रुंजी घालणारी मानाची करंजी

सुप्रिया खासनीस, चिंचवड
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कोणत्याही शुभकार्यात नैवेद्यात मानाच्या पदार्थाचा मान; मनात रुंजी घालणाऱ्या, शुभशकुनाच्या करंजीचाच होय. दिवाळी फराळामध्ये तर करंजी अग्रस्थानीच हवी. अशाच या मानाच्या करंजीच्या काही गोड व तिखट पाककृती.

साठ्याच्या रंगीत करंज्या
साहित्य ः एक वाटी रवा, १ वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, ४ चमचे डालडा, खाण्याचे हिरवा व केशरी असे दोन रंग
साठ्यासाठी : अर्धी वाटी घट्ट डालडा, पाऊण वाटी कॉर्नफ्लोअर.
सारण : एक वाटी सुके किसलेले खोबरे, २ वाट्या पिठीसाखर, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी कणीक, वेलदोड्याची पूड, चारोळी.
कृती : रवा, मैदा, मीठ व पातळ डालडा एकत्र करून दुधात घट्ट भिजवून तीन तास ठेवावे. थोड्या तुपावर कणीक भाजून घ्यावी व खोबरे किसून मंदाग्नीवर छान भाजून घ्यावे. खसखस भाजून त्याची पूड करावी. वेलची पूड व चारोळी घालून सारण तयार करावे. ताटामध्ये डालडा खूप फेसून घ्यावा. तुपाची कणी मोडली की त्यात थोडे थोडे कॉर्नफ्लोअर घालून साठ्याचा गोळा तयार करावा. भिजलेले पीठ चांगले कुटून घ्यावे. नंतर कुटलेल्या पिठाचे एकसारखे चार भाग करावेत. दोन भाग पांढरे ठेवावे. उरलेल्या एका भागात हिरवा व दुसऱ्या भागात केशरी रंग घालून ते भाग पुन्हा एकसारखे करून घ्यावे. चारही गोळे चांगले कुटून झाकून ठेवावे. नंतर चारही गोळ्यांच्या पोळ्या लाटाव्या. पोळ्या खूप पातळ व खूप जाड लाटू नये. मध्यम असाव्यात. नंतर पहिली पांढरी पोळी घेऊन त्यावर चांगला साठा पसरवून लावावा. त्यावर रंगीत पोळी ठेवावी व त्यावर साठा लावावा. नंतर पुन्हा पांढरी पोळी ठेवावी व त्यावर साठा लावावा. नंतर पुन्हा रंगीत पोळी घेऊन त्यावर ठेवावी व उरलेला साठा त्यावर चांगला लावावा. तयार झालेल्या चारही पोळ्यांची चांगली घट्ट वळकटी करावी. त्याच्या सुरीने पाहिजे त्या आकाराच्या लाट्या कराव्यात व हलक्या हाताने पुऱ्या लाटून त्यात सारण भरून करंज्या तयार करून मंदाग्नीवर तळाव्यात. तळताना झाऱ्याने करंजीवर तूप उडवावे म्हणजे करंजीला छान पदर सुटतात. करंज्या करायला वेळ लागतो पण छान दिसतात.

खजुराच्या करंज्या
साहित्य ः दोनशे ग्रॅम बिन बियांचा खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, १ चमचा खसखस, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, वेलची पूड, दीड वाटी मैदा, पाव चमचा मीठ, २ चमचे तुपाचे मोहन, पुरेसे दूध.
कृती : तूप फेसून घ्यावे. नंतर मैदा, तूप व मीठ एकत्र करून दुधामध्ये पीठ चांगले घट्ट भिजवावे. खसखस, खोबरे भाजावे. खोबरे हाताने कुस्करून घ्यावे खजूर मिक्सरमधून एकदम बारीक वाटावा. मग सर्व एकत्र करून सारण तयार करावे. नेहमीप्रमाणे भिजवलेल्या मैद्याच्या पुऱ्या लाटून, सारण भरून करंज्या तयार कराव्यात. ह्या करंज्या आधी तव्यावर या थोड्या गरम करून घ्याव्यात व नंतर तळाव्यात.

