंग व कुरकुरीत चिवड्याच्या सोप्या पाककृती...

कच्च्या पोह्यांचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा पाव डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, अर्धा पाव भाजून सोललेले दाणे, १२-१५ हिरव्या मिरच्या, १ मूठ कढीपत्ता पाने, पाव किलो मुरमुरे, चवीनुसार मीठ व साखर, १ चमचा गरम मसाला, फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग, हळद वगैरे.
कृती : एका मोठ्या पातेल्यात दीड डाव तेल घ्यावे. तेल तापले की त्यात थोडी हळद घालावी व पोहे घालून परतावे, म्हणजे पोहे कुरकुरीत होतील. बोटांनी चुरडून पहावे. चुरले गेले म्हणजे पोहे खाली उतरवून कागदावर पसरावे. नंतर त्याच पातेल्यात तेल घालून फोडणी करावी. हिंग थोडे जास्त घालावे, मोहरी, हळद, मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. नंतर त्यात खोबऱ्याचे काप टाकावेत. खोबरे गुलाबी रंगावर आले की त्यात कढीपत्ता, डाळे, दाणे, चवीनुसार मीठ व साखर, गरम मसाला घालून जरा ढवळून घ्यावे. मग त्यात मुरमुरे घालून परतावे. परतल्यावर त्यात भाजलेले पोहे घालून ढवळावे व खाली उतरवून ठेवावे.

भाजक्या पोह्यांचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो भाजके पोहे, अर्धा पाव भाजून सोललेले दाणे, अर्धा पाव डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, ८ ते १० मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, १ चमचा काळा मसाला, फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग वगैरे.
कृती : प्रथम जास्त तेलाची फोडणी करून त्यात हिंग, हळद, मोहरी घालावी. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता पाने, खोबऱ्याचे काप घालावेत व परतावे. खोबरे लालसर झाले की त्यात डाळे, दाणे, चवीनुसार मीठ, साखर व मसाला घालून चांगले ढवळावे. त्यावर पोहे घालावेत व जरा परतावे. हा चिवडा लवकर होतो व छान लागतो.

बेस्ट चिवडा
साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा पाव भाजून सोललेले दाणे, अर्धा पाव डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, १ चमचा जिरे, १३-१५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
कृती ः प्रथम पोहे भाजून घ्यावेत. कुरकुरीत झाले की गॅसवरून खाली उतरवावेत. जिरे, खोबऱ्याचा कीस थोडे पाणी घालून वाटून घ्यावा. मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. नंतर चवीनुसार मीठ, साखर, मिरच्यांचे तुकडे, जिरे, खोबऱ्याचा वाटलेला कीस घालून परतून घ्यावे. नंतर खोबऱ्याचे काप घालून परतावे. थोडे परतल्यावर डाळे, दाणे व भाजलेले पोहे घालून चांगले हलवावे. हा चिवडा तिखटच चांगला लागतो.

तळलेल्या पोह्यांचा चिवडा
साहित्य : अर्धी वाटी जाड पोहे, १ वाटी भाजून सोललेले दाणे, अर्धी वाटी डाळ, १ वाटी खोबऱ्याचे काप, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम पांढरे तीळ, आवश्यकतेनुसार काजू, बेदाणे, चवीनुसार मीठ व पिठीसाखर, तिखट, कढीपत्ता, हिंग, हळद, तेल.
कृती : प्रथम कढईत तेल तापवून त्यात गाळणीमधून शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, डाळ, काजू, बेदाणे तळून घ्यावेत. नंतर त्याच तेलात जाड पोहे व कढीपत्ता तळून घ्यावा. खसखस व तीळ जरा भाजून घ्यावे. नंतर कागदावर सर्व जिन्नस एकत्र करावे. म्हणजे जास्तीचे तेल निघून जाते. नंतर त्यावर तिखट, हळद, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून मिश्रण एकसारखे करावे.

