रुचकर भाज्या 

मनीषा जोशीराव
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
 

स्टफ्ड सिमला मिरची 
साहित्य : पाव किलो सिमला मिरची, ३ ते ४ उकडलेले बटाटे, अर्धा इंच आले, १ लिंबाचा रस, २ टेबलस्पून तेल, कोथिंबीर, १ टेबलस्पून आले, लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून तिखट, २ ते ३ हिरव्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून चाट मसाला, २ टेबलस्पून ओले खोबरे, १ टेबलस्पून गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी मोहरी, जिरे, थोडासा हिंग व हळद.
कृती : सिमला मिरची मधोमध चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. बटाटे सोलून बारीक कुस्करून घ्यावेत. मीठ, आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक वाटून बटाट्यात एकत्र करावी. लिंबाचा रस, चाट मसाला व गरम मसाला घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. बटाट्याचे एकजीव केलेले मिश्रण कापलेल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यावे. पसरट पॅनमध्ये तेल तापवून घ्यावे व सर्व भरलेल्या मिरच्या त्यामध्ये घालून झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी झाकण काढून मिरच्यांची दुसरी बाजू खमंग भाजून घ्यावी. पुन्हा ५ मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा. खोबरे व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. 


मेथी मटर मलई 
साहित्य : एक जुडी मेथी, १५० ग्रॅम मटार (अंदाजे १ वाटीभर), अर्धा कप दूध, अर्धी वाटी दुधावरची घट्ट साय, १ चमचा गरम मसाला, अर्धा इंच आले (बारीक किसून), १ चमचा साखर, चवीनुसार मीठ, ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक वाटून), २ चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. 
कृती : मेथीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी. उकळत्या पाण्यात चिरलेली भाजी ५ मिनिटे वाफवून घ्यावी. नंतर चाळणीतून सगळे पाणी निथळून घ्यावे. वाफवलेली भाजी चांगली घोटून एकजीव करून घ्यावी. मटार दाणेपण गरम पाण्यात ५ मिनिटे वाफवून निथळून घ्यावेत. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आले-मिरचीची पेस्ट घालून फोडणी करून घ्यावी. हळद घालून पुन्हा परतावी. नंतर त्यात मेथीची भाजी घालून दोन मिनिटे वाफ आणावी. मटार दाणे घालून ५ मिनिटे भाजी परतून घ्यावी. गरम मसाला घालून पुन्हा भाजी परतावी. चवीनुसार त्यात मीठ, साखर घालून थोडे पाणी घालून भाजी उकळू द्यावी. नंतर साय चमच्याने चांगली एकजीव करून घ्यावी व दूध आणि साय घालून भाजी चांगली एकजीव करावी. दूध आणि साय घातल्यानंतर भाजी पुन्हा उकळू नये. 


स्टफ्ड टोमॅटो 
साहित्य : अर्धा किलो टोमॅटो, ३ मोठे कांदे, २०० ग्रॅम पनीर, अर्धी वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे, दीड चमचा गरम मसाला, अर्धा चमचा साखर, १ चमचा आले-मिरची वाटून, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरेपूड, १ चमचा बटर किंवा साजूक तूप, १ लहान कोळसा, २ चमचे तेल. 
कृती : सगळे टोमॅटो स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत. प्रत्येक टोमॅटोवरील एक लहान चकती कापून आतील सगळा भाग काढून घ्यावा. कांदे बारीक चिरून तेलावर किंवा बटरवर परतून घ्यावेत. त्यात थोडे मीठ व मिरेपूड घालून गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पनीर किसून घालावे. खोवलेले खोबरे, कोथिंबीर, वाटलेली आले मिरची पेस्ट व गरम मसाला घालून मिश्रण कालवून घ्यावे. थोडा काढलेला टोमॅटोचा गर आणि थोडी साखर घालून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण सगळ्या टोमॅटोंमध्ये भरून वरून कापलेली चकती परत त्यावर ठेवावी. नंतर पॅनमध्ये तेल घालून सगळे टोमॅटो पॅनमध्ये ठेवावेत. वरून झाकण ठेवून गॅसवर १० मिनिटे ठेवावे. कोळसा गॅसवर फुलवून घ्यावा व एका वाटीत ठेवून ती वाटी पॅनच्या मधोमध ठेवावी. फुललेल्या कोळशावर थोडे बटर घालून ५ मिनिटे पॅनवर ठेवावे. स्टफ्ड टोमॅटो खाण्यासाठी तयार. 


