रोटी, पराठा, कुलचा 

उषा लोकरे 
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

सणासुदीला जेवणात नेहमीपेक्षा वेगळा मेनू असतो. त्यासाठीच नेहमीच्या पोळी, भाकरीऐवजी करता येतील असे पराठे, कुलचे आणि रोटी...

१) भटुरे 
साहित्य ः दोन कप मैदा, १ टेबलस्पून रवा, ४ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा, मीठ. 
कृती ः मीठ, मैदा चाळून घ्यावा. ५ टेबलस्पून पाण्यात रवा  भिजवून घ्यावा. (५ मिनिटे). आता मैद्यात भिजवलेला रवा, दही, तेल, साखर, मीठ, बेकिंग पावडर, सोडा मिसळून मिश्रण नीट कालवून घ्यावे. वरील मिश्रणात थोडे-थोडे पाणी मिसळत आटा मळून गोळा करावा व कपड्याने झाकून ३-४ तास थोड्या गरम ठिकाणी ठेवावा. हा गोळा साधारण दुप्पट आकारात फुलून येतो. आता परत तेलाच्या हाताने पिठाचा गोळा परत मळून मऊसर करावा. या गोळ्यातून मध्यम आकाराचे गोळे करून पुऱ्या लाटाव्यात. तळणीसाठी वापरण्याचे तेल चांगले गरम असावे. त्यामुळे भटुरा छान फुलतो. पुरी मध्यम जाडसर लाटावी. २ कप मैद्याला साधारण १ चमचा ड्राय यीस्ट वापरले जाते. 

२) पुऱ्या 
साहित्य ः १ वाटी मैदा, १ वाटी कणीक, २ टेबलस्पून बारीक रवा, पाव चमचा मीठ व साखर, ४ टेबलस्पून पातळ मोहन तळण्यासाठी रिफाइंड तेल. 
कृती ः सर्व जिन्नस एकत्र करून कोमट पाण्याने पीठ मिळून भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे व परत गोळा नीट मळून मऊसर करावा व मध्यम आकाराचे गोळे करून बेताच्या आकारात पुऱ्या कराव्यात. गरम तेलात एक-एक पुरी सोडावी, वर आलेल्या पुरीची कड झाऱ्याने दाबावी म्हणजे पुरी छान फुगून येते. तिला मग उलटी करून सोनेरी रंगावर खमंग तळावी. 

३) मटार पराठा 
साहित्य ः ३ वाट्या मटाराचे दाणे, मीठ, साखर चवीनुसार, २ चमचे हिरवी मिरची- आले- लसूण एकत्र वाटून पेस्ट, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, तेल, कणीक. 
कृती ः मटाराचे दाणे चांगले मऊ शिजवून त्याचा लगदा करावा. त्यात मीठ, साखर, आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस घालून मिश्रण नीट कालवून घ्यावे. आता या मिश्रणात मावेल एवढी कणीक मिसळून गोळा मळून घ्यावा. ५-१० मिनिटांनी मिश्रणाचे गोळे करून छोटे पराठे लाटून तव्यावर तेल सोडून खमंग भाजावेत. 
- अशाच प्रकारे उकडलेल्या बटाट्याचेही पराठे करता येतात. 

