विविधांगी फराळाची संस्कृती

मृणाल तुळपुळे
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
 

आपल्याकडे दिवाळी, संक्रांत, दसरा, होळी असे अनेक सण असतात आणि ते साजरे करण्यामागे काही परंपरा आहेत. यापैकी प्रत्येक सणाला काही खास व पारंपरिक पदार्थ तयार करून त्या सणाची लज्जत वाढवली जाते. फराळ हा दिवाळीतला एक महत्त्वपूर्ण भाग असतो व दिवाळीच्या दिवसात शक्यतो सकाळच्या नाश्‍त्याला सर्वांनी एकत्र जमून फराळ करण्याची आपली परंपरा आहे. त्यावेळी नातेवाईक वा मित्रमंडळींना बोलावले जाते व सर्वजण हसत खेळत फराळाचा आस्वाद घेतात.

दिवाळी जवळ आली, की आपल्याला फराळाच्या पदार्थांचे वेध लागतात. चकल्या, शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळी हे पदार्थ आपण वर्षभर करत असतो; पण अनरसे, करंज्या, चिरोटे असे निगुतीने करण्याचे पदार्थ मात्र शक्यतो दिवाळीत केले जातात. हे सर्व फराळाचे पदार्थ दिवाळीच्या वेळी खाल्ले जातात, हे त्या फराळाचे वैशिष्ट्य आहे.

पूर्वीच्या काळी फराळाच्या वेळी घरी केलेले लाडू, चकली, चिवडा असे पदार्थ ताटात नीट मांडून, ती ताटे टेबलवर ठेवत असत व सर्वजण त्यातल्या पदार्थांचा आस्वाद घेत असत. असे फराळाच्या पदार्थांनी भरलेले ताट आपल्या मित्रमंडळी वा नातेवाइकांकडे पाठवण्याची किंवा दिवाळीत कोणाकडे बोलावले असता, असे ताट घेऊन जाण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार पाळली जाते. ताटाची जागा आता आकर्षक पिशव्यांनी व सजवलेल्या कागदाच्या पेट्यांनी घेतली आहे. मित्रमंडळी व नातेवाइकांना बोलावल्यावर टेबलवर फराळाचे ताट भरून ठेवायची पद्धतदेखील आता मागे पडली आहे. चकली, चिरोटे, शेव असा फराळाचा प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या बशीत वा भांड्यात काढला जातो. 

दिवाळीत दिव्यांच्या जोडीने रांगोळीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आधुनिक फराळाच्या वेळी टेबलवर एखादी पणती लावून तिच्या भोवती व फराळाच्या भांड्यांभोवती फुलांची रांगोळी काढली जाते. फराळाच्या  पदार्थांच्या जोडीने चहा, कॉफी, मिल्कशेक व एखादा ताजा पदार्थ करून त्या फराळाची रंगत वाढवली जाते. ताज्या पदार्थांमध्ये हल्ली मिसळ किंवा चाटचा एखादा पदार्थ करण्याकडे कल दिसून येतो.

भारतातील प्रत्येक प्रांतातील फराळाचे पदार्थ थोड्याफार फरकाने तेच असतात; पण त्यांची नावे वेगवेगळी असतात. आपल्या घरच्या फराळात वेगळेपणा आणण्यासाठी त्यात उत्तरभारतातील पिन्नी व मठरी, दाक्षिणात्य मुरूक्कू, गुजरातमधील फाफडे, हैदराबादची सुतरफेणी, राजस्थानचे घीवर असे इतर प्रांतातील पदार्थ केले जातात. असेच इतर प्रांतातले अनेक फराळाचे पदार्थ आहेत, की त्यापैकी कोणता पदार्थ करावा हा प्रश्‍न पडेल.

आपल्याकडे पांढरे शुभ्र आणि पातळ पापुद्रे सुटलेले खुसखुशीत चिरोटे केले जातात. कधी त्यावर पिठीसाखर घातली जाते, तर काहीवेळा ते पाकातले केले जातात. खाजा हा चिरोट्याचा एक प्रकार म्हणजे बिहार व उत्तराखंडमधील पारंपरिक गोड पदार्थ आहे.

दिवाळीत केला जाणारा करंजी हा प्रकार वेगवेगळ्या प्रांतात विविध प्रकारे केला जातो. आपल्याकडच्या साधी करंजी, साट्याची करंजी, कानवले अशा पदार्थांना उत्तर भारतात गुजिया म्हटले जाते. आपल्या करंजीत ओल्या नारळाचे किंवा सुक्या खोबऱ्‍याचे सारण असते. सुकामेवा व साखर तसेच पुरण भरूनदेखील करंज्या केल्या जातात. पुरण भरलेल्या करंजीला कडबू म्हटले जाते. चंद्रकला हा करंजीचाच एक प्रकार. अर्धगोलाकार करंजी चंद्राच्या एका कलेप्रमाणे दिसते म्हणून तिला चंद्रकला हे नाव पडले आहे. त्याच्या सारणात सुकामेवा, खवा, रवा, साखर हे पदार्थ घातले जातात. 

