दिवाळीसाठी काही खास पक्वान्ने 

उमाशशी भालेराव 
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

फराळाचे पदार्थ तयार करून डबे भरून झाले, की मग दिवाळीच्या सणाचे चार दिवस रोज काय पक्वान्न करायचे याचा विचार सुरू होतो. श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी हे जिन्नस नेहमीच केले जातात. यापेक्षा थोडे वेगळे, हटके गोड पदार्थ यंदा करूया. 

१) पाकातल्या पुऱ्या 
साहित्य ः ४ वाट्या बारीक रवा, १ वाटी आंबट दही, ६ वाट्या साखर, अर्धी वाटी तेल, चवीपुरते मीठ, केशर (अथवा खाण्याचा केशरी रंग), तळण्यासाठी तूप अथवा रिफाइंड तेल. 
कृती ः रव्यामध्ये अर्धी वाटी गरम तेलाचे मोहन घालावे. आंबट दही, चवीनुसार किंचित मीठ व जरूर तेवढे पाणी घालून रवा घट्ट भिजवावा. दोन तास तसेच झाकून ठेवावे. नंतर खूप चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे-छोटे गोळे करून नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा थोड्या जाडसर पुऱ्या लाटाव्यात. साखरेचा २ तारी पाक करावा व मंद विस्तवावर ठेवावा म्हणजे पाक गरम राहील. पाक गार झाल्यास तो पुऱ्यांमध्ये शिरत नाही. पाकात केशर वा रंग घालावा व जितकी आंबट-गोड चव हवी असेल त्या प्रमाणात लिंबू पिळावे. पुऱ्या तांबूस रंगावर तळून पाकात सोडाव्यात. दुसऱ्या पुऱ्या तळून होईपर्यंत पहिल्या पुऱ्या पाकात ठेवाव्यात व नंतर ताटात काढून घ्याव्यात. या पुऱ्या दोन-तीन दिवस ठेवल्या तरी चालते. नरम पडत नाहीत. 

२) मालपोवा 
साहित्य ः अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, तूप, दीड वाटी साखर, केशर अथवा खाण्याचा केशरी रंग. 
कृती ः मालपोवा करण्याच्या आदल्या रात्री रवा व मैदा २ चमचे तूप घालून कोमट पाण्यात सैलसर भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी साखरेचा २ तारी पाक करावा. त्यात केशर अथवा खाण्याचा केशरी रंग घालावा. भिजवून ठेवलेले रवा-मैद्याचे पीठ चांगले फेटून घ्यावे. तव्यावर तूप सोडून या पिठाची तळहाताएवढी लहान-लहान धिरडी घालावीत व परतून झाल्यावर पाकात सोडावीत. गरमच सर्व्ह करावीत. 

३) साटोऱ्या 
साहित्य ः १ वाटी रवा व १ वाटी मैदा शिवाय दीड वाटी अगदी बारीक रवा, १ वाटी खवा, २ वाट्या पिठीसाखर, पाव वाटी खसखस, थोडी वेलदोड्याची पूड, तूप. 
कृती ः १ वाटी रवा व १ वाटी मैदा दुधात घट्ट भिजवावा. दीड वाटी बारीक रवा थोड्या तुपावर भाजून घ्यावा. त्यातच खवा घालून भाजावे अथवा खवा वेगळा भाजून त्यात मिसळावा. खसखस भाजून व पूड करून त्यात घालावे. नंतर त्यात वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून सर्व एकत्र मळून त्याचे लहान-लहान लाडू वळून ठेवावेत. भिजवलेला रवा-मैदा छान  
मळून त्याच्या साटोऱ्या जेवढ्या आकाराच्या हव्या असतील त्यामानाने गोळे करावेत. एक गोळी घेऊन त्यात पुरणाच्या पोळीप्रमाणे तयार सारणाचा एक गोळा भरावा व हलक्‍या हाताने तांदळाची पिठी लावून साटोऱ्या लाटाव्यात. या साटोऱ्या तुपात तळाव्यात अथवा तव्यावर तूप सोडून भाजून काढाव्यात. 

४) अननसाचा शिरा 
साहित्य ः १ छोटा अननस, १ वाटी रवा, १ वाटी तूप, १ वाटी साखर, काजू-बदामाचे काप. 
कृती ः तूप गरम करून त्यात गुलाबी रंग येईपर्यंत रवा परतून घ्यावा. त्यात अननसाच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे. त्यात दोन वाट्या गरम पाणी घालून, झाकून मंद विस्तवावर २-३ मिनिटे शिजवावे. नंतर साखर घालून पुन्हा सर्व एकत्र शिजवावे व कोरडे करावे. काजू-बदामाच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे. 

५) त्रिगुणी लाडू 
साहित्य ः १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी उडदाची डाळ व १ वाटी मसूरडाळ, ४ वाट्या साखर, २ वाट्या तूप, चमचाभर वेलची पूड, काजू-बदाम काप, थोडे किसमिस, पाव वाटी दूध. 
कृती ः सर्व डाळी खमंग भाजून मिक्‍सरमधून त्यांचे पीठ करून घ्यावे. चाळून घ्यावे व नंतर ही पिठे तुपात परतून घ्यावीत. डाळी भाजलेल्या असल्याने फार परतावे लागत नाही. साखरेत थोडे पाणी घालून २ तारी पाक करावा. त्यात भाजलेली पिठे, सुकामेवा, वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे व लाडू वळावेत. 