४) पेशावरी पराठा 
साहित्यः २ वाट्या कणीक, २ टेबलस्पून तुपाचे गरम मोहन, मीठ, २ टेबलस्पून दूध. 
सारण ः अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ, अर्धी वाटी पनीर बारीक किसून, १  
बटाटा उकडून लगदा, १ टेबलस्पून आले, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, १ चमचा पुदिना बारीक चिरून, १ चमचा कोथिंबीर बारीक चिरून, तूप/तेल, मीठ व साखर चवीनुसार. 
कृती ः कणीक, मोहन (तूप), मीठ एकत्र करून दूध व पाण्याचे मिश्रण वापरून कणीक चांगली मळून घ्यावी. हा गोळा अर्धा तास झाकून ठेवावा व परत त्याला तेलाच्या हाताने चांगला मळावा. भिजवलेली मुगाची डाळ अगदी कमी पाण्यात बारीक वाटून घ्यावी. त्यात पनीर, बटाट्याचा लगदा व इतर सर्व जिन्नस मिसळून घ्यावे. चवीनुसार मीठ व साखर घालून सारण करावे. कणकेच्या दोन पुऱ्या लाटून एका पुरीवर सारण ठेवून दुसऱ्या पुरीने झाकून कडा दाबून घेऊन जाडसर पराठा लाटावा किंवा कणकेच्या गोळ्याची खोलगट वाटी करून त्यात सारण ठेवून जाडसर पराठा लाटावा. तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूंनी तेल सोडून खमंग भाजावा. 
- पिंडीवाला पराठा करताना त्यात मटार, कलौंजी मिश्रण वापरतात. 

५) कुलचा 
साहित्य ः २ कप मैदा, १ चमचा मीठ, १ चमचा पिठीसाखर, ३ टेबलस्पून बटर, ४ टेबलस्पून दही, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, तेल/ बटर, कलौंजी/ कोथिंबीर व पुदिना बारीक चिरलेला. 
- अडीच कप मैद्याला १ चमचा ड्राय यीस्ट वापरूनही करता येतो. 
कृती ः मैदा, बेकिंग पावडर, सोडा चाळून एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यावा. त्यात मीठ, पिठीसाखर, बटर, दही घालून मिक्‍स करून पिठाचा गोळा करावा. प्रथम हा चिकट असतो. त्याला तेलाच्या हाताने मळून-मळून मऊसर गोळा करावा. हा गोळा ओढला असता तुटणार नाही. त्याला परत तुपाच्या हाताने मळून झाकून १ तासभर ठेवावा. तासाने गोळा मळून त्याचे मोठे ५-६ गोळे करावेत. पोळपाटाला व लाटण्याला तेलाचा हात फिरवून घेऊन गोळा थोडासा लाटावा. त्यावर कलौंजी, कोथिंबीर, पुदिना मिश्रण दाबून परत मोठी पोळी करावी. पोळीच्या उलट्या बाजूला पाण्याचा हात फिरवावा. आता तवा मंद आचेवर गरम करावा. त्यावर उलटी बाजू खाली टाकून तव्यावर कुलचाच्या बाजूने थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून कुलचा अर्धवट भाजावा. नंतर सुलटी बाजू खाली करून तव्यावर परत पाणी शिंपडून झाकण ठेवून कुलचा भाजावा. ताबडतोब खाणार असल्यास दोन्ही बाजूंनी बटर लावून तव्यावर खमंगसर भाजावा किंवा अर्धवट भाजलेले कुलचे ५-६ दिवस घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवता येतात व हवे असतील तेव्हा बटर लावून खमंग भाजूनही खाता येतात. 
- कुलचा यीस्ट घालूनही करता येतो. १ चमचा यीस्ट, १ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ व कोमट पाण्याने २०० ग्रॅम मैदा वापरून पीठ मळून कुलचा तंदूर, ओव्हनमध्ये -- भाजून केला जातो. 

६) नान 
साहित्य ः ३ कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा मीठ, १ कप कोमट दूध, पाव कप दही, १ टेबलस्पून साखर, ३ टेबलस्पून तेल, २-३ चमचे बारीक चिरलेला लसूण/ कलौंजी/ बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर. 
कृती ः मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ एकत्र करून चाळणीने चाळून घ्यावे. त्यात दूध, साखर, तेल, दही एकत्र करून मिश्रण फेटून त्यात साखर पूर्ण विरघळल्यावर मैद्यात मिसळून घ्यावे. आता सर्व एकत्र करून छान मळून गोळा करावा. त्याला तेलाच्या हाताने मळून-मळून मऊसर करावे. (३-४ मिनिटे). आटा मळताना मैदा घालून मळावे. मिश्रण झाकून अर्धा तास ऊबदार ठिकाणी ठेवावे. आता मळून आट्याच्या गोळ्या कराव्यात. मग त्या पोळपाटावर लाटून घ्याव्यात. याला अंडाकृती आकारात लाटावे. वरील भागावर कोथिंबीर, लसूण, कलौंजी दाबावी. आता उलट्या बाजूला थोडेसे पाणी लावून ही उलटी बाजू गरम तव्यावर भाजावी. त्यावर बुडबुडे वर दिसल्यावर त्याला गॅसवर भाजावे. वरून बटर लावून सर्व्ह करावे. 