शेव, चिवडा व लाडूचे तर किती प्रकार केले जातात, त्याची गणतीच नाही. शेव वेगवेगळ्या जाडीची केली जाते व त्यातील अगदी बारीक शेव झीरो नंबरची म्हणून ओळखली जाते. शेवेच्या पिठात पालक, टोमॅटो, चीज असे पदार्थ घालून त्याला वेगळी चव आणि स्वाद दिला जातो. बटाट्याची शेव हा एक शेवेचा खास प्रकार. हाच प्रकार चिवड्याचा व लाडूचा. बटाट्याचा कीस, जाड पोहे, पातळ पोहे, चुरमुरे, साबुदाणा, कॉर्नफ्लेक्स, खारी बुंदी हे पदार्थ वापरून अनेक प्रकारचा खमंग चिवडा केला जातो.

रव्याचे, बेसनाचे, डाळीच्या रव्याचे राघवदास, सुक्यामेव्याचे, खजुराचे, कणकेचे हे काही लाडूचे प्रकार. कणीक व तांदळाचे पीठ साजूक तुपात परतून केलेले दराब्याचे लाडू हा खानदेशात दिवाळीत केला जाणारा खास पदार्थ आहे. दिवाळीत आपल्याकडे अनेक घरांतून मोतीचुराचे लाडू केले जातात. आपले मोतीचुराचे लाडू खुटखुटीत असतात, तर उत्तरेकडे मोतीचूर मऊ असतात.  

खुसखुशीत भाजणीच्या चकल्या परदेशातदेखील प्रसिद्ध आहेत. तांदळाच्या पिठाच्या दाक्षिणात्य चकल्या म्हणजे मुरूक्कू. त्याचेदेखील अनेक प्रकार असतात. गोड व खारे शंकरपाळे हा दिवाळी फराळातला आवडता पदार्थ. खारे शंकरपाळे करताना त्यातदेखील शेवेप्रमाणेच जिरे, पालक, चीज, टोमॅटो असे पदार्थ घातले जातात. नमकपारा व मठरी हे उत्तर भारतात केले जाणारे खाऱ्‍या शंकरपाळ्यासारखेच प्रकार.

बहुतेक सगळे फराळाचे चविष्ट पदार्थ भरपूर गोड व तळलेले असतात. आपल्या तब्येतीविषयी जागरूक असणाऱ्‍यांसाठी किंवा पथ्य म्हणून ज्यांना गोड खायचे नाही अशांसाठी, बेक केलेल्या करंज्या व शंकरपाळे तसेच भट्टीत फुलवलेल्या साबुदाण्याचा व बटाट्याचा चिवडा, खजुराचे लाडू व बर्फी असे अनेक नवीन पदार्थ हल्ली उदयास आले आहेत.

सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात घरी फराळाचे करायला वेळच मिळत नाही. वर्तमानपत्रातून फराळाचे पदार्थ पुरवणाऱ्‍यांच्या जाहिराती येणे सुरू झाल्यावर घरी कोणते पदार्थ करायचे आणि बाहेरून काय काय आणायचे याची आखणी सुरू होते. पूर्वी वाड्यातल्या बायका वा शेजारणी एकत्र येऊन दिवाळीचा फराळ करत असत. आता चार पाच मैत्रिणी मिळून आचारी लावून मोतीचुराचे लाडू, शेव, चिवडा असे पदार्थ करून घेतात. तयार फराळ घेण्याकडेही बऱ्‍याच जणांचा कल दिसून येतो. ज्यांना फराळ स्वतः करायचा आहे त्यांच्यासाठी बाजारात चकली कडबोळीची भाजणी, चिवड्याचा मसाला हे तयार मिळते. त्यामुळे ते पदार्थ करणे सोपे झाले आहे. बऱ्‍याच घरातली मुले कामानिमित्त परदेशात स्थायिक झाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यासाठी परदेशात फराळाचे पदार्थ पाठवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. 

काळानुसार दिवाळी फराळाचे स्वरूप बदलले, फराळाच्या पदार्थांत वैविध्य आले; पण पूर्वापार चालत आलेली दिवाळी फराळाची परंपरा मात्र आजही घरोघरी पाळली जाते. परदेशात स्थायिक झालेले भारतीयसुद्धा दिवाळीतील फराळ व इतर परंपरा तितक्याच काटेकोरपणे पाळतात ही तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. 

संबंधित बातम्या