६) पनीरची खीर 
साहित्य ः पाव किलो पनीर, २ चमचे मैदा, आपल्या आवडीप्रमाणे गोड किती पाहिजे त्या प्रमाणात साखर (अंदाजे पाव किलो), बेदाणे, काजू, बदाम, वेलची पूड, केशर. 
कृती ः पनीरमध्ये थोडा मैदा मिसळून चांगले दाबून ठेवावे. अर्ध्या तासानंतर त्याचे लहान-लहान तुकडे करावेत. एका पातेल्यात दुधात साखर घालून दूध आटवण्यास ठेवावे. दूध जरा आटत आले, की त्यात काजू-बदामाचे काप व केशर घालावे. दूध जरा घट्ट झाले, की त्यात पनीरचे तुकडे घालून पुन्हा उकळावे. बासुंदीसारखे घट्ट होताच खाली उतरवून घ्यावे व वेलची पूड घालावीत. पनीरची खीर तयार! 

७) मूग हलवा 
साहित्य ः १ वाटी मूगडाळ, दीड वाटी तूप, १ वाटी साखर, ३ वाट्या दूध, सुकामेवा, वेलची पूड. 
कृती ः मूगडाळ ४ तास भिजवावी. नंतर चाळणीत घालून पाणी पूर्णपणे काढून टाकावे व डाळ मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावी. थोडी रवाळच वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून त्यात वाटलेली डाळ मंद विस्तवावर परतावी. लालसर रंग येईपर्यंत परतावी. याला बराच वेळ लागतो. नंतर त्यात दूध घालून शिजवावे. शिजल्यानंतर त्यात साखर घालावी. दोन्ही एकजीव होऊन साखर विरघळून सर्व घट्ट झाले, की गॅस बंद करावा. वेलची पूड घालावी व सुक्‍यामेव्याने सजवून सर्व्ह करावे. 

८) संदेश 
साहित्य ः अर्धा किलो पनीर (किसून घेणे), १ वाटी साखर, केशर, वेलची पूड, सुकामेव्याचे काप. 
कृती ः कढईत पनीर व साखर एकत्र करून कोरडे होईपर्यंत परतावे. वेलची पूड व केशर घालावे. पनीर कोरडे होताच विस्तवावरून खाली उतरवावे. पनीर थोडे गरम असतानाच त्याचे गोल छोटे गोळे करावेत. जरा चपटे करून त्यावर काजू, बदाम, पिस्ते यांचे काप लावावेत. हा बंगाली पदार्थ सर्वांना खूप आवडतो. 

९) ब्रेडची मिठाई 
साहित्य ः ३ वाट्या ब्रेडचा चुरा, १ वाटी खवलेले ओले खोबरे, १ वाटी खवा, ३ वाट्या साखर, अर्धी वाटी दूध, वेलची पूड, केशर, सुकामेवा. 
कृती ः ब्रेड स्लाईसच्या कडा कापून टाकून द्याव्यात व पांढऱ्या शुभ्र ब्रेड स्लाईसचा मिक्‍सरमधून चुरा करून घ्यावा. खवा मंद आचेवर परतून घ्यावा. ब्रेडचा चुरा, खवलेले खोबरे, साखर व दूध एकत्र करून शिजवावे. घट्ट होत आले, की त्यात परतून ठेवलेला खवा मिसळावा. सर्व नीट एकजीव करून घट्ट होईपर्यंत शिजवावे. वेलची पूड घालावी व सुकामेव्याने सजवून सर्व्ह करावे. 
- मिश्रण ताटात थापून गार झाल्यावर त्याच्या वड्याही करता येतील. वड्यांवर सुकामेवा घालावा. 

१०) शाही टुकडा 
साहित्य ः ब्रेडचे ८ स्लाईस, दीड वाटी साखर, दूध आटवून त्यात साखर घालून केलेली रबडी. रबडी घट्ट करावी. तळण्यासाठी साजूक तूप, काजू-बदामाचे काप वाटीभर. 
कृती ः ब्रेड स्लाईसच्या कडा कापून टाकाव्यात व मध्ये कापून एकाचे दोन त्रिकोणी तुकडे करावेत. हे तुकडे तुपात ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत. दुसरीकडे दीड वाटी साखरेत थोडे पाणी घालून १ तारी पाक करून घ्यावा. त्यात हे तळलेले तुकडे अर्धा मिनीट बुडवून मग ताटात काढून ठेवावेत. जास्तीचा पाक निघून जाईल. नंतर हे ब्रेडचे तुकडे उथळ बशीत कलात्मकतेने मांडून त्यावर रबडी ओतावी. वर काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालून सजवावे व सर्व्ह करावे

संबंधित बातम्या