७) साटोरी 
साहित्य ः २ कप मैदा, १ कप रवा, २ टेबलस्पून तूप (वनस्पती), चवीला मीठ, दूध. 
सारण ः १०० ग्रॅम खवा, २०० ग्रॅम बारीक रवा, २०० ग्रॅम पिठीसाखर, ३ टेबलस्पून खसखस भाजून पूड, १ चमचा वेलची पूड, तूप. 
कृती ः सारण करण्यासाठी रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. त्यात भाजलेल्या खसखशीची पावडर, खवा, पिठीसाखर सर्व नीट मिसळून एकत्र करावे व वेलची पूड घालावी. मिश्रण एकजीव करण्यासाठी थोडेसे दूध घालून मळून घ्यावे. पारीसाठी रवा व मैदा, मीठ घालून कालवावा. त्यातच वितळलेल्या गरम तुपाचे मोहन घालून दुधाने पीठ घट्ट मळून घ्यावे. १ तासानंतर हे पीठ मळून चांगले कुटून घेऊन मऊसर करावे. पिठाच्या गोळीपेक्षा सारणाची गोळी मोठी ठेवून मध्यम पुऱ्या लाटाव्यात. साटोरी प्रथम नुसती भाजावी. नंतर बाजूने तूप सोडून खमंग दोन्ही बाजूंनी भाजावी. 

८) नारळाची पोळी 
साहित्य ः १ वाटी खवलेले खोबरे, अर्धी वाटी साखर, १०० ग्रॅम खवा, अर्धा चमचा जायफळ व वेलदोडा पूड, २ वाट्या कणीक, २ टेबलस्पून तेल मोहन, मीठ चवीला, तूप. 
कृती ः नारळाचा चव मिक्‍सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावा. त्यात साखर घालून मिश्रण मंद आचेवर शिजवून कोरडे करावे. त्यात खवा व वेलदोडा- जायफळ पूड मिसळून सारण करावे. कणकेत तेल, मीठ घालून मऊसर गोळा मळून घ्यावा. अर्धा तास कणीक झाकून मुरू द्यावे. कणकेतून छोटी गोळी घेऊन त्यात सारणाचा गोळा करावा. नंतर पराठा लाटावा. प्रथम मंद आचेवर भाजून नंतर बाजूने तूप सोडून खमंग भाजावा. 

९) सांजोरी 
साहित्य ः २ वाट्या बारीक रवा, २ वाट्या पिवळा धम्मक बारीक चिरलेला गूळ, १ चमचा वेलदोडा पूड, १ वाटी तूप, २ वाट्या कणीक, २ टेबलस्पून तेल, चवीला मीठ, दूध, तांदळाची पिठी. 
कृती ः कणकेत तेल, मीठ घालून दुधाने कणकेचा गोळा मळून घ्यावा. सारणासाठी २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात रवा भाजावा. (खमंग वास येईपर्यंत). आता रव्याच्या दुप्पट पाणी घालून एक वाफ आणावी. त्यात गूळ मिसळून मिश्रण ढवळून घ्यावे व झाकण ठेवून गूळ विरघळून मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवावे. शिरा छान मऊसर शिजला की त्यात वेलदोडा पावडर मिसळावी व मिश्रण थंड होऊ द्यावे. कणकेचा लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा करावा. त्यात शिऱ्याची जरा मोठी गोळी ठेवून कडा बंद करून तांदळाच्या पिठावर पराठा/ पोळी लाटावी. तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडून पोळी खमंग भाजावी

संबंधित बातम्या