चंदन बटवा 
चंदन बटवा ही एक पालेभाजी आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही बाजी बाजारात मिळते. याची पाने मध्यम आकाराची थोडीशी त्रिकोणी असतात. ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात जरूर खावी. 
साहित्य : एक जुडी चंदन बटवा, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी चणा डाळ, ३-४ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, २ चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, २ ते ३ चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ. 
कृती : चंदन बटव्याची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. डाळ व शेंगदाणे ३-४ तास भिजवून घ्यावेत. चिरलेली भाजी व डाळ, दाणे कुकरला दोन शिट्ट्या काढून पाणी न घालता शिजवून (वाफवून) घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर जिरे, मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. त्यात वाटलेली मिरची व लसूण घालून खमंग परतावे. नंतर शिजलेले डाळ दाणे व भाजी फोडणीस घालून एकत्र परतावे. थोडेसे पाणी घेऊन त्यात बेसन पीठ घालून मिश्रण एकत्र करावे. नंतर कालवलेले बेसन भाजीत घालून चवीनुसार मीठ घालावे. थोडेसे पाणी घालून भाजीला चांगली उकळी आणावी व गॅस बंद करावा. झटपट भाजी तयार. 


वांग्याची भाजी  
ही भाजी अतिशय झटपट व अत्यंत चविष्ट होते. 
साहित्य : पाव किलो भरताची वांगी किंवा छोटीपण चालतात, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, अर्धी वाटी दाण्याचे कूट, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर, १ चमचा मिरचीचे बारीक तुकडे, ४ ते ५ लसूण पाकळ्या ठेचून, २ चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, मीठ चवीनुसार.
कृती : वांगी, कांदे व टोमॅटोचे पातळ काप करून घ्यावेत. कढई किंवा पॅन घेऊन त्यात सर्वप्रथम फोडणी करून घ्यावी. मिरचीचे बारीक तुकडे व लसूण घालावा. त्यावर कांद्याचे काप, वांग्याचे काप व टोमॅटोचे काप यांचा थर लावावा. अजिबात ढवळू नये. त्यावर खोबरे, दाण्याचे कूट, कोथिंबीर बारीक चिरून, मीठ व तिखट घालून झाकण ठेवावे. मंद गॅसवर १२ ते १५ मिनिटे भाजी शिजवून घ्यावी. पाणी अजिबात घालू नये. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. नंतर भाजी ढवळून घ्यावी. खमंग व चविष्ट वांग्याची भाजी वाढायला तयार. 


तोंडल्याची रस भाजी  
साहित्य : पाव किलो तोंडली (मध्यम आकाराची), पाव वाटी दाण्याचे कूट, अर्धी वाटी ओले खोबरे, पाव वाटी कोथिंबीर, पाव वाटी तिळाचे कूट, दीड चमचा तिखट, दीड चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा धनेपूड, एक चमचा गूळ, दीड चमचा चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ. 
कृती : तोंडली उभी चिरून घ्यावीत. एका तोंडल्याचे चार भाग करावेत. खूप बारीक चिरू नये. थोडेसे मीठ घालून व थोडे पाणी घालून कुकरमध्ये वाफवून घ्यावीत. तीन शिट्ट्या कराव्यात. कढईमध्ये तेल तापले की जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मेथीचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. त्यावर वाफवलेली तोंडली, दाण्याचे कूट, तिळाचे कूट, थोडेसे मीठ, गोडा मसाला व धने-जिरेपूड घालून पुन्हा भाजी परतून घ्यावी. त्यात गूळ व चिंचेचा कोळ घालून, १ वाटी पाणी घालून भाजी उकळून घ्यावी. मग खोबरे व कोथिंबीर घालून परत एक उकळी आणावी व गॅस बंद करावा. ही भाजी खूप छान चविष्ट होते.