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या
साहित्य ः दोन वाट्या मैदा, पाव वाटी रवा, अर्धी वाटी डालडाचे मोहन, अर्धा चमचा मीठ, जरुरी पुरते दूध.
सारण : दोन वाट्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी खसखस, २ वाट्या पिठीसाखर, वेलदोड्याची पूड.
कृती : खोबऱ्याचा कीस व खसखस मंदाग्नीवर वेगळेवेगळे भाजून घ्यावे. खोबरे हाताने कुस्करून घ्यावे व खसखस वाटून घ्यावी. कणीक थोड्या तुपावर भाजून घ्यावी. नंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात वेलची पूड घालून चांगले एकसारखे सारण करावे. रवा, मैदा व मीठ हे तुपाचे मोहन घालून दुधामध्ये चांगले घट्ट भिजवून ठेवावे. पीठ चांगले तासभर भिजू द्यावे. नंतर पीठ चांगले कुटून घ्यावे. पिठाच्या मध्यम आकाराच्या लाट्या कराव्यात. त्याची पुरी लाटून त्यात सारण भरून करंज्या तयार कराव्यात. कातणाने कडा कापून घ्याव्यात. करंज्या मंदाग्नीवर छान तळाव्यात.

मिक्स फ्रूट जाॅम करंज्या
साहित्य ः एक वाटी रवा,१ वाटी मैदा, ४ चमचे तूप, पुरेसे दूध, १ नारळ, १ चमचा तांदळाची पिठी,१ वाटी तयार मिक्स फ्रूट जाम.
कृती : तेलाचे अगर तुपाचे मोहन घालून रवा व मैदा दुधात चांगला घट्ट भिजवून ठेवावा. खोवलेला नारळ व साखर एकत्र करून शिजवावे. सारण मऊसर होत आल्यावर त्यात तांदळाची पिठी घालून थोडे शिजवावे. सारण गार झाल्यावर त्यात जाॅम घालावा व सारण एकसारखे करावे. जामला वेगळा स्वाद असल्यामुळे वेलची पावडर घालण्याची आवश्यकता नसते. नंतर नेहमीप्रमाणे  रवा मैदा कुटून लाट्या कराव्यात. तयार सारणाच्या करंज्या करून मंदाग्नीवर तळाव्यात.

नारळाच्या करंज्या
साहित्य ः एक वाटी रवा, १ वाटी मैदा, १ नारळ, २ वाट्या साखर, ४ चमचे तूप, १ चमचा तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल अथवा तूप, पुरेसे दूध.
कृती : तेलाचे अगर तुपाचे मोहन घालून रवा मैदा दुधात चांगला घट्ट भिजवावा. तासभर झाकून ठेवावा. नारळ खोवून खोबरे व साखर एकत्र शिजवून मऊसर सारण तयार करावे. शिजताना त्यात एक चमचा तांदळाची पिठी घालावी. वेलची पूड घालून सारण तयार करावे. नंतर पीठ चांगले कुटून घ्यावे. हव्या त्या आकाराच्या लाट्या करून पुऱ्या लाटून त्यात सारण भरून करंज्या कराव्यात. कडा चांगल्या मिटवून त्या कातणाने कापून घ्याव्यात व करंज्या मंदाग्नीवर छान तळाव्यात.

गुलकंदाच्या करंज्या
साहित्य ः एक वाटी रवा, १ वाटी मैदा, पुरेसे दूध, १ नारळ, ४ चमचे तूप, १ चमचा तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल अथवा तूप, अर्धी वाटी गुलकंद.
कृती : तेलाचे अगर तुपाचे मोहन घालून रवा व मैदा एकत्र करून दुधात घट्ट भिजवून तास भर मुरू द्यावा‌. खोवलेले खोबरे व साखर एकत्र शिजवून मऊसर सारण तयार करावे. सारण तयार झाल्यावर त्यात एक चमचा तांदळाची पिठी घालावी व थोडे एकसारखे करून  घ्यावे. गार झाल्यावर त्यात गुलकंद मिसळावा. गुलकंदामुळे वेलचीची आवश्यकता नसते. शिवाय स्वादही सुंदर येतो. नंतर पीठ चांगले कुटून घ्यावे त्याच्या हव्या त्या आकाराच्या लाट्या करून पुऱ्या लाटाव्यात. तयार झालेले सारण भरून करंज्या कराव्यात. कातणाने कडा कापून छान तळाव्यात.