पांढरा चिवडा
साहित्य : पाव किलो पातळ पोहे, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे, ७-८ लाल मिरच्या, १ चमचा पांढरे तीळ, थोडा कढीपत्ता, फोडणीसाठी हिंग, जिरे, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीसाठी तूप, तळण्यासाठी तेल.
कृती : मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत घालावी. भिजत घालताना त्यात वालाएवढी तुरटी घालावी. नंतर डाळ उपसून कपड्यावर कोरडी करून घ्यावी. तेलामध्ये डाळ तळून घ्यावी. डाळ आदल्या दिवशी तळून  
ठेवली तरी चालते. नंतर पोहे परतून घ्यावे. कुरकुरीत झाले की कागदावर पसरावे. खोबऱ्याचा कीस परतून घ्यावा. डालडा तुपाची हिंग, जिरे घालून फोडणी करावी. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालून थोडे परतावे व शेंगदाणे घालून ढवळावे. नंतर खाली उतरवून त्यात भाजलेले पोहे, चवीनुसार मीठ, साखर व सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस घालून एकत्र करावे. मिश्रण थोडावेळ परतावे. खाली उतरवून त्यात तळलेली डाळ घालून एकसारखे करावे.

चुरमुऱ्याचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो मुरमुरे, अर्धा पाव खारे दाणे, अर्धा पाव फुटाणे (पिवळे चणे), चवीनुसार मीठ व साखर, तिखट, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य - हिंग, हळद, मोहरी वगैरे, तेल, १ मोठा चमचा मेतकूट.
कृती : मोठ्या पातेल्यात बेताचे तेल घालून (कढीपत्ता ऐच्छिक) हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर, तिखट घालून खाली उतरवावे. खाली उतरवल्यावर त्यात दाणे, चणे, मुरमुरे घालून ढवळावे व मेतकूट घालून एकसारखे करावे. मेतकुटामुळे हा चिवडा चविष्ट लागतो.

भडंग
साहित्य : अर्धा किलो भडंगाचे मुरमुरे, दीड वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, तेल, ४ चमचे मेतकूट, १ चमचा काळा मसाला, २ चमचे लाल तिखट, कढीपत्ता, १ चमचा लवंग व दालचिनी यांची एकत्रित पूड, १ चमचा धने पूड, १ चमचा जिरे पूड, फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावेत. थोड्या कच्च्या तेलात मेतकूट, काळा मसाला, चवीनुसार मीठ, साखर, लवंग दालचिनी पूड, धने जिरे पूड व लाल तिखट घालून एकसारखे करावे. नंतर हा मसाला मुरमुऱ्याला लावावा. पाव वाटी तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता, दाणे, खोबऱ्याचे काप घालून परतावे. नंतर खाली उतरवून त्यात मुरमुरे घालून सर्व एकसारखे करावे. हे भडंग चविष्ट व कुरकुरीत लागतात.

डाळमूठ
साहित्य : अखंड मसूर (हव्या त्या प्रमाणात), चवीनुसार तिखट व मीठ, थोडे आमचूर, थोडे पादेलोण, गरजेनुसार काजू पाकळ्या किंवा मगज बी सोलून. 
कृती : रात्री मसूर भिजत घालाव्यात व सकाळी स्वच्छ धुऊन रोळीत उपसून ठेवाव्यात. कपड्यावर कोरड्या कराव्यात. कढईत गाळणे ठेवून त्यातून मसूर तळून घ्याव्या. काजू पाकळी किंवा मगज बी गुलाबी रंगावर तळावे. तळलेल्या मसुरामध्ये चवीनुसार साखर, मीठ, थोडे आमचूर व पादेलोण, तळलेली काजू पाकळी किंवा मगज बी घालून एकसारखे करावे. नंतर त्यात बारीक शेव मिसळावी. खायला देताना बारीक कांदा व कोथिंबीर घालावी.