कच्च्या फणसाची भाजी  
साहित्य : अर्धा किलो कच्चा फणस, १ लहान वाटी शेंगदाणे, दीड वाटी ओले खोबरे, २ चमचे गूळ, २ ते ३ चमचे तेल, १ चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धी वाटी कोथिंबीर, २ अमसुले, दीड चमचा तिखट, २-३ सुक्‍या लाल मिरच्या, १ मोठा चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ. 
कृती : ही भाजी करताना सगळ्यात किचकट काम म्हणजे कच्चा फणस चिरणे. फणस चिरण्याची सगळ्यात सोपी पद्धत सांगते. विळीला किंवा सुरीला गोड्या तेलाचा हात लावून घ्यावा. फणसाच्या पाठीचा भाग न काढताच फणसाचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावेत. कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून ४ ते ५ शिट्ट्या करून फणस शिजवून घ्यावा. असे केल्याने फणस चिरण्याचे किचकट काम अगदी सोपे होते. शेंगदाणे २-३ तास भिजवून घ्यावेत व फणसाबरोबरच कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. नंतर वाफवलेला फणस, पाठीचा भाग काढून बारीक ठेचावा. कढईमध्ये तेल घालावे. तेल तापले की २-३ सुक्‍या मिरच्या, मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात ठेचून घेतलेला फणस, शेंगदाणे घालून परतून घ्यावे. ओले खोबरे, गूळ, मसाला, तिखट, मीठ, अमसूल असे सर्व जिन्नस घालावेत व गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून भाजीला चांगली उकळी आणावी. वरून खोबरे, कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. 


फरसबी
साहित्य : पाव किलो फरसबी, १ वाटी ओले खोबरे, पाव वाटी कोथिंबीर, दीड चमचा खोबरेल तेल, १ चमचा उडदाची डाळ, ४-५ सुक्‍या लाल मिरच्या, १०-१२ कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा गूळ, १ अमसूल, चवीप्रमाणे मीठ. 
कृती : फरसबी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी. कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड चमचा खोबरेल तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात सुक्‍या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने घालून चांगले परतावे. नंतर उडदाची डाळ घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे. हिंग, जिरे, मोहरी व हळद घालून खमंग फोडणी करावी, त्यावर बारीक चिरलेली फरसबी घालून भाजी नीट परतून घ्यावी. थोडेसे पाणी घालून झाकण ठेवावे व ५-१० मिनिटे वाफ आणावी. भाजी शिजल्यावर त्यात ओले खोबरे, कोथिंबीर, गूळ, अमसूल व चवीप्रमाणे मीठ घालावे. पुन्हा ५ ते १० मिनिटे भाजी शिजवून घ्यावी. परत वरून थोडी कोथिंबीर व खोबरे घातले, की भाजी खाण्यासाठी तयार. 
(खोबरेल तेल व उडदाच्या डाळीच्या फोडणीमुळे भाजीची चव खूपच वेगळी व छान लागते.) 


लाल माठ
साहित्य : एक जुडी लाल माठ, ४-५ सुक्‍या लाल मिरच्या, २ ते ३ चमचे उडदाची डाळ, अर्धी मोठी वाटी ओले खोबरे, २ चमचे खोबरेल तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ.
कृती : लाल माठाची पाने निवडून, स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर सुक्‍या लाल मिरच्यांचे तुकडे, जिरे, मोहरी, हिंग, उडदाची डाळ व हळद घालून खमंग फोडणी करावी. शक्‍यतो लोखंडी कढईचा वापर करावा. फोडणी करून झाली, की त्यावर बारीक चिरलेली भाजी घालावी. छान परतून घ्यावी. नंतर त्यात ओले खोबरे घालावे व २-३ वाफा येईपर्यंत झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यावर चवीनुसार मीठ घालून परत एक वाफ आणावी व गॅस बंद करावा. 
(कांदा, लसूण काहीही न वापरतादेखील ही भाजी अतिशय रुचकर लागते. खोबरेल तेलाच्या फोडणीने भाजीला खूप छान चव येते.) 

संबंधित बातम्या