ड्रायफ्रूट करंज्या
साहित्य ः एक वाटी रवा, १ वाटी मैदा, पाव वाटी तूप किंवा तेल, पुरेसे दूध, १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी खारीक पावडर, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, वेलची पूड व हव्या त्या सुक्यामेव्याचे बारीक तुकडे.
कृती : रवा, मैद्यात तेल किंवा तूप गरम करून घालावे. चांगले एकत्र करून दुधामध्ये घट्ट भिजवावे. पीठ तासभर तरी भिजले पाहिजे. खोबऱ्याचा कीस मंदाग्नीवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. गार झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड, पिठीसाखर, व हवे असलेले सुक्या मेव्याचे बारीक केलेले तुकडे घालून सारण तयार करावे व नेहमीप्रमाणे मैदा कुटून घ्यावा. लाट्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून, सारण भरून करंज्या कराव्यात व तळाव्यात.

मक्याच्या करंज्या
साहित्य ः दोन वाट्या मक्याचे दाणे, पाव वाटी भिजलेली मुगाची डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडे सुके किंवा ओले खोबरे, तेल, थोडा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
पारीसाठी : दोन वाट्या मैदा.
कृती : प्रथम तेलाचे मोहन घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवून ठेवावा. एक तास तरी भिजला पाहिजे. मक्याचे दाणे, भिजलेली डाळ, मिरच्या यांचे मिक्सरमधून चांगले दाटसर मिश्रण काढून घ्यावे. नंतर हळद, मोहरी याची फोडणी करावी. त्यामध्ये वरील मिश्रण घालावे. चांगले परतून घ्यावे, झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. मिश्रण चांगले हलवावे. चवीनुसार मीठ घालावे व साखर घालावी. सारण कोरडे होऊ द्यावे. सारणात खोबरे व कोथिंबीर घालून लिंबाचा रस घालावा. नेहमीप्रमाणे भिजवलेल्या मैद्याच्या पारी लाटून त्यात वरील सारण भरून करंज्या करून तळाव्यात.

शेव कांदा करंजी
साहित्य ः दोन वाट्या मैदा,२ वाट्या मध्यम जाडीची शेव, १ मोठा कांदा, तिखट, मीठ, साखर, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाचा रस (ऐच्छिक).
कृती : तेलाचे मोहन घालून मैदा चांगला घट्ट भिजवावा. थोड्या तेलावर फोडणी करून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. गार झाल्यावर त्यात तिखट, मीठ, साखर, कोरडी बारीक चिरलेली कोथिंबीर व शेव घालून एकसारखे सारण तयार करावे. हवा असल्यास आवडीनुसार लिंबाचा रस घालावा. भिजवलेल्या मैद्याच्या नेहमीप्रमाणे पारी लाटून त्यात सारण भरून करंज्या तयार कराव्यात व तळाव्यात.

कोथिंबीर करंजी
साहित्य ः दोन वाट्या मैदा, तेल, हळद, ७-८ हिरव्या मिरच्या, लसूण, १ कोथिंबीर जुडी, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : तेलाचे मोहन व हळद घालून मैदा चांगला घट्ट भिजवून ठेवावा. कोथिंबीर बारीक चिरून धुऊन चांगली निथळून घ्यावी. लसूण मिरचीचे वाटण करून घ्यावे. फोडणीमध्ये लसूण मिरचीचे वाटण घालून थोडे परतावे. नंतर कोथिंबीर चांगली परतून घ्यावी. वाफ येऊन चांगली शिजली की त्यात थोडे थोडे चण्याचे पीठ घालून मोकळी भाजी करावी. चवीनुसार मीठ घालून भाजी गार करत ठेवावी. वरील सारण भरून नेहमीप्रमाणे भिजवलेल्या मैद्याच्या करंज्या तयार कराव्यात. या करंज्याच्या कडा न कापता कडबू सारख्या मुरडल्या तरी चालतात. तयार झालेल्या करंज्या मंदाग्नीवर छान तळाव्यात.