कॉर्नफ्लेक्सचा चिवडा
साहित्य : अर्धा किलो कॉर्नफ्लेक्स, अर्धा पाव डाळ, अर्धा पाव भाजून सोललेले दाणे, १ वाटी खोबऱ्याचे काप, १ मूठ कढीपत्ता, १२-१५ मिरच्यांचे तुकडे, ५० ग्रॅम काजू पाकळ्या, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीसाठी डालडा, हिंग, मोहरी हळद.
कृती : मोठ्या पातेल्यात दीड ते दोन डाव डालडा घालून हिंग, मोहरीची फोडणी करावी. हळद नंतर घालावी. मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, दाणे, डाळ, काजू, मीठ व साखर घालून हलवावे. नंतर कॉर्नफ्लेक्स घालून एकसारखे करावे व मग खाली उतरवावे. हा चिवडा चवीला फारच छान लागतो. डालडावर केल्यामुळे वेगळीच चव येते.

मक्याच्या पोह्यांचा चिवडा
साहित्य : पाव किलो मक्याचे पोहे, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी डाळ, २ मोठे कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, १ चमचा जिरे, १ चमचा धने, ४-५ लवंगा, चवीनुसार मीठ, साखर, तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती : कढईत तापलेल्या तेलात मोठे गाळणे ठेवून त्यात मक्याचे पोहे थोडे थोडे घालून तळावे. खोबऱ्याचे काप, डाळ, दाणे, तळून घ्यावेत. कांदे किसावे व घट्ट पिळून घ्यावे. कांद्याचा कीस तळून घ्यावा. लसूण बारीक चिरावा व तळून घ्यावा. धने, जिरे, लवंग एकत्र करून बारीक पूड करावी.  किसासह पोहे सर्व एकत्र करून त्यावर चवीनुसार मीठ, तिखट, हळद, साखर घालून कालवावे. पोहे फार फुगलेले वाटल्यास थोडे कुस्करावे.

बुंदीचा चिवडा
साहित्य : पाव किलो तयार तिखट बुंदी, अर्धी वाटी शेंगदाणे, ५० ग्रॅम काजूचे तुकडे, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, पाव चमचा सुंठ पूड, तेल, थोडे मीठ व चवीनुसार साखर.
कृती : थोड्या तेलावर दाणे तळावेत व कागदावर पसरावे. काजूचे तुकडे तळून घ्यावेत, खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. खोबऱ्याचा कीस, दाणे, काजू तुकडे, सुंठ पूड, गरजेनुसार मीठ व चवीनुसार साखर घालून एकसारखे करावे. (तिखट बुंदीमध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ त्यानुसारच घालावे.) वरील मिश्रणात तिखट बुंदी घालून कालवावे. पार्टीसाठी हा एक वेगळ्या प्रकारचा चिवडा तयार होतो.

मिसळीचा - कडधान्यांचा चिवडा.
साहित्य : अर्धा किलो जाड पोहे, अर्धी वाटी हिरवे मूग, अर्धी वाटी काबुली चणे, अर्धी वाटी हिरवे वाटाणे, अर्धी वाटी हरभरा डाळ, १ वाटी शेंगदाणे, आवश्यकतेनुसार काजू, बेदाणे, १ चमचा खसखस, थोडा कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, तिखट, चवीनुसार मीठ, साखर, तळण्यासाठी तेल.
कृती : आदल्या दिवशी सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगवेगळे भिजत घालावेत. सकाळी चाळणीवर उपसून कपड्यावर पसरून कोरडी करून घ्यावीत. नंतर सर्व कडधान्ये व दाणे वेगवेगळी तळून घ्यावीत. हरभरा डाळ, पोहे, काजू, बेदाणे तळून घ्यावेत. खसखस थोडीशी भाजावी. मोठ्या पातेल्यात तेलाची हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. कढीपत्ता, पोहे घालून ढवळावे व खाली उतरवावे. सर्व तळलेले पदार्थ कागदावर पसरवून जास्तीचे तेल काढून घ्यावे. त्यावर चवीनुसार तिखट, मीठ, साखर व खसखस थोडीशी बारीक करून घालावी व पोहे घालून एकसारखे करावे.