मुगाच्या डाळीची करंजी
साहित्य ः दोन वाट्या मैदा, २ वाट्या मुगाची डाळ, तिखट मीठ, धने, जिरे पूड, ओल्या मिरच्या, आले, लिंबू, कोथिंबीर, ओले खोबरे, तेल, तूप, चवीला साखर.
कृती : मैद्यामध्ये पाव वाटी तेलाचे मोहन व चवीला मीठ घालून मैदा चांगला घट्ट भिजवून ठेवावा. मुगाची डाळ दोन तास भिजत घालावी. तेलाची फोडणी करून त्यावर डाळ घालावी. डाळीत थोडे पाणी घालून ती मोकळी शिजू द्यावी. चांगली वाफ आल्यावर गरम असतानाच डावाने ठेचावी. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या, तिखट, मीठ, हळद घालून पुन्हा एकदा चांगली वाफ आणावी. गार झाल्यावर त्यात धने जिरे पूड, चवीला साखर, ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबाचा रस असे सर्व साहित्य घालून सारण तयार करावे. नंतर नेहमी प्रमाणे मैदा कुटून त्याच्या लाट्याच्या पुऱ्या करून त्यात सारण भरून करंज्या कराव्यात. मंदाग्नीवर तळाव्यात.

मटार करंजी
साहित्य : दोन वाट्या मटार दाणे, तेल, जिरे, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या, धने पूड, ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीला मीठ व साखर. 
पारीसाठी ः एक वाटी मैदा, १ वाटी रवा, २ चमचे बेसन, अर्धा चमचा ओवा, दूध.
कृती : मैदा, रवा व बेसन चांगले एकत्र करून त्यात तेलाचे अगर तुपाचे मोहन घालावे. अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घालावा. पीठ दूध किंवा पाण्याने घट्ट भिजवून ठेवावे व झाकून ठेवावे. मटार दाणे मिक्सरमधून भरडसर वाटून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग, हळद व वाटलेली मिरची घालावी. भरडसर मटार त्यावर परतून घ्यावे. वाफ येऊन थोडे शिजल्यावर धनेपूड मीठ व साखर घालून आणखी एक वाफ द्यावी व नंतर खाली उतरवून ठेवावे. गार झाल्यावर त्यात कोथिंबीर, खोवलेले खोबरे व लिंबाचा रस घालावा. नेहमीप्रमाणे भिजवलेले पीठ कुटून घ्यावे व त्याच्या पुऱ्या करून त्यात थंड झालेले सारण भरावे व करंज्या कराव्यात. मंद आचेवर तळून काढाव्यात.

बाखर - मसाला करंजी
साहित्य : दोन वाट्या मैदा, २ चमचे बेसन, दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खसखस, पाव वाटी तीळ, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, धने, जिरे पूड, हिंग, १ चमचा काळा मसाला, तेल, शेव.
कृती : मैदा व बेसनामध्ये तीन चमचे तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. खोबरे, खसखस व तीळ स्वतंत्र भाजावे. खोबरे हाताने कुस्करून घ्यावे, तीळ कुटून घ्यावेत. खोबरे, तीळ, खसखस, काळा मसाला, धने, जिरे पूड, साखर घालून चांगले कालवावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. कोथिंबीर पूर्ण कोरडी असावी. थोडी शेव घालून सारण एकसारखे करावे. नंतर मैदा कुटून घ्यावा व नेहमीप्रमाणे सारण भरून करंज्या तयार कराव्यात व तळाव्यात.

चणा डाळ करंजी
साहित्य : दोन वाट्या मैदा, २ वाट्या चणा डाळ, ७-८ ओल्या मिरच्या कोथिंबीर, तेल, मीठ, साखर, ओले खोबरे, फोडणीचे साहित्य.
कृती : चण्याची डाळ चार तास भिजत घालावी. मैद्यामध्ये पाव वाटी तेलाचे मोहन घालून थोडे मीठ घालावे व मैदा चांगला घट्ट भिजवून ठेवावा. डाळ चांगली भिजल्यानंतर हिरव्या मिरच्या घालून भरडसर वाटावी. नंतर फोडणी करून त्यावर डाळ परतावी. चांगली वाफ आणावी. चवीनुसार मीठ व साखर घालून पुन्हा वाफ आणावी. चांगली शिजल्यावर उतरवून गार करावी. गार झाल्यावर यात खोबरे कोथिंबीर घालून सारण एकसारखे करावे. नंतर नेहमीप्रमाणे मैद्याच्या पारी लाटून त्यात वरील सारण घालून करंज्या कराव्यात व त्या मंदाग्नीवर छान तळाव्यात.   

संबंधित बातम्या