बटाट्याचा उपवास चिवडा
साहित्य : हवे असतील तेवढे बटाटे, गरजेनुसार व आवश्यकतेनुसार दाणे, काजू, बेदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, पिठीसाखर, तळण्यासाठी तूप.
कृती : प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन नेहमीच्या किसणीवर किसून घ्यावे. कीस पाण्यात टाकावा. थोडा थोडा कीस हाताने घट्ट पिळून घ्यावा व कपड्यावर पसरून ठेवावा. नंतर कीस तुपात तळावा. कीस बारीक असल्यामुळे लवकर तळून होतो. नंतर दाणे, मिरच्यांचे तुकडे, काजू, बेदाणे तळून घ्यावेत. तळलेल्या किसामध्ये वरील सर्व जिन्नस व चवीनुसार मीठ, साखर घालून एकसारखे कालवावे. हा चिवडा थोड्या वेळात होतो व चविष्ट लागतो.

फणसाचा चिवडा
साहित्य : कच्च्या फणसाचे पाहिजे तेवढे तुकडे, दाणे, सुक्या खोबऱ्याचा कीस, चवीनुसार तिखट, मीठ साखर, तूप.
कृती : प्रथम फणस जाड किसणीवर किसून घ्यावा. कीस तुपावर थोडा थोडा बदामी रंगावर तळून घ्यावा. नंतर तळलेल्या किसामध्ये तळलेले दाणे, सुक्या खोबऱ्याचा कीस, चवीनुसार तिखट, मीठ, साखर घालून एकसारखे करावे. उपवासाला नको असेल तर हळद व गरम मसाला घालू शकतो.

नायलॉन साबुदाणा पोह्यांचा चिवडा
साहित्य : पाव किलो नायलॉन साबुदाण्याचे पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, तळण्यासाठी तूप, चवीनुसार मीठ, साखर, ८-१० मिरच्यांचे तुकडे.  
कृती : प्रथम पोहे कढईत चाळणी ठेवून तुपात तळून घ्यावेत. तळलेले पोहे कागदावर पसरवून ठेवावे, म्हणजे जादाचे तूप निघून जाते. नंतर दाणे, मिरच्यांचे तुकडे तळून पोह्यात घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालून एकसारखे करावे.

साळीच्या लाह्यांचा चिवडा
साहित्य : पाव किलो साळीच्या लाह्या, २ चमचे तूप, थोडेसे डाळे, २-३ मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, साखर.
कृती : लाह्या स्वच्छ निवडून घ्याव्यात, फोलपटे काढून टाकावीत. कढईत तूप घेऊन त्यात डाळे, मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. नंतर त्यात साळीच्या लाह्या घालाव्यात व चवीनुसार मीठ, साखर घालून परतावे. कुरकुरीत होऊ द्यावेत. याचप्रमाणे राजगिऱ्याच्या लाह्यांचा चिवडा करता येतो.

फोडणीच्या ज्वारीच्या लाह्या
साहित्य : पाव किलो ज्वारीच्या लाह्या, फोडणीचे साहित्य, पाव वाटी डाळे, पाव वाटी दाणे, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर, तेल, कढीपत्ता.
कृती : प्रथम लाह्या स्वच्छ निवडून व चाळून घ्याव्यात. प्रथम कढईत तेल तापवून घ्यावे. नंतर त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळे, दाणे, मिरच्यांचे तुकडे परतावे व शेवटी लाह्या घालून परतावे. चवीनुसार मीठ, साखर घालून एकसारखे करावे.

काही टिप्स

  • चिवडा जास्त तेलकट झाला, तर त्यात मेतकूट घालावे.
  • चिवड्यामध्ये साखर घालायची असेल तर नेहमीच्या साखरेऐवजी पिठीसाखर वापरावी. पटकन एकसारखी मिसळली जाते. 
  • पातळ पोह्यांचा चिवडा करताना पोहे आधी उन्हात ठेवावे, म्हणजे चिवडा चांगला कुरकुरीत होतो.
  • चिवड्यात तळलेला कांदा घालावयाचा असल्यास कांदा पातळ चिरून उन्हात थोडा वेळ वाळवून घ्यावा व नंतर तळावा.

संबंधित